२५ ऑगस्ट, २०२१

मराठी गझलेतील सामाजिक जाणीव - १


 ‘कविता हा स्वप्नापासून वास्तवापर्यंतचा आणि वास्तवापासून स्वप्नापर्यंतचा  प्रवास असते’. कवी स्वप्नात रमलेला वाटत असला तरी जगाच्या तुलनेत तो अधिक भानावर असतो. त्याची सचोटी त्याला त्याच्या माणुसपणापासून दूर जाऊ देत नाही . त्यामुळे भोवताली घडणा-या  ब-या-वाईट गोष्टींचे प्रतिमा-प्रतिकांच्या स्वरुपातले चित्र त्याच्या कवितेत उभे राहते. अनेक पाश्चात्य तत्ववेत्ते तर असे मानतात की साहित्यकृतीचे मूळ सामाजिक व भौगोलिक परिस्थितीत असते. त्यामुळे कविता सुद्धा भोवतालच्या परिस्थितीचा आरसा असते. गझल हा महत्वाचा काव्यप्रकार असल्याने गझलेच्या दोन ओळींच्या शेरात परिस्थितीवर सटीक भाष्य केलेले आढळते. प्रस्तुत लेख म्हणजे मराठी गझलेत उमटलेल्या सामजिक जाणीवांचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न आहे. 

            गझल ही मितभाषी, नेमकी आणि टोकदार रचना असते. तसेच कमी काळात, कमी शब्दांत अधिक आवेगाने रसिकांच्या मनाचा ठाव घेते हे गझलेचे वैशिष्ट्य आहे. कमी शब्दात व्यक्त व्हायचे असल्याने गझलकाराची जबाबदारी अधिक वाढते. गझलेचा गोळीबंदपणा सैल पडला, तर तिची पडझड निश्चित असते. त्यामुळे गझलकाराला अधिक जबाबदारीने व्यक्त व्हावे लागते. कवितेप्रमाणेच गझलेत गझलकार आपल्या भावना व्यक्त करतो. ही भावनांची अभिव्यक्ती वरवर पाहता वैयक्तिक स्वरुपाची वाटत असली तरी ती वाचणा-याला जवळची वाटते तेव्हा तिला वैश्विक स्वरुप प्राप्त होते. काव्यातून मानवी मनाचे विविध पैलु अधोरेखित होतात. कविता भोवतालच्या सामाजिक स्थितीवरसुद्धा भाष्य करते.  तिची शक्ती व्यवस्थेत परिवर्तन घडवून आणू शकते. मराठी गझलेच्या प्रारंभापासून अनेक गझलकारांनी आपल्या गझलेतील दोन ओळींच्या शेरामधून सामाजिक स्थितीवर भाष्य केले आहे. माधव जुलियन आणि त्यांच्या प्रभावातील काही कविंनी तसा प्रयत्न केलेला दिसून येतो. त्यांच्या प्रभावातील कवी यशवंत (१८९९-१९८५) यांच्या काही रचनांमधे सामाजिक जाणीव दिसून येते -

मिळाव्या स्वाभिमानाच्या सदा शीर्षावरी लाथा
करी जो सारखा हांजी तया तख्तापुढे थारा

         या शेरात मांडलेला विचार आजही तितकाच खरा आहे. स्वाभिमानाने जगणा-यांना लाथा बसतात आणि सत्ताधिशांपुढे हाजी करणा-यांची आजही चलती आहे. त्यानंतरच्या काळातील  कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर या कविंनी सुद्धा गझललेखनाचा प्रयत्न केला. पैकी मंगेश पाडगावकर यांना चांगले गझलतंत्र अवगत होते. त्यांच्या प्रेमकवितांप्रमाणेच सामाजिक आशयाच्या अनेक रचना लोकप्रिय आहेत.

जमाखर्च स्वातंत्र्याचा मांडणार केव्हा?
जाब उंच प्रासादांचा मागणार केव्हा?
प्राक्तनात अस्पृश्यांच्या छळाचीच गाथा
आग आंधळ्या धर्माला लावणार केव्हा ?

            स्वातंत्र्याचा जमाखर्च मांडला गेला पाहिजे. स्वातंत्र्याने समाजाची स्थिती फारशी बदललेली नसल्यामुळे ज्यांच्या हातात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सत्ता एकवटलेली आहे त्यांना जाब विचारला गेलाच पाहिजे. पुढच्या ओळींमधे आधिकच टोकदारपणा आला आहे. अस्पृश्यांच्या वाट्याला छळाचीच गाथा आहे. माणसाला  माणूस न म्हणणा-या आंधळ्या धर्मालाच आग लावली गेली पाहिजे अशी भावना पाडगावकर व्यक्त करतात. मराठी गझलसम्राट सुरेश भटांच्या गझलेत शृंगाररसाप्रमाणेच ताकदीची सामाजिक जाणीव ओतप्रोत भरली आहे.  

पुसतात जात हे मुडदे मसणात एकमेकांना
कोणीच विचारत नाही माणूस कोणता मेला

        मेल्यानंतरही जात माणसाचा पिच्छा सोडत नाही  हे वास्तव उपरोक्त शेरामधून नेमकेपणाने व्यक्त झाले आहे. एखाद्याने त्याच्या जीवनात मानवी कल्याणासाठी अथक परिश्रम केलेले असोत किंवा देशासाठी, समाजासाठी प्राणाची आहुती दिलेली असो तरी सुद्धा मेल्यावरही त्याची जात शोधली जाते. सुरेश भटांप्रमाणेच कळंबचे शेखर गिरी लिहितात -

जरी माणूस आहे तो तरी धर्मावरुन त्याच्या
कुणाला घर कुणाला नोकरी नाकारली जाते!

        घर भाड्याने देणे आहे ही पाटी शहरांमधे सर्रास वाचायला मिळते. पण कुठलीतरी शक्कल लढवून  भाडेकरूची जात हुडकली जाते आणि त्याला तितक्याच अक्कलहुशारीने नाकारले जाते. तसेच नोकरीचे सुद्धा होते. नेमके आपण कोणत्या दिशेला जात आहोत हेच कळत नाही. वरून वरून तर आपण एकमेकांशी फार सौजन्याने वागतो पण गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या शब्दात सांगायचं झालं तर 

बाहेर एकमेका सौजन्य दाखवा रे
आतून सज्ज सारा विश्वासघात आहे.

        असा एकमेकांचा विश्वासघात करण्यासाठी आपण सज्ज असतो. या शेरातून आजची परिस्थिती चित्रित झाली आहे. यापेक्षा जंगलातली हिंस्त्र श्वापदे कितीतरी बरी असतात. समाजात घडणा-या खून, दरोडे,मारामा-या, बलात्काराच्या घटना पाहिल्या की अहमदनगरच्या वंदना पाटील वैराळकर म्हणतात -

गर्दीच श्वापदांची झाली सभोवताली ;
शोधून सापडेना आधार माणसांचा

        सच्च्या कवीला कोणत्याही धर्माच्या आणि जातीच्या चौकटीत बांधता येत नाही. कवी आपले माणुसपण कधीच विसरत नाही. त्यामुळे त्याला सतत माणुस म्हणूण जगणा-यांचा आधार हवा असतो. माणसा-माणसांमधे जिथे प्रेम, आपुलकी जिव्हाळा असतो तिथेच कवीचे मन रमते. परंतु आताच्या काळात प्रेम नावाची गोष्ट  एखाद्या विदर्भातल्या उद्योगाप्रमाणे डबघाईलाच आलेली आहे असे वाटते. ही गोष्ट सिंधुदूर्ग जिल्ह्यातले गझलकार मधुसुदन नानीवडेकर फार सुंदररीत्या मांडतात –  

प्रेम डबघाईला येत आहे तरी
चालवूया महामंडळासारखे

        प्रेम नावाची संकल्पना आता महामंडळासारखीच चालवण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही  महामंडळांची स्थिती आज फार दयनीय झाली आहे. कारण काय असेल तर प्रेमातझालेल्या भेसळीप्रमाणेच इकडेही बोकाळत चाललेला भ्रष्टाचार !  ‘न खाऊंगा न खाने दुंगा’ ही घोषणा तर कुठे हवेत विरली ते तर माहितच नाही पण इतकी बिकट परिस्थिती आली आहे की भ्रष्टाचाराला कायद्यानेच मान्य द्यावी लागेल की काय असे वाटते. सासवडचे शुभानन चिंचकर ‘अरुण’ तर म्हणतात की -  

एवढे देशात माझ्या फक्त बाकी राहिले
भ्रष्ट वागायास द्यावी कायद्याने मान्यता

            असे सद्यस्थितीवरचे भाष्य म्हणजे प्रखर सामजिक जाणीवच आहे. कविता जेव्हा समाजात घडणा-या चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकते तेव्हा त्या जाणीवेच्या मुळाशी ‘माणूस’ हा केंद्रबिंदू असतो. माणसांना होणा-या वेदना जेव्हा कवितेत मांडल्या जातात तेव्हा ती सामाजिक स्वरुपाची असते. कवितेमधे कवीचे भौतिक व्यक्तीमत्व कधीच दिसत नाही. गझलेच्या प्रत्येक शेरात वेगवेगळ्या विषयावरील शेर येऊ शकतात. त्या शेरांमधून गझलकार दिसायला कसा आहे हे कळत नाही पण त्याच्या मनाचे व्यक्तीमत्व मात्र स्पष्टपणे दिसते. त्याच्या जाणीवा किती प्रगल्भ आहेत याचे दर्शन होते. गझलकार हा एक समाजाचाच भाग असल्याने त्याकाळातील समाजिक परिस्थीतीचे त्याच्या परिपूर्ण कविता असलेल्या एका शेरामधून  अवलोकन करता येते.  आज देशात बेरोजगारीचा प्रश्न खूप गंभीर झाला आहे. आज उच्चशिक्षण घेतलेले अनेक तरुण हाताला मिळेल ते काम करत आहेत. आई-वडीलांनी काबाडकष्ट करून खूप शिकवले पण हातात आलेली पदवी नोकरी देत नसेल तर काय कामाची? असा प्रश्न अकोल्याच्या निलेश कवडेंसारखाच  अनेक तरुणांना पडत राहतो -    

देत नाही भाकरी ताटात पदवी
काय कामाची अशी हातात पदवी

(क्रमशः) 
....................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४


                   

३ टिप्पण्या:

  1. व्व्वाह! खूपच सर्वसमावेशक असा मागोवा घेतला आहे आमोल सर, सुंदर झाला आहे लेख!

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा अभ्यासपूर्ण आणि अप्रतिम लेख अभिनंदन

    उत्तर द्याहटवा
  3. उत्तमोत्तम लेख येत आहेत सगळे... खूप शुभेच्छा💐

    उत्तर द्याहटवा