९ डिसेंबर, २०२०

पीर, संत ना ईश्वर झालो,फक्त भुक्याची भाकर झालो

                                नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरचं जीवन म्हणजे आयुष्याची सेकंड इनींग. ही सेकंड इनींग सुरू झाली की लोक भांबावतात. अनेकांचे जीवन थांबलेले असते. म्हणावं तितकं वय झालेलं नसूनही जास्तीत जास्त लोक वयापेक्षा वयोवृद्ध दिसायला लागतात. स्वतःला दुर्लक्षीत घटक समजत आपले शेवटचे दिवस मोजायला सुरू करतात. अशावेळी अचानक ह्रदयात खोलवर एखादी कळ उठून सगळं काही संपून जातं. मग दरवर्षी नित्यनेमाने फोटोला एखाद्या हारापुरतं त्यांचं अस्तित्वं शिल्लक राहतं. परंतू कलावंत मात्र कधीच म्हातारा होत नाही. वाट्याला आलेला प्रत्येक क्षण तो साजरा करतो. कला माणसाला कसं जगायचं हे शिकवते. एमएसईबीतून निवृत्तीनंतरही आपल्या गझलेत जगणारे एक चिरतरूण गझलकार म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद जवळील साक्री येथील मसूद पटेल ! सध्या ते पुण्यात स्थायिक झालेले आहेत. (जन्म – १८ नोव्हेंबर १९५४) 
.............................................................................
 १९७९ साली मसूद पटेल एमएसईबीमधे नोकरीला लागल्यानंतर त्यांना विविध कार्यक्रमांचे संचालन करताना छोट्या छोट्या कवितांची गरज भासे. मग यानिमित्ताने त्यांचे काव्यलेखन सुरू झाले. साहित्याची लहापणापासून आवड असल्यामुळे त्यामुळे वाचन होतेच. गझल हा काव्यप्रकार देखील त्यांच्या वाचनात आलाच. गझलेच्या प्रेमात पडलेल्या मसूद पटेलांनी गझलसदृश्य रचना लिहून विविध वर्तमानपत्र आणि मासिकांमधे आपल्या कविता पाठवायला सुरुवात केली. अमरावती येथून प्रकाशित होणा-या ‘अक्षरवैदर्भी’ नावाच्या मासिकासाठी ते आपल्या गझलसदृश्य रचना गझल म्हणून पाठवू लागले. मासिकाच्या संपादकांनी एकेदिवशी न रहावून पटेलांना फोन केला आणि चांगली खरडपट्टी काढली. यानंतर आपल्या रचना पाठवू नये असे सुनावले. संवेदनशील मनाच्या पटेलांना काय झाले ते कळेना. २००९ मधली ही घटना त्यांच्या काव्यप्रवासाला वेगळे वळण देणारी ठरली. यातूनच त्यांनी गझल हा काव्यप्रकार समजून घेऊन आपले गझल लेखन समृद्ध केले. त्यांचा गझलप्रवास नवोदितांना नक्कीच प्रेरणादायी आहे.

वाट काट्यांची निरंतर चाललो मी
मग कुठे गावी फुलांच्या पोचलो मी
पाहुनी दंग्यातल्या उध्वस्त वस्त्या
मानवी जन्मात येउन लाजलो मी

           लिहिण्याची कुठलीही घाई नसलेल्या मसूद पटेलांच्या गझलेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या गझलेत उमटलेली प्रखर सामाजिक जाणीव! समाजात होणा-या धार्मिक दंगलीमुळे बेचिराख झालेल्या वस्त्या पाहून खरोखरच आपण माणूस म्हणून जन्माला आलो याची लाज कुठल्याही संवेदनशील व्यक्तीला वाटत असते. दुसरीकडे दंगली घडवून आणणारे मात्र निष्पाप जिवांच्या चितेवर आपल्या स्वार्थाची पोळी भाजण्यात मश्गूल असतात. खरं म्हणजे अशा लोकांनाही माणूस म्हणायची लाज वाटते. गरीबांच्या जीवावर राजकारण, धर्मकारण आणि अर्थकारण करणा-यांच्या बंगल्यातला उजेड कुणाच्या मरण्याने तसूभरही कमी होत नाही. तेव्हा पटेल म्हणतात -      

बंगल्यांची रोज जी आरास आहे
झोपड्यांचा चोरलेला घास आहे

 चोर, डाकू, दरोडेखोर बदनाम असतात पण झोपड्यांच्या ताटातला घास दररोज दिवसाढवळ्या चोरला जातो, त्याचे काय? त्यांच्यावर होणा-या अन्यायाला कुठेच वाचा फुटत नाही. ‘व्हाईट कॉलर’ वाल्या चोरांना कोणीही पकडू शकत नाही. पकडले गेले तरी त्यातून त्यांची सहीसलामत सुटका होते. धार्मिक दंगली घडवून आणणा-या समाजकंटकांचेही काहीच बिघडू शकत नाही. न्याय कुठे मागावा हेच कळत नाही. अशावेळी मसूद पटेलांचा शेर आपसूक आठवतो - 
   
पक्षपाती धोरणाने झाड वागू लागल्यावर
कोणत्या न्यायालयी मग पाखरे तक्रार करतिल ?

     व्यवस्थेचे झाडच जर पक्षपातीपणाने वागून जीवावर उठले असेल तर पाखरांनी कुठे जायचे हा खरोखर गंभीर प्रश्न आहे. देशात भूक, गरीबी, दारिद्र्य, बेरोजगारी हे प्रश्न आ वासून उभे असताना माणसा-माणसामधे धार्मिक तेढ निर्माण करून भलत्याच गोष्टींना महत्व दिले जात आहे. माणुसकीच्या पिकावर द्वेषाची फवारणी इतकी जोरात चालली आहे की संपूर्ण जमीनच नापिक होऊन जाईल की काय ही भीती निर्माण झाली आहे. एकमेकांबद्दलची दिवसागणिक वाढत जाणारी घृणा पाहून मसूद पटेल लिहितात -       

हे कसे आहे घृणेचे कर्ज की ज्याला अम्ही
फेडतो जितके इथे तितके पुन्हा ते वाढते
 
             सुरेश भट म्हणतात, ’कोणत्याही साहित्यप्रकारात खरेपणा ही अत्यंत आवश्यक बाब असते. खोटा माणूस खरे लिहूच शकत नाही, हा नियम आहे. जे खोटे असतात, ते कितीही सुबक, शोभिवंत, खुसखुशीत व नक्षीदार लिहीत असले, तरी त्यांचे लेखन म्हणजे श्रृंगारलेले प्रेतच असते. ज्यांना इतरांविषयी काहीच वाटत नाही, तो संवेदनशील नसतो. संवेदनशील नसलेल्या, फक्त आत्मकेंद्री असलेल्या माणसाचा (चुकून माणूस लिहिले) साहित्यात अखेर पराभवच होत असतो. शब्दांची चलाखी कामी पडत नसते. सत्याशिवाय शब्दांना अर्थ नसतो आणि जो माणसांवर प्रेम करत नाही, तो कवितेवर प्रेम करीत नसतो. तुकाराम, कबीर यांनी स्वतःवर प्रेम केले नाही; त्यांनी सा-या मानवजातीचा कळवळा शब्दांत सामावून घेतला. म्हणूनच ते आज शिल्लक आहेत.’ मसूद पटेलांची गझल या कसोटीवर खरी उतरते. ते जे मांडतात ते त्यांच्या आतून आलेले असते. अत्यंत शांत, संयमी, मृदू स्वभाव असलेल्या पटेलांच्या गझलेतला माणसांबद्दलचा कळवळा मातीशी इमान राखणारा आहे.  

पीर, संत ना ईश्वर झालो
फक्त भुक्याची भाकर झालो

                                  एखाद्या हारातल्या गुलाबाचा सुवास होण्यापेक्षा भुकेल्या ओठातला घास होणे कधीही चांगले. जगातले सर्व तत्वज्ञान भाकरीपुढे फिके पडते. दोन ओळींच्या शेरामधे एवढा मोठा आशय व्यक्त करणे अत्यंत जिकिरीचे काम आहे. यासाठी सखोल चिंतन आणि प्रचंड संयमाची गरज असते. गझल कवितेसारखी सलग एका बैठकीत पूर्ण करण्याची गोष्ट नाही. प्रत्येक शेरावर आणि शेरातल्या प्रत्येक शब्दावर गझलकार अनेकदा विचार करतो. स्वतःच स्वतःचा समीक्षक होऊन शेरात आवश्यक ती परिष्करणे करत असतो. तेव्हाच एक ताकदीची गझल जन्माला येत असते. मसूद पटेलांची गझल वाचताना त्यांचे सखोल चिंतन प्रकर्षाने जाणवते. 
                        आपल्या हातात लेखणी आली आहे तर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा जीवनाचा मध्यवर्ती विचार असलेल्या गझलकार मसूद पटेल यांची एक गझल दै अजिंक्य भारतच्या वाचकांसाठी - 
 
चित्रामधे फारच सुखी मज वाटले होते शहर
प्रत्यक्ष दुःखांनी किती पण ग्रासले होते शहर

रक्षा तयांची घेउनी आलो परत गावी अता
स्वप्ने उरी जी साठवुन मी गाठले होते शहर

शहरासही गावाकडे होते खरे तर जायचे
चालू शकत नसल्यामुळे पण थांबले होते शहर

पांथस्थ अनवाणी कुणी चालून गेले वाटते
तेंव्हाच तर सारे असे रक्ताळले होते शहर

फुटपाथ वरचे सोबती सोडून गेल्या पासुनी
कित्येक राती एकटे मग जागले होते शहर

ज्यांनी मरणदारातही जातीय खेळी खेळली
निर्लज्जतेवर खूप त्यांच्या लाजले होते शहर

(मसूद पटेल, नॉटींग हिल सोसायटी,
पुण्यधाम आश्रम रोड, कोंढवा, पुणे मो. ९६०४६५३३२२)

................................................

अमोल बी शिरसाट
अकोला 
९०४९००११२३४ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा