३१ मार्च, २०२१

'फ्रेंड्स' जुड़ते गए और मैं बावला बनता गया


     कवी आपल्या भावना कवितेतून व्यक्त करतो. पण कवितेला वाचक किंवा श्रोता मिळत नाही तोपर्यंत कवितेला पुर्णत्व येतं नाही. आजकाल सोशल मिडीयामुळे कवितेला सहज वाचक मिळतो, ही कवितेच्या पर्यायाने भाषेच्या विकासासाठी अत्यंत पोषक बाब आहे. पण सवंग प्रसिद्धीसाठी अनेक कवी कविता-गझला लिहिताना दिसतात आणि त्यांना शेकडो लाईक्स आणि कमेंट्सही मिळतात हे चांगल्या कवितेसाठी अत्यंत घातक आहे. कवितेला हाडाचा रसिक मिळणे ही तशी कठिणच बाब आहे. मराठी गझलेचे एक हाडाचे रसिक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं  असे नागपूरचे देवदत्त संगेप हे जगावेगळं रसायन आहे. सोशल मिडियाचा प्रभावीपणे वापर करत ते अनेक उर्दू व मराठी गझलकारांना लिहिण्यासाठी ऊर्जा देत असतात.

  आपल्यावर निरपेक्षपणे प्रेम करणारे लोक फारच कमी असतात. मतलबी दुनियेत जास्तीतजास्त लोक आपला हेतु साध्य करण्यासाठी टपलेले असतात. संधी मिळाली की ते आपला डाव साधून मोकळे होतात. त्यांचे फक्त स्वतःवर प्रेम असते मग कविता तर फारच दूरची गोष्ट आहे. पण स्टेट बॅकेतून निवृत्त झालेले देवदत्त संगेप मात्र मराठी गझलेवर निरपेक्ष भावनेने प्रेम करताना दिसतात. साहित्याला असा हाडाचा रसिक मिळणे जवळजवळ दुरापास्तच आहे. निवृत्तीनंतर अनेक लोकांच्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण होते. वेळ जाता जात नाही अशातच त्यांना एखादा हृदयविकाराचा तीव्र झटका येतो आणि त्यांचे अस्तित्व भिंतीवरच्या फोटोपुरते मर्यादित होऊन जाते. पण निवृतीनंतरचे जीवन म्हणजे जीवनाची सेंकंड इनींग समजाणारे देवदत्त संगेपांसारखे लोक स्वतःला वेगवेगळ्या कामांमधे व्यस्त करून टाकतात आणि जीवनात काहीतरी वेगळे साध्य करतात.
  १९९५ पासूनच संगणकाशी मैत्री  करणा-या देवदत्त संगेपांचा निवृतीनंतर सोशल मिडीयावर मुक्तपणे वावर सुरु झाला. गझल हा काव्यप्रकार त्यांना सुरुवातीपासून आवडायचा. परंतु नोकरीच्या व्यापामुळे वाचनासाठी वेळ मिळत नव्हता. सेकंड इनींग सुरु झाल्यानंतर पुस्तके व सोशल मिडीयावर गझल वाचन व संग्रह सुरु झाला. गझलांचा संग्रह करताना सुद्धा कल्पकता सुरु झाली. संगेपांनी सुरेश भटांचे शेर ‘अ’ पासून ‘ज्ञ’ पर्यंतच्या वर्णाक्षरांनी सुरू होणारे शेर व गझला वर्णमालेनुसार संग्रहित करून ठेवले आहेत. सुरेश भटांबरोबरच महाराष्ट्रातील तमाम गझलकारांचे शेरही वर्णमालेनुसार गोळा करून ठेवले आहेत. सोबतच वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे प्रेम, विरह, आनंद, दुःख, भूक, भाकरी अशा शेकडो विषयांवर आधारित शेर आनि गझला ते नियमितपणे एकत्र करून ठेवतात. अनेक प्रासंगिक विषयांची यात उत्तरोत्तर भर पडत असते. ३०० मराठी शेरांची बैतबाजी अर्थात अंताक्षरी त्यांनी तयार केली आहे.  असे कल्पकतेने करून ठेवलेले संग्रह ते फेसबुकवर नियमितपणे पोस्टही करत असतात. अशा उपक्रमांमुळे गझलकारांना मोठी उर्जा लाभते.
 
         साहित्यिक क्षेत्रात असलेल्या कंपुशाहीपासून मराठी गझलही वेगळी नाही. किबहुंना ती मराठी गझलेत जास्त प्रमाणात असल्याचे लोक म्हणतात. अशी कंपुशाही साहित्याच्या विकासासाठी घातक असते. आपल्याच कंपुतील लोकांची वाहवा करणे, स्तुती करणे व इतरांकडे दुर्लक्ष करणे हे फेसबुकवर सर्सासपणे चालते. आजकाल तर फेसबुकवर एक नवअस्पृश्यता मोठ्या प्रमाणावर बोकाळत चालली आहे. पण चांगली कविता लाईक-कमेंट्च्या मोहपाशात कधीच अ‍डकत नाही आणि देवदत्त संगेपांसारख्या हाडाच्या रसिकांनाही अश्या कंपुशाहीचे काहीही घेणेदेणे नसते. ते कुठलीही अपेक्षा न ठेवता कवी आणि कवितेवर प्रेम करत राहतात. देवदत्त संगेप कधीच कंपुंचा विचारही डोक्यात शिरु देत नाहीत. आवडलेल्या गझला व शेर ते नेहमी पोस्ट करत राहतात आणि लिहिणा-यांना आणखी चांगले लिहिण्यासाठी प्रेरणा देत राहतात.
           देवदत्त संगेप फक्त आभासी दुनियेतच वावरत नाही तर जिथे जिथे मुशायरा असेल तिथे स्वखर्चाने जाऊन पोहोचतात. कधीही मानसन्मानाची अपेक्षा ठेवत नाहीत. मुशायरा सुरु व्हायच्या दहा मिनिटे आधी पोहोचून गुपचूप आपली जागा पकडून मुशाय-याचा आस्वाद घेतात. गझलकारांना भेटून आवर्जून त्यांना पुस्तके भेट देतात. मराठी गझलेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रभरातील गझलकारांशी रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट नाती निर्माण केली आहेत. प्रत्यक्ष भेटीत ते मितभाषी असले तरी ते आपल्या कृतीमधूनच खूप काही बोलून जातात. मराठी गझलेप्रमाणेच ते उर्दू गझल मुशाया-यांना सुद्धा नियमित हजेरी लावतात. या निमिताने त्यांनी उर्दूच्या अनेक नामवंत शायरांशी परिचय करून घेतला आहे. आभासी दुनियेइतकेच प्रत्यक्ष जीवनतही गझलकारांमधे ते लोकप्रिय आहेत.
      बँकिंग क्षेत्रात काम करता करता त्यांना जुनी नाणी आणि नोटा गोळा करण्याचा छंदही त्यांनी जोपासला आहे. याबरोबरच ते अनेक हिंदी-उर्दू शेरांचे सुंदर विंडबनही करतात. खरं म्हणजे विडंबन करणेही एक कलाच आहे. त्यांनी गालिबच्या एका सुप्रसिद्ध शेराचे केलेले विडंबन तर खूपच विनोदी आहे.

हज़ारों ‘लाईक्स’ ऐसे कि हर 'लाईक' पे दम निकले
‘कॉमेंट्स’ भी मिले बहुत पर गिनती में कम निकले


गालिबचा मूळ शेर -
हज़ारों ख़्वाहिशें ऐसी की, हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले...

 
असाच एक मजरुह सुलातानपुरीचा  गाजलेला शेर -
 
मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर,
लोग साथ आते गए और कारवां बनता गया

   या शेराचेही संगेपांनी खुपच विनोदी आणि आजच्या कायम आभासी दुनियेत वावरणा-यांसाठी असलेले विनोदी विडंबन - 

‘अच्छा-भला' ही आया था मैं ‘फेसबुक’ पे मगर
‘फ्रेंड्स' जुड़ते गए, और मैं बावला बनता गया


     फेसबुकवर चोविसतास वावरणारे लाईक आणि कमेंटसच्या जाळ्यात नकळतपणे अडकतात आणि ते कधी ‘बावले’ होऊन जातात त्यांच त्यांनाच कळत नाही. अशा लोकांसाठी समर्पित असलेला संगेपांचा उपरोक्त शेर म्हणजे त्यांच्या विनोद्बुद्धीची साक्षच देणारा आहे. आजपर्यंत फक्त हझलचे सुटे शेर लिहिणारे संगेप नक्कीच चांगली हझल लिहू शकतील असे वाटते. अशी जगावेगळी वल्ली असलेले देवदत्त संगेप तरुणांनाही लाजवतील अशाप्रकारे संगणक, सोशल मिडिया हाताळत विविध गझलकारांना वेळोवेळी प्रकाश झोतात आणण्याचे काम करत असतात. असा मराठी गझलेवर निरपेक्षपणे प्रेम करणारा दुसरा रसिक होणे नाही !
....................
अमोल शिरसाट
९०४९०११२३४

५ टिप्पण्या: