१४ ऑक्टोबर, २०२०

जानवे घालू नका रे विठ्ठलाला

                



             जागतिकीकरणाच्या या युगात जाहिरातींना अवाजवी महत्त्व आले आहे. जाहिरात म्हटली की भंपकपणा आलाच. हा भंपकपणा आजकाल सगळीकडेच दिसतो. पण माणसाचं व्यक्तीमत्व उठून दिसते ते साधेपणानेच! आपण जसे नाही तसे दाखविण्यासाठी करावी लागणारी कसरत माणसाच्या मूळ रूपाला बाधा आणते. आपण जसे आहोत तसे झळाळून व्यक्तिमत्त्व उन्नत करण्याचे काम साधेपणा करीत असतो. मराठी गझल क्षेत्रात साधेपणाने उठून दिसणारं एक व्यक्तीमत्व म्हणजे म.भा.चव्हाण !

    
                    कविता कवीला आत्मिक समाधान देऊ शकते पण पोटाचे खळगे मात्र भरू शकत नाही. पोटाचे खळगे भरण्यासाठी करावी लागणारी कसरत तशी कुणालाच चुकत नाही. वितभर पोट माणसाला नको नको ते करायला लावते. अशात एखादा कवी आपला पूर्णवेळ कवितेला देतो तेव्हा जग त्याला वेड्यात काढते. पण एल.एल.बीची पदवी प्राप्त करून वकीली व्यवसायात मन न रमलेल्या म.भा.चव्हाण यांनी आपल्या आयुष्याची ४० वर्षे साहित्यसेवेसाठी दिलेली आहेत. गांधी विचारांनी प्रभावित होऊन नागपूर विद्यापिठात गांधी विचार पदविका प्राप्त करण्यासाठी गेलेल्या मभांची भेट गझलसम्राट सुरेश भटांशी झाली आणि इथुनंच त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण मिळाले.

                    मराठी साहित्यविश्वात म.भा. म्हणून सुप्रसिद्ध असलेले मच्छिंद्र भागाजी चव्हाण यांच्या गझलेचा महत्वाचा पैलु म्हणजे त्यांचा रोखठोकपणा! ते नेहमी म्हणतात, ‘जो निर्भय असेल तोच चांगली गझल लिहू शकतो.’ हा निर्भयपणा त्यांच्या गझलेमधून व्यक्त होताना दिसतो. ते ठामपणे आपले विचार मांडतात –

ज्ञानदेवांना कसे हे ज्ञात नाही
कोणताही वेद रेडा गात नाही.

                    वारकरी संप्रदायातील संतांनी आयुष्यभर अंधश्रद्धा निर्मुलनासाठी, मानवतेसाठी आपले आयुष्य वेचले. परंतु शोकांतिका ही आहे की संतांच्या जीवनाशी अनेक चमत्कारही जोडले गेले. आजच्या विज्ञानवादी युगात ज्ञानदेवांच्या सांगण्यावरून रेड्याने वेद कसे म्हटले असतील? हा प्रश्न कोणालाही पडू शकतो. वारकरी संप्रदायाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विठ्ठलाच्या वारीत जातीभेदाला स्थान नाही. ‘विठ्ठल हा देव एकेकाळचा लोकदेव असला पाहिजे आणि तो क्रमाने कीर्तिवंत होत गेल्यानंतर त्याचे वैदिकीकरण करण्यात आले’ असे लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ. रा.चिं.ढेरे यांचे मत आहे. अश्या या लोकांच्या देवाला ‘जानवे’ घातले जाते म्हणजे त्याला एका विशिष्ट जातीत बांधले जाते तेव्हा मभांच्या संवेदनशील मनाला बोलल्या वाचून रहावले जात नाही. ते परखडपणे म्हणतात –

जानवे घालू नका रे विठ्ठलाला
त्या बिचा-याला स्वतःची जात नाही

                    खरं म्हणजे जात नाही ती जात असं म्हटलं जाते. ही जात माणसा- माणसामधे दरी निर्माण करण्याचे काम करते. जातीभेद निर्माण करणा-या राक्षसांनी देवालाही जातीत बांधण्याचं काम केलं. या जाती निर्माण करणा-यांशी मभांचे पटूच शकत नाही –
घातले स्वतःला ज्यांनी जातींचे कुंपण आहे
त्या प्रत्येकाशी माझे ठरलेले भांडण आहे

लोकहो, वाचवा तुमची जिंदगी लाख मोलाची
तीर्थाच्या पाण्यामधे रोगाची लागण आहे.
                        असे रोजच्या जगण्यामधले 'असली' संदर्भ आपल्या गझलेतून मांडणा-या म.भा.चव्हणांची गझलेबाबतची भूमिका अगदी स्पष्ट आहे. ते म्हणतात ‘जगण्यात असलीयत असली की गझलेत गझलीयत आपोआप येते’. खरे पाहिले तर ही असलीयत प्रत्येकाच्याच जगण्यात असणे गरजेचे आहे. ओठात एक आणि पोटात दुसरे ठेऊन जगणे म्हणजे केवळ ढोंगीपणा आहे. असे करणे म्हणजे स्वतःला फसविणे आहे. कवी असे जीवन जगूच शकत नाही. जगण्यात असलीयत असलेला प्रत्येकजण स्वतःशी संवाद साधतो आणि म्हणतो –

मी मलाच सांगत होतो, मी मलाच ऐकत होतो
मी माझ्या एकांताशी एकटाच बोलत होतो

आयुष्य संपले केव्हा मज कधीच कळले नाही
मी सुन्या सुन्या बाजारी कोणास पुकारत होतो

                        मभांच्या या ओळी जीवनाशी प्रामाणिक असलेल्या प्रत्येकाच्या आहेत. आजपर्यंत अनेक महापुरूषांनी आयुष्यभर लोकांना सत्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. गाडगेबाबांसारखे संत आयुष्यभर लोकांना ओरडून ओरडून सांगत होते. परंतु स्वतःचा आवाजही ऐकु न येणा-या या बहि-या दुनियेला पुकारत त्यांचे आयुष्य संपून गेले.
                            सामाजिक जाणीव आपल्या गझलेतून परखडपणे मांडणारे मभा प्रेमभाव व्यक्त करताना अत्यंत हळवे होताना दिसतात -
तुझ्या रुपाचा गुलाब ताजा अजून माझ्या मनात आहे
अजूनही मी दवाप्रमाणे गडे तुझ्या पाकळ्यात आहे

                    वरील शेरात ‘तिच्या’ रुपाची तुलना गुलाबाशी केली आहे. यात तसं पाहिलं तर काही नाविन्य नाही. प्रेम करणा-या प्रत्येकाने आपल्या प्रेयसीची तुलना आदीम काळापासून वेगवेगळ्या फुलासोबत केलेली आहे परंतू मभांच्या प्रेमाची अभिव्यक्ती अत्यंत तरल आणि साधीसोपी वाटते. त्यामुळे वरील शेर वाचणा-या प्रत्येकाचा होऊन जातो. त्यांच्या ‘वाहवा’(२००६) या कविवर्य सुरेश भटांनी संपादित केलेल्या संग्रहात अशा अनेक तरल रचना वाचायला मिळतात. संपादकीय मनोगतात भटांनी ‘निखळ मराठी भाषा आणि मराठमोळी अभिव्यक्ती ही चव्हाणांच्या लिखाणाची अंगभूत वैशिष्टे आहेत’ असा त्यांच्या गझललेखनाचा गौरव केला आहे. मभांचा ‘धर्मशाळा’(१९८५) हा कवितासंग्रह देखील सुप्रसिद्ध लेखक व.पु.काळे यांनी संपादित केला आहे. त्यांची ‘शहर पुण्याचा कवी’, 'मभाची गाथा' ही पुस्तके देखील प्रकाशानाच्या मार्गावर आहेत.
                    कवीलाही आपले उपजिविकेचे साधन निवडावेच लागते. म.भा चव्हाणांचा साहित्याकडे कल असल्यामुळे त्यांनी ४० वर्षांपूर्वी पुण्यात ’पृथ्वीराज प्रकाशन’ ही आपली प्रकाशन संस्था सुरू करून अनेक नामवंत साहित्यिकांची पुस्तके प्रकाशित केली आहेत. ही त्यांची साहित्यसेवा सुद्धा मोलाची आहे. त्यांच्या ‘ प्रेमशाळा : कविता दर्शन’ या काव्यवाचनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रात उदंड प्रतिसाद लाभला आहे. अनेक संगीतकारांनी मभांची गीते स्वरबद्ध केलेली आहेत. ते यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार, कुसुमाग्रज स्मृती पुरस्कार, भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार आणि यु आर एल फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत.
गझलकार म.भा. चव्हाणांची एक गझल खास दै. अजिंक्य भारतच्या वाचंकासाठी –

तुझा तसाच गोडवा असेलही नसेलही
तसा उन्हात गारवा असेलही नसेलही

अजून रोज हिंडते नभात एक पाखरू
उदास तोच पारवा असेलही नसेलही

निवांत एकटाच मी निवांत ही तुझी नशा
तुझ्या स्वरात मारवा असेलही नसेलही

किती अनोळखी इथे मला सुगंध भेटती
हवी तशीच ही हवा असेलही नसेलही
(म.भा.चव्हाण)
- अमोल शिरसाट

२ टिप्पण्या: