१९८०-९० च्या दशकात मराठी गझलेचा ‘काफला’ एका दूरवरच्या प्रवासाला जाण्यासाठी निघाला. काफल्याच्या ०नेतृत्वाची जबाबदारी सुरेश भटांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. या काळात त्यांच्यावर ‘मराठी कवींची एक मोठी पिढी बरबाद होत आहे’ अशी टीकाही प्रस्थापित मराठी सारस्वतांनी केली. दुसरीकडे या काफल्याचे खंदे शिलेदार सुद्धा तयार होत होते. हे शिलेदार सुरेश भटांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानून मराठी गझल प्राणपणाने जपत होते. मिळेल त्या मार्गाने मराठी जनमानसात गझल रुजविण्याचे काम त्यांनी केले. मुंबई प्रांतातील शिलेदारांपैकी एक नाव म्हणजे १९९० च्या दशकापासून गझललेखन करणारे कल्याणचे गझलकार प्रशांत वैद्य! त्यांचा ‘अहवाल’(२०१७) हा गझलसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. ( जन्म - १२ मे १९६०)
...............................................................................................................
प्रशांत वैद्य यांचे आई आणि वडील हे मराठी रंगभूमीतील हौशी कलावंत होते. त्यामुळे त्यांना संगीत, साहित्य आणि नाट्यकला यांचे लहानपणपासून बाळकडू मिळाले. बालपणापासून काव्यलेखनाची आवड असलेल्या वैद्यांचा कैसर उल जाफरी, नासीर शकेब या उर्दूच्या नामवंत शायरांशी संपर्क आला. या शायरांची व ठाण्यातील अनेक साहित्यिकांची कल्याणच्या टिळक रेस्टॉरंटमधे उठबस असे. इथूनच प्रशांत वैद्य गझलेकडे आकर्षीत झाले. पुढे सुरेश भटांच्या मराठी गझलेने प्रभावित होऊन ते मराठी गझलेकडे वळले. सुरूवातीच्या काळातील गझलकारांवर भटांचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता. परंतू प्रशांत वैद्य यांच्या लेखणीवरही हा प्रभाव काही अंशी जाणवत असला तरी त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर
मी माझ्या मर्जीने जातो उंचावर अन् घेतो गिरक्या
दुस-या हाती दोर देऊनी उडणारा मी पतंग नाही
मांडून प्रदर्शन केंव्हा ठेवले न मी दु:खाचे
जखमांशी सलगीसुद्धा अश्रूंच्या नकळत केली...!
काही लोक आपले हसू जगाला देऊन आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या जीवनातील काही क्षण का होईना सुखकर करतात. परंतू अनेक लोक त्यांचे अश्रू भांडवल म्हणून वापरतात. या बिनव्याजी भांडवलाने त्यांना लोकांची सहानुभूती तर मिळतेच वर आर्थिक लाभ होतो तो वेगळाच ! पण प्रशांत वैद्यांसारखे गझलकार मात्र आपल्या अश्रूंना आपल्या जखमांचा पत्ता देखील लागू देत नाहीत, मग त्या इतरांना तरी कशा दिसतील? खरं म्हणजे आपल्या जखमा आणि त्यातून होणा-या वेदना ह्या आपल्यालाच सहन कराव्या लागतात. वेदनाच आपल्या हक्काच्या असतात. त्याच माणसाला जगणं शिकवतात. तीच आपली खरी स्थावर मालमत्ता असते -
मोजली जेंव्हा कधी मी अंतरीची मालमत्ता
सौख्य हे जंगम निघाले वेदना सा-याच स्थावर...!
मानवी भावभावनांचे सुंदर चित्रण प्रशांत वैद्य यांच्या गझलेत दिसून येते. प्रेमभावना व्यक्त करताना त्यांची लेखणी अत्यंत तरल होते.
तू सांग तुझ्या स्वप्नांना दरवाजे उघडे ठेवा
मी रात्रीच्या कुठल्याही प्रहराला फितवुन येतो.
हा शेर वाचताना पुन्हा ‘पसीना गुलाब था’ वाले दिवस आठवल्याशिवाय राहत नाहीत, ते दिवस ‘हवा’ झाले असले
तरीही ! पण प्रशांत वैद्यांच्या लेखणीला मात्र चिरतारुण्य लाभले आहे.
मला न पर्वा सहा ऋतुंची चिरतरुणाई माझी दौलत
बदलत जाते गुलबाक्षी पण मी कायम गुलमोहर असतो
रोज संध्याकाळी उगवणा-या ‘गुलबाक्षी’ या फुलाचा रंग गर्द गुलाबी असतो. म्हणूनच त्याचं नाव गुलबाक्षी असं पडलं आहे. पण गुलबाक्षी हे नाव असलं तरी इतरही अनेक रंगाची फुलं येणा-या या फुलाच्या अनेक जाती आहेत. गुलबाक्षीचा रंग बदलत जातो पण चिरतरुणाई लाभलेला ‘प्रशांत वैद्य’ नावाचा गुलमोहर मात्र कायम बहरत आहे.
नाट्यकला वडिलांकडून वारश्यात मिळालेल्या गझलकार प्रशांत वैद्य यांनी नाट्यलेखन आणि
दिग्दर्शनही केले आहे. त्यांना 'लिटमस', 'द ग्रेटेस्ट सोव्हरीन' ह्या व अनेक एकांकिकांसाठी दिग्दर्शनाची व अभिनयाची अनेक पारितोषिके प्राप्त झाली आहेत. 'सडेफटिंग’ व 'आता कसं वाटतंय?' ह्या मराठी चित्रपटांचे, तसेच 'फिरुनी या मनामधे’ व 'श्रीमंत पतीची राणी' ह्या नाटकांचे गीतलेखन सुद्धा त्यांनी केले आहे. त्यांच्या गीतांचे म्युझिक अल्बम सुद्धा प्रसिद्ध झाले आहेत. अनेक वर्तमानपत्रांमधून त्यांनी अनेक वर्षे गझल सदर चालवले. 'आम्ही कल्याणकर' ह्या सामाजिक संस्थेशी संलग्न संस्थेतर्फे गझल, तसेच साहित्य चळवळ पुढे नेण्यात त्यांचा नेहमीच हातभार असतो. कल्याण व आसपासच्या परिसरातील अनेक गझलकारांचे मुशायरे आयोजित करून मराठी गझल चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न प्रशांत वैद्य करत असतात. सोबतच अनेक गझल मुशाय-यांचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले आहे. पिंपरी-चिंचवडच्या गझलपुष्प संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला 'गझलपुष्प ' पुरस्कार सुद्धा त्यांना प्राप्त झाला आहे.
गझल चळवळीतील बिनीच्या शिलेदाराची एक गझल
या नजरेमधली किमया मी शिकून घ्यावी म्हणतो
हलकेच तुझ्या श्वासावर मी गझल लिहावी म्हणतो...!
मी अस्सल प्रत जन्माची यापुढे जगावी म्हणतो...!
सोबती क्षणाचे माझे, क्षण सारे फसवे माझे
आभास तुझा मज छळतो हा दोष तुझा की माझा
हे कळण्या तव हृदयाची मी धडधड व्हावी म्हणतो...!
मी खिंड सांत्वनांचीही किंचित् लढवावी म्हणतो...!
हो मीच ठेवला होता "अहवाल" गोपनिय माझा
ती कागदपत्रे आता मी खुली करावी म्हणतो...!
(प्रशांत वैद्य : समाधान निवास, कासार आळी,
संत
सेनामहाराज चौक, कल्याण-४२१ ३०१, जि. ठाणे मो.
९३२३५८४४८२.)
.........................................................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४
Behatrin...
उत्तर द्याहटवाGazal
सुंदर शब्दांकन
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर परिचय दिलात या गझल सूर्याचा.
उत्तर द्याहटवाआ.सुरेश दादांच्या गझलेचे बिनीचे वारसदार
आहेत प्रशांत दादा. हा सूर्य असाच तळपत राहो.
व्वा व्वा सुंदर परिचय.
उत्तर द्याहटवावाह वाह अप्रतिम परिचय करून दिल्याबद्दल अमोल सर आपले मानावे तेवढे आभार कमीच
उत्तर द्याहटवाअप्रतीम कार्य आहे आपले
अप्रतिम परिचय
उत्तर द्याहटवा