२१ ऑक्टोबर, २०२०

लोकहो गझलेत झाल्या खूप टोळ्या

 


                अडीचशेहून अधिक वर्षांपासून वाटचाल सुरू असलेल्या मराठी गझलेला मोठ्या प्रमाणावर रसिकमान्यता मिळत आहे. अनेक नवनवीन मराठी गझलकार गझललेखनाकडे वळत आहेत. उर्दू गझलेप्रमाणेच मराठी गझलेतसुद्धा एक अंगभूत शक्ती आहे. परंतु एक प्रभावी काव्यप्रकार असूनही मराठी काव्यसमीक्षक मात्र अजूनही पाहिजे त्या प्रमाणात मराठी गझलेची समीक्षा करताना दिसत नाहीत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्येसुद्धा मराठी गझलेवर फारशी चर्चा होताना दिसत नाही. अशा परिस्थितीत सुरुवातीच्या काळात मराठी गझलेचं संशोधन आणि समीक्षा व्रतस्थपणे करणा-या काही मोजक्या अभ्यासकांमधे एक महत्त्वाचं नाव आहे प्राचार्य डॉ. अविनाश सांगोलेकर! मराठी गझलेचे आद्य संशोधक म्हणून त्यांची कामगिरी अत्यंत मोलाची आहे.ते स्वत: उत्तम कवी , गीतकार आणि गझलकार आहेत.
                    खरं म्हणजे गझल या काव्यप्रकाराबाबत अनेक संभ्रम आहेत. हा संभ्रम अगदी नावापासून सुरू होतो. सुरुवातीला गज्जल असे संबोधले जाऊन तिचे स्वरूप पुल्लिंगी होते. त्यांनतर ‘गझल’ हा शब्द मान्यता पावला. आजही उर्दूप्रमाणेच ‘ग़ज़ल’ किंवा मराठीत नुक्ता नसल्यामुळे ‘गजल’ असे लिहिले जावे, असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. बऱ्याचदा यावर वादही होताना दिसतात. दुसरा संभ्रम निर्माण करणारा महत्त्वाचा मुद्दा आहे गझलेचा आकृतिबंध! या आकृतिबंधात गझलेचे वृत्त, काफिया आणि रदीफ अशा गोष्टींमुळे थोडी क्लिष्टता निर्माण होते आणि त्यामुळेच अनेकदा समीक्षक गझलेच्या समीक्षेच्या वाटेला जाताना दिसत नाहीत. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख पद भूषवलेले आणि सध्या प्राचार्य पद भूषवत असलेले डॉ. अविनाश सांगोलेकर हे स्वतः उत्तम गझलकार असल्यानं त्यांनी सुरेश भटांच्या मार्गदर्शनाखाली गझल आत्मसात करून ‘मराठी गझल : १९२० ते १९८५’ हा मराठी गझलेवरील पहिला पीएच.डी.साठीचा शोधप्रबंध लिहिला आहे. यासाठी त्यांना १९९१ साली पुणे विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. यापूर्वी त्यांना ‘मराठी गझल : उगम व विकास’ या शोधप्रबंधिकेसाठी १९८४ मधे एम.फिल. पदवीसुद्धा प्राप्त झाली आहे. त्यानंतर या दोन्ही प्रबंधांच्या आधारे सांगोलेकरांनी ‘मराठी गझल : १९२० ते १९८५’ हा मराठी गझलेसंबंधीचा अभ्यास मांडणारा महत्त्वाचा ग्रंथ साकारला असून त्याची पहिली आवृत्ती १९९५ मध्ये , तर दुसरी आवृत्ती २०१५ मध्ये प्रकाशित झाली आहे.
                                ‘मराठी गझल : १९२० ते १९८५’ या ग्रंथात डॉ.अविनाश सांगोलेकरांनी मराठी गझलेची १९२० पासूनची जडणघडण मांडली आहे. १९२० हे वर्ष निवडण्याचे कारण म्हणजे या वर्षापासून माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव जूलियन (१८९४-१९३९) यांनी मराठी गझललेखनास आणि गझलेच्या प्रसार-प्रचारास प्रारंभ केला. त्याअर्थाने चालू २०२० हे वर्ष मराठी गझलेच्या शतकपूर्तीचे वर्ष म्हणता येईल. इंग्रजी आणि फार्सीचे प्राध्यापक असलेल्या माधव जूलियनांनी सुरुवातीच्या काळात गझलेच्या अनेक व्याख्या करून ‘गज्जलांजलि’ (१९३३, कवितासंग्रह), छंदोरचना (१९३७, संशोधनात्मक ग्रंथ) या दोन महत्त्वाच्या पुस्तकांबरोबरंच अनेक कविता व कवितेसंबंधीची पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या गझलांचा आणि गझलविचाराचा सखोल आढावा सांगोलेकरांनी त्यांच्या संशोधनात घेतला आहे. याबरोबरंच १९२० ते १९८५ या काळातील माधव जूलियनपद्धतीच्या विविध कवींच्या गझलांचा अभ्यास विविध अंगांनी केला आहे. त्यामुळे मराठी गझलेत कोणकोणती स्थिंत्यंतरे आली, याचा अंदाज बांधता येतो. १९६१ नंतर मराठी कवितेच्या क्षितिजावर उगवलेल्या सुरेश भट नावाच्या दैदिप्यमान ता-याने संपूर्ण आकाश उजळवून टाकले. सांगोलेकरांनी या ता-याची १९८५ पर्यंतची वाटचाल व प्रभाव उपरोक्त ग्रंथात समर्थपणे मांडला आहे.
                            डॉ अविनाश सांगोलेकरांनी त्यांचे संशोधनकार्य सुरु असतानाच सुरेश भटांसोबत ‘काफला’ (प्रथमावृत्ती : १९९० , द्वितीयावृत्ती : २०११) हा पहिला मराठी गझलांचा प्रातिनिधिक संग्रह संपादित केला. या संग्रहात ऐंशी-नव्वदच्या दशकात नव्यानेच गझल लिहू पाहणा-या ७३ कवीच्या १२४ तंत्रशुद्ध गझलांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे मराठी गझलेच्या विकासाच्या टप्प्यात या संग्रहाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सांगोलेकारांनी संपादित केलेला दुसरा महत्त्वाचा प्रातिनिधिक गझलसंग्रह म्हणजे ‘गझलधारा’(प्रथमावृत्ती : १९९४, द्वितीयावृत्ती : २०१५). हा संग्रह म्हणजे मराठी गझलेच्या आरंभापासून १९९४ पर्यंतच्या अडीचशेहून आधिक वर्षांच्या वाटचालीचे दर्शन घडविणारा प्रातिनिधिक गझलसंग्रह होय. अमृतराय(१६९८-१७५३) ते श्रीकृष्ण राऊत (१९५५) अशा एकूण निवडक ३२ गझलकारांच्या निवडक ५३ गझलांचा समावेश या संग्रहात आहे. सांगोलेकरांचे संशोधनकार्य आणि ‘काफला’, ‘गझलधारा’ या दोन संग्रहांवरून त्यांनी मराठी गझलेची व्रतस्थपणे केलेली साधना आणि सेवा दिसून येते. मराठी गझलेचा प्रचार-प्रसार सुरेश भटांनी एखाद्या मिशनसारखा केला. त्यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शानातून सांगोलेकरांनीसुद्धा संशोधनाच्या पातळीवर किल्ला लढविला आहे.
                        डॉ सांगोलेकारांचे आणखी तीन महत्त्वाचे ग्रंथ म्हणजे ‘गझलविश्व’ (२००५), ‘मराठी गझल : प्रवाह आणि प्रवृत्ती’ (२०१७) व ‘गझलचिंतन’ (२०१७) हे होत. या ग्रंथांमध्ये त्यांनी त्यांच्या मराठी गझलेच्या व्यासंगातून केलेले चिंतन मांडलेले आहे. मराठी गझलेच्या वाढीतील आणि विकासातील सजग साक्षीदार म्हणून आपली भूमिका चोखपणे पार पाडणा-या सांगोलेकारांनी आजपर्यंत विविध विषयांवरील एकूण १८ पुस्तके लिहिली आहेत. मराठी गझल क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना ‘भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार ' (२०११) , ' गझलरत्न ' ( २०१७ ) या पुरस्करांबरोबरच विविध सन्मान त्यांना आजवर प्राप्त झाले आहेत. सांगोलेकरांनी गझलेतील गटातटाच्या राजकारणापासून आणि वादविवादापासून स्वत:ला अलिप्त ठेवत आपले संशोधन कार्य आपली चिंतनशीलवृत्ती जोपासत अविरतपणे केले आहे. म्हणूनच ते त्यांच्या अलीकडच्या एका गझलेत शेवटी म्हणतात,

लोकहो गझलेत झाल्या खूप टोळ्या ,
मात्र ' अविनाश ' च कुण्या टोळीत नाही !

                        अशा वादविवादांपासून अलिप्त राहून गझलसमीक्षा आणि गझलसंशोधन करणा-या प्राचार्य डॉ.अविनाश सांगोलेकर यांचा पहिला गझलसंग्रह लवकरच प्रकाशित होत आहे. सद्यस्थितीवर भाष्य करणारी त्यांची एक गझल रसिकांसाठी -

कोरोनावर मात करूया, म्हणती सारे !
परंतु येता प्रसंग बाका दडती सारे !

एक विषाणू इवलासा पण दहशत मोठी ,
आला म्हणता घाबरून मग पळती सारे !

ह्या व्याधीला नाही पर्वा कोणाचीही,
मात्र तरीही बेपर्वाई करती सारे !

योद्धे सारे आपत्तीशी झुंजत असता ,
राजकारणी परस्परांशी लढती सारे !

औषध केवळ नसे पुरेसे कळल्यानंतर ,
योगसाधनेकडे शेवटी वळती सारे !

' अविनाश ' म्हणे , माणूस नसे हो लेचापेचा ,
त्याच्याशी जे लढती , अंती हरती सारे !
(डॉ.अविनाश सांगोलेकर)

- अमोल शिरसाट
९०४९०११२३४



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा