वामनदादा कर्डक आंबेडकरी चळवळीतला एक झंझावात. या झंझावाताने आपलं वैयक्तिक दुःख, दारिद्रय, दैन्य बाजूला ठेऊन चळवळ मोठी केली. शेवटच्या श्वासापर्यंत लोकांचं प्रबोधन गीत आणि गझलांमधून केलं. परंतु या अवलियाचं गझललेखन दुर्लक्षितच राहिलं. परिस्थितीनं आणि मराठी साहित्य परंपरेनही या कलंदराची उपेक्षाच केली. 'सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला' हे 'सांगते ऐका'(१९५९) या चित्रपटातलं गाजलेलं गाणं वामनदादांनी लिहिलं पण शोकांतिका ही आहे की अनेकदा हे गाणं ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलं असं सांगितलं जातं. या गीताचेही स.ग.पाचपोळ यांच्या 'हंबरून वासराले' या कवितेसारखंच झालं आहे.
वामनदादांनी मराठी गझल व संगीताची एकलव्यासारखी साधना केली. कोणी गुरू भेटला नाही. मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतल्या गीतांवरून आणि हिंदी-उर्दू कव्वाली, गझलांवरून शिकून ते स्वत:च स्वतःचे गुरू झाले. गझल संगीताच्या साथीने गाऊन सादर करायची असल्यास शब्दांची निवड संगीताला पोषक असावी लागते. वामनदादा स्वत: एक चांगले गायक असल्यामुळे त्यांच्या गझलेत गेयता आपसूकच आली आहे. त्यांच्या लेखणीवर तमाशा आणि शाहिरी परंपरेचे संस्कार लहानपणीच झाले होते. सोबतच महानगरीय संस्कृतीतल्या समस्या त्यांनी अनुभवल्या होत्या. त्यामुळे मराठी मातीशी नातं सांगणारी शाहिरी बाण्याची, जदीदी(आधुनिक) आणि तरक्कीपसंद (सुधारणावादी) गझल त्यांनी लिहिली हे सत्य स्वीकारावेच लागेल.
लहानपणी निरक्षर असलेल्या वामनदादांनी तरूण वयात आपल्या देहलवी नावाच्या अधिकाऱ्याकडून अक्षर ओळख करून घेतली. दुकानांवरच्या पाट्या आणि बोर्ड वाचून जिद्दीनं लिहायला वाचायला शिकले. डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार हे त्यांचं उर्जाकेंद्र होतं. या उर्जेतूनच वामनदादांनी आपल्या गीत-गझलांच्या माध्यमातून घराघरात, गावागावात लोकप्रबोधनाचं कार्य केलं. वामनदादांची गझल मराठी गझलेतला एक मैलाचा दगड आहे. ओघवती आणि समाजमनाचा ठाव घेणारी भाषाशैली हे त्यांच्या लेखणीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शाहिरी परंपरेचे संस्कार झाल्यामुळे ताकदीची आवाहनात्मकता त्यांच्या गझलेत आहे.
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारिचे तयांच्या न्यारेच टोक असते.
या शेरात खयालाच्या सुस्पष्ट मांडणीबरोबरंच दुस-या ओळीत मिळालेली कलाटणी उल्लेखनीय आहे.
सांगा अम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा धनाचा साठा अमुचा वाटा कुठाय हो?
.....इथे व्यक्त झालेल्या जनसामान्यांच्या भावना अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये मांडलेल्या आहेत. गझलेच्या शेराची पहिली ओळ दुस-या ओळीत पुर्णत्वाला जाणा-या खयालाची प्रस्तावना असते. वरील शेरात पहिल्या ओळीत आलेले ‘बिर्ला, बाटा आणि टाटा’ पुढे काय आहे? याची उत्सुकता ताणतात. हे शब्द गझलेत आल्यामुळे वामनदादा जदीदी गझलकार होते असे नक्कीच म्हणता येते. दुसरी ओळ ‘वाटा’वर येऊन थांबते तेव्हा रसिकांच्या ओठातून दाद आल्याशिवाय राहत नाही. वामनदादा म्हणतात “मी अडाणी समाजाची बोलीभाषा स्वीकारली व तीच माझ्या गीतांची भाषा बनली.” लोकांच्या भाषेत लिहिणारे कवी म्हणून लोककवी ही उपाधी त्यांना सार्थ ठरते. गझल लिहीताना वृत्तामधे लिहीणे आवश्यक असते. वृत्त म्हणजे शब्दांच्या उच्चारानुसार केलेली रचना होय. कोणत्याही शाळेत शिक्षण न घेतलेल्या वामनदादा़ंना हे खरोखर कसं साधलं असेल? गझलेचे वृत्त हा निरक्षर माणूस कुठे शिकला असेल? कवी कोणत्याही कारखान्यात घडवता येत नाहीत तर ते जन्माला यावे लागतात. एक निरक्षर व्यक्ती ते उत्तम गायक, गीतकार, गझलकार, संगीतकार असा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. समाजाला पोखरत असलेल्या जातीव्यवस्थेवर बोलताना ते म्हणतात...
मित्र जरी मित्राघरी जात आहे
तरी जात आतल्या मनात आहे
या शेरामधे जातवास्तव अधोरेखित झाले आहे. सोबतच 'जात' हा शब्द दोन्ही ओळीत वेगवेगळ्या अर्थाने येतो. अशी शब्द आणि अर्थचमत्कृती अनेक गझलांमधे साधली गेली आहे. अशा शब्दांच्या चमत्कारातून या माणसाने आपल्या लेखणीतून समाजाला आरसा दाखवत आयुष्यभर समता,स्वातंत्र्य, बंधुता, न्याय तत्त्वांचा पुरस्कार केला.
वामनदादांनी जाणिवेच्या पातळीवर गझल लेखन केले नाही. त्यांना लोकप्रबोधनसाठी गझल हे माध्यम प्रभावी वाटले असावे. काही शेरांमधे खयालांची मांडणी सुस्पष्ट नाही. तरी मोजके दोष वगळता त्यांच्या गझला तंत्रशुद्ध आहेत. त्यांच्या एकुण गझललेखनाचा विचार करता असे दिसून येते की ते माधव जुलियन आणि सुरेश भट यांच्या परिघाबाहेरचे गझलकार आहेत. वामनदादांनी हिंदी उर्दू गझलांमधे वापरल्या जाणा-या उच्चारी वजनाचा सफाईदारपणे वापर केला आहे. असा वापर मराठी गझल परंपरेत आढळत नाही. हा मराठी गझल संशोधकांसाठी अभ्यासाचा विषय ठरावा.
वामनदादांच्या गझलेत असलेली वृत्तांची विविधता हाही त्यांच्या लेखनाचा एक महत्वाचा पैलु आहे. मराठीत अत्यल्प प्रमाणात वापरल्या जाणा-या ‘बहर-ए-मीर’ म्हणजे उर्दूचा ख्यातनाम शायर मीरने वापरलेल्या वृत्तांचा देखील वापर केला आहे.
तो भीम जसा लढला, तो लोक लढा लढवा
जा ठायी ठायी जा, माणूस नवा घडवा
हा उंच पदी आहे तो नीच पदी आहे
या नीच प्रणालीला जा सूळावर चढवा
या गझलेत आणि प्यासा(१९५७) या चित्रपटातील ‘हम आपकी आंखो में इस दिल को बसा दे तो’ या गाण्यामधे असलेले वृत्त सारखेच आहे. वामनदादांची अनेक गाणी हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर बसवलेली असायची. गाण्याच्या चाली बरोबरच ते त्या गाण्याचे वृत्तं नकळत पकडत असत. शब्दांच्या उच्चाराची लय टिपणारा कान असेल तरंच हे साध्य होऊ शकतं. त्यांच्या काव्यलेखनात व्याकरणाचे दोषही खूप कमी प्रमाणात आहेत. उर्दू साहित्यातील इतर काव्यप्रकार देखील त्यांनी हाताळले आहेत. ते मराठीमधे कव्वालीसारखे गायन करणारे पहिलेच गायक असावेत असे वाटते. म्हणूनच येत्या काळात या उपेक्षित झंझावाताला मराठी साहित्याला एक महत्त्वाचा गझलकार म्हणून मान्यता द्यावीच लागेल.
वामनदादांची एक गझल रसिकांसाठी ...
कानात काल माझ्या माझे मरण म्हणाले
तन मन तुलाच माझे आले शरण म्हणाले
कोटी उपास पोटी धरिलेस तूच पोटी
झाले तुझ्या कुळाचे शुद्धीकरण म्हणाले
जळणे दिव्याप्रमाणे नाही तुझे फुकाचे
गौतम तुझ्यात आहे मज त्रिसरण म्हणाले
जीवनकथा गुरूची गाथा लिहीत होते
सरला प्रवास आता माझे चरण म्हणाले
ओटीत गौतमाच्या घालून सात कोटी
चल झोप शांत आता माझे सरण म्हणाले
वामनसमान माझ्या चिमण्या चिल्यापिलांनो
तारील मी तुम्हाला एकीकरण म्हणाले
(वामनदादा कर्डक)
- अमोल शिरसाट
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा