५ मे, २०२१

दिली आहेस आयुष्या जरी वणवण घरी दारी

   
      आजकाल सुदृढ बालक जन्मण्यासाठी महागडे गर्भसंस्कार केले जातात. विविध मंत्र आणि ध्यानसाधनेचे प्रयोग आजकाल जोमात सुरू आहेत. पण आईच्या गर्भात रणरणत्या उन्हाच्या झळा आणि परिस्थितीचे चटके सोसणा-या एक गझलकारा म्हणजे अनाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममता सपकाळ! केवळ सिंधुताईंच्या कन्या हीच त्यांची ओळख नसून एक उत्तम गझलकारा आणि कर्तबगार स्त्री म्हणून त्यांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. (जन्म – १४ ऑक्टो ’७३) 
....................................

       पद्मश्री सिंधुताईंचा जन्म झाला त्यावेळी नकोशी म्हणून निदान ‘चिंधी’ असे त्यांच्या वडीलांनी नाव तरी दिले पण ममता सपकाळ यांचे काय? त्यांना काय मिळालं? फक्त जन्मदात्या बापाकडूनच नव्हे तर जगाकडूनही नकार मिळाला. जन्माआधीच होरपळ आणि वणवण मिळाली. जन्मानंतर पोटाची खळगी भरण्यासाठी आईच्या झोळीत दारोदार भटकंती मिळाली. हजारो अनाथ मुलांचा सांभाळ करण्याच्या उच्च ध्येयाने प्रेरित झालेल्या सिंधूताईंनी शिक्षणासाठी त्यांना श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर ट्रस्टच्या स्वाधीन केलं. आपल्यापेक्षा आपल्या आईची गरज अनेक निराधार बालकांना आहे हे सत्य त्यांनी लहानपणीच स्वीकारलं. आज त्या सिंधूताईप्रमाणेच एक कर्तबगार स्त्री म्हणून सन्मती बालनिकेतन, मांजरी (पुणे) या अनाथ व निराधार बालकांचा सांभाळ करणा-या संस्थेच्या व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासून आईच्या गीत, गझल,कवितेच्या प्रभावी गायनाचे संस्कार लाभलेल्या ममता सपकाळ जेव्हा गझल लिहितात तेव्हा ती अर्थव्यक्तीच्या गुणांनी भारलेली असते.

दिली आहेस आयुष्या जरी वणवण घरी दारी
तरीही मी तुझी आहे मनापासून आभारी.!

       आयुष्याने वणवण दिली तरी त्याचे आभार मानण्यासाठी मनाचा मोठेपणा असावा लागतो. पण अजाणत्या वयातच मनाचा मोठेपणा मिळालेल्या ममता सपकाळ यांचा कुणावरही रोष नाही. त्यांच्या गझलेतून वाहणारा प्रेमभावनेचा प्रवाह अत्यंत तरल आणि प्रवाही असतो. 

मिटून डोळे उजेड लपता अंधाराच्या आड एकदा
किती अनावर झाले होते वेलीसोबत झाड एकदा
                                               भावनात्मक अनुभूतीचा लयबद्ध विलोभनीय अविष्कार म्हणजे गझल! हा विलोभनीय अविष्कार गझलकार दैंनंदिन जीवनातील प्रतिमा वापरून गझलेत करत असतात. संध्याकाळचा संधीप्रकाश आणि वेलींनी वेढलेले झाड सगळ्यांनीच पाहिले असेल पण वरील ओळींमधे व्यक्त झालेला झाड आणि वेलीचा प्रणय अद्भूत आहे. आणखी एक विशेष म्हणजे पहिली ओळ वाचताना दुसरी ओळ कुठे जाणार आहे याचा बिलकुलच अंदाज लावता येत नाही. त्यामुळे दुसरी ओळ वाचताना अचानक दाद निघून जाते. ममता सपकाळ त्यांच्या अनेक शेरांमधून अशी दाद हक्काने वसूल करतात. 

झुलावे असे जर कधी वाटले;
मिठी दे तुझी, त्या झुल्यावर नको!

  त्यांच्या गझलेबद्दल बोलताना श्रीकृष्ण राऊत म्हणतात, ‘ स्त्री पुरूष प्रेमामधली देहबोली ममताच्या गझलेतली अभिसारिका नाकारत नाही. अतिशय समरसतेने ती प्रेमाचं सदेह रूप स्वीकारते. त्या शारीर अनुभूतीला धीटपणे मांडते. स्त्री गझलकारांच्या अभिव्यक्तीत एवढा धीटपणा अपवादानेच आढळतो.’ उपरोक्त शेरातल्या प्रेयसीला झुलण्यासाठी कुठल्याही प्रकारचा झुला नको आहे. झुलायचंच असेल तर तिला मिठीचा झुला हवा असतो. ही प्रेमाने केलेली लाडिक मागणी वेड लावल्याशिवाय रहावत नाही. 
फुलाचे नाव तू ओठास द्यावे;
खुडावी पाकळीने पाकळी मी!
     स्विस मानसशास्त्राज्ञ रोअरशॅक याने मानवी संवेदना समजून घेण्यासाठी ‘इंक ब्लॉट टेस्ट’ चा सर्वप्रथम वापर केला. या चाचणीत शाईचा एक ठिपका कागदावर टाकून नंतर तो कागद दुमडला जातो. त्यानंतर निर्माण होणा-या आकृतीतून कोणकोणते आकार मनात निर्माण होतात त्यावरून एखाद्या व्यक्तीच्या अप्रकट मनात कोणकोणत्या गोष्टी साठलेल्या आहेत याचा अभ्यास करता येतो असा त्याचा दावा होता. कवितेमधे सुद्धा अशा अनेक रोजच्या वापरातील प्रतिमा वापरून कवी सुंदर कलाकृती निर्माण करतो. त्याच्या अचेतन मनातल्या गोष्टी प्रतिमांचा आधार घेऊन अविष्कृत होतात. ह्या गोष्टी केवळ त्याच्याच एकट्याच्याच मनात असतात असे नाही तर त्या मानवी संवेदना असतात. प्रतिमांचा वापर केल्याने संवेदनांचे सौंदर्य अधिक खुलते. पाकळीने पाकळी खुडण्याची कल्पकता जेव्हा ममता सपकाळ वापरतात तेव्हा त्यांची सौंदर्यदृष्टी विशेषत्वाने अधोरेखित होताना दिसते.    

तुझ्या डोळ्यात बघताना असे लक्षात येते की..
अरे हा भोवरा आहे.. इथे बुडणे अटळ आहे.!

         त्याच्या डोळ्यात पाहिल्यावर बुडण्याची अ‍टळता ममता सपकाळांना जशी लक्षात येते तशीच रसिकांनाही हा शेर ऐकल्यावर भरभरून दाद देण्याची अपरिहार्यताही लक्षात आल्यावाचून रहात नाही. अगदी साध्या-सोप्या शब्दांची मांडणी असलेला हा शेर थेटपणे पोहोचतो. परंतु हा फक्त दाद घेणारा ‘मंचीय’ शेर आहे अशी टीकाही काही लोक करू शकतात. शेवटी आपापला दृष्टीकोन आहे. असं म्हणतात की सौंदर्य पाहणा-याच्या दृष्टीत असते. पण तत्वज्ञानाच्या गोष्टी करणारे बरेचदा छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद गमावून बसतात. समीक्षेच्या आखीव-रेखीव चौकटी आखून बसणा-यांच्या हातात शेवटी काहीच लागत नाही. असे असले तरी ममता सपकाळ यांना सुद्धा आपल्या कक्षेची जाणीव आहे. म्हणूनच त्या म्हणतात-  

मला माझ्याच कक्षेचा सुगावा लागता कळले
किती आकाशगंगा या इथे आहेत शेजारी.!

  आपल्या मर्यादा, कक्षा,सीमा ओळखणे प्रत्येकाला कुठे जमते? आणि जमले तरीही आपल्या शेजारी सुद्धा अनेक मोठ्या आकाशगंगा आहेत हे स्वीकारयला मन मोठ लागते! असा मानचा मोठेपणा लाभलेल्या ममता सपकाळ सन्मती बालनिकेतनच्या अनाथ व निराधार मुलांमधे त्यांची मोठी ताई होऊन रमतात. समाजानं नाकारलेल्या मुलांना आयुष्यभर पुरेल अशी नात्यांची शिदोरी इथे मिळते. गरज असेल तेव्हा ताई आधार बनून उभ्या राहतात. वारस्याने मिळालेल्या ममत्वाचा वसा जोपासून आपले नाव सार्थकी लावतात.      
                  पुण्याच्या रंगत संगत प्रतिष्ठानचा भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार, मुंबईच्या यु.आर. एल फाउंडेशनचा ‘गझल उन्मेष पुरस्कार’ असे सन्मान प्राप्त झालेल्या ममता सपकाळ यांच्या गझलेत प्रामुख्याने प्रेमभावनेचे विविध पैलु अनुभवायला मिळतात. त्यांचे काव्यलेखन सोशल मिडियामुळे सुरू झाले. त्या २०१० साली ऑर्कूटवर असलेल्या गझलकार सुधीर मुळीक व त्यांच्या मित्रांनी सुरू केलेल्या ‘काव्यांजली’ या समूहाशी जोडल्या गेल्या. त्यांचा सुधीर मुळीक यांचेशी झालेला काव्य-संवाद एकत्रितपणे ‘विळखा : एक बंध’ या नावाने संग्रह रुपात प्रकाशित झाला आहे.   
   गझलकारा ममता सपकाळ यांची एक गझल - 

कधीही एवढा शापीत क्षण येऊ नये..
जगावे वाटते जेव्हा मरण येऊ नये.!

नसावे वाटते जेंव्हा कुणीही भोवती
अशा वेळी कुणाची आठवण येऊ नये.!

जरी फिरतोय आपण आपल्या कक्षेमधे
तरी दोघांमध्ये आता ग्रहण येवू नये.!

नजर लागू नये रात्रीस माझ्या यापुढे
अता वाट्यास माझ्या जागरण येवू नये.!

मलाही न्याय ना देता तिला आला कधी
म्हणुन कुठल्याच इच्छेने शरण येऊ नये.!
 ( ममता सपकाळ, पुणे – ९३७०००३१३२)
..............................
अमोल शिरसाट
९०४९०११२३

४ टिप्पण्या: