२ डिसेंबर, २०२०

गझलेतून व्यक्त झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर

पाक्षिक प्रबुद्ध भारत या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पाक्षिकामधे महापरीनिर्वाण दिनानिमित्त प्रकाशित लेख 
___________________________


                             भावनांच्या अभिव्यक्तीचे एक प्रभावी माध्यम म्हणजे गझल ! गझलेचा उगम अरबस्थानात झाला  असला तरी अनेक भारतीय भाषांसह जगातील अनेक भाषांमधे गझल लिहिली जाते. मराठीत गझल आणण्याचे श्रेय माधव जुलियन यांना आहे तर मराठीत ख-या अर्थाने गझल रुजविली ती सुरेश भटांनी. कदाचित शरीराने अपंग असल्याने व मराठी साहित्य परंपरेनेसुद्धा नाकारल्यामुळे भटांच्या मनात उपेक्षितपणाची भावना रुजली गेली असावी. जाणत्या काळात त्यांच्यावर डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव पडून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांच्या अनेक गझलांमधे आंबेडकरी विचार आला आहे.  त्यांचे समकालीन असलेल्या वामनदादा कर्डक यांनी सुद्धा सुरेश भटांप्रमाणेच आपल्या विचारांच्या अभिव्यक्तीसाठी गझल हे माध्यम निवडले आणि आंबेडकरी विचारांचा शेवटपर्यंत प्रचार प्रसार केला. सुरेश भट आणि वामनदादांप्रमाणेच महाराष्ट्रातील अनेक गझलकारांनी बाबासाहेबांना गझलेतून आदरांजली वाहिली आहे. 
                             मराठी गझल उगमापासूनच जशी जदीद(आधुनिक) आहे तशीच ती तरक्कीपसंद ( सुधारणावादी) सुद्धा आहे. अनेक गझलकारांनी आपल्या गझलांमधून सुधारणावादी विचार मांडले आहेत. कोणताही सुधारणावादी विचार बाबासाहेबांशिवाय अपूर्णच असतो. सुरेश भटांनी ‘भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना’ या गीतामधून बाबासाहेबांना वाहिलेली शब्दरूपी आदरांजली अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. आजही हे गीत ऐकताना अंगावर काटा उभा राहतो. सुरेश भटांवर असलेला बाबासाहेबांचा प्रभाव अनेक ठिकाणी दिसून येतो. त्यांच्या ‘एल्गार’(१९८३),’ झंझावात’(१९९४) या संग्रहांमधील अनेक गझला आंबेडकरी विचारांनी प्रेरित आहेत. पैकी झंझावात हा संग्रह त्यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण केला आहे. या संग्रहातील एका गझलेत ते म्हणतात -

कुठे गेलास तू? माया तुझी का आटली, बाबा?
कुठे गेलास तू? छाती जगाची फाटली, बाबा!
कुणी केली दगाबाजी? कुणी केले तुझे सौदे?
तुझ्यामागे तुझी स्वप्ने कुणी ही छाटली, बाबा?

      अशा गझलांमधून त्यांनी चळवळीबद्दलची खंत सुद्धा व्यक्त केली आहे. चवळवळीसोबत बेईमानी करून सौदा करणा-या दलालांना आता जाब विचारण्याची गरज निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच वामनदादा सुद्धा म्हणतात -  
तो भीम जसा लढला तो लोकलढा लढवा
जा ठायी ठायी जा माणूस नवा घडवा

हा उंच पदी आहे तो नीच पदी आहे
या नीच प्रणालीला जा सुळावर चढवा

                   बाबासाहेबांनी लढलेला लोकलढा हा भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुर्वणाक्षरांनी नोंदला गेला आहे. कारण त्यांचा लढा मानव जातीच्या कल्याणासाठी होता. माणसाला माणूस म्हणून न स्वीकारणा-या व्यवस्थेविरुद्ध त्यांचे बंड होते. कोणत्याही प्रकारचे औपचारिक शिक्षण न घेतलेल्या  वामनदादांनी तरूण वयात आपल्या देहलवी नावाच्या अधिकाऱ्याकडून अक्षर ओळख करून घेतली. दुकानांवरच्या पाट्या आणि बोर्ड वाचून जिद्दीनं लिहायला वाचायला शिकले. डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार हे त्यांचं उर्जाकेंद्र होतं. या उर्जेतूनच वामनदादांनी आपल्या गीत-गझलांच्या माध्यमातून घराघरात, गावागावात लोकप्रबोधनाचं कार्य केलं. वामनदादांची गझल मराठी गझलेतला एक मैलाचा दगड आहे. ओघवती आणि समाजमनाचा ठाव घेणारी भाषाशैली हे त्यांच्या लेखणीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शाहिरी परंपरेचे संस्कार झाल्यामुळे ताकदीची आवाहनात्मकता त्यांच्या गझलेत आहे.

भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारिचे तयांच्या न्यारेच टोक असते.

 पूर्वी दूरर्शनवर एक जाहीरात यायची. त्यामधे शरीराने बलदंड असलेला एक माणूस अनेक छोट्या काठ्या एक एक करून तोडयचा. पण त्याच छोट्या काठ्या एकत्र करुन तोडायला दिल्यानंतर त्या एकत्र आलेल्या काठ्या तो तोडू शकत नसे. आज अशाच एकतेची गरज निर्माण झाली आहे. वामनदादांनी म्हटल्याप्रमाणे  एकोप्यातच खरी ताकद आहे. तलवार हे प्रतिक वापरून त्यांनी एकतेची ताकद पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. वामनदादांनी जाणिवेच्या पातळीवर गझल लेखन केले नाही. परंतु आपली भावना त्यांनी जनसामान्यांपर्यंत अत्यंत प्रभावीपणे थेट पोहोचवली आहे.  एक निरक्षर व्यक्ती ते उत्तम गायक, गीतकार, गझलकार, संगीतकार असा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे.
      मराठी गझलेतून बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंग, संघर्ष, आंदोलने प्रभावीपणे मांडले गेले आहेत. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्या चवदार तळ्याचे पाणी पिऊन कोणी अमर होणार नव्हते. तो त्यांचा प्रतिकात्मक लढा होता. चवदार तळ्याचा संघर्ष देखील अनेक गझलकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या शेरांमधून व्यक्त केला आहे. अकोल्याचे श्रीकृष्ण राऊत म्हणतात –

पेटले तुझ्या स्पर्शाने चवदार तळ्याचे पाणी
धगधगत्या संघर्षाने शब्दांना फुटली वाणी

अबलांच्या पाठीमागे कायदा उभा तू केला
शिवलेल्या ओठांवरती मग हक्काची आली गाणी

                            आंबेडकरी विचार जात-धर्म-वंश-लिंग यांना भेदून पुढे जातो. बाबासाहेब केवळ एका जातीपुरते मर्यादीत नाहीत. स्त्रीयांना सुद्धा त्यांनी सन्मानाचे स्थान मिळवून दिले आहे. त्यामुळेच कालची अबला आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून समर्थपणे उभी आहे. श्रीकृष्ण राऊतांनी आपल्या अनेक गझलांमधून समता-न्याय-स्वातंत्र्य-बंधुत्वाचा विचार मांडला आहे. त्यांनी ‘बुद्ध एक, संघ एक, एक भीम आमचा’ या सारख्या गीतांमधूनही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. त्यांच्या बाबासाहेब व रमाई यांना उद्देशून लिहिलेल्या गझलेतला एक शेर आहे –

तिचा शब्द माझ्या भिडे काळजाला;
तुटे जीव माझा कळू दे रमाला

       बाबासाहेबांसाठी रमाईने अपार कष्ट सोसले. रमाई मात्र बाबासाहेबांना आपली खुशाली पत्रातून कळवत. पण बाबासाहेबांना सगळे स्पष्टपणे दिसत होते. रमाईचे हाल होत असताना बाबासाहेबांचा जीवसुद्धा तीळ तीळ तुटत होता. राऊतांनी त्यांची भावावस्था नेमकेपणाने हेरली आहे. बाबासाहेबांबद्दलची भावना व्यक्त करताना सावन्याचे आबेद शेख लिहितात –

हा घोट घेत आहे, हा घास घेत आहे
तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत आहे.
घेऊन काय घेऊ घेण्यास काय आहे 
तुमचे विचार बाबा देण्यास घेत आहे

   आबेद शेख यांना बाबासाहेबांचे विचार देण्यासाठी घ्यावेसे वाटतात याचा अर्थ बाबासाहेबांचा विचार सर्वसमावेशक आहे. बाबासाहेब म्हणतात ‘ मी प्रथमतः आणि अंतीमतः भारतीय आहे’. म्हणूनच त्यांनी संविधानाची निर्मिती करताना भारतातील प्रत्येकाचा कुटूंब म्हणून विचार केला. त्यामुळेच शेकडो वर्ष प्रत्येक भारतीयाचा संविधान हाच धर्मग्रंथ असेल. बाबासाहेबांची महती मांडताना झोडग्याचे कमलाकर देसले म्हणतात – 

तू खरा विद्वान बाबा;
तूच आहे ज्ञान बाबा 
तूच आम्हाला दिले ना;
अस्मितेचे दान बाबा

 बाबासाहेबांनी वंचितांना अस्मितेचे दान दिले. व्यवस्थेच्या दगडाखाली पिचलेल्या माणसांच्या मनात स्वाभिमानाचे बीज पेरले. अजूनही अनेक लोकांना त्यांचे हक्क मिळाले नाहीत. बौद्ध धर्माच्या स्वीकारानंतर नव्याने लिहू लागलेल्या आंबेडकरी कवींनी आपल्या जाणिवा ताकदीने मांडल्या आहेत. सूर्याच्या प्रकाशाने एखादी अंधारलेली दरी प्रकाशमान व्हावी असेच हे कवी प्रकाशित झालेले दिसतात.  यवतमाळचे प्रा.सिद्धार्थ भगत  हे सुद्धा एक उजेडाचे पाईक असलेले गझलकार आहेत. भगत म्हणतात - 

 तुझ्या दिशेने  जेव्हा अम्ही निघालो होतो
नव्या युगाची वाटे प्रभात प्यालो होतो

जुन्या दिव्यांच्या वाती जळून गेल्या गेल्या
स्वतःच आम्ही सारे उजेड झालो होतो
  
 बाबासाहेबांच्या दिशेने निघालेला समाज सूर्याचे तेज प्राशून एका नव्या तेजाने झळाळून गेला आणि ‘अत्तं दीप’ होऊन प्रकाशमान झाला आहे. जनसमान्यांच्या भावना सिद्धार्थ भगत यांनी आपल्या गझलेतून प्रभावीपणे मांडल्या आहेत. ‘अत्तं दीप’ होऊन आंबेडकरी विचार प्रखरपणे मांडणारे आणखी एक गझलकार म्हणजे नागपूरचे प्रमोद वाळके. ते म्हणतात – 

आता कुठे दिव्यांना उजळायचे कळाले
अंधारधाक गाडुन चालायचे कळाले

                          या शेरामधे स्पष्टपणे बाबासाहेबांचा उल्लेख नाही पण दिव्यांना अंधाराची भीती सोडून उजळायचे का कळाले आहे ते स्पष्टपणे जाणवते. अकोल्याचे निलेश कवडे म्हणतात –

जागतो माणूस जो जयभीम म्हणतो
पेटतो माणूस जो जयभीम म्हणतो
फक्त भाषा माणसांना जोडण्याची
बोलतो माणूस जो जयभीम म्हणतो
 
                        एवढी जयभीम म्हणण्याची ताकद आहे. जयभीम हे केवळ जातीवाचक अभिवादन नाही तर समता – स्वातंत्र्य – बंधुता – न्यायासाठी लढण्या-या प्रत्येकाचा श्वास आहे.
                                बाबासाहेबांना जाऊन ६४ वर्षांचा कालवधी लोटला आहे. संपूर्ण भारतात असे एकही गाव किंवा घर नसेल जिथे त्यांच्या नावाचा उल्लेख झाला नसेल. आजही जनमानसात बाबासाहेबांची प्रतिमा खोलवर वसलेली दिसते. आज हयात नसलेले पुण्याचे जेष्ट गझलकार व हझलकार घनश्याम धेंडे आपल्या वेगळ्या शैलीतून बाबासाहेबांना आदरांजली वाहतात -

देह नाशवंत हा जरी, जगी न राहिला
नांदतोस आजही जनामनात तू भिमा !

         नांदेडचे नवोदित गझलकार निशांत पवार सुद्धा बाबासाहेबांचे तेज वेगळ्या पद्धतीने मांडताना दिसतात - 
अस्त पावणे सूर्यालाही चुकले नाही 
महामानवा, तेज तुझे रे ढळले नाही

     जन्म आहे तसे मरण देखील आहेच. ते कोणालाच चुकत नाही. पण शरीराने संपलेला माणुस विचारंमधे कायम जिवंत राहतो. बाबासाहेबांना जाऊन खूप मोठा काळ लोटला असला तरी त्यांनी केलेल्या कार्याच्या आणि विचारांच्या विविध पैलुंचा उलगडा नव्याने होत राहतो. त्यामुळेच ही भावना व्यक्त करणारा निशांत पवारांचा वरील शेर अत्यंत उल्लेखनीय आहे. डोळ्यांनी अंध पण बाबासाहेबांच्या तेजाने तेजोमय झालेले जालन्याचे विजय आव्हाड यांना सुद्धा बाबासाहेबांची कमतरता जाणवते ते म्हणतात- 

तू कुठे गेलास निघुनी भीमराया?
माणसांची हरवली आभाळमाया.

     अत्यंत साध्या शब्दात आव्हाडांनी आपली भावना व्यक्त केली आहे. 
                                  माधव जुलियन यांनी १९२० पासून गझल लेखनाला प्रारंभ केला. त्या अनुशंगाने २०२० हे वर्ष मराठी गझल १०० वर्षांची झाली आहे. मराठी गझलेला अजून बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. मराठी गझलेत विविध विषय हाताळले जात आहेत. गझल ही कवितेसरखी नसते. एका गझलेत वेगवेगळ्या आशयाचे शेर येऊ शकतात. मराठी गझल बव्हंशी तरक्कीपसंद वृत्त्तीची असल्याने सुधारणावादी विचार गझलेतून व्यक्त होताना दिसतात. डॉ. बाबासाहेबांचा विचार भारतीय समाजमनात खोलवर रुजला आहे. अनेकदा तो विचार आचरणात आणत असताना आचरणात आणणा-यालासुद्धा याची कल्पना नसते. मराठी गझलेचे सुद्धा तसेच आहे. अनेक गझलकार पुरोगामी विचार मांडतात तेव्हा तो बाबासाहेबांकडेच जाणारा असतो. आंबेडकरी विचार आता एका जातीपुरता मर्यादित राहिला नसून तो एक सर्वसमावेशक विचार झाला आहे. आंबेडकरी विचाराची पाळेमुळे मराठी गझलेत खोलवर रुजली आहेत.
............................................
अमोल शिरसाट
अकोला
9049011234
#प्रबुद्धभारत #गझलयात्रा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा