२१ एप्रिल, २०२१

सखी अबला नव्हे, आहेस तू सबला

        गेल्या दहा वर्षात मराठी गझलेकडे अनेक कवी वळत आहेत. यामधे कवियित्रींची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. गझलेमधे स्त्री जाणीवांबरोबरच त्या अनेक विषय हाताळताना दिसतात. आपल्या कौटुंबिक-सामाजिक जबाबदा-या सांभाळून एका स्त्रीला आपल्या अभिव्यक्तीला मोकळी वाट करून देणे म्हणजे तारेवरची कसरतच असते. अशी तारेवरची कसरत करून सशक्तपणे गझललेखन करणा-या एक गझलकारा म्हणजे नंदूरबार जिल्ह्यातील शहादा येथील हेमलता पाटील! कौटुंबिक जबाबदा-या सांभाळत त्यांचे पती शरद पाटील यांनी सुरू केलेल्या अ‍ॅग्रोटेक उद्योगाच्या संचालक म्हणूनही त्या गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. 
.....................
  शालेय किंवा महाविद्यालयीन जीवनात जवळपास सगळेच लोक कवी असतात. जीवनाचा हा काळ भावनिक बदलांचा संवेदनशील काळ असतो. पुढे दुनियादारी सांभाळत आर्थिक घडी नेटकी करताना कविता कधी मागे पडते हे कळतही नाही. सर्वकाही स्थिरसावर झाल्यानंतर आता लिहिणे-वाचण्याचे वय निघून गेले आहे असे लोकांना वाटते. परंतु हेमलता पाटील यांनी मात्र या विचाराला फाटा दिला आहे. त्यांची मुलं मोठी झाली, उच्च शिक्षणासाठी त्यांनी घर सोडलं तेव्हा हेमलता पाटील यांनी जुन्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून खूप उशिरा आपले शालेय जीवनात सुटलेले काव्यलेखन पुन्हा सुरु केले. गझलेबरोबर ओळख झाल्यानंतर आपल्या भावनांना लयबद्ध मोकळी वाट करून दिली. 

तुझी प्रीत की ती त्सुनामी वगैरे
हृदय त्यात झाले निकामी वगैरे

  अनेकदा वयानुसार लिहिण्याचे पोकळ बंधन लोक कवीवर घालतात. वयाने जेष्ठ असलेला एखादा कवी प्रेम भावना व्यक्त करत असेल तर हे तुमचे वय आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जातात. कविता लिहिणारी जर एखादी स्त्री असेल तर मग तर विचारूच नका! आणखी एक गोष्ट म्हणजे पुरुषांपेक्षा एका स्त्रीच्या कवितेवर ‘कविता कशा सोबत खातात? हे न समजणा-या संघटनेचे अनेक स्वयंघोषित समीक्षक’ टीका करायला सुरुवात करतात. स्त्रीला आपल्या कुटूंबातील लोकांबरोबरच अशा फालतु टीकाकारांनाही तोंड द्यावे लागते. बाहेर स्त्री-पुरुष समानतेवर बेंबीच्या देठापासून कोकलणारे घरात बायकोच्या व्हाट्सअप अकाऊंटवर चोरटी नजर ठेऊन असतात. पण ज्याप्रमाणे हेमलता पाटील आपल्या पतीच्या पाठीशी उद्योगात खंबीरपणे उभ्या आहेत त्यापेक्षा जास्त त्यांचे पती त्यांना गझललेखनासाठी प्रोत्साहित करत असतात. त्यामुळेच उपरोक्त ओळींमधे प्रेमभावनेची एक लाट रसिकांना अनुभवायला मिळते.       
 
पावसा, बाहेर ती येणार नाही
येवढा घालू नको तू येरझारा
  
   पावसात भिजण्याच्या अल्लड वयातल्या प्रेमीजिवांच्या भावना व्यक्त करणारा हा शेर हेमलता पाटील यांनी अत्यंत साध्या आणि सुंदर शब्दांमधे लिहिला आहे. अशी सहजता त्यांच्या अनेक शेरांमधे दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या ‘असेलही नसेलही’(२०१८) या गझलसंग्रहाबद्दल बोलताना ‘हेमलता पाटील यांच्या रचनांमधे खानदेशच्या भूमीतील अंगभूत लयबद्ध गोडवा असल्याने या रचना कोणत्याही अंगाने कृत्रिम वाटत नाहीत. त्यांच्या अभिव्यक्तीत एक लोभसवाणी सहजता आहे’ असे शाहीर सुरेशकुमार वैराळकर म्हणतात ते खरेच आहे. 

क्षणांनो वेळ द्या थोडा मला फुलपाखरू होण्या
प्रथांनी वेढल्या बुरसट जुन्या कोषात आहे मी
  
        हेमलता पाटील प्रेमभावनेबरोबरच आपल्या गझलांमधे स्त्री जाणीवांचाही एक वेगळा अविष्कार करताना दिसतात. भारतीय स्त्री एकविसाव्या शतकातही बुरसटलेल्या विचारसरणीच्या कोषात अडकलेली आहे. स्त्रियांचे विश्व ‘चूल आणि मूल’ एवढेच आहे हे मानणारी जमात आजही अस्तित्वात आहे. पावलापावलांवर तिला रोखले जाते. तिच्यावर अत्याचार केले जातात. त्यामुळे स्त्रीचे जीवन एखाद्या जिवंत कबरीप्रमाणेच होऊन बसते.  
 
आठवणींची कबर आणि मी
दोन आसवे, पदर आणि मी

   स्त्रीजीवनाची वेदना मांडणारा हेमलता पाटील यांचा हा शेर खूपच ह्रदयस्पर्शी आहे. या शेरात आलेली आठवणींची कबर, दोन आसवे आणि पदर या प्रतिमा पुरातन बंधनांमधे जखड्लेल्या स्त्रीचा हुंदका वाचणा-या ऐकणा-यापर्यंत पोहोचवतात. आपला हुंदका दाबत प्रत्येक स्त्री आपल्या कुटूंबातील प्रत्येकाची काळजी घेते. प्रसंगी ती आपल्या नव-याची आई सुद्धा होते -

पत्नी असुनी क्षणभर त्याची आई झाले
'थकलो आहे' नवरा जेव्हा म्हटला होता
  
  असे आपल्या नव-याची आई होणे प्रेमाची सर्वोच्च पातळी असते. वास्तविक जीवनात अनुभव घेतल्याशिवाय असा शेर लिहिणेही कठीणच आहे. हेमलता पाटील वास्तविक जीवनातल्या सर्व भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडतात. या सर्व भूमिका पार पाडत असताना त्या स्वतःचा शोधही घेत असतात. आपल्या गझलेखनात नवनवे प्रयोग करून स्वतःची क्षमताही तपासतात. उपरोक्त शेर त्यांच्या पन्नास शेरांच्या गझलेतला आहे. अशी पन्नास शेरांची गझल लिहिणे सोपे नाही. हिंदी उर्दूत असे प्रयोग होताना दिसतात परंतु मराठीमधे अशी संख्या कमी आहे. एकाच जमिनीत अनेक शेर लिहिणे रटाळ आणि काफियानुसारी होत जाते परंतु हा प्रयोग हेमलता पाटील यांनी ताकदीने निभवला आहे. एका गझलेत असे अनेक शेर लिहू शकणे हे त्यांचे वैशिष्ट्य असले तरी सुचतील तेवढे लिहिण्याचा मोह टाळता आला आणि खयालांमधे अधिक नेमकेपणा आणता आला तर त्यांची गझल अधिक सुंदर होईल असे वाटते.
    पतीच्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभी राहणारी पत्नी, मुलांचे जीवन घडवणारी आई, यशस्वी उद्योजिका, उत्तम गझलकारा म्हणून भूमिका निभावणा-या हेमलता पाटील पाककलेची आवड सुद्धा नित्यनेमाने जोपासतात. त्यांचे ‘स्वाद’ हे पाककृतींवरचे पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे. त्या अनेक वाहिन्यांवर पाककृतींच्या कार्यक्रमात देखील सहभागी होत असतात.    

हेमलता पाटील यांची एक सुंदर गझल रसिकांसाठी - 
  
निजावी रात्र अन् व्हावा कहर बाई
भिजावे चिंब स्वप्नांनी नगर बाई

सुगंधी अंगभर झाल्या जुई जाई
स्मृतींना केवढा आला बहर बाई

मिठीची ओढ कासावीस करते मज
सरेना दीर्घ सांजेचा प्रहर बाई

असे शिव पार्वतीसम आमची जोडी
व्यथांचे प्राशतो मिळुनी जहर बाई

कधी शब्दातुनी तो व्यक्त ना झाला
मला मुक प्रेमभावांची कदर बाई

पहाटे गुंग मधुस्वप्नात मी असते
मधे किंचाळतो कर्कश गजर बाई

सखी अबला नव्हे, आहेस तू सबला
लढाया सज्ज् हो खोचत पदर बाई

( हेमलता पाटील , शहादा जि नंदूरबार)
.............
अमोल शिरसाट
९०४९०११२३४


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा