अभिव्यक्ती म्हणजे भावना, विचार किंवा संवेदना व्यक्त करणे होय. व्यक्त होणे ही इतर सजीवांप्रमाणेच मानवाची नैसर्गिक गरज आहे. ती स्त्री आणि पुरूष यांच्यासाठी समान असते. पण पुरूषांच्या तुलनेत स्त्रीला आजही व्यक्त होण्याचा समान अधिकार नाही. हे प्राचीन काळापासून चालत आले आहे. प्राचीन भारतीय साहित्यामध्ये स्त्रीयांचे अस्तित्व फार मोजक्या ठिकाणी आढळते. मराठी साहित्यामधे महानुभाव पंथ आणि वारकरी संप्रदायात साहित्य निर्मितीत स्त्रीयांनी भरीव कामगिरी केली आहे. परंतु पुरुषांच्या तुलनेने तशी संख्या कमीच आहे. आधुनिक काळातही अनेक स्त्रीया लिहित्या झाल्या असल्या तरी फार मोजक्या स्त्रीया आपल्या जाणिवा थेटपणे व्यक्त करू शकल्या आहेत. मराठी गझलेचा विचार केला तर फार वेगळी परिस्थिती नाही. मराठी गझलेतही स्त्रीयांची संख्या तशी कमीच आहे आणि गझलेची अंगभूतशक्ती असलेली उत्स्फुर्तता आणि उत्कटता मोजक्याच स्त्रीयांच्या अभिव्यक्तीत अविष्कृत झाली आहे. मराठी गझलेत व्यक्त झालेल्या स्त्री जाणिवांचा मागोवा प्रस्तुत लेखातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
१९८० च्या दशकात सुरेश भटांच्या गझलेचा झंझावात पेटलेला होता. याकाळात अनेक मराठी कवींबरोबर कवयित्रीसुद्धा गझलेकडे वळल्या. यामधे दीपमाला कुबडे, शोभा तेलंग, नीता भिसे, संगीता जोशी, कविता डवरे ह्या प्रामुख्याने होत्या. १९९० पर्यंत काही गझलकारांचे संग्रह सुद्धा प्रकाशित झाले परंतु मराठीतील स्त्री गझलकारेचा संपूर्ण गझला असलेला पहिला संग्रह १९९६ साली प्रकाशित झाला. तो म्हणजे इंदूरच्या शोभा तेलंग यांचा ‘बहरून ये जरासा’ हा गझलसंग्रह. २००० ते २०१० या काळातही स्त्री गझलकारांची संख्या कमीच आहे. २०१० नंतर ही संख्या बरीच वाढली आहे. संख्या कमी असण्याच्या कारणांचा शोध घेतला असता असे दिसून येते की एकतर एकुणच गझल हा काव्यप्रकार क्लिष्ट वाटतो. दुसरे म्हणजे एक कवयित्री जेव्हा कविता-गझल लिहू पहाते तेव्हा तिला आपल्या कौटुंबिक, सामाजिक परिस्थितीचा विचार करून लिहावे लागते. गझलेत पुरूषांना फक्त आकृतीबंधाचे,तंत्राचे बंधन असते परंतु एका स्त्रीला आकृतीबंधाच्या बाहेरच्या बंधनांचा विचार करूनही गझल लिहावी लागते. सर्वप्रथम आपला नवरा त्यानंतर कुटुंब आणि सर्वात शेवटी समाज यांचे दडपण तिच्यावर असते. विशिष्ट आशयाचा शेर किंवा ओळी गझलेत किंवा कवितेत का आल्या? याचे स्प्ष्टीकरण तिला द्यावे लागते. पुरूषप्रधान संस्कृतीत आजही स्त्रीयांना दुय्यम दर्जा आहे हे सत्य नाकारता येत नाही. आणि म्हणूनच स्त्रीयांना साहित्यामधे मनमोकळेपणाने व्यक्त होण्याची मुभा नाही. गझलेतून व्यक्त झालेल्या स्त्री जाणिवा हा खरोखरच एका स्वतंत्र संशोधनाचा विषय असू शकेल. यातून आजच्या समाजातील स्त्रीयांचे स्थान निश्चितच अधोरेखित होऊ शकेल.
प्रतिभासंपन्न मराठी कवयित्री, लेखिका, गीतकार आणि पत्रकार म्हणून नावलौकिक असलेल्या शांता शेळके (१९२१-२००२) यांनी शृंगार रसापासून ते वीररसापर्यंत एकाहून एक कविता आणि गीते लिहिली आहेत. त्या गझलेत व्यक्त होताना म्हणतात –
हे रान चेह-यांचे आहे सभोवती
नाही इथे जिवाचा कोणीच सोबती
एक एकटी स्त्री जेव्हा समाजात वावरते तेव्हा सभोवताली असलेली चेह-यांची गर्दी तिला एखाद्या भयावह जंगलासारखी वाटते आणि अशावेळी तिला जिवाचा सोबती कोणीच नाही. तिच्या मनाची अवस्था वरील ओळींमधे नेमकेपणाने चित्रित झाली आहे. बोच-या नजरांच्या काटेरी जंगलात वावरत आजची स्त्री घराबाहेर पडते. काळ वेगाने बदलत आहे. पण रायगडावरून गडाचे दरवाजे बंद झालेले असताना आपल्या बाळासाठी खोल दरीत उतरून जाणा-या हिरकणीमधे आणि आजच्या नोकरी करणा-या स्त्रीयांमधे काहीच फरक नाही. काळ जरी बदलत असला तरी स्त्रीयांची स्थिती बदललेली नाही. परंतु एखाद्याच हिरकणीची दखल घेतली जाते इतर स्त्रीयांच्या सोसण्याची कुठेच बातमी होत नाही. सोलापूरच्या सुप्रिया मिलिंद जाधव हीच व्यथा आपल्या शेरातून मांडतात –
हिरकणी इतकीच फरपट रोज होते
फक्त अमुचा पाठ अभ्यासात नाही
नोकरी, घर, नातेवाईक सांभाळता सांभाळता आपल्या लेकरांच्या संगोपनाची जबाबदारी सुद्धा आजची स्त्री पेलते. कामावर जाताना जाताना होणारी तिची ओढाताण कोणीच लक्षात घेत नाही. आज मुली मुलांप्रमाणेच उच्चशिक्षण घेतात. मोठ्या हुद्द्यावर काम देखील करतात. उच्चशिक्षित मुलीला आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्याला सन्मानाची वागणूक देणारा नवरा हवा असतो. ही तिची इच्छा रास्त असते पण लग्न झाल्यावर दिवस बदलतात. नव-याचा पुरुषी अभिमान कधी जागा होतो कळत नाही. पण ती मात्र सतत तिच्या अस्तित्वाला वजा करत राहते. पुसदच्या निशा डांगे लिहितात –
वजा स्वतःला करून कायम माझ्यात तुला गुणले
तेव्हा कोठे संसाराचे कोडे सुटले होते
कितीही ठरवले तरी शेवटी संसारासाठी माघार स्त्रीलाच घ्यावी लागते. ती त्याच्याभोवती, त्याच्या मुलांभोवती आयुष्यभर धावत असते परंतु तिचं घरातलं अस्तित्व काय असतं? मग तिला जाणवतं की आपण केवळ मृगजळामागेच धावत आहोत. नाशिकच्या अनिता बोडके लिहितात –
धावत होते त्याच्या मागे तहान घेवुन माझी
अखेर कळले फसवे मृगजळ अवतीभवती माझ्या
स्वतःच्या मीपणाला बाजुला ठेऊन ती त्याच्या भोवती फिरते पण तिच्या पदरात मात्र निराशाच पडते. तिला हेही जाणवतं की आपण एकटेच आहोत. डोंबिवलीच्या गाथा जाधव आयगोळे म्हणतात –
कोंडली देहातल्या कप्प्यात आहे
एक वेडी बाहुली माझ्यात आहे
देहाच्या कप्प्यात एक बाहुली कोंडली असल्याचा भास प्रत्येक स्त्रीला होत असतो. बाहुली म्हटलं की सुप्रसिद्ध नॉर्वेजीयन नाटककार हेनरिक इब्सनच्या ‘ अ डॉल्स हाऊस’(१८७९) या स्त्रीवादी नाटकाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. या नाटकातील ‘नोरा हेल्मर’ या स्त्री पात्रासारखीच आजही स्त्रीची अवस्था आहे असे वाटते. नोरा हेल्मर नाटकाच्या शेवटी आपल्या नव-यासोबत झालेल्या गैरसमजांमुळे घर सोडून निघून जाते. पण प्रत्येक स्त्रीला असं करता येत नाही. ती तिच्या इच्छा मारुन तिच्या नव-याच्या आणि कुटुंबाच्या इच्छाच आपल्या इच्छा आहेत असं मानून मनाच्या आतल्या कप्प्यात एक बाहुली कोंडून जगत राहते. तिला धुळ्याच्या उमा पाटील यांच्या सारखाच प्रश्न पडत राहतो –
सर्वांसोबत असूनही मी कुणाबरोबर नसते..
मी नसल्याने वा असल्याने कधी कुणाचे अडते?
तिच्या असण्यानसण्याने कोणाला फरक पडतो? ती स्वतःचा शोध घेत राहते. आपली मतं, विचार ती कोणावरही लादत नाही. बरेचदा ती घरात, समाजात शांत राहणेच पसंत करते. याचा अर्थ तिला बोलता येत नाही, ती मुकी आहे असा होत नाही. ती निमुटपणे सर्व स्वीकारत राहते. यासाठी तिचे अनेकदा कौतुकही होते. मुंबईच्या नवोदित आश्वासक गझलकारा रत्नमाला शिंदे खूप सफाईदारपणे मुक्याचा रोल करणा-या स्त्रीच्या भावना व्यक्त करतात –
कितीदा एवढ्यासाठी जगाने वाहवा केली
मुक्याचा रोल केला मी, चला हेही बरे झाले
(क्रमशः)
.......................
अमोल शिरसाट
अकोला
छान. सर्वांचीच सर्वंकष नोंद. उत्तम.
उत्तर द्याहटवाबहोत खूब..दुसरा भाग वाचायला निश्चित आवडेल..!गझलेच्या आकृतिबंधासोबतच स्त्रिला बाहेरच्या बंधनाकडेही बघावं लागतं..हे वाक्य कितिही आवडलं तरी शोकांतिका आहे हे विसरता येत नाही..!
उत्तर द्याहटवा