माणसाला लेखन कला अवगत झाली. लेखनातून आपल्या भावना विचार व्यक्त करता येऊ लागले. परंतु जे लिहायचे आहे ते नेमकेपणानं लिहिण्याची कला प्रत्येकाला अवगत नसते. आपल्याकडे असलेली लेखनकला ही एक ताकद आहे ही गोष्ट समजून घेऊन आपल्या लेखणीशी प्रामाणिक राहणारेही खूप कमी लोक आहेत. आपल्या लेखणीशी प्रामाणिक राहून लेखन करणाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे वसंत केशव पाटील! (जन्म – २० मार्च १९४६) त्यांनी कथा, ललित लेख, अनुवाद, कविता, साहित्यसमीक्षा यामध्ये आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी गझललेखनसुद्धा केले आहे. सुरेश भटांना वसंत पाटलांची पूर्ण शक्ती गझलेलाच मिळावी असे वाटत होते.
......................
एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला की माणूस स्वतःला विसरून जातो. ध्यासाच्या मार्गात होणारा त्रासही जाणवत नाही. मंतरलेल्या अवस्थेत मार्गक्रमण सुरू राहते. अनेक यशाची शिखरं सहज पायतळी येतात. पण यशाची शिखरं गाठल्यानं माणूस मोठा होत नसतो. माणसाचं मोठेपण यश संपादन करूनही पाय जमीनीवर राहण्यात असतं. जेष्ठ साहित्यिक वसंत पाटील पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून लेखन करीत आहे. त्यांच्या चतुरस्त्र लेखणीने अनेक साहित्य प्रकारांना स्पर्श केला आहे. त्यांना या काळात अनेक पुरस्कार मिळाले, अनेक सन्मान प्राप्त झाले, परंतु आजही त्यांच्यात मीपणाचा कुठेही लवलेष नाही. जन्मल्यापासून वसंत पाटलांच्या मनाला एक निखारा मात्र कायम डागण्या देत राहिला आहे. अशी एक अंधश्रद्धा समाजात पसरलेली आहे की एखाद्या बाळाचा विशाखा नक्षत्रात जन्म झाला असेल तर आई, बाळ किंवा वडील यांच्यापैकी एकाचा तरी मृत्यु होतो. वसंत पाटलांचा जन्म विशाखा नक्षत्रातला ! त्यांचा जन्म झाल्याबरोबर एक महिन्यांनी त्यांच्या वडीलांचे निधन झाले. कळत्या वयात ही गोष्ट वसंत पाटलांना समजली तेव्हा पासून आपण आपल्या वडीलांच्या मृत्युला जबाबदार आहोत असे वाटून ते खुप दुःखी झाले. भोवतालची गर्दी त्यांना नकोशी वाटू लागली आणि त्यांचा आत्मशोधाचा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम त्यांना कवितेनं आधार दिला. मनातलं साचलेपण शब्दारूपातून कवितेतून उतरू लागलं. सातव्या वर्गात शिकत असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. कथा लिहिण्यामधेही त्यांना विशेष रस वाटू लागला. १९९० साली त्यांचा ‘छप्पर’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहाच्या आजपर्यंत तीन आवृत्त्या देखील प्रकाशित झाल्या आहेत.
महाविद्यालयात शिकत असताना निवडलेल्या विषयांमुळे हिंदी साहित्याचं प्रचंड मोठं दालन वसंत पाटील यांना उपलब्ध झालं. मराठी साहित्य वाचनाची लहानपनापासूनच आवड असल्याने हिंदी साहित्यामधेही ते रमले. हिंदी साहित्याचा मराठीत अनुवाद करावा असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. अनेक हिंदी पुस्तकांचा अनुवाद करणे त्यांनी सुरू केले. हरिवंशराय बच्चन यांचे आत्मचरित्र चार भागांमधे प्रकाशित झाले आहे. यापैकी ‘दशद्वार ते सोपान’ या चवथ्या भागाचा वसंत पाटलांनी मराठीत केलेला अनुवाद खूप गाजला. त्याच्या देखील तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. या पुस्तकाला साहित्य अकादमीच्या १९९५ सालच्या पुरस्काराबरोबरच अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. केवळ हिंदीवर न थांबता इंग्रजी, उर्दू बरोबरच तेलगु, पंजाबी, राजस्थानी या भाषांमधील अनेक पुस्तके त्यांनी मराठीत अनुवादित केली आहेत. तेलगु भाषेतील सुप्रसिद्ध लेखक केशव रेड्डी यांच्या अनेक पुस्तकांचे ‘अखेरचे झोपडे’(२००८), ‘मातीमाय’(२००८), त्याने जग जिंकलं (२०१०, पाच आवृत्त्या) असे त्यांनी केलेले अनुवाद गाजले आहेत. पंजाबी लेखक गुरुदयाल सिंग यांच्या ‘परश्या’(२०१०)या मराठीत अनुवादित कथासंग्रहाच्या सुद्धा पाच आवृत्त्या आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी केलेला इंग्रजी लेखक अरिंदम चौधरी यांच्या एका पुस्तकाचा अनुवाद देखील प्रकाशनाच्या मार्गावर आहे. अशी अनुवादन क्षेत्रातली वसंत पाटील यांची कामगिरी थक्कं करणारी आहे. अनुवादनाबरोबरच त्यांचे 'कंदिलाचा उजेड'(१९९९), ‘पंख फुटीचे दिवस’ (२००८) हे ललितलेख संग्रह आणि 'फाळणी' हा विविध भाषांमधल्या या कथा वेचून तयार केलेला बृहद कथासंग्रह प्रसिद्ध झाला आहे.
कविता आणि तत्वज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे मानणा-या वसंत पाटील यांच्या नावावर दिपराग(२००८), आदिताल आणि इतर कविता (२००८) असे दोन कवितासंग्रह आहेत. 'दिपराग'मधे काही गझला देखील समाविष्ट आहेत. सुरेश भटांशी त्यांचा अनेकदा पत्रव्यवहार होत असे. सुरेश भटांनी त्यांचे चिरंजीव चित्तरंजन भट सांगलीला शिकायला असताना त्यांचे पालकत्व वसंत पाटलांकडेच सोपवले होते. वसंत पाटील यांचे भाषेवरील प्रभुत्व पाहता त्यांनी आपली पूर्ण शक्ती मराठी गझलेलाच द्यावी असे सुरेश भटांना वाटत होते. त्यांच्या लेखनात गझलेला हवी असलेली उत्स्फुर्तता अनेक ठिकाणी दिसून येते.
प्रेतास मीच माझ्या देतो हसून खांदा
आले बघून गेले ते सोयरे मघाशी
किंवा
पोटात घास नव्हता, नाही घरात दाणा
ते गावही परंतु मोठे जिवंत होते
वसंत पाटलांचे असे शेर वाचले की सुरेश भटांचे म्हणणे खरोखरच पटते. आजही त्यांनी गझललेखनात आपली उर्जा ओतली तर एक वेगळे भावविश्व चित्रित करणारी वेगळ्या धाटणीची गझल लिहितील असे राहून राहून वाटत राहते.
वसंत केशव पाटील या व्रतस्थ वाटसरूची एक गझल गझलयात्रेत समाविष्ट व्हायलाच हवी -
छापून लेख आला चर्चा बरीच झाली
लोकांस ते कळाले हेल्यास गाय व्याली.
.
लुंगी धरून कोणी गेली पळून चिंगी
गावात मात्र मागे रक्तात रात न्हाली
.
रस्ता असा कसा हा वाटेवरी गळाला
गोत्यात पाय फसुनी गुडघ्यात मान आली
.
हा रोजचा तमाशा पेंद्या प्रधान झाला
त्याचीच ती तुतारी लोकांस कोण वाली ?
.
ओसाड गाव झाले दुष्काळ 'काळ ' आला
आता घरात येथे साऱ्या घुशी नि पाली
.
होते लपून सोदे बोळात बोलणारे*
काळोख दाटला हा शोधू चला मशाली
(वसंत केशव पाटील,'मंगेशप्रसाद', भोकरे कॉलेज समोर, मिरज रस्ता, मिरज - ४१६४१० भ्रमणध्वनी - ७०२०१४६५८६)
......................
अमोल शिरसाट
९०४९०११२३४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा