माणसाने प्राचीन काळापासून अनेक इंधनांचा शोध लावला. त्या इंधनांचा वापर करून जग भरधाव वेगाने रात्रंदिवस धावत आहे. खरं पाहिलं तर जग इंधनावर चालत नाही तर ते चालते आशेवर ! जीवनात अनेक अडचणी येतात. आपण निराश होतो हतबल होतो तेव्हा ‘उम्मीद पे दुनिया कायम है’ हे वाक्य वारंवार कानांवर पडतं. आपल्या अवती भवती अनेक लोक असतात की जे स्वतःच्या अडचणींवर मात करून यशाच्या उंच शिखरावर जाऊन पोचतात. शरीराने अपंग असलेली अनेक माणसं आपल्या अपंगत्वाला सहानुभुतीचं कारण बनू देत नाहीत. ते आपल्यातल्या कमतरतेवर लक्ष न देता आपल्या बलस्थानावर लक्ष केंद्रीत करतात. मराठी गझलेला आपलं बलस्थान बनवणा-या लोकांपैकी एक नाव म्हणजे गझलकार कमलाकर आत्माराम देसले. नाशिक जिल्ह्यात ते माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
मराठी गझलविश्वात आबा म्हणून प्रसिद्ध असलेले कमलाकर देसले यांचा जन्म २४ मे १९६३ रोजी नाशिक जिल्ह्यातील झोडगे या गावी झाला. तिथेच ते १९८२ साली जनता विद्यालयात शिपाई म्हणून नोकरीला लागले. जन्मतः दोन्ही पायांनी अपंग असल्याने लहानपणी न्युनत्वाचे भूत त्यांच्या मानगुटीवर बसले होते. सोबतची मुलं चिडवायची, हसायची. याचा आबांना खूप त्रास झाला. याचाच परिपाक म्हणून की काय तर ते दहावीला चक्कं चारवेळा नापास झाले. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. दहावीला चारदा नापास झालेले आबा नियमित विद्यार्थी नसूनही नोकरी करत ग्रॅज्युएशन आणि पीजीला महाविद्यालयातून सर्वप्रथम आले. सुरुवातीला शिपाई आणि नंतर पुढील काळात त्याच शाळेत माध्यमिक शिक्षक बनले. आबांना घडविण्यामागे त्यांना जीवनाचे शिक्षण आपल्या ओव्यांमधून देणा-या त्यांच्या आई सुशिलाबाईंचा मोठा वाटा आहे. लहानपणी आईच्या मांडीवर जात्यावरच्या छंदोबद्ध ओव्या ऐकत ते झोपी जात. इथेच जीवनाच्या तत्वज्ञानाबरोबच कवितेची आणि गझलेची बिजं आबांच्या मनात खोलवर रुजली. त्यामुळेच आबा जीवनाचं सार दोन ओळींच्या शेरात ताकदीनं मांडताना दिसतात –
अंकुराला
दगड सुद्धा चालतो
जीवनाला फक्त संधी पाहिजे ..
निसर्गात प्रतिकुल परिस्थितीतही अनेक ठिकाणी आपण झाड उगवताना पाहतो. वाळवंटातही निवडूंग उगवताना दिसतात. याचाच अर्थ इच्छाशक्ती असली की काहीही घडू शकतं. पण यासाठी झळ सोसावी लागते. चटके सहन करावे लागतात. चटके म्हटलं अहिराणी बोलीत ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर’ असं जीवनाचं तत्वज्ञान सांगणा-या बहिणाईंची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. दुःखाच्या चटक्यांना कुठेच पर्याय नाही. आणि या चटक्यांमधून माणूस ख-या अर्थाने घडतो –
इस्त्री
फिरली दु:खाची दिनरात अशी, की -
आयुष्याचा कपडा अवघा
सुंदर झाला ...
आयुष्याचा सुरकुतलेला कपडा दु:खाच्या इस्त्रीने सुंदर होतो. किती सुंदर कल्पना आहे ही! गझलेच्या शेरात खयालाची मांडणी करताना शायराला काळजी घ्यावी लागते ती उत्कटतेची. दररोजच्या जीवनातील उदाहरणे, प्रतिमा चपखलपणे बसवता यायला हव्यात. गझलेवर अनेकदा तंत्राला शरण जाणारा काव्यप्रकार अशी टीका केली जाते. परंतु तंत्र ही गझलेची खरी शक्ती आहे. गझलेत पाळले जाणारे वृत्त आणि इतर बंधने ओळींमधे लय आणि नादमाधुर्य निर्माण करतात. त्यामुळेच आशय आणि आकृतीबंध यांचा सुंदर संगम असलेला शेर या काळजापासून त्या काळजापर्यंत थेट पोचतो आणि दाद आल्याशिवाय राहत नाही.
या उन्हाचा केवढा हा बोलबाला ;
सावलीचा कोठला आवाज नाही
...
सावली कधीच कुठला आवाज करत नाही. अगदी तसेच शांत आणि संयमी स्वभावाचे आबा अगदी सहजपणे लिहून जातात. जीवनाला डोळसपणे बघतात, कान उघडे ठेऊन ऐकतात आणि मनात साठलेल्या अनेक गोष्टींमधून सोन्याचे कण मातीतून वेगळे करावे तसा आशय वेगळा करतात. त्यातून जन्माला येतात ते शेर प्रचंड ताकदीचे असतात –
उपाय सुद्धा अपाय होतो कधी कधी हा ;
शिवले म्हणुनी केळीचे हे
पान फाटले ...
माणूस अनेकदा त्याच्या समस्यांवर उपाय करतो पण ते उपाय कधी कधी अपाय होऊन बसतात. साध्यासुध्या अडचणीसाठी मोठा उपाय करणे अडचणीचे ठरते. आधीच नाजुक असलेले केळीचे पान शिवले तर पुर्ववत होण्याऐवजी ते फाटून जाईल. आकाशाएवढा आशय अणुमधे बसविण्याची शक्ती गझलेमधे आहे.
दिवस संपावा तसे आयुष्य सरते ;
आणि येते झोप त्याचे नाव
मृत्यू ...
जीवन म्हणजे काय? आपला
जन्म कशासाठी झाला आहे ? मृत्यु म्हणजे काय? असे
प्रश्न प्रत्येक व्यक्तीच्या मनात वेगवेगळ्या
वळणावर पडतंच असतात. या प्रश्नांची उत्तरे देणे एखाद्या स्थितप्रज्ञ व्यक्तीचेच काम आहे. कमलाकर देसलेंसारखा गझलकार सुद्धा
गझल लिहिताना एखाद्या ध्यानमग्न ऋषीसारखाच
असतो. एखादी गझल किंवा शेरामागे त्याने जागून काढलेल्या कितीतरी रात्रींची होरपळ असते.
कमलाकर
देसले हे नाव जेव्हा जेव्हा समोर येते
तेव्हा जीवनातल्या सुखदुःखांकडे विरक्त वृत्तीने पाहणा-या बालकवींच्या कवितेतील औंदुंबरांची आपसुकंच आठवण होते. लहानपणी आजोबांसोबत किर्तनात हार्मोनियमची साथ देणा-या आबांचा
‘ज्ञानिया तुझे पायी'(१९९६) हा अभंगसंग्रह व ‘काळाचा
जरासा घास’(२०१४) हा
गझलसंग्रह असे दोन संग्रह प्रकाशित
झाले आहेत. ‘बिंब-प्रतिबिंब’ हा
कवी खलील मोमीन आणि कमलाकर देसले
यांच्या प्रदीर्घ काळ कवितेतून चाललेला अनोखा पत्रव्यवहारसुद्धा संग्रह रुपात प्रकाशित झाला आहे. याबरोबरच विविध
वृत्तपत्रांमधे आबा स्तंभलेखन सुद्धा करत असतात.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए.च्या अभ्यासक्रमात त्यांच्या
पाच कवितांचा समावेश झाला आहे. याच विद्यापीठाच्या एम.ए.च्या गझलनामा पुस्तकासाठी ‘गझल परिचय, तंत्र व अभ्यास’ अशी प्रदीर्घ प्रस्तावना देखील आबांनी लिहिली आहे. सह्याद्री
वाहिनी व रंगबावरी संस्था, मुंबई
यांच्या विद्यमाने दिला जाणारा महाकवी कालिदास पुरस्कारासह अनेक सन्मान सुद्धा त्यांना
प्राप्त झाले आहेत.
स्थितप्रज्ञ वृत्तीच्या कमलाकर देसले (आबा) यांची जीवनातले विविध पैलू उलगडून दाखवणारी एक सुंदर गझल -
तुझे रे जीवना कोडे मला नाही उमगले बघ ;
मला इतकेच कळले की मला काही न कळले बघ
कुणाला हरवणे
आणी कुणाची जिरवणे सोपे ;
स्वतःला जिंकण्यासाठी स्वतःला मी हरवले बघ..
म्हणे धरणातुनी
पाणी कधीचे सोडले आहे
मधे कोण्या पुढाऱ्याने कुठे आहे जिरवले बघ
कशा आल्या भरुन विहिरी अचानक दोन डोळ्यांच्या
निघाली सासरी तेव्हा मला पोरी रडवले बघ
तुझे वैकुंठही
होते तुझ्यापाशी तुकारामा
तरी खोट्या विमानातुन तुला त्यांनी बसवले बघ
कथा कविता लिहावी की कुणाचे चित्र काढावे
असो पण कागदाला तू किती आहे मळवले बघ
(कमलाकर आत्माराम देसले)
- अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४
खूपच सुंदर झाला आहे लेख. आबांचं आयुष्य आणि गझल दोन्हींचं सुरेख चित्रण !
उत्तर द्याहटवामनापासून आभार 💐
हटवावाह सुंदर लेख
हटवामनापासुन आभार दादा
हटवासुंदर लेख
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद
हटवाअप्रतिम लेख . आबासारख्या स्थितप्रज्ञ व्यक्तिमत्त्वाला प्रणाम .🙏🌹
उत्तर द्याहटवासर मनापासून आभार 💐
हटवाआबा अतिशय सुंदर व्यक्तिमत्व व लेखही तसाच सुंदर 👌
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद 🌹
हटवावा अप्रतिम..
उत्तर द्याहटवामनःपूर्वक आभार 💐
हटवाअतिशय सुंदर शब्दांत मांडणी,खूप छान
उत्तर द्याहटवाखूप धन्यवाद दादा
हटवाआबा द ग्रेट...
उत्तर द्याहटवा