१४ एप्रिल, २०२१

माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर झाले !

            वारश्याने डॉक्टर, इंजीनीअर होता येईल पण कवी होता येत नाही. जगातल्या कुठल्याही शाळेत किंवा विद्यापीठात कवी असल्याबाबतचे प्रमाणपत्रही मिळत नाही. मराठी कवितेची परंपरा फार मोठी आहे परंतु या परंपरेत कवीची मुलंही उत्तम कवी झाल्याची उदाहरणं फार मोजकी आहेत. कारण संपत्ती किंवा इतर कौशल्यांप्रमाणे कवितेचा वारसा मिळू शकत नाही. कवित्व उपजतच असावे लागते. कविवर्य सुरेश भटांचे चिरंजीव चित्तरंजन भट हे सुद्धा उत्तम गझलकार आणि कवी आहेत. त्यांनी मराठीत गझलेत आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.( जन्म – ८ ऑक्टोबर १९७०) 
.............................

    एखाद्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व, त्याची चालण्याची, बोलण्याची विचार करण्याची पद्धत, त्याची वक्तृत्वाची, गायनाची, लेखनाची शैली यांचा प्रभाव इतरांवर पडत असतो. लहानपणी एखादे मुल त्याच्या आईवडीलांच्या व्यक्तीमत्वाने प्रभावित असते. ते नैसर्गीकही आहे. परंतु प्रत्येकाचे या जगात आपले वेगळे, युनिक अस्तित्व आहे. निसर्गाने मानवाला समूहरुपात सारखे बनवले असले तरी प्रत्येकाचे व्यक्तीमत्व वेगळे आहे. प्रत्येकाला स्वतःचे वेगळेपण ओळखता यायला हवे. त्यामुळेच आपली एक वेगळी ओळख निर्माण करता येते. चित्तरंजन भट यांनी सुरेश भट यांच्या व्यक्तीमत्वाच्या प्रभावाने गझललेखन सुरु केले असले तरी त्यांनी आपली स्वतःची वेगळी गझललेखनाची शैली शोधून ती जपली आहे.  
      
कुणी टाकला डाका तर कोणी लुटलेले आहे
ह्या शहराचे शटर सारखे उचकटलेले आहे

कुठे न माझा मागमूस मी कसा पोचलो इथवर
मला कोणत्या जनावराने फरफटलेले आहे

        फ्रेंच शास्त्रज्ञ जॉर्ज ब्युफो म्हणतो की ‘ I don’t wish to sign my name, though I am afraid everybody will know who the writer is : ones style is ones signature always’. ब्युफोला त्याने जे लिहिले आहे त्याच्या खाली आपले नाव लिहावेसे वाटत नाही कारण त्याची शैली त्याचे वेगळेपण अधोरेखीत करते. काव्याच्या शैलीचा अभ्यास करण्यासाठी आशय, भाषा आणि कवितेचा प्रकार ही तीन परिमाणे आहेत. चित्तरंजन भटांच्या उपरोक्त ओळींमधला आशय व भाषा अत्यंत वेगळी आहे. त्यामुळे त्यात त्यांचा वेगळेपणा दिसून येतो.
  
तुला पाहिले आणि एकटक, एकसारखा बघत राहिलो
बघता-बघता माझे बघणे तुझ्याहूनही सुंदर झाले !

  सौंदर्यानुभूती कवीची दृष्टी अधिक सुंदर बनवते. प्रत्यक्ष सौंदर्यापेक्षा कवीचे काव्य अधिक सुंदर बनते ते त्याच्या दृष्टीमुळेच! त्या काव्याला कवीने मांडलेल्या आशयाची आणि त्याच्या सर्जनशीलतेची जोड लाभते. चित्तरंजन भटांकडे एक अनोखी सौंदर्यदृष्टी आहे. त्यांचे सर्जनशील मन गझलेकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघते.

एक चिमणी आठवण आली
आणि मग झाला किती गलका

   कवितेचे किंवा गझलेचे वेगळेपण कवीच्या प्रयोगशीलतेमधेही असते. प्रत्येक कवी प्रयोगशील असतो. तो आपले म्हणणे वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. उपरोक्त शेरात चित्रमयता आहे. एक छोटी चिमणी आणि तिच्यामागे आलेला गलका डोळ्यांपुढे उभा राहतो. पण ही चिमणी साधीसुधी नाही ती मनातल्या कप्प्यात राहणारी एक सुंदर आठवण आहे. ती येते तेव्हा गतकाळाच्या आठणींचा गलका सोबत घेऊन येते. चित्रमयतेचा प्रयोग आपल्या गझलेतून गझलकार करतात. तेव्हा अनेकदा केवळ वर्णन केले जाते. परंतु केवळ वर्णन करणे हे कवीचे काम नाही तर चित्तरंजन भटांच्या उपरोक्त शेराप्रमाणे डोळ्यांपुढे उभे राहिलेले चित्र शब्दरुपातून मनाला स्पर्शून जाणे गरजेचे असते.     

बेत इतकाच ह्या प्रवासाचा
दूर येथून जायचे आहे.

  जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर प्रत्येकाचा एक नवा प्रवास सुरू होतो. हा नवा प्रवास सुरू करताना एक निश्चित ध्येय डोळ्यांपुढे नक्कीच असते. परंतु ज्या वळणावर थांबलो आहोत तिथून निघायचे सुद्धा असते. त्यामुळे नव्या प्रवासाचे ध्येय ठरण्याआधी जिथे थांबलो आहोत तिथून निघण्याचा विचार नव्या प्रवासासाठी उद्युक्त करत असतो. हीच गोष्ट चित्तरंजन यांनी साध्या शब्दात परीणामकारकरीत्या मांडली आहे. 

            ‌रोज आपण तोंडावाटे अनेक शब्दांचा उच्चार करतो. कविता लिहिताना हेच शब्द वापरले जातात. कवितेचे प्रथमदर्शनी वेगळेपण हे असते की रोजच्याच वापरातल्या शब्दांची एक विशिष्ट क्रमवार मांडणी केलेली असते. हे कवितेचे फक्त वरवरचे लक्षण झाले. नुसती वेगळी मांडणी केली आणि यमकांचा खेळ खेळला तर कविता होते काय? नक्कीच नाही ! या रोजच्या वापरातील शब्दांना सृजनस्पर्श होणे गरजेचे असते. नवनिर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नातूनच काव्य उन्नत होत जाते.
          
आपल्या दोघांमधे कोणी नको
ये मिठी नेसू, तिची वस्त्रे करू

      असे जेव्हा चित्तरंजन भट म्हणतात तेव्हा पहिली ओळ जगातला कोणताही प्रियकर आपल्या प्रेयसीला म्हणेल. पण दुस-या ओळीत आलेली 'मिठी वस्त्राप्रमाणे नेसण्याची कल्पना' म्हणजेच कवीचा सृजनस्पर्श होय. यातूनच उपरोक्त शेर वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे.   

पोरके याहून भीषण दुःख नाही
कोण मज समजेल, समजावेल आता

    माणसाला अनेकदा आपण एकटे असल्याची जाणीव होते. कोणी आपल्याला समजून घेणारे नाही असे वाटत असतानाच आपण एकटे नाही हे समजावून सांगणारे सुद्धा कोणी नाही याचेही दुःख वाटत राहते. कधी कधी आपले दुःख कुरवाळत राहणे हा माणसाचा स्वभावच आहे की काय असेच वाटते. चित्तरंजन भट वरवर आत्ममग्न असल्यासारखे वाटतात परंतु ही आत्ममग्नता नसून माणसाच्या आत्मशोधाच्या प्रवासाचा आदिबंध आहे. हा शोध प्रत्येकजण आपल्या अनुभवांच्या पातळीवर घेत असतो. प्रत्येकाचा अनुभव वेगळा आणि शब्दात मांडताना तो आणखी वेगळा होतो. म्हणूनच लेखनही वेगळे आणि यातूनच विकसित होते वेगळी लेखन शैली !    
         इलेक्ट्रिकल इंजीनीअर असलेले गझलकार चित्तरंजन भट व्यवसायाने पेटंट कनसल्टंट आहेत. सोबतच ते उत्तम फोटोग्राफरसुद्धा आहेत. २००७ मधे त्यांनी सुरेश भट यांच्या नावाने आंतरजालावर संकेतस्थळ सुरु केले. अनेक वर्ष या संकेतस्थळाने अनेक नवनवीन गझलकारांना गझलेखनासाठी एक हक्काचे व्यासपीठ म्हणून भूमिका निभावली . ह्या संकेतस्थळावर अनेक उत्तमोत्तम गझला सादर झाल्या. निकोप चर्चाही झाल्या. मिळालेल्या प्रतिसादांतून अनेक गझलकारांना फायदा झाला. गझलेचे तांत्रिक बारकावे आत्मसात करण्यात मदत झाली. आज फेसबुकासारख्या समाजमाध्यमातून आपल्या रचना सादर करण्यासाठी गझलकारांना जागा तर मिळते पण निकोप चर्चा मात्र घडताना दिसत नाही. सुरेश भट डॉट इन संकेतस्थळ पुन्हा नव्याने पुनरूज्जीवीत होण्याची गरज निर्माण झाली आहे. चित्तरंजन भट यात पुन्हा नक्कीच पुढाकार घेतील असे अनेक गझलकार व रसिकांना वाटते. 
     चित्तरंजन भटांची एक गझल - 

खूप बोलू लागला अंधार नंतर
नीज आली; पण पहाटे चारनंतर

वेल जाईची पुन्हा फुलणार माझी
सांज अवघी लालसर होणार नंतर

राग आला ह्याच गोष्टीचा अचानक
चीड आली खूप तपशिलवार नंतर

खूप तो आहे तसा सहृदय कसाई
कळवळा येईल त्याला फार नंतर

फक्त बिंदूएवढा काळोख होता
घेत गेला एक दैत्याकार नंतर

कोरडा झालो निरोपाच्या क्षणी पण
भिजवले एकांत मी क्रमवार नंतर
( चित्तरंजन भट)
......................
अमोल शिरसाट
९०४९०११२३४

१० टिप्पण्या:

  1. सुंदर लेख.....
    आणि तेही सुरेश भट यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला....

    उत्तर द्याहटवा