२ डिसेंबर, २०२०

मी माणसात आलो भीमा तुझ्यामुळे


                            डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा भारतीय साहित्यावर खोलवर परीणाम दिसून येतो. भारतातातील प्रत्येक भाषेतील काव्यामधे बाबासाहेबांचे अस्तित्व विशेषत्वाने दिसून येते. युट्यूबवर सर्च केल्यास शेकडो भाषांमधे त्यांच्यावरील गाणी सापडतात. ‘फॅन बाबासाहेब दी’ या गाजलेल्या गीताने प्रकाशझोतात आलेली जालंधरची २१ वर्षांची रॅप आणि हिपहॉप गायिका गिन्नी माही ही तर कॅनडा, ग्रीस, इटली, जर्मनी, युके अशा अनेक देशांमधे पंजाबी भाषेतून भीमगीतांचे कार्यक्रम सादर करत असते. अशा परिस्थितीत मराठी गझल आंबेडकरी विचारांपासून वेगळी कशी राहू शकेल? येत्या महापरीनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मराठी गझलेतून व्यक्त झालेल्या आंबेडकरी विचारांचा मागोवा घेण्याचा एक छोटासा प्रयत्न –
...........................................................................................................
                         सुरेश भटांनी त्यांचा आंबेडकरी विचारांच्या प्रभावामुळे बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. ‘झंझावात’(१९९४) हा संग्रह देखील त्यांनी संग्रह त्यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केला आहे. त्यांच्या लेखनावर बाबासाहेबांच्या विचारांचा मोठा प्रभाव दिसून येतो.

भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना
आज घे ओथंबलेल्या अंतरांची वंदना

या गीतामधून व्यक्त झालेल्या भावना त्यांच्यावरील प्रभावाची साक्ष देतात. भटांप्रमाणेच वामनदादा कर्डक यांनी सुद्धा आपल्या गीत-गझलांमधून आंबेडकरी विचारांचा प्रसार-प्रचार प्रभावीपणे केला. त्यांनी लिहिलेली हजारो गाणी आजही पूर्णपणे संकलित होऊ शकली नाहीत. लहानपणी निरक्षर असलेल्या वामनदादांनी जिद्दीने लिहायला वाचयाला शिकून सुंदर गझला लिहिल्या -

कानात काल आला आवाज हा भिमाचा
माझाच काल झाला आवाज हा भिमाचा
सारे उपास पोटी एका फडात येता
तारील माणसाला आवाज हा भिमाचा

‘आवाज हा भीमाचा’ इतका मोठा रदीफ (यमक) सांभाळून आपल्या भावना नेमकेपणाने मांडणे प्रतिभावंताचेच काम आहे. मराठी गझलेमधे अनेक गझलकारांनी आंबेडकरी विचार आपल्या गझलेतून मांडला आहे. अकोल्याचे श्रीकृष्ण राऊत लिहितात –

रामाने काळ्या तेव्हा दारास उघडले होते;
जेव्हा तू समतेसाठी धडधडला तोफेवाणी.

या शेरामधे नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह बेमालूमपणे चित्रीत झाला आहे. राउतांच्या अनेक गझलांमधे बौद्ध तत्वज्ञान व आंबेडकरी विचार दिसून येतो. बाबासाहेबांनी आयुष्यभर समतेसाठी लढा दिला. समतेच्या या लढाईमधे या महामानवाकडे कोणते शस्त्र होते? गोंदियाचे युवा गझलकार रमेश बुरबुरे बाबासाहेबांच्या शस्त्रांबद्दल लिहितात –

लेखणी तलवार होती सोबती अन्
संकटी तू पुस्तकांची ढाल केली

                         लेखणीची तलवार आणि पुस्तकांची ढाल करून त्यांनी माणसाला माणूस म्हणून न स्वीकारणा-या व्यवथेविरुद्ध बंड पुकारले. लहानग्या भिवाची शाळेत वर्गाबाहेर बसताना, गणित सोडविण्यासाठी फळ्याकडे जात असता आमचे जेवणाचे डबे अपवित्र होतील म्हणून आरडाओरड करणा-या मुलांकडे बघून काय अवस्था होत असेल. पण इथल्या माणसांबद्दल त्यांना कधीच राग नव्हता, त्यांचा खरा विरोध होता तो सड्क्या आणि बुरसटलेल्या प्रवृत्तींना! त्यांना समाजात समाजात समता अपेक्षित होती. बाबासाहेबांनी लहानपणी जातीभेदाचे चटके सोसल्यामुळे समतेचा विचार त्यांच्या मनात प्रथम आला. बुलढाण्याचे युवा गझलकार गोपाल मापारी लिहितात –

आमच्या शिवा-भिमाने समता दिली जगाला
समता कधीच नव्हती परक्यांकडून आली

                  शिव-फुले-शाहू-आंबेडकरांनी समाजात समता प्रस्थापित व्हावी म्हणून आयुष्यभर प्रयत्न केले. त्यामुळेच समतेचे तत्व भारतीय संविधानामधे खोलवर रुजले आहे. संविधानाने महिलांसाठी काय केले हे नाशिकच्या युवा गझलकारा जयश्री कुलकर्णी यांनी अत्यंत समर्पक शब्दांमधे मांडले आहे –

दगड समजून वागवले जरी होते समाजाने
नवी मुर्ती सुबक माझी घडवली संविधानाने

                   हा शेर महिलांसाठी तर लागू आहेच पण जात-धर्म-वंश-लिंग यांच्यापलिकडे जाऊन संविधानाच्या माध्यमातून शोषित-पिडीत-उपेक्षित समाज घटकांच्या जीवनाची मुर्ती सुबक बनविण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले आहे. कालचे मुके आज बोलू लागले आहेत. ‘शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा!’ हा मंत्र उराशी बाळगून वंचित समाज शिक्षणामुळे समृद्धीकडे वाटचाल करीत आहे. आदिवासी जाणिवा आपल्या गझलेतून प्रभावीपणे मांडणारे यवतमाळचे किरणकुमार मडावी म्हणतात –

तू सूर्य शिक्षणाचा गात्रात पेरला अन्
आल्यात काळरात्री धाकात आज बाबा

                    ज्यांचे माणूस म्हणून जगण्याचे अधिकार व्यव्हस्थेने हिराऊन घेतले होते आज ते शिक्षणामुळे भारतातच नव्हे तर ज्गाभरात अनेक उच्च पदांवर जाऊन पोहोचले. काल ज्यांना बोलण्याचा अधिकार नव्हता आज त्यांच्या शब्दांना किंमत आली आहे.त्यामुळेच पुसदचे रविप्रकाश चापके लिहितात –

मी शब्द बोललेला झाला प्रमाण आहे
म्हणतात ऐकणारे हे संविधान आहे.

             संविधनाने कोट्यावधी लोकांचे जीवन प्रकाशमान झाले. स्वतः सूर्याप्रमाणे जळून बाबासाहेबांनी संकटांची काळरात्र दूर केली. म्हणूनच परभणीचे आत्तम गेंदे म्हणतात –

स्वतः उजळून भीमाने मिटवली रात्र कायमची
मिळाला सूर्य दुनियेला कधी जो मावळत नाही.

              मराठी कवितेमधेच नव्हे तर बाबासाहेबांना अनेक भाषांमधील कवितांमधे सूर्याची उपमा दिली जाते. बाबासाहेबांचे व्यक्तीमत्व खरोखरच सूर्याप्रमाणेच होते. बाबासाहेबांना जाऊन ६४ वर्षे होत आहेत. तरीसुद्धा त्यांच्या विचारांचे तेज मात्र काही केल्या कमी होत नाही. बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू उत्तरोत्तर उलगडत आहेत. त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती दररोज येत असते. आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणीक अशा अनेक क्षेत्रात बाबासाहेबांचा प्रभाव अनेकदा दिसून येतो. त्यांचे अनंत उपकार या देशावर आहेत हेच म्हणावे लागेल. देशाचा जबाबदार नगरीक या नात्याने त्यांनी सर्वसमावेशक भूमिका ठेवली. म्हणूनच भुसावळच्या एजाज शेख यांना लिहावसं वाटतं की –

खोडून जात आलो भीमा तुझ्यामुळे
मी माणसात आलो भीमा तुझ्यामुळे

            मानवी कल्याणासाठी झटणा-या प्रत्येकाचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे. त्यामुळेच बाबासाहेब जगभारातील अनेक चळवळींचे आयडॉल आहेत. ते कित्येकांचे उद्धारकर्ते आहेत. कळंबच्या शेखर गिरी यांचा एक सुंदर शेर आहे –

केलास तू जगाचा उद्धार भीमराया
मानू तुझे किती मी उपकार भीमराया

नांदेडचे चंद्रकांत कदमही बाबासाहेबांना आदरांजली वाहताना म्हणतात –
 
तोडल्या नकोशा सा-या शृंखला भिमाने म्हणूनी
या निळ्या नभाच्याखाली माणूस सलामत आहे
 
               सकारात्मक आणि विधायक काम करणा-या लोकांच्या बळावरच हे सारे विश्व तरून आहे. समाजविघातकी लोकांनी कीतीही नकारात्मकतेचा अंधार पसरवला तरी मानवी कल्याणासाठी झटणारे बाबासाहेबांसारखे महापुरूष मात्र आपल्या विचारांच्या तेजाने ही नकारात्मकता दूर केल्या शिवाय राहत नाहीत.
झाड जसे सावली देताना आपला परका असा भेद करत नाही, अगदी तसेच बाबासाहेबांनी प्रत्येक जाती-धर्मातील लोकांबद्दल समान भावना ठेवली. त्यांनी आपला परका असा भेद केला नाही. त्यामुळेच दरवर्षी ६ डिसेंबरला अथांग जनसागर मुंबईच्या चैत्यभूमीवर अवतरतो. या गर्दीत केवळ एकाच जातीचे लोक नसतात. तर समाजाच्या सर्व स्तरातून लोक अभिवादन करण्यासाठी येत असतात. प्रत्येकाच्या डोळ्यात आजही बाबासाहेबांसाठी अश्रू असतात. बाबासाहेब गेले त्यावेळी अलोट गर्दी चैत्यभूमीवर उलटली होती. बाबासाहेबांची चिता जेव्हा जळत होती. तेव्हाची स्थिती अकोल्याच्या अविनाश येलकर यांनी आपल्या शब्दात मांडली आहे. हीच भावना आजही प्रत्येकाची असते -

होते निजून जेव्हा बाबा तुम्ही चितेवर
हर एक लाट रडली; होता उदास वारा!
....................................................
अमोल शिरसाट, 
अकोला
९०४९०११२३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा