३० डिसेंबर, २०२०

तारू तुझे किनारी लागायला हवे




                प्रत्येकाची आपली वेगळी आवड असते. आवडीनुसार छंदही जडतात. वयानुसार दृष्टीकोनही बदलतो. तशा आवडी-निवडी बदलतात, छंदही बदलतात. बदल हा निसर्गाचा नियमच आहे. पण एखादी आवड किंवा छंद आयुष्यभर जोपासून त्याच्या धुंदीत जगणं काळाच्या रेट्यात प्रत्येकाला शक्य होत नाही. जबाबदा-यांचं ओझं मान वर काढू देत नाही. सतत एक झापड डोळ्यांना लावून माणूस कुठल्या तरी शर्यतीत धावत सुटतो. मग सरते शेवटी जाणवतं की अमुक एका गोष्टीची आपल्याला फार आवड होती ती करायचीच राहून गेली. आपली आवड आयुष्यभर जपणं ही सोपी गोष्ट नाही. पण रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळच्या कान्हे या गावी ६ मार्च १९३७ रोजी जन्मलेले गझलकार वा.न. सरदेसाई मात्र वयाच्या ८३ व्या वर्षी देखील तितक्याच ताकदीने आपली बालपणापासूनची काव्यलेखनाची आवड अविरतपणे जपत आहेत.

...................................................................................................................................

                   
                    वर्ष सरत आलं की गेलेल्या वर्षाचा लेखाजोखा मांडणे सुरू होते. काय मिळवलं? यापेक्षा काय गमावलं? याची चुटपुट मनाला लागून जाते. आपण कुठे कमी पडलो याची आठवण येते. आपल्या चुका आठवायला लागतात. पण प्रत्येकवेळा आपली चूक असते असंही नाही. आपण आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करतो. पण ऐनवेळी आपल्या हातात आलेले यश हुलकावण्या देते. आणि माथ्यावर बसलेल्या ‘लुझर’ च्या शिक्क्याने आपण हताश होतो. तेव्हा गझलकार वा.न. सरदेसाईंचा शेर जगाला आवर्जून सांगावासा वाटतो –
 

कोणी म्हणेल की, मी हरलो कसा इथे...
तेव्हा जगास सांगा, लढलो कसा इथे !


                    आपण कसे हरलो त्याची चर्चा सगळीकडेच होते. मित्र, नातेवाईक, आपल्याला नको असलेले लोक तो नकोसा विषय आपल्याकडे हटकून काढतात. पण जिंकण्यासाठी केलेले प्रयत्न मात्र कोणीच लक्षात घेत नाही. जग माणसाला सुखाने जगू देत नाही आणि मरूही ! माणूस जन्माला येतो तो एकटाच आणि मरतोही एकटाच त्यामुळे आपल्याच आपला सच्चा सोबती होऊन सावरावे लागते. नव्याने सुरुवात करून मार्गक्रमण करत रहावे लागते. तेव्हा वा.न. सरदेसाईंचा एक शेर सोबत येतो –

मी जुनी टाकून आलो कात माझी
जीवनाची ही नवी सुरवात माझी !


जुनी कात झटकून ‘शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही’ हे स्वतःला सतत सांगत रहावे लागते. कारण नवी सुरूवात करायला वयाचे कुठलेही बंधन नसते. फक्त गरज असते फक्त आपल्या नजरेचा कॅलिडोस्कोप फिरवण्याची ! यावेळी मन, बुद्धी आणि डोळे स्वतःच्या ताब्यात असणे गरजेचे असते. कारण दुस-याचे डोळे लावून जग पाहणे म्हणजे मुर्खपणाचे लक्षण आहे.

मी दुस-यांचे ' डोळे ' लावुनि कशास पाहू ?
जग हे उघड्या डोळ्यांनी मी बघेन म्हणतो !


                              असे आयुष्यभर स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहणारे वा.न.सरदेसाई आजघडीला सुरेश भटांचा सहवास लाभलेले मराठी गझलेतील सर्वात ज्येष्ठ गझलकारांपैकी एक आहेत. त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शब्दांवरची अद्वितीय पकड होय. मराठी गझलेच्या जवळपास सर्वच वृत्त-छंदात त्यांनी गझला लिहिल्या आहेत. छंद कितीही अवघड असो तो त्यांना सहजपणे वश होतो. गझलेचे अनेक उपप्रकार सुद्धा त्यांनी लीलया हाताळले आहेत. ‘रूबाई’ हा गझलेचा उपप्रकार उर्दूचे शायरसुद्धा फारसा हाताळताना दिसत नाहीत. डॉ.राम पंडीत यांच्या मते ‘उर्दूतील पन्नासहून अधिक असलेल्या रुबाईच्या समग्र छंदांमधे त्यांनी मराठीत सर्वप्रथम रुबाया लिहिल्या आहेत. कोणत्याही वृत्तात काव्य रचण्याची क्षमता पाहता सरदेसाईंना गझल छंदशास्त्राचे मोरोपंतच म्हणायला हवे.’ उर्दूतील ‘कतअ’ अर्थात मुक्तकावर सुद्धा त्यांचे प्रभुत्व आहे. वा.न.सरदेसाईंच्या मते मराठीतील मूळ शब्द जसा आहे तसाच कवीने लिहावा, कमीतकमी सूट घ्यावी जेणेकरून भाषेचे सौंदर्य, सौष्ठव, डौल कायम रहातो. त्यांच्या समग्र काव्यात फार कमी वेळा सूट घेतलेली आढळते. शाळेत शिकत असताना आपल्या शिक्षकाच्या सांगण्यावरून हिंदी ओळींचे संस्कृतमधे गणवृत्तातून लीलया अनुवाद करणा-या वा.न.सरदेसाई यांनी अंगाई, अभंग, ओवी, दोहा, बालगीत, भक्तिगीत, भावगीत, लावणी, लोकगीत, हायकू अशा कवितेच्या सर्व प्रकारांमधे लेखन केले आहे हे विशेष!
                                      माझी कविता (कवितासंग्रह; १९८४), आभाळपंख (गझलसंग्रह;२००१), चांदण्यांची तोरणे (गझलसंग्रह; २००३) असे तीन संग्रह नावावर असलेल्या शब्दप्रभू वा.न.सरदेसाई यांच्या समग्र काव्याचा ‘अंगाई ते गझल-रुबाई’ हा संग्रह देखील २००९ साली प्रकाशित झाला आहे. युट्यूबवर तरुणांनाही लाजवेल असे कविता-गझलांचे लाजवाब सादरीकरण करणा-या सरदेसाईंनी नाट्यलेखन, दिग्दर्शन आणि अभिनय सुद्धा केला आहे. त्यांनी धुळ्यातील शहादा येथे 'रंगश्री' नाट्यमंडळाची स्थापना करून नाटकांचे अनेक सुविहित प्रयोगही केले आहेत. ‘त्याची वंदावी पाउले' या त्यांच्या नाटकाला १९७१ साली तृतीय पारितोषिक प्राप्त झाले होते. याबरोबरच त्यांनी 'माता न तू वैरिणी', 'शूऽऽ। शूटिंग चालू आहे...', 'माती गाते गीत आपुले’, 'आम्ही हरलोय.... पृथ्वी जिंकलीय!' (बालनाट्य), 'को जागर्ति?'(बालनाट्य) ही नाटके लिहिली आहेत. यातील काही नाटके अप्रकाशित आहेत आणि ब-याच नाटकांना विविध पुरस्कार प्राप्त झले आहेत.
                              सुरेश भट आणि भाऊसाहेब पाटणकर यांच्यासोबत अनेक मंचांवरून गझलवाचन करणा-या वा.न. सरदेसाई यांना सुरेश भट स्मृती 'गझल' पुरस्कार (अंकूर, अकोला -२००९), कै. मोरेश्वर पटवर्धन स्मृती 'गीतकाव्य' पुरस्कार.. (पार्ले २०१०), 'बांधण' जनप्रतिष्ठान, नवी मुंबई तर्फे जीवन गौरव पुरस्कार' (२०१०), 'साप्ता. लोकगौरव' पुणे तर्फे ग़ज़ल भूषण म्हणून गौरव (२०१४) असे विविध पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहेत. त्यांच्या गझलांचा उत्तर महा. विद्यापीठाच्या एम.ए. द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेशही झाला आहे.
                          वयाच्या ८३ व्या वर्षी सुद्धा तरुणांनाही लाजवेल असा प्रचंड उत्साह असणा-या कल्याणच्या गझलकार वासुदेव नरहर सरदेसाई यांची एक हृदयस्पर्शी रचना अजिंक्य भारतच्या वाचकांसाठी नववर्षाच्या शुभेच्छांसह –

हे का कुणी फुलांना सांगायला हवे,
त्यांनी कसे ऋतूंशी वागायला हवे.

या वादळात माझ्या पुसल्या जरी दिशा,
तारू तुझे किनारी लागायला हवे.

आता जुन्यास कोठे संदर्भ राहिला,
गाणे नव्या युगाचे मज गायला हवे,

विश्वास टाकुनी हे जग शांत झोपले,
मी तांबडे फुटेतो जागायला हवे.


( वा.न.सरदेसाई, २०३, ‘आनंदतीर्थ’, राममंदीरासमोर, पारनाका, कल्याण(प) ४२१३०१, भ्रमणध्वनी- ९८६७१५४५०२)

.................................................

अमोल बी शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा