२३ सप्टेंबर, २०२०

या एकलेपणाचा छेडीत मी पियानो


            विदर्भाच्या मातीने मराठी गझलेला अनेक ताकदीचे गझलकार दिले आहेत. गझल सर्वप्रथम विदर्भातच रुजली असे म्हटले तरी वावगे ठरू नये. कारण मराठीतील पहिली गझलसदृश्य रचना लिहिणारे संतकवी अमृतराय हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा या गावचे! 'जगव्यापका हरीला नाही कसे म्हणावे' ही त्यांची रचना बऱ्याच अंशी गझल या काव्यप्रकाराशी साम्य असलेली आहे. हीच मराठीतील पहिली गझल समजली जाते. गझल सम्राट सुरेश भट हेही विदर्भाचेच! या मातीत जन्मलेले आणखी एक महत्त्वाचे गझलकार म्हणजे उ.रा.गिरी! अकोला जिल्ह्यातील मुर्तिजापूर तालुक्यात असलेल्या लाखपुरी या छोट्याशा गावात राहून हा कलंदर माणूस 'एकला चलो रे' च्या रागात गझल साधना करत राहिला‌.

       उद्धव गिरी रामगिरबुवा गिरी (१९२९-१९८६) यांचे ‘चंद्रायणी’ व ‘मी एकटा निघालो’ हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. दोन्ही संग्रहामधे तंत्रशुद्ध गझलांची संख्या कमी असली तरी संवेदनशील मनाच्या गिरींनी अनेक सुंदर गझला लिहिल्या आहेत. संगीतानुकूल, नादमाधूर्य असलेल्या - भावगीतासारख्या या रचना मनाला भुरळ घालतात. प्रेम, शृंगार, निसर्ग यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या काव्यात दिसतो. वैयक्तिक आयुष्यात असलेल्या पोकळीने गिरींच्या गझला शोकात्म झाल्या आहेत. दु:खाचा प्याला डोळे मिटून पीत, कवितेच्या धुंदीत जगत त्यांनी आपले आयुष्य सुंदर केले. बा.भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, सुरेश भट यांचे सहयात्री असलेले उ.रा. गिरी प्रसिद्धी पासून नेहमी दूर राहिलेत.
             
               जगात अनेक लोक संवेदनशून्य जीवन जगत असतात. त्यांना इतरांच्या दु:खाचे काही घेणे देणे नसते. आपली पोळी भाजली की झाले. मग कोणी उपाशी राहो की मरो. अशा लोकांचे खाण्याचे आणि दाखवण्याचे दात मात्र वेगळे असतात. परंतू संवेदनशील माणूस असे बेगडी जीवन कधीच जगू शकत नाही. उ.रा. गिरींच्याच शब्दात सांगायचे झाले तर

साच्यात सज्जनांच्या बसता कधी न आले
त्या नाटकी त-हांनी हसता कधी न आले

               सज्जनतेचा बुरखा घालून खोटे खोटे हसणे संवेदनशील माणसाला कधीच जमत नाही. जगाच्या नाटकी त-हांमध्ये बसता न आल्यामुळे अनेकवेळा नुकसानही होते.

तेजीत चाललेली त्यांची दुकानदारी
सगळीकडे बुडाली माझीच पण उधारी

            आणि त्यामुळेच गिरींसारखा कलंदर कफल्लक जीवन जगतो. स्वार्थी, ढोंगी, दांभिक प्रवृत्तींपासून नेहमीच दूर राहतो. जगात स्वार्थीप्रवृत्तींची दुकानदारी मात्र तेजीत असते. अशी दुकानदारी न जमल्यामुळे गिरींसारख्या गझलकाराच्या नशीबी मात्र दैन्यच येते. सोबत असलेले लोक खूप पुढे निघून जातात. आपण मागे पडल्याचे दु:ख माणसाला सतावत राहते. मग भोवताली गर्दी असूनही मनात एकलेपण रुजते. उ.रा. गिरींच्या मनातही खोलवर एक दुखरं एकलेपण रुजलेलं होतं. आणि तेच त्यांच्या कविता आणि गझलांमधून वेगवेगळ्या रुपात दिसत राहते. खरं म्हणजे हे एकलेपण प्रत्येक माणसाला ‘एक के साथ एक फ्री’ सारखंच भेटते.

सोडून चाललेले माझे मलाच गाणे
मी मैफिलीत उरलो वर्ज्य स्वराप्रमाणे

                   गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी भैरवीच्या सुरात गायलेल्या गिरींच्या या गझलेत वर्ज्य स्वर आला आहे. काय असतो हा वर्ज्य स्वर?  भारतीय संगीतामधे सात स्वर हे रागाचे मूळ घटक असले तरी विशिष्ट रागात काही स्वर वर्ज्य म्हणजे बाजूला काढून ठेवलेले असतात. बाजुला काढून ठेवल्यानंतर ते स्वर जणुकाही एकटेच उरतात. असं एकटं उरणं जेव्हा माणसाच्या आयुष्यात येतं तेव्हा ते खूप वेदनादायक असते. संगीताशी जवळचे नाते असणाऱ्या गिरींनी संगीतातील प्रतिमा गझलेत चपखलपणे बसवल्या आहेत. वर्ज्य स्वर ही प्रतिमा काळजाला पीळ घातल्या शिवाय राहत नाही. वरच्या ओळीत आलेले ‘गाणे’ सोडून चालले म्हणजे नेमके काय? हे गाणे म्हणजे आवडती व्यक्ती देखील असू शकते. एकमेकांवर जिवापाड प्रेम करणा-या ‘त्याचं’ आणि ‘तिचं’ लग्न होऊ शकत नाही. ती आता तिथे राहत नाही पण तो मात्र तिच्या गल्लीतून अनेकदा विनाकारण जातो आणि म्हणतो....

अद्यापही तुझ्या मी दारावरून जातो
वा-यावरी शुभेच्छा वाहून मूक जातो

             इंग्रजी साहित्यातला सुप्रसिद्ध कवी पी.बी.शेली म्हणतो ‘Our sweetest songs are those that tell of sadest thought’.  पंकज उदासच्या ‘चांदी जैसा रंग है तेरा’ पेक्षा गुलाम अलीची ‘चुपके चुपके रात दिन’ ही गझल मनाला अधिक स्पर्शून जाते असंच काहीतरी शेलीला म्हणायचं आहे. काव्यामधून व्यक्त होणारा शोकात्मभाव ऐकणा-याला नेहमीच भावतो. हा शोकात्मभाव गिरींच्या गझलेमधून व्यक्त होताना दिसतो. सतत होणारी उपेक्षा, अपूर्णता, उपहास यातून त्यांंच्या  गझलेत दु:खाचा आलाप दिसतो. गिरी फक्त जगापासूनच नाही तर स्वत:पासूनही वेगळे होऊ पाहतात -

मार्गावरुन माझ्या मी एकटा निघालो
डोळ्यात चंद्र जखमी घेऊन मी निघालो

झोपेत हासणा-या चुंबून राहूलाशी
माझ्या यशोधरेला सोडून मी निघालो

           गेयता हे उ.रा.गिरींच्या गझलेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. ही गेयता म्हणजे गिरींच्या ह्रदय सरोवरात उमटलेले भावतरंग असतात. हे भावतरंग जेव्हा गझलरूपात आपल्या पर्यंत पोचतात तेव्हा एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जातात. संगीताशिवाय जीवनाला अर्थ नाही असे मानणा-या गिरींच्या गायनात अनोखे मार्दव होते. संगीत हा मोक्षप्राप्तीचा ‘शॉर्टकट’ असे ते अनेकदा गमतीने म्हणत. आपल्या कविता-गझला ते रागदारीतच सादर करीत असत. गिरी गात असताना श्रोते मंत्रमुग्ध होऊन जात.  विदर्भ साहित्य संघाच्या मेहकर(बुलढाणा) येथील एका संमेलनासाठी पु.ल. देशपांडे आले होते. त्यावेळी पु.ल. देशपांडे गिरींना देहभान विसरून दोन तास ऐकत होते. नागपूर आकाशवाणीवर गिरींनी काव्यगायनाचे काही कार्यक्रम केले होते. त्यांच्या आवाजात त्यांनी सादर केलेल्या कविता-गझला हा येणा-या पिढ्यांसाठी एक अनमोल ठेवा आहे. तो जतन करून ठेवणे गरजेचे आहे.
          एकलेपणाचा पियानो छेडत जीवनाचं दुखरं गाणं सुसह्य करू पाहणा-या उ.रा. गिरींची  गझलगंधर्व सुधाकर कदम यांनी गायलेली एक सुंदर गझल –

या एकलेपणाचा छेडीत मी पियानो
ओठास भैरवीच्या दंशून जा स्वरांनो

तिमिरात हरवलेली निद्रा अनाथ माझी
माझ्यासवे तुम्हीही का जागता कळ्यांनो
 
शब्दात आसवांची बांधू कशी समाधी
व्हा हद्दपार आता डोळ्यातल्या तळ्यांनो

व्याकूल यामिनीला कुठली पहाट माझ्या
आता उषा उद्याची विसरून जा दिशांनो
(उ. रा. गिरी)

- अमोल शिरसाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा