२८ जुलै, २०२१

मुके केलेय एका बोलक्या गावास टॉवरने


           गझल कधी प्रेयसी असते, कधी मैत्रीण होते, कधी पाठीराखा बनते आणि बरेचदा ती मार्गदर्शकही बनते. जीवनाच्या वेगवेगळ्या वळणांवर पुढे पुढे जाण्यासाठी प्रेरित करत राहते. गझल म्हणजे स्वतःशी अविरतपणे चाललेला संवाद असते. मग भोवताली विपरित परिस्थिती असली तरी गझलकाराला जगण्याची लय गझलेमधून सापडत राहते. नागपूर जवळच्या कोराडीमधील औष्णिक विद्युत केंद्रात यंत्रांच्या कर्कश आवाजात देखील लय शोधणारे एक गझलकार आहेत अझीझ खान पठाण! ते या केंद्रात अनेक वर्षांपासून विद्युत अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ( जन्म – ३ ऑगस्ट ’७३)

                   निसर्गात प्रत्येक गोष्टीमधे एक लय असते. प्रत्येक आवाजात एक नाद असतो. कर्कश वाटणा-या कावळ्याच्या आवाजात देखील नाद-लय दोन्ही असतात. मानवनिर्मित यंत्रांचे आवाज कर्णकर्कश असले तरी तिथे कामगारांना काम करावेच लागते. तसं पाहिलं तर नकोशी वाटणारी परिस्थिती प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात निर्माण होतच असते. त्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा आहे यावरूनच मनस्थिती निश्चित होत असते. प्रत्येक गोष्टीमधे लय शोधणारी दृष्टी असली की आपले जगणे सुसह्य बनते. यंत्रांमधे लय शोधणारी दृष्टी असलेले गझलकार अझीझ खान यांना गझलेमधे सुद्धा आपली स्वतःची लय सापडली आहे.   
 

ठेवले मी घाव माझ्या आत काही
आपल्यांचे पोसले आघात काही

फोनवरती 'कोण?' म्हटल्यावर समजले
राहिले नाही अता नात्यात काही


  या अझीझ खान यांच्या शेरांमधे ‘आपल्यांचे आघात पोसणे’ ही कल्पना फारच ह्रदयस्पर्शी आहे. असा अनुभव प्रत्येकालाच येत असतो. दुस-या शेरामधे चित्रित झालेला प्रसंग प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलाच आहे. खूप दिवसांनी एखाद्या जवळच्या व्यक्तीला फोन केल्यानंतर पलिकडून ‘कोण?’ असा प्रश्न आला तर वेदनेची एक बारीकशी कळ आतमधे उठल्याशिवाय राहत नाही. मग नात्यात आलेला दुरावा अधिक स्पष्टपणे अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट अझीझ खान यांनी चिमटीत पकडून हातावर ठेवावी अशी मांडली आहे. ‘फोन’ आधुनिक युगातला एक महत्वाचा शोध आहे. अशा आधुनिक गोष्टी गझलेत मांडणारी शायरी ‘जदीद’ शायरी. अझीझ खान यांनी गझलेत अशी जदिदीयत आणण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत –

मदर्स् डेला हासरी सेल्फीत आई
लाडक्याला वर्षभर मग याद नाही!


                    अझीझ खान यांच्या गझलेत सामजिक जाणीवही प्रखरतेने अभिव्यक्त होत राहते. त्यांचे वडील व्यवसायाने शिक्षक होते व ते आंबेडकरी विचारांनी प्रेरित झालेले होते.  आपली मुलं शिकून खूप मोठी व्हावीत यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे असे त्यांच्या वडिलांना वाटत होते. यासाठी घरात बाबासाहेबांची प्रतिमा देखील लावली. त्यामुळेच सुरूवातीला विद्युत पदविका प्राप्त करून एमएसईबीमधे नोकरी मिळाली तरी अझिझ खान यांनी त्यावर समाधान मानले नाही. त्यांनी नोकरी करत अभियांत्रिकी शाखेतील पदवी बरोबरच एमबीए सुद्धा केले. मराठी आणि इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदव्या सुद्धा प्राप्त केल्या आहेत. आंबेडकरी विचारांच्या प्रभावामुळे अझीझ खान यांच्या गझलेत सामाजिक जाणीव प्रकर्षाने दिसून येते-    

चंद्र आला दोन बोटांवर अता
फक्त भाकर राहिली दुर्मिळ इथे


                       अवकाश सफर घडवून आणण्यासाठी आता अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत. प्रचंड पैसा खर्च करून आता जगातले अनेक श्रीमंत लोक अवकाश सफरीसाठी आतूर झाले आहेत. मग चंद्रच काय इतर अनेक ग्रहांच्या सहली घडून येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पण या गडबडीत गरीबांची भाकर मात्र अधिकाधिक दुर्मिळ होत जाईल यात काहीच शंका नाही. संसाधनांची अशी उधळपट्टी करून खरंच काय साध्य होईल? भारतामधे अनेक गावे ओसाड पडत चालली आहेत. शेतक-यांची आपली शेती विकून शहराकडे धाव घेत आहेत. अझीझ खान सामाजिक जाणीवेतूनच शेतक-यांची व्यथा मांडणारे अनेक शेर सहजपणे लिहून जातात.

कासऱ्याचा फास झाल्यावर कळाले
एवढे सोपे नसावे दोर असणे.


गझल नेहमी सखोल चिंतनातून जन्म घेत असते. कॅलिडोस्कोपप्रमाणे एखाद्या गोष्टीला विविध दृष्टीकोनातून बघावे लागते. सर्व शक्यता तपासून बघाव्या लागतात. यासाठी सखोल चिंतन आवश्यक असते. ही चिंतनाची प्रक्रिया निरंतरपणे चालत असते. एखादेवेळी लहानपणी पाहिलेली घटना अंतर्मनात खोलवर घर करून बसते आणि आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर ती नकळतपणे शब्दांमधून व्यक्त होते. विद्यूत केंद्रात नोकरी करत असताना तसे पाहिले तर अझीझ खान यांचा शेतीशी फारसा संबंध नाही पण कधीतरी-कुठेतरी पाहिलेल्या गोष्टी प्रतिमारूपाने वरील शेरात प्रकट झाल्या आहेत. त्यामधे त्यांची चिंतनशीलता दिसून येते.
                    
              सखोल चिंतनातून आपली स्वतःची वाट आणि वेगळेपण शोधू पाहणा-या अझीझ खान यांचा एक गझलसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. महाविद्यालयीन जीवनापासून काव्यलेखनाची आवड होती. २०१६ पासून आपले गझललेखन सुरू केले. यासाठी त्यांना नागपूरच्या अनंत नांदूरकर ‘खलिश’ यांनी अधिकाधिक प्रेरित केले. सोबतच या दोघांनी नागपूर भागातील मराठी-उर्दूच्या शायरांच्या सहकार्याने ‘गझलबहार’ हा समूह स्थापन केला व या समुहाच्या माध्यमातून मराठी व उर्दू शायरांचे अनेक मिले-जुले मुशायरे त्यांनी आयोजित केले आहेत. या बरोबरच अझीझ खान यांनी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या कोराडी शाखेचे अध्यक्षपद देखील भुषविले आहे. या संघटनेच्या माध्यमातून  कर्मचारी व कामगारांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या सर्व उपक्रमांमधे त्यांचा सक्रीय सहभाग असतो.

अझीझ खान पठाण यांची एक गझल –
     

स्वतःशीही कधी तर एकट्यामध्ये बसा बोलत
हसू लागेल तुमच्या आतला माणुस हसा बोलत
.
“इगो, इभ्रत, वजन, स्टेटस वगैरे बस करा यारो!”
दिसावा मित्र एखादा असे फ्रस्टेटसा बोलत !!

मुके केलेय एका बोलक्या गावास टॉवरने
अता तर पारही नाही कुणाशी फारसा बोलत

कथेची स्क्रिप्ट होती...अन्यथा तो हारला नसता
विजेत्या कासवाशी हेच तर नव्हता ससा बोलत?

अजुन का पोचला नाही? कधी तर पोच वेळेवर !
कळव तू थांबला कोठे? कुणाशी? पावसा बोलत

(अझीझ खान पठाण ,कोराडी मो. 7875894343)

............................................

अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

३ टिप्पण्या: