गझल ऐकताना अनेकदा रसिक ‘वाह!’ किंवा ‘आह!’ अशी दाद देत असतात. दोन्ही शब्द दाद देण्यासाठी वापरले जात असले तरी या दोन शब्दांमधे खूप अंतर आहे. ‘वाह!’ ही एखादा शेर आवडल्यानंतरची साहाजिक प्रतिक्रीया आहे. पण ‘आह!’ असा प्रतिसाद एखादा शेर काळजाला भिडल्यानंतरच येतो. खरं म्हणजे खरी गझल वाह पासून आह पर्यंतचा प्रवास असते. म्हणूनच गझलेच्या दोन ओळींमधे आयुष्य समावण्याची ताकद असते. पण शायराला त्या दोन ओळी जीव ओतून जगाव्या लागतात. तेव्हाच त्याच्या शब्दांमधे उत्स्फूर्तता येऊन रसिकांची भरभरून दाद मिळते. गझल लिहिण्याआधी गझल जगणारे अमरावतीचे एक शायर म्हणजे अनंत नांदूरकर ‘खलिश’! ते सध्या नागपुरमधे स्थायिक झाले असून त्यांचा ‘आंतरसल’ (२००७) हा संग्रह प्रसिद्ध झाला आहे. (जन्म – १३ डिसेंबर १९६८)
............................................................................................
१९९४-९५ ची गोष्ट आहे. अमरावतीच्या पठाण चौकात शहरातले नामांकित हिंदी उर्दू शायर संध्याकाळी हजेरी लावत. चहाटपरीवर चहाचा अस्वाद घेत घेत मैफिली रंगत. तेव्हा त्या मैफिली दूरवर बसून ऐकत नुकताच दहावी उत्तीर्ण झालेला; मिसरुढही न फुटलेला एक पोरगा गझलेच्या प्रेमात पडला आणि पाहता पाहता आपली ‘खलिश’ गझलेत लीलया मांडू लागला. त्याचं गझलवेड इतकं होतं की अझिझभाई नावाच्या एका अडाणी पण उत्तम शायर असलेल्या भंगारवाल्याच्या दुकानात तासनतास बसून गझल आत्मसात केली. उर्दू शायरांच्या नशीस्त अर्थात बैठकींमधे आणि मुशाय-यांमधे रात्ररात्रभर हजेरी लावली. तो पोरगा म्हणजे हिंदी-उर्दू आणि मराठीचे एक गझलेने झपाटलेले शायर अनंत नांदूरकर ‘खलिश’. खलिश हा त्यांचा तखल्लुस आहे. ‘खलिश’ म्हणजे काळजाला रुतत राहणारी गोष्ट. ही ‘खलिश’ नांदूरकर आपल्या शब्दांमधे मांडतात-
कोरुन हवा श्वासांनी आकार फुलांचे केले
मी खोल जुन्या जखमांना श्रृंगार फुलांचे केले
मी नाही दगडी भिंती नात्यात बांधल्या केव्हा
संसार नेटका केला घरदार फुलांचे केले
जीव घेणारी एखादी ओळ जेव्हा शायर लिहितो तेव्हा तो एक जीवघेणी वेदना उराशी सांभाळत असतो. गझल किंवा कविता लिहिणे हा केवळ यमकांचा खेळ नाही. कविने जगलेल्या क्षणांचा अर्क तो शब्दांमधे ओतत असतो. तेव्हा कुठे साध्यासुध्या वाटणा-या शब्दांना एक अनोखी झळाळी येते. आणि गझल तर अशी एक काव्यविधा आहे की ती त्या गझलकाराला अक्षरशः वेड लावते. स्वस्थपणे जगू देत नाही आणि मरूही देत नाही. अशा वेडेपणातूनच नांदूरकर २३-२४ वर्षांचे असताना नागपुरातील कामठीच्या एका इंडो-पाक मुशाय-यात उर्दूचे ख्यातनाम शायर मुन्नवर रानांना आपला एक शेर ऐकवण्यासाठी पोलिसांच्या नजरा चुकवून थेट मंचावर चढले होते. कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी झपाटलेपण आवश्यक असते.
संयमाचा तोल गेला पाहिजे
तर शिगोशिग गच्च पेला पाहिजे
स्वतःला झोकून देत स्वतःच्या संयमाचा पेला शिगोशिग भरला तरच निश्चित ध्येय साध्य करता येतं. नांदूरकरांच्या उपरोक्त गझलेतला एक शेर अजून ऐकण्यासारखा आहे. ते म्हणतात –
फेक जा डिग्री अता बेकार ती
तुज चहाचा एक ठेला पाहिजे
समाजात ही परिस्थिती आपण नेहमीच पाहतो. खूप शिक्षण घेतलेले लोक बेकार असतात आणि शाळेत उनाडपणा करणारे विद्यार्थी पुढे प्रचंड नाव आणि पैसा कमवतात. खूप शिकलेला व्यक्ती छोटे काम करायला लाजतो. पण कोणतही काम छोटं किंवा मोठं नसते, छोटा-मोठा आसतो तो दृष्टीकोन! नांदूकरांनी रोजच्या वापरातील प्रतिमा वापरून साध्या सोप्या शब्दांमधे मोठा विचार मांडला आहे. रोजच्या वापरातील प्रतिमा त्यांच्या शेरांमधे अनेकदा आढळून येतात. त्यामुळे तो शेर रसिकांना आपलासा वाटतो –
तू नवा तंत्रज्ञानी तुझा वेग आहे किती वादळी
मी जुनी पत्रपेटी तुला काय सांगु खुशाली अता?
तंत्रज्ञानाची प्रगती प्रचंड वेगाने सुरू आहे. काल आणलेला मोबाईल काही तासातच जुना होऊन जातो. पुर्वी मोबाईलवर एसएमएस पाठवला जायचा. आज मोबाईलवर ईमेल, व्हाट्सप बरोबरच विडीओ कॉलिंगची देखील सुविधा आहे. अशावेळी पूर्वी गावातल्या किंवा शहरातल्या चौकात असलेली लाल रंगाची पत्रपेटी मात्र एकटी पडली आहे. घरातल्या वयोवृद्धांची देखील तीच अवस्था आहे. कधीकाळी वैभवशाली असलेल्या पत्रपेटीप्रमाणेच ते सुद्धा दुर्लक्षित आहेत. त्यांना मनातलं दुखः व्यक्त नाही करता येत. त्यांच्या दुःखाची कुठे बातमीही होत नाही –
विठ्ठलाला त्रास का आहे कमी
आणि माझे दु:ख छोटी बातमी
दोन माझे हात- माझे शस्त्र अन्
श्वासही घेतोच आहे नेहमी
आपले हातच आपले शस्त्र असतात. पण ते परिस्थितीला वाकवण्यासाठी वापरावेत की कोणापुढे पसरण्यासाठी वापरावेत हे आपल्याच हाती असतं. उपरोक्त शेरामधे नांदूरकरांनी ही कल्पना खूप वेगळ्या पद्धतीने मांडली आहे. अनंत नांदूरकर मराठी बरोबरच उर्दूमधेसुद्धा ताकदीचे लिहीतात. लहानपणी कबड्डीच्या मैदानात कॉर्नरवर रेडरचा पाय लिलया पकडणारे नांदूरकर उर्दू गझलेच्या सागरातले पट्टीचे जलतरणपटू आहेत.
महंगे सूट में नींद कहॉं आती है अब
लेकिन तब मिट्टी के बिस्तर अच्छे थे
अनंत नांदूरकर हे एक पुर्णवेळ कवी असून त्यांच्या उपजिविकीचे साधन शब्दच आहेत. नव्या जुन्या हिंदी उर्दू गझलकारांच्या गझला त्यांना मुकपाठ असतात. शब्दसंपदा आणि समयसुचकतेच्या भरवश्यावर ते अनेक ऑल इंडीया हिंदी-उर्दू मुशायरे व महाराष्ट्रभरातील अनेक कार्यक्रमांचे बहारदार निवेदन व सूत्रसंचालन करतात. सोबतच मराठी नाट्यक्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटला आहे. अभिनय, नाट्यलेखन, दिग्दर्शन करण्याबरोबरच नेपथ्य आणि प्रकाशयोजनाही ते उत्तमरित्या करतात. अनंत नांदूरकर लिखित व दिग्दर्शित ‘उशाःप’ या ४० मुकबधीर मुलांच्या नाटकाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या नाटकाच्या लेखनासाठी त्यांना नाना पाटेकरांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त झाला आहे. नांदूरकरांच्या अनेक रचनासुद्धा नामवंत संगीतकरांनी संगीतबद्ध केल्या आहेत.
अनंत नांदूरकर ‘खलिश’ ह्यांची काळजाची ‘आंतरसल’ मांडणारी एक सुंदर रचना -
आयुष्याचा बैल सजवतो रोजच पोळा करतो,
जुनी गोधडी पुन्हा उसवतो नवीन खोळा करतो
वाईटाची होते माती नव्या चांगल्यासाठी
कुजल्यावरती काम खताचे मग पाचोळा करतो
जगण्याचा इतिहास शिकवतो भल्याबुर्यांशी लढणे,
मी सापाला मारत नाही जहरच गोळा करतो
सलाम करतो रोज आरसा एकसष्टीला माझ्या
रोज नव्याचा कलप लाऊनी मी वय सोळा करतो
जुन्या घराचे कुलूप सांगते नव्या घराचा पत्ता
सराव व्हावा म्हणून आधी गल्लीबोळा करतो
ज्यास मनाच्या श्रीमंतीचे मोल न कळले काही
तोच इथे मग सोने गोळा तोळा तोळा करतो.
(अनंत नांदूरकर ‘खलिश’)
- अमोल शिरसाट
९०४९०११२३४
https://gazalyatra2020.blogspot.com/
अनंत नांदूरकर/खलिश भाई यांचा मी जबरदस्त चाहता आहे. आणि त्याची सुरूवात "आपली जिंदगी आपल्यासारखी
उत्तर द्याहटवापंख कोणीतरी कापल्यासारखी" या मतल्यापासून.
अमोल दादा तुमचे लिखाण मी अधून मधून वाचत असतो. अतिशय उत्तम, इत्यंभूत लिहीत असता. या निमित्ताने छान उपक्रम तुम्ही हाती घेतलाय. तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी अनंत शुभेच्छा...
रोशनजी मनःपूर्वक आभार!
हटवाआह
उत्तर द्याहटवामनापासून आभार
हटवाअतिशय सुंदर लेख. गझलकाराचा संपूर्ण परिचय लेखातून करून देण्याची आपली शैली अप्रतिम.
उत्तर द्याहटवाआदरणीय सर,
हटवामनापासून आभार!