१८ ऑगस्ट, २०२१

मराठी गझलेतील स्त्री जाणिवा - २

 
      आजकालच्या महागाईच्या युगात पती-पत्नी कमावते असल्याशिवाय संसाराचा गाडा नीट चालत नाही. नोकरी करणारे पुरूष नोकरी करणा-या मुलीलाच पसंती देतात. मुलगी कमावती हवी पण ती ‘मुक्याचा रोल’ करणारी हवी असते. ही मुकी आणि कमावती स्त्री म्हणजे त्याचे हक्काचे बागायती शेतच असते असे म्हणा ना! ज्यावर त्याचा आयुष्यभर मालकी हक्क असतो.

कमावती स्त्री घरात असते शेतावाणी
ओलितातली खुंटत नाही जशी हराळी !

              अशी कमावत्या स्त्रीची अवस्था अमरावतीच्या कविता डवरे 'नीती' मराठी मातीतल्या प्रतिमा वापरून चपखलपणे मांडतात. एकीकडे पुरुषाला कमावती पत्नी हवी असते पण भारतातला जन्मदर सांगतो की आजही मुलगी ‘नकोशी’च आहे. ही भावना पुण्याच्या किर्ती वैराळकर इंगोले आपल्या एका शेरातून व्यक्त करतात –

लांघून उंबऱ्याला ती अंतराळ फिरली
मुलगी तरी जगाला का भार होत आहे

          कल्पना चावला, सुनिता विलियम्ससह जगातील कितीतरी महिला अंतराळातसुद्धा पुरुषांच्या बरोबरीने आपली जबाबदारी पार पाडत आहेत. तरीसुद्धा भारतात मुलगी का नकोशी आहे हा चिंतनाचा विषय आहे. जिजाऊ नसत्या तर खरोखरच शिवाजी राजे जन्मले असते का? ही भावना मीरजच्या डॉ अमिता गोसावी यांना व्यक्त केल्यावाचून राहवत नाही

जन्मायला हवा जर शतकात या शिवाजी
घडवायला हवी ना आधी नवी जिजाई

           खरोखरंच स्त्रीभृणहत्या रोखणं ही काळाची गरज झाली आहे. गर्भलिंगनिदान कायदा असूनही आजही पैशाच्या लोभापायी आपली नीतीमत्ता विकणारे आणि मानवी जन्माला काळिमा फासणारे लोक पाहिले की मन सुन्नं होते. मुलगी नको असलेला पुरूषाचे वागणे इतके विचित्र असते की काहीकारणास्तव पत्नीचा अकाली मृत्यु झाला तर पहिल्या पत्नीच्या चितेची आग थंड होण्याची वाट न पाहता तो दुस-या लग्नासाठी बोहल्यावर चढतो. तेव्हा नागपूरच्या प्रीती जामगडे म्हणतात-

संसार थाटतो तो; नंतर तिच्या नव्याने
कित्येकदा चितेवर ती एकटी जळाली

          पत्नी मरण पावल्यानंतर पुरुष तात्काळ दुसरे लग्न करतो पण पुरूष मरण पावल्यानंतर पत्नीला मात्र आयुष्यभर त्याची विधवा म्हणून जगावे लागते. दोन्ही परिस्थितीत ती मात्र एकटीच जळत राहते. असं असलं तरी अलिबागच्या गझलकारा मनिषा नाईक यांचा शेर वाचला की मनाला हायसं वाटतं –

घराच्या आतली मी रीत आधी मोडली
मुलीला आणलेली ओढणी मी फाडली

              आज समाजात स्त्रीयांच्या स्थितीला काही अंशी स्वतः स्त्रीया सुद्धा जबाबदार आहेत. अनिष्ट चालीरीती, परंपरा पुढे नेण्यामध्ये सुद्धा कळत-नकळतपणे स्त्रीयासुद्धा हातभार लावतात. आज सोशल मिडीयावरून सुद्धा ‘नथीचा नखरा’ सारखे ट्रेंड पाहिले की देवगडच्या डॉ. माधुरी चव्हाण जोशी यांचा शेर आठवतो –

जीभ ओठांआड बाई ठेव कायमची तुझी,
सांगतो आहे नथीचा आकडा नाकातला.....

           आई आपल्या मुलीला कसं बोलावं? कसं रहावं? याचे धडे तिला सतत देत राहते. तिच्यावर सतत स्त्रीत्व बिंबवत राहते. शेवटी तिला आपल्या स्त्रीत्वाचे इतके पाठांतर होऊन जाते की तिला काही शिकवावे लागत नाही. ही भावना व्यक्त करणारा मुंबईच्या स्वाती शुक्ल यांचा शेर हृदयस्पर्शी आहे – 

मी माझ्या स्त्री असण्याचे पाठांतर इतके केले
आईही आता काही, नेमाने शिकवत नाही

     स्त्री गझलकारांच्या गझलांमधे प्रेम भावनासुद्धा हळुवारपणे व्यक्त होताना दिसतात. पुण्याच्या ममता सपकाळ यांच्या गझलेतील प्रेम भावनेचा आविष्कार अत्यंत सुंदर असतो.  

मिटून डोळे उजेड लपता अंधाराच्या आड एकदा
किती अनावर झाले होते वेलीसोबत झाड एकदा

  संध्याकाळचा संधीप्रकाश आणि वेलींनी वेढलेले झाड सगळ्यांनीच पाहिले असेल उपरोक्त शेरामधे व्यक्त झालेला झाड आणि वेलीचा प्रणय अद्भूत आहे. नेहमीच्या प्रतिमा वापरून लिहिलेल्या ममता सपकाळ यांच्या शेराला मुशाय-यांमधे भरभरून दाद मिळत असते. पुसदच्या अल्पना देशमुख नायक याची गझलेतील अभिव्यक्ती अत्यंत सहज आणि सुंदर आहे –

ही चंद्र सूर्य ता-यांची आरास जरी झगमगती
पण तुझ्याविना असणारी ही दुनिया माझी नाही .

  स्त्री आणि पुरूष संसाररूपी रथाची दोन चाके आहेत असे म्हटले जाते. दोघांचेही महत्त्व सारखेच आहे. पण प्रत्यक्षात स्त्री पुरुष समानता हा विषय मात्र भाषणातून पोटतिडकीने मांडण्याचा आणि केवळ मोठमोठे लेख लिहिण्याचाच विषय आहे. एका स्त्रीने ठरवले तर ती संपूर्ण संसाराचा गाडा एकटी ओढू शकते. पण अल्पना देशमुख यांच्या शेराप्रमाणे तिला त्याच्याशिवाय असलेली दुनिया तिची वाटत नाही. ती त्याची जागा कोणालाच देत नाही. 

तुझ्यापायी किती केला तिने त्रागा
दिली नाही व्यथेला मी तुझी जागा

हा गझल चळवळीमधे सक्रीयपणे काम करणा-या कोल्हापूरच्या डॉ. स्नेहल कुलकर्णी यांचा शेर पुन्हा तिच्या जीवनातलं त्याचं स्थान अधोरेखित करतो. हळुवार प्रेमभावनेप्रमाणेच सामाजिक जाणीवही स्त्री गझलकारांच्या गझलेमधे प्रकर्षाने दिसून येते. या गझलकारा केवळ आपल्याच कोषात रमत नाहीत. त्या सभोवतालची परिस्थिती डोळसपणे बघतात. आपले विचार आणि भावना गझलेचा आकृतीबंध पाळून लयीत व्यक्त होतात. बुलढाणा जिल्ह्यातील गझलकारा वंदना पाटील वैराळकर यांच्या गोड गळयातून गझल ऐकताना रसिक मंत्रमुग्ध होऊन जातात. त्यांच्या सामजिक जाणीवेच्या शेरांमधे अनोखी धार असते.  

कितीदा त्याच त्या वाटा जुन्या चोखाळुनी झाल्या
उठा आता चला शोधू पुन्हा रस्ते नवे काही
 
  असे नवे रस्ते शोधण्याचा प्रयत्न अनेक गझलकारांच्या अभिव्यक्तीत आढळून येते. शहाद्याच्या उद्योजिका असलेल्या गझलकारा हेमलता पाटील नवे रस्ते शोधत असतानाच सामाजिक जाणीव सुद्धा आपल्या शेरांमधून व्यक्त करतात. 

क्षणांनो वेळ द्या थोडा मला फुलपाखरू होण्या
प्रथांनी वेढल्या बुरसट जुन्या कोषात आहे मी

              आजच्या स्त्री गझलकारांच्या गझलेतून स्त्री भावविश्वाचे वेगवेगळे पदर सशक्तपणे अभिव्यक्त होताना दिसतात. १९८०-२०२० या काळात अनेक स्त्री गझलकारांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या गझलेतून दिसणा-या प्रतिमा आणि प्रतिकांमधून स्त्रीयांच्या दृष्टीतले जग दिसून येते. मराठी स्त्री गझलकारा फक्त स्त्री विश्वातच रमत नाहीत तर त्यांच्या गझलेमधून विविध मानवी भावना सुद्धा व्यक्त होताना दिसतात. वंदना पाटील वैराळकर( अहमदनगर) , आशा पांडे(नागपूर) , गझलनंदा पाटील, डॉ. संगीता म्हसकर(पुणे), राधा भावे(गोवा), क्रांती साडेकर(नागपूर), अल्पना देशमुख – नायक (पुसद), सुनीति लिमये , कविता क्षिरभागर, अश्विनी आपटे(पुणे), अन्वी आठलेकर(पुणे), अश्विनी विटेकर(सेलु), चंदना सोमाणी (पुणे), निर्मिती कोलते (पुणे), पुजा फाटे(पुणे), भावसुधा (कल्याण), डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे (बुलढाणा), रजनी निकाळजे (भुसावळ), सुहासिनी देशमुख, पुजा भडांगे ( बेळगाव), जयश्री कुलकर्णी ( नाशिक) मीनाक्षी गोरंटीवार(यवतमाळ), शुभदा कुलकर्णी 'मिश्री'(मुंबई), या व आणखी ब-याच नव्याजुन्या गझलकारा स्त्री जाणिवा व्यक्त करणारे आश्वासक गझलेखन करीत आहेत. नवोदित गझलकारांचे गझललेखन पाहता असे वाटते की येणा-या काळात मराठीत उच्च दर्जाची गझलनिर्मिती होईल.
.................

अमोल शिरसाट 
अकोला
९०४९०११२३४

९ टिप्पण्या:

  1. अप्रतिम...हा ही लेख काबिले-तारीफ झालाय..!

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय संवेदनशील लेख... स्त्री जाणिवांच्या वैशिष्ट्यपूर्ण शेरांंच्या विवेचनाने समृद्ध!

    उत्तर द्याहटवा