१८ नोव्हेंबर, २०२०

गझलकार ‘सीमोल्लंघन’ची तपपुर्ती


                   दरवर्षी दस-याच्या निमित्ताने प्रकाशित होणारा ‘गझलकार’ ब्लॉगचा सीमोल्लंघन २०२० हा ऑनलाईन गझल विशेषांक नुकताच प्रकाशित झाला आहे. यंदा महाराष्ट्रभरातील १५७ नव्याजुन्या गझलकारांच्या गझला व गझलेसंबंधीचे १० लेख या अंकामधे समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सुरेश भट लिखित ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ या सुप्रसिद्ध मराठी अभिमान गीताचे व ‘बालगंधर्व’, ‘अजिंठा’ या गाजलेल्या चित्रपटांचे संगितकार, सारेगमप या संगीतसस्पर्धेचे परिक्षक कौशल इनामदार यांच्या हस्ते या अंकाचे ऑनलाईन प्रकाशन करण्यात आले आहे. हा विशेषांक म्हणजे मराठी गझल रसिकांसाठी एक पर्वणीच असतो.

                    मराठी गझल जनसामान्यांमधे रुजावी याकरिता अनेक गझलकार, गायक, संगीतकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. मराठी गझल रसिकसुद्धा मराठी गझलांच्या मैफिली, मुशायरे यांना आवर्जून हजेरी लावत असतात. सोशल मिडियावर मराठी गझलेचा प्रसार प्रचार जोमाने सुरु आहे. पाश्चात्य जगाच्या तुलनेत मराठी ब्लॉगर्सची संख्या तशी कमीच आहे. मराठी गझलांचे ब्लॉगही मोजकेच आहेत. यापरिस्थितीत जेष्ठ गझलकार श्रीकृष्ण राऊत यांच्या दूरदृष्टीतून साकार झालेला ‘गझलकार’ हा मराठी गझलेच्या कला आणि कौशल्यासंबंधी ‘सब कुछ’ देण्याचा प्रयत्न करणारा ब्लॉग उल्लेखनीय आहे. २००८ मधे सुरु झालेल्या या प्रवासाला यावर्षी १२ वर्ष पूर्ण झाले. १२ वर्षांच्या या काळात दस-याच्या निमित्ताने प्रकाशित होणा-या ‘सीमोल्लंघन’ या गझल विशेषांकात तमाम मराठी गझलकारांच्या वैविध्यपूर्ण गझला आणि लेख प्रकाशित झाले आहेत. या विशेषांकाला देशभरातूनच नव्हे तर मायभूमीपासून दूर सातासमुद्रापार असलेल्या मराठी रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो.

                   यंदा प्रकाशित झालेल्या सीमोल्लंघनचे वैशिष्ट्य म्हणजे नोकरीच्या निमित्ताने सातासमुद्रापार लंडनमधे राहून गझल लेखन कराणारे अमरावतीचे गझलकार राहूल गडेकर ते आदीवासींच्या व्यथा मांडणारे यवतमाळचे गझलकार कीरणकुमार मडावी व्हाया गोवा, गुजरात, कर्नाटक, तेलंगाना आणि मध्यप्रदेशमधील १५७ गझलकारांच्या उत्तमोत्तम गझलांचा समावेश आहे. ‘आँख में पानी रखो होटों पे चिंगारी रख्खो’ या ख्यातनाम शायर राहत इंदोरी यांच्यावर प्रकाश टाकणारा शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांच्या विशेष संपादकीय लेखापासून या विशेषांकाची सुरुवात होते. जेष्ट गझलकार श्याम पारसकर यांनी ‘एक गझल : एक पुस्तक : फिर संसद मे हंगामा या लेखात प्रकाश पुरोहित यांच्या पुस्तकावर प्रकाश टाकला आहे,  बडोद्याचे गुजराती- मराठी गझलकार हेमंत पुणेकर यांनी ‘गणवृत्तांना लवचिक करण्याची गुरुकिल्ली : उच्चारी वजन’ या लेखात हिंदी उर्दू प्रमाणे मराठीत उच्चारी वजनाचा वापर कसा करता येईल यासंबंधी प्रश्नोत्तरी स्वरूपात लेखन केले आहे. सोबतच त्यांनी अनुवादित केलेल्या मकरंद मुसळे यांची गुजराती गझल मराठी अनुवादित केली आहे.  लोककवी वामनदादा कर्डक यांच्या आंबेडकरी जाणीवेच्या दहा गझला या अंकात गझलकार प्रमोद वाळके यांनी संपादित केलेल्या ‘संग्रामपिटक’ मधून घेण्यात आल्या आहेत. गझलकार कालीदास चावडेकर यांच्या सहा हझला, सुरेश भटांच्या दोन गझलांचे चित्रकार केंलाश शिवणकर यांनी केलेले सुलेखन, मराठी व उर्दू गझलांचे व्यासंगी देवदत्त संगेप यांचे ‘हज़ल के शेर बनाम ग़ज़ल के शेर’ हे या विशेषांकाचे वैशिष्ट्य आहे. सोबतच बंगलुरूचे गझलकार अविनाश चिंचवडकर यांनी ‘आठवणी सुरेश भटांच्या’ या लेखात भटांच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. गझलकार संजय गोरडे यांचा ‘इस्लाह’संबंधीचा लेख वैशिष्ट्य्पूर्ण आहे. गझलगंधर्व सुधाकर कदम  यांचा ‘उर्दू गझल गायन ऐकताना’ व गझलकारा डॉ संगीता म्हसकर यांचा ‘गझल गायकीचा इतिहास’ गझल गायनासंदर्भातील लेख महत्वाचे आहेत. मराठी गझलेचे अभ्यासक व जेष्ठ गझलकार डॉ. राम पंडित यांनी ‘ग़ज़ल विधेची उपेक्षा का?’ या लेखामधे मराठी गझलेच्या मराठी साहित्य विश्वात होणा-या मराठी गझलेच्या उपेक्षेसंदर्भात भाष्य केले आहे. जेष्ठ गझलकार शिवाजी जवरे यांनी  ‘तुझे इरादे महान होते’ भटांच्या गझलेखनावर प्रकाश टाकला आहे. साबीर सोलापूरी ‘दीपोत्सवात रंग गझलेचा’ या लेखासह गझलेसंबंधीचे महत्वाचे लेख सीमोल्लंघनमधे समाविष्ट आहेत.

                            एका क्लिक सरशी गेल्या बारा वर्षांच्या काळात प्रकाशित झालेले विशेषांक हे मराठी रसिक व अभ्यासकांना सहजपणे प्राप्त होऊ शकतात. २०१५ पर्यंत राऊतांनी स्वतः या अंकांचे संपादन केले. त्यांनतर दोन वर्ष या तपस्येत त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे खंड पडला. त्यानंतर संपादक मंडळात शाहीर सुरेशकुमार वैराळकर, प्रस्तुत लेखक व गझलकार अमोल शिरसाट यांचा समावेश करण्यात आला. ब्लॉगचे सुंदर मुखपृष्ट छायाचित्रकार अशोक वानखडे यांनी केले आहे. ब्लॉगची आकर्षक मांडणी वाचकांचे वेधून घेते. विभागवार केलेली रचना अत्यंत सुलभ आहे. सोशल मिडीयाच्या या युगामधे मराठी गझलेला वाहिलेला एकमेव ब्लॉग म्हणून या ब्लॉगचे महत्व अनन्यसाधारण आहे. मराठी गझलेच्या विकासाच्या दृष्टीने आंतरजलावर सहजपणे उपलब्ध होणारा दुवा म्हणून पीएचडीच्या अभ्यासकांच्या दृष्टीने सुद्धा गझलकार ब्लॉग अत्यंत महत्वाचा आहे.
कुठल्याही प्रकारच्या आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केवळ मराठी गझलेच्या विकासासाठी गझलकार ब्लॉगची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.
खाली दिलेल्या लिंकवर रसिकांना अंक विनामुल्य वाचता येईल.

https://gazalakar20.blogspot.com/

- अमोल शिरसाट
९०४९०११२३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा