२५ नोव्हेंबर, २०२०

मी ठेवतो तरीही प्राणात बुद्ध माझ्या.


            सुरेश भट महाराष्ट्रभरातील अनेक लिहिणा-यांसोबत संपर्कात होते. पत्राद्वारे ते अनेकांना गझलेबाबत मार्गदर्शन करत असत. त्यांना भेटायलाही अनेक लोक उत्सुक असत. पण भटांनी ‘ गझल चांगली लिहिता. आपली भेट होणे आवश्यक. नागपूरला आल्यास अवश्य भेटा.’ असे पत्र पाठवूनही केवळ संकोचापायी कधीच न भेटलेले आणि एकलव्याप्रमाणे गझल साधना करणारे विदर्भातले ताकदीचे गझलकार म्हणजे सिद्धार्थ भगत. ते कला वाणिज्य महाविद्यालय, राळेगाव जि यवतमाळ येथे प्राध्यापक आहेत. १९९० पासून मराठी गझलेमधून आंबेडकरी विचारधारा मांडणारे एक महत्वाचे गझलकार म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ( जन्म – ०२ फेब्रुवारी १९६५)
-------------------------------------------------------
                आंबेडकरी विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आंबेडकरी जलस्यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिलेली आहे. डॉ बाबासाहेबांचे सुद्धा अशा जलसाकारांवर अत्यंत प्रेम होते. सुरेश भटांनी सुद्धा आंबेडकरी विचारांनी प्रेरीत होऊन बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यांच्या गझलांमधून आंबेडकरी विचार अनेक ठिकाणी व्यक्त झाला आहे. सिद्धार्थ भगत हे सुद्धा आंबेडकरी विचारधारेचे कृतीशील पाईक असल्याने त्यांनी आंधळेपणाने कोणतीही गोष्ट न स्वीकारता डोळसपणे आपला विचार गझलेतून व्यक्त केला आहे –

बुद्ध माझ्यासवे राहतो हिंडतो
मी न केली कधी वेगळी वंदना

              सिद्धार्थ भगत अंधभक्त नाहीत. त्यांनी बुद्धाचा विचार आत्मसात केला आहे म्हणूनच त्यांना वेगळी पूजा करावी लागत नाही. बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर नव्याने लिहू लागलेल्या आंबेडकरी कवींनी आपल्या जाणिवा ताकदीने मांडल्या आहेत. सूर्याच्या प्रकाशाने एखादी अंधारलेली दरी प्रकाशमान व्हावी असेच हे कवी प्रकाशित झालेले दिसतात. सिद्धार्थ भगत सुद्धा उजेडाचे पाईक आहेत -

 तुझ्या दिशेने  जेव्हा अम्ही निघालो होतो
नव्या युगाची वाटे प्रभात प्यालो होतो
जुन्या दिव्यांच्या वाती जळून गेल्या गेल्या
स्वतःच आम्ही सारे उजेड झालो होतो

                  ‘अत्तं दीप भव’ अर्थात स्वयं प्रकाशित बना. विद्यार्थीदशेपासूनच सामाजिक चळवळीमधे सक्रीय असलेल्या सिद्धार्थ भगत यांच्या विचारांमधे सुस्पष्टता आहे. स्वतः कृती करून इतरांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे अशी त्यांची भूमिका असते. त्यांना उजेड होणे आवडते आणि ही भावना त्यांच्या गझलेत सशक्तपणे व्यक्त होताना दिसते. पण उजेड होणे साधी गोष्ट नाही. त्यासाठी जळणे भाग आहे. माणसाचं जळणं कधीच एकट्यापुरतं नसावं. सिद्धार्थ भगत म्हणतात –

जळणेच भाग आहे जर आपुले इथेही
उजळून सर्व टाकू मग हा दिगंत आता

                   सिद्धार्थ भगत यांच्या गझलेत समाजिक भान वेळोवेळी व्यक्त झाले आहे. हे सामाजिक भान त्यांना आंबेडकरी चळवळीकडून मिळाले आहे. चळवळीचे संविधानाप्रमाणेच समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता हे चार प्रमुख आधारस्तंभ आहेत. बाबासाहेबांनी समाजात सर्व क्षेत्रातील समतेचा पुरस्कार केला. हे तत्व त्यांनी संविधानात खोलवर रुजवले. परंतू कोविडच्या काळात हाताला काम नाही म्हणून आपल्या घरी जाण्यासाठी अनवाणी पायांनी आणि भुकेल्या पोटाने हजारो किलोमीटरचा प्रवास करणारी गरीबी, रेल्वेलाईनवर पायी प्रवास करणा-या एका कुटंबाचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह आणि त्यांच्या अस्ताव्यस्त पडलेल्या भाकरी, रेल्वेस्टेशनवर भुकेने तडफडून मेलेल्या आईच्या पदराशी रात्रभर खेळणारं मुल आठवलं की काळजात चर्र झाल्याशिवाय राहत नाही. अशावेळी सिद्धार्थ भगत यांच्या ओळी आठवतात -

नसे श्रीमंत कोणी अन् दरिद्रीही कुणी जेथे
असे कोणीतरी आता उद्याचे चित्र रेखाटा

उपेक्षा सोसली ज्यांनी कधी पासून काळाची
मिळाला पाहिजे त्यांना तयांचा नेमका वाटा

    खरोखरच उपेक्षितांना त्यांचा वाटा मिळेल काय? गरीबीबरोबरंच कुपोषण, जातीयवाद, अंधश्रद्धा, बेरोजगारी अशा कित्येक समस्या इंडीयातल्या भारतात आहेत. सिद्धार्थ भगत विविध सामाजिक प्रश्न आपल्या गझलेमधून व्यक्त करतात. समाजातील जातवास्तव, शेतक-यांचे दुःख, धर्मांधता या विषयांबरोबरच ते सुंदर प्रेमभावनाही व्यक्त करतात. 
           श्रीलंका येथे संपन्न झालेल्या पाचव्या ‘शब्द’ विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविणा-या सिद्धार्थ भगत यांचे ‘युद्धयात्रा’ (२००६), ‘अस्वस्थ मनाच्या नोंदी’(२००७), यापुढे माझी लढाई( २००९), आणि पुन्हा एकदा बुद्ध हसावा म्हणून’(२०१०), ‘वर्तूळ कंसातील अवतरणे’(२०११), ‘कळ कोवळी उठू दे’(२०१३) हे गझलसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या समग्र गझलेबाबत ‘ गझल प्रत्यय’ हा विविध मान्यवरांच्या लेखांचा संग्रह डॉ युवराज मानकर यांनी संपादित केला आहे. विद्रोही वृत्तीच्या सिद्धार्थ भगत यांनी प्रेमविवाह केला. त्यांच्या पत्नी गुजराती भाषिक आहेत. म्हणूनच ते गुजराती भाषेच्या सुद्धा प्रेमात पडले. गुजराती भाषा शिकून घेतली आणि गुजरातच्या सौराष्ट्र विद्यापीठातही अभ्यास केला. आणि म्हणूनच त्यांनी ‘गुजराती गझल व मराठी गझल यांचा तौलनिक अभ्यास’ हा विषय पीएचडीच्या प्रबंधासाठी निवडला. परंतू शोकांतिका ही आहे की अमरावतीच नव्हे तर नागपूर विद्यापीठाने सुद्धा त्यांच्या संशोधन विषयालाच अभ्यासक उपलब्ध नसल्याने मान्यता दिली नाही. यामुळे भगत निराश झाले नाही. त्यांनी ‘गुरु प्रेमदास यांचे समग्र साहित्य’ हा विषय निवडला आणि त्रिस्तरीय संशोधन केले. पहिला स्तर म्हणजे कबीरपंथी गुरु प्रेमदास हे वाशिम जिल्ह्यातील अशिक्षित पण उच्च दर्जाची साहित्य निर्मिती करणारे बंजारा धर्मगुरू होत. हे नाव अगदी अपरिचित आहे. दुसरा स्तर म्हणजे त्यांचे साहित्य उजेडात आणले आणि तिसरा स्तर म्हणजे त्यांच्या साहित्याची समीक्षा हा होय. अशा प्रकारचे संशोधन करून त्यांनी आपले वेगळेपण संशोधन कार्यात देखील सिद्ध केले आहे.
                      आंबेडकरी विचारांचे डोळस पाईक, चळवळीचा सक्रीय कार्यकर्ता, अपरिचित विषयावर संशोधन करून प्राध्यापकवर्ग आणि विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवणारा हाडाचा प्राध्यापक, नव्या शैक्षणीक धोरणांच्या संदर्भात काम करणा-या संघटनेचा कार्याध्यक्ष आणि एक ताकदीचा मराठी गझलकार अशा वेगवेगळ्या भूमिका समर्थपणे करणारे सिद्धार्थ भगत खरोखरच एक अजब रसायन आहे ! त्यांची आंबेडकरी जाणिवा व्यक्त करणारी एक गझल -

आहे जरी सभोती पेटून युद्ध माझ्या;
मी ठेवतो तरीही प्राणात बुद्ध माझ्या.

बोलेन स्पष्ट मी अन् वागेन इष्ट आता;
हे विश्वही उभे मग ठाको विरुद्ध माझ्या.

ही जागवा स्मशाने, द्या पेटवून वारे;
हा ओघ वाहताहे रक्तात क्रुद्ध माझ्या.

आता जपून मीही एकेक श्वास घेतो;
नाही तशी हवाही गावात शुद्ध माझ्या.

ध्यानीमनी तरीही राहील जात माझी;
ते शोधतात हल्ली ओळी अशुद्ध माझ्या.

( प्रा.डॉ. सिद्धार्थ भगत यांचा संपर्क - 
22, सीताराम नगरी, 
महाजन कॉलेज रोड,
पाण्याच्या टाकीजवळ,
वडगाव, यवतमाळ. 445001 - मो 9822712380)

-अमोल शिरसाट
9049011234

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा