४ ऑगस्ट, २०२१

सहज हिंडण्याची मजा घेऊ ‘हेमंत’

              कवी आपल्या कवितेत नेहमी नवनवीन प्रयोग करून पाहत असतो. कधी छंद आणि वृत्तांचे बंधन पाळून तर कधी मुक्तपणे आपल्या भावना मांडतो. कधी भाषेचे तर कधी शब्दांचे वेगवेगळे प्रयोग तो कवितेतून करत असतो. कवीने नेहमी प्रयोगशील असलंच पाहिजे. मराठी गझलेतही गझलकार अनेक नवनवीन प्रयोग वृत्तांच्या बंधनात राहून करत असतात. मूळचे गुजरातमधील बडोद्याचे आणि सध्या पुण्यात वास्तव्याला असलेले मराठी भाषिक गझलकार हेमंत पुणेकर हे आजच्या गुजराती गझलविश्वातील एक प्रयोगशील शायर आहेत. ते मराठी गझलेतही काही नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ( जन्म – १८ डिसेंबर १९७८)

 ...................

आडनाव ‘पुणेकर’ असले तरी हेमंत पुणेकर यांच्या सात पिढ्या नोकरीच्या निमित्ताने बडोद्यातच रहात आहेत. अनेक पिढ्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांना आपली सेवा दिली आहे. हेमंत पुणेकर मात्र नोकरीच्या निमित्ताने आडनावाप्रमाणे एकप्रकारे पुन्हा ‘पुणेकर’ झाले आहेत. त्यांनी २००३ मधे दिल्लीच्या आय.आय.टी.तून तंत्रज्ञानातील स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते पुण्यातील एका इंजिनीअरींग सॉफ्टवेअर कंपनीमधे रुजू झाले. सध्या त्याच कंपनीत ते सिनीयर मॅनेजर पदावर कार्यरत आहेत. हेमंत पुणेकर यांना शालेय जीवनापासूनच कवितेची आवड होती. वृत्तबद्ध कविता विशेष आवडत. मातृभाषा मराठी असली तरी त्यांचे शालेय शिक्षण गुजरातीतूनच झाले आहे. त्यामुळे गुजराती कवितेत त्यांना विशेष रस होता. गुजराती कवितेची परंपरा देखील मोठी आहे. गझल दीडशे वर्षांपूर्वी गुजराती भाषेत रुजली. त्यामुळे मराठी गझलेच्या तुलनेत गुजराती गझलेचा रसिकाश्रय मोठा आहे. हेमंत पुणेकर यांनी २००६ पासून गुजरातीत गझललेखन सुरू केले. त्यासाठी त्यांना गुजरातीचे सुप्रसिद्ध शायर डॉ. रईश मनीआर यांचे मार्गदर्शन लाभले. 

           गुजराती भाषा संस्कृत आणि हिंदी नंतर मराठीला सर्वात जवळची भाषा आहे. मराठी भाषेत अनेक गुजराती शब्द आढळतात. असे असले तरी गुजराती भाषा मराठी भाषिकांना लवकर समजेल अशी नाही. मराठी भाषिक हेमंत पुणेकर गुजरातीतील नव्या पिढीतील एक आश्वासक गझलकार आहेत.

प्रथम सूर्य पासे उधारी करे छे
पछी चांद बहु होशियारी करे छे

(अर्थात चंद्र पहिल्यांदा सुर्याकडून प्रकाश उधार घेतो आणि पछी म्हणजे नंतर रात्रीच्या अंधारात मात्र आपली हुशारी दाखवतो.)

एम थोडो लगाव राखे छे
स्वप्नमां आवजाव राखे छे
  
(अर्थात ती अशा पद्धतीने थोडी जवळीक ठेवते की निरंतर स्वप्नात येणे जाणे कायम ठेवते.)  

फूल-शी जात रक्षवा माटे
कांटा जेवो स्वभाव राखे छे

(अर्थात ती फुलासारखी असल्यामुळे स्वतःला जपण्यासाठी आपला स्वभाव काट्यांसारखा ठेवते.)

असे सहज सुंदर शेर लिहून हेमंत पुणेकर आपले गुजराती गझलेतील स्थान अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गुजराती भाषेतून शिक्षण आणि मातृभाषा मराठी असल्याने दोन्ही भाषांवर त्यांचे तितकेच प्रेम आहे. म्हणूनच ते अनेक मराठी गझलांचा गुजरातीत आणि गुजराती गझलांचा मराठीत अनुवाद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दोन्ही भाषेतील अनेक शायरांच्या गझलांचा सुंदर अनुवाद त्यांनी केला आहे.

साची मजा सफरनी मळी ए घडी मने    
ज्यारे गतिनुं कोई प्रयोजन रह्युं नहीं   

या डॉ. रईश मनीआर यांच्या शेराचा अनुवाद करताना हेमंत पुणेकर लिहितात -

तेव्हा खरी मिळाली प्रवासातली मजा
जेव्हा गतीचे काही प्रयोजन न राहिले
        गुजराती गझलांप्रमाणेच मराठी गझलांचा देखील सुंदर अनुवाद त्यांनी गुजरातीत केला आहे. अशा अनुवादीत गझलांचा संग्रह आल्यास मराठी आणि गुजराती गझलेला जोडणारा सेतु म्हणून हेमंत पुणेकर यांची कामगिरी निश्चितच महत्वाची असेल.

      उर्दू, हिंदी किंवा गुजराती गझलेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे उच्चारी वजन! उच्चारी वजन मराठी रसिकांच्या दृष्टीने महत्वाचे नसले तरी मराठी गझलकारांनी मात्र याबद्दल नक्कीच विचार केला पाहिजे. माधवराव पटवर्धनांनी अनेक फारसी वृत्तांचा अभ्यास करून त्यांचे मराठीकरण केले. त्यातून त्यांनी उच्चारी वजन हा भाग वगळला. उच्चारी वजन म्हणजे काय तर शब्दांमधील अक्षरांच्या उच्चारासाठी लागणारा कालावधी होय. हा कालावधी बोलताना अनेकवेळा कमीअधिक होऊ शकतो. त्यानुसार तो वृत्तांमधे देखील लवचिकतेसाठी वापरला जायला हवा. काही नियम घालून त्याचा वापर मराठी वगळता उर्दूसह अनेक भाषांमधे होत आहे. असा प्रयोग मराठीत वामनदादा कर्डक यांनीही केला होता. हेमंत पुणेकरांनी सुद्धा उर्दू आणि गुजराती गझलांचा सखोल अभ्यास करून मराठीत हा प्रयोग सुरू केला आहे.

फारसे काही कळत नाही अजुन
अन् जे कळते ते वळत नाही अजुन

गूढ मरणाचे नको सांगू मला
कोडे जगण्याचे सुटत नाही अजुन

       उच्चारी वजन म्हणजे एकप्रकारची सुट आहे. वृत्ताच्या शिथिलतेसाठी अशी सुट मराठीतही मर्यादित स्वरुपात घेतली जाते. अनेकदा दीर्घ वेलांटी आणि दीर्घ उकार सोयीसाठी –हस्व केली जाते. म्हणजे त्यांचा उच्चार कमी कालावधीसाठी केला जातो. जर मराठीत वेलांटी आणि उकारसाठी ही सुट घेतली जाते तर काना आणि मात्रासाठी का नाही ? हेमंत पुणेकर यांच्या उपरोक्त ओळींमधे ‘जे’ आणि ‘कोडे’ शब्दामधील ‘डे’ या अक्षराचा उच्चार कमी कालावधीसाठी केला आहे. हे सर्व मराठीत प्रायोगिक पातळीवर असले तरी अशा वापरामुळे अक्षरगणवृत्तांमधे अधिक लवचिकता येऊ शकेल का? याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. यासाठी अभ्यासकांना हेमंत पुणेकर यांचे लेख ‘गझलकार सीमोल्लंघन’च्या ऑनलाईन अंकामधे उपलब्ध होऊ शकतील.   

      गझलकार हेमंत पुणेकर यांच्या गुजराती गझलांचा ‘कागळनी नाव’ ( कागदाची नाव) हा संग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. एका मराठी भाषिकाचा गुजरातीत गझलसंग्रह प्रकाशित व्हावा ही एक खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. मराठी भाषिक जगभरात कुठेही गेले तर तेथील संस्कृतीशी ते नक्कीच एकरुप होतात परंतु आपल्या ‘ अमृतातेही पैजा जिंकणा-या’ मातृभाषेला ते कधीच विसरत नाहीत. हेमंत पुणेकर यांना गुजराती गझल लेखनासाठी इंडीयन नॅशनल थिएटर, मुंबई तर्फे दिला जाणारा 'शयदा पुरस्कार' प्राप्त झाला आहे. १९९७ पासून हा पुरस्कार गुजरातीचे आद्य शायर शयदा यांच्या नावाने नवोदित शायरांना दिला जातो. 

   हेमंत पुणेकर यांची उच्चारी वजनातील एक गझल -     

पुन्हा जन्मलीये मनात एक आशा
बघूया पुढे काय होतो तमाशा

तू प्रत्यक्ष भेटू शकत नाही, ठीकेय
तू स्वप्नात पण येत नाही अताशा

कशाला तू देतेस कानांना तसदी
जिथे बोलती ओठ ओठांची भाषा

महालात राहणारी हृदयात राहशील?
जमेल का तुला या घरात एवढ्याशा?

सहज हिंडण्याची मजा घेऊ ‘हेमंत’
कशाला हवाये नकाशा बिकाशा?

( हेमंत पुणेकर – ९९२१२८३४८५ )
.................

अमोल शिरसाट 
९०४९०११२३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा