४ नोव्हेंबर, २०२०

दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते

           




                 गोवा...निसर्गसौंदर्य आणि समुद्रकिना-यांसाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे राज्य. कविवर्य बा.भ.बोरकर उर्फ बाकीबाब यांची जन्मभूमी. ’माझ्या गोव्याच्या भूमीत’ सारख्या कवितांमधून  बाकीबाबांनी गोव्याचे सुंदर वर्णन केले आहे. प्राचीन भारतीय साहित्यामधे सुद्धा गोव्याचा अनेक ठिकाणी ‘गोपभूमी’ किंवा ‘गोपराष्ट्र’ असा उल्लेख आला आहे.  अनेक वर्ष पोर्तुगीजांच्या प्रभावात असला तरी गोव्यातल्या मराठी आणि कोकणी या प्रमुख भाषा आहेत. गोव्यातील साहित्यिकांनी विपूल प्रमाणात मराठी आणि कोकणी भाषेत साहित्य निर्मिती केली आहे. ’सोनकेवड्याच्या’ या भूमीत मराठी गझल सुद्धा रुजत आहे. गोव्यातील एक प्रमुख मराठी गझलकारा म्हणून राधा भावे यांचे नाव अग्रक्रमावर येते. सुजला देव असं त्यांचं पुर्वाश्रमीचं नाव असून त्यांचा जन्म १७ ऑगस्ट १९६१ रोजी रीवण (गोवा) येथे झाला.
 
             आजकालचे जीवन धकाधकीचे झाले आहे. अशावेळी प्रत्येकाला रोजच्या कोलाहलापासून दूर कुठेतरी विरंगुळ्याचे क्षण हवे असतात. तसं पाहिलं तर असे क्षण शोधत राहणे हा मानवी स्वभाव प्राचीन काळापासून राहिला आहे. प्राचीन काळातील भित्तीचित्रांपासून ते साहित्यापर्यंत या सर्वांमधून त्या त्या काळात मानवाने शोधलेले विरंगुळ्याचे क्षण प्रामुख्याने अधोरेखित करता येतात. अशा गोष्टींमधून मानवाचा अविरत चाललेला ‘स्वसंवाद’ देखील दिसून येतो. पणजीमधे असलेल्या गोवा राज्य वस्तूसंग्रहालयात गोवन संस्कृतीबरोबरच भारतीय संस्कृतीतील अशाच अनेक प्राचीन वस्तूंचा वारसा जतन करून ठेवला आहे. या संग्रहालयाच्या संचालक पदावर गझलकारा राधा भावे ह्या गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी पुरातत्वशास्त्र आणि मराठी अशा दोन एकमेकांशी विसंगत असलेल्या विषयातून स्नातकोत्तर पदवी प्राप्त केलेली आहे. संचालक म्हणून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडत त्या रोजच्या कोलाहलापासून स्वतःला वेगळे करून स्वतःशी संवाद साधू पहात असतात. खरं म्हणजे स्वसंवाद माणसाला जगायची कला शिकवतो. स्वतःशी केलेल्या सकारात्मक संवादाने निराशा, दुःख, वेदना, चिंता यातून स्वतःला सहीसलामत बाहेर काढता येतं. म्हणूनच स्वतःशी वेळोवेळी संवाद साधून आपला विवेक सदैव जागृत ठेवणा-या राधा भावे म्हणतात –

दुःखालाही चिमटीमध्ये धरता येते
आणिक त्याचे फूलपाखरू करता येते


    खरंच असं दु:खाला चिमटीत धरून त्याचं फुलपाखरू करता आलं असतं तर किती छान झालं असतं. कवी सामान्य माणसासारखा असला तरी त्याचा दृष्टीकोन मात्र वेगळा असतो. इतरांच्या तुलनेने त्याला अधिक संवेदनशीलता, अधिक उत्साह व कोवळेपणा यांची देगणी लाभलेली असते. कवी नेहमी प्रतिमांच्या भाषेत बोलतो. कवी नसलेला व्यक्ती केवळ एखाद्या गोष्टीच्या वर्णनावर समाधान मानतो. परंतु कवी मात्र त्या गोष्टीशी भावनात्मक समानता प्रस्थापित करू पाहतो. अशीच सुंदर भावनात्मक समानता राधा भावे त्यांच्या अनेक शेरांमधून साधताना दिसतात -  

कसे वजा करायचे तुझ्या मनातल्या मला,
कसा बरे फुलातला गंध वेगळा करू?


     फुल आणि गंध यांच्या परस्पर संबंधाची तुलना प्रेमाशी करताना एक अनोखी भावनिक समानता प्रस्थापित झाली आहे. फुलाचा गंध जसा वेगळा करता येत नाही अगदी तसंच ‘तो’ आणि ‘ती’ एकमेकांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. कवी नसलेली व्यक्ती हीच गोष्ट सरळ सरळ सांगून टाकेल पण कवी एखादी प्रतिमा वापरून आपली भावना व्यक्त करतो तेव्हा त्याच गोष्टीला एक वेगळा उठाव येतो.   

आसवे पुसायला दिला रूमाल तू
ठेवले घडीत मी जपून चांदणे


    या शेरात आसवे आणि चांदणे तेच असले असले तरी शेराची ‘घडी’ मात्र वेगळी आहे.  अनेकदा दुःख अनावर होते, अश्रुंवरचा ताबा सुटतो. ‘कुणीतरी’ डोळ्यात आलेली आसवे पुसायला दिलेला रुमाल आयुष्यभर जपून ठेवावासा वाटतो. त्या रुमालाच्या घडीत त्याच्या किंवा तिच्या आठवणींचे चांदणे आयुष्यभर जपून ठेवलेले असते. मनाच्या घडीत सुद्धा एखादे हवेहवेसे वाटणारे ‘चांदणे’ लपवलेले असते.

मनात ठेवले तुला कुणास ना कळू दिले
जळू दिले स्वतःस अन् तुलाच मोहरू दिले


    प्रेम प्रत्येकवेळी शब्दात व्यक्त करावं लागत नाही. डोळ्यांपासून सुरू झालेलं प्रकरण स्पर्शाच्या वाटेनं काळजात खोलवर जाऊन पोहोचतं. पण प्रत्येकाचे प्रेम स्पर्शाच्या वाटेनं जातेच असं नाही. कित्येकवेळा मनातल्या मनात झुरणे वाट्याला येते. समोर असलेल्या व्यक्तीला आणि जगाला ते कळुही द्यावे लागत नाही. असे जळणे सहजपणे मांडणाऱ्या राधा भावे यांच्या लेखनात कोणताही आक्रस्ताळेपणा दिसत नाही. त्या जे वाटते ते अत्यंत उत्कटपणे मांडतात. त्यांनी लिहिलेला शेर आधी त्यांचा असतो आणि नंतरच तो रसिकांचा होऊन जातो.

उगा आरशाला विचारू कशाला
तुझे हास्य सांगे तुला भावते मी


      त्याच्या डोळ्यात चमकलेलं तिचं प्रतिबिंब आणि ओठांवर उमटलेलं हसू अख्खं आयुष्य सुंदर करते. मग तिला जगातल्या कोणत्याच आरशाची गरजच पडत नाही. अशा सुंदर प्रणयभावनांचं वास्तवदर्शी चित्रण राधा भावे यांच्या गझलांमधून चित्रित झाले आहे.   
 
         लहानपणापासूनच कविता लेखनाची आवड असलेल्या राधा भावे त्यांचा ‘उमलताना’(२००९) हा कवितासंग्रह प्रकाशित झाल्यानंतर  गझलेखनाकडे वळल्या. त्यानंतरच्या त्यांच्या ‘तुला भेटून येताना’ (२०१५) या संग्रहामधे अनेक सुंदर गझला समाविष्ट आहेत. सहजता आणि उत्कटता हे त्यांच्या लेखणीचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी कोकणी भाषेत सुद्धा गझललेखन केले आहे.   अनेक वृत्तपत्रांमधे त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध झालेलं आहे. ‘जिवाचो पतंग’ (२०१८) हा त्यांचा कोकणी  ललितलेखांचा संग्रह  प्रकाशित झाला आहे. मनाच्या तळातून आलेल्या भावना उत्कटतेनं मांडणाऱ्या राधा भावे यांना यु.आर.एल. फौंडेशनचा गझल गौरव पुरस्कार, गोवा राज्य कला अकादमीचा साहित्य पुरस्कार, कविवर्य बा.भ.बोरकर स्मृति पुरस्कार असे अनेक सन्मानही प्राप्त झाले आहेत.      

    बालकवींच्या ‘फुलराणी’ची प्रतीती आणणारी गझलकारा राधा भावे यांची एक सुंदर गझल -

मला माझ्यातले गाणे सुखाने वाचता येते
व्यथांची का करू पर्वा मला तर हासता येते

जपावी का कशासाठी कथा उद्ध्वस्त हृदयाची
तिथेही रोप प्रेमाचे नव्याने लावता येते

कुणाचा आसरा मागू कशाला सावली शोधू
निवाऱ्याला उन्हाच्याही मला जर राहता येते

तुझा दे हात हाती अन् जरासे चांदणेही दे
नशा चढते मला माझी, मला फेसाळता येते

दिलेली लाट स्पर्शाची कुण्या बेभान दर्याने
खुबीने टाळता येते, हवी तर माळता येते

(राधा भावे)
 
- अमोल शिरसाट
 अकोला
९०४९०११२३४

९ टिप्पण्या:

  1. मानवी मनातल्या तरल भावनांना शब्द रूपात व्यक्त केलेल्या रचना खूप छान....

    उत्तर द्याहटवा
  2. व्वा!अप्रतिम गझलांचे अप्रतिम रसग्रहण.....

    उत्तर द्याहटवा
  3. उगा आरश्याला विचारू कशाला ?
    आणि,
    दिलेली लाट स्पर्शाची,कुणा बेभान दर्याने
    ---अप्रतिम !

    उत्तर द्याहटवा