वामनदादा कर्डक (१९२२-२००४) आंबेडकरी चळवळीतला एक झंझावात. या झंझावाताने आपलं वैयक्तिक दुःख, दारिद्रय, दैन्य बाजूला ठेऊन चळवळ मोठी केली. शेवटच्या श्वासापर्यंत लोकांचं प्रबोधन गीत आणि गझलांमधून केलं. परंतु या अवलियाचं गझललेखन दुर्लक्षितच राहिलं. परिस्थितीनं आणि मराठी साहित्य परंपरेनही या कलंदराची उपेक्षाच केली. 'सांगा या वेडीला, माझ्या गुलछडीला' हे 'सांगते ऐका'(१९५९) या चित्रपटातलं गाजलेलं गाणं वामनदादांनी लिहिलं पण शोकांतिका ही आहे की अनेकदा हे गाणं ग.दि. माडगूळकर यांनी लिहिलं असं सांगितलं जातं. या गीताचेही स.ग.पाचपोळ यांच्या 'हंबरून वासराले' या कवितेसारखंच झालं आहे.
वामनदादांनी मराठी गझल व संगीताची एकलव्यासारखी साधना केली. कोणी गुरू भेटला नाही. मराठी-हिंदी चित्रपट सृष्टीतल्या गीतांवरून आणि हिंदी-उर्दू कव्वाली, गझलांवरून शिकून ते स्वत:च स्वतःचे गुरू झाले. गझल संगीताच्या साथीने गाऊन सादर करायची असल्यास शब्दांची निवड संगीताला पोषक असावी लागते. वामनदादा स्वत: एक चांगले गायक असल्यामुळे त्यांच्या गझलेत गेयता आपसूकच आली आहे. त्यांच्या लेखणीवर तमाशा आणि शाहिरी परंपरेचे संस्कार लहानपणीच झाले होते. सोबतच महानगरीय संस्कृतीतल्या समस्या त्यांनी अनुभवल्या होत्या. त्यामुळे मराठी मातीशी नातं सांगणारी शाहिरी बाण्याची, जदीद(आधुनिक) आणि तरक्कीपसंद (सुधारणावादी) गझल त्यांनी लिहिली हे सत्य स्वीकारावेच लागेल.
लहानपणी निरक्षर असलेल्या वामनदादांनी तरूण वयात आपल्या देहलवी नावाच्या अधिकाऱ्याकडून अक्षर ओळख करून घेतली. दुकानांवरच्या पाट्या आणि बोर्ड वाचून जिद्दीनं लिहायला वाचायला शिकले. डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार हे त्यांचं उर्जाकेंद्र होतं. या उर्जेतूनच वामनदादांनी आपल्या गीत-गझलांच्या माध्यमातून घराघरात, गावागावात लोकप्रबोधनाचं कार्य केलं. वामनदादांची गझल मराठी गझलेतला एक मैलाचा दगड आहे. ओघवती आणि समाजमनाचा ठाव घेणारी भाषाशैली हे त्यांच्या लेखणीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. शाहिरी परंपरेचे संस्कार झाल्यामुळे ताकदीची आवाहनात्मकता त्यांच्या गझलेत आहे.
भीमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते
तलवारिचे तयांच्या न्यारेच टोक असते.
या शेरात खयालाच्या सुस्पष्ट मांडणीबरोबरंच दुस-या ओळीत मिळालेली कलाटणी उल्लेखनीय आहे.
सांगा अम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा धनाचा साठा अमुचा वाटा कुठाय हो?
.....इथे व्यक्त झालेल्या जनसामान्यांच्या भावना अत्यंत साध्या सोप्या शब्दांमध्ये मांडलेल्या आहेत. गझलेच्या शेराची पहिली ओळ दुस-या ओळीत पुर्णत्वाला जाणा-या खयालाची प्रस्तावना असते. वरील शेरात पहिल्या ओळीत आलेले ‘बिर्ला, बाटा आणि टाटा’ पुढे काय आहे? याची उत्सुकता ताणतात. हे शब्द गझलेत आल्यामुळे वामनदादा जदीदी गझलकार होते असे नक्कीच म्हणता येते. दुसरी ओळ ‘वाटा’वर येऊन थांबते तेव्हा रसिकांच्या ओठातून दाद आल्याशिवाय राहत नाही. वामनदादा म्हणतात “मी अडाणी समाजाची बोलीभाषा स्वीकारली व तीच माझ्या गीतांची भाषा बनली.” लोकांच्या भाषेत लिहिणारे कवी म्हणून लोककवी ही उपाधी त्यांना सार्थ ठरते. गझल लिहीताना वृत्तामधे लिहीणे आवश्यक असते. वृत्त म्हणजे शब्दांच्या उच्चारानुसार केलेली रचना होय. कोणत्याही शाळेत शिक्षण न घेतलेल्या वामनदादा़ंना हे खरोखर कसं साधलं असेल? गझलेचे वृत्त हा निरक्षर माणूस कुठे शिकला असेल? एक निरक्षर व्यक्ती ते उत्तम गायक, गीतकार, गझलकार, संगीतकार असा त्यांचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे. शब्दांच्या चमत्कारातून या माणसाने आपल्या लेखणीने समाजाला आरसा दाखवत आयुष्यभर समता,स्वातंत्र्य, बंधुता, न्याय तत्त्वांचा पुरस्कार केला.
वामनदादांनी जाणिवेच्या पातळीवर गझल लेखन केले नाही. त्यांना लोकप्रबोधनसाठी गझल हे माध्यम प्रभावी वाटले असावे. काही शेरांमधे खयालांची मांडणी सुस्पष्ट नाही. तरी मोजके दोष वगळता त्यांच्या गझला तंत्रशुद्ध आहेत. वामनदादांच्या गझलेत असलेली वृत्तांची विविधता हा त्यांच्या लेखनाचा एक महत्वाचा पैलु आहे. मराठीत अत्यल्प प्रमाणात वापरल्या जाणा-या ‘बहर-ए-मीर’ म्हणजे उर्दूचा ख्यातनाम शायर मीरने वापरलेल्या वृत्तांचा देखील वापर केला आहे.
तो भीम जसा लढला, तो लोक लढा लढवा
जा ठायी ठायी जा, माणूस नवा घडवा
हा उंच पदी आहे तो नीच पदी आहे
या नीच प्रणालीला जा सूळावर चढवा
या गझलेत आणि प्यासा(१९५७) या चित्रपटातील ‘हम आपकी आंखो में इस दिल को बसा दे तो’ या गाण्यामधे असलेले वृत्त सारखेच आहे. वामनदादांची अनेक गाणी हिंदी चित्रपटातील गाण्यांच्या चालीवर बसवलेली असायची. गाण्याच्या चाली बरोबरच ते त्या गाण्याचे वृत्तं नकळत पकडत असत. शब्दांच्या उच्चाराची लय टिपणारा कान असेल तरंच हे साध्य होऊ शकतं. त्यांच्या काव्यलेखनात व्याकरणाचे दोषही खूप कमी प्रमाणात आहेत.
हिंदी उर्दू गझलांमधे लवचिकतेसाठी अनेकदा उच्चारी वजनाचा वापर केला जातो. उच्चारी वजन म्हणजे एकप्रकारची सूट असते. आपल्या तोंडावाटे उच्चारल्या जाणा-या प्रत्येक अक्षराचा एक विशिष्ट कालावधी असतो. उच्चार करण्यासाठी लागणा-या कालावधी नुसार अक्षरांचे लघु (-हस्व) आणि गुरू(दीर्घ) असे प्रकार पडतात. हिंदी-उर्दूत वृत्ताच्या सहजतेसाठी व लय साधण्यासाठी अनेकदा विशिष्ट ठिकाणी काना, मात्रा, वेलांटी, उकार गुरू ऐवजी लघु म्हणुन वापरले जातात. यालाच मात्रा गिराना अर्थात उच्चारी वजनाची सूट म्हटले जाते. त्यामुळे हिंदी-उर्दू गझलांमधे एक वेगळ्या प्रकारची सहजता जाणवते. परंतु मराठीचा विचार केला तर मराठीत अशी सूट फक्त उकार आणि वेलांटीसाठीच घेतली जाते. वामनदादांनी अशा उच्चारी वजनाचा वापर आपल्या गझलांमधे सफाईदारपणे केला आहे, हे विशेष!
सदा चिंतेचे ओझे वाहूनी शिणली बहू काया
विसावा घेवु द्या थोडा पुरा शिणभाग जाईल ना!
‘ हळु या ना गं लाटांनो’ या मुसलसल गझलेतील असलेल्या उपरोक्त शेरामधे उच्चारी वजनाचा वापर केलेला दिसतो. यामधे चिंतेचे शब्दात ‘चे’ या गुरू अक्षराचा उच्चार लय कायम रहावी याकरीता कमी कालावधीत करावा लागतो. त्याचप्रमाणे ‘घेवु’ या शब्दातील ‘वु’ ची उकार सुद्धा लय साधण्यासाठी –हस्व केली गेली आहे. असा उच्चारी वजनाचा वापर वामनदादांनी आपल्या अनेक शेरांमधे केवळ हिंदी-उर्दू गझलांच्या निरीक्षणावरून केला आहे. गझल उर्दूतून अनेक भाषांमधे गेली. त्या भाषांमधे सर्व नियमांबरोबर जशीच्या तशी स्वीकारली गेली परंतु मराठीमधे मात्र ती जशीच्या तशी का स्वीकरली गेली नाही? हा एक संशोधनाचा विषय आहे. मराठीमधे उर्दू गझलेच्या तुलनेत काही अंशी ताठरता जाणवते, ती उच्चारी वजनाचा वापर न केल्यामुळे जाणवत असावी का? याचाही अभ्यास येणा-या काळात होईलच. यासाठी वामनदादांच्या गझला नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतील.
वामनदादांच्या गझेलेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काफिया (उपांत्ययमक), रदीफ (अंत्ययमक) यांची विविधता होय. गझलेची ही दोन सौंदर्यस्थळे आहेत. या दोन सौंदर्यस्थळांमुळेच गझल इतर काव्यप्रकारांपेक्षा वेगळी ठरते. यांचा वापर वामनदादांनी अनोख्यापद्धतीने केला आहे.
उभ्या विश्वास ह्या सांगू तुझा संदेश भिमराया
तुझ्या तत्वाकडे वळवू तुझा हा देश भिमराया
किंवा
पाहिले ना जे कधी ते आज आम्ही पाहतो
जात असता माऊलीची लाज आम्ही पाहतो
किंवा
भिमाच्या पायवाटेची जराशी धूळ मी आहे
नदी नाही तरी ओढ्यातली झुळझूळ मी आहे
या सारख्या अनेक गझलांमधे निभावलेले रदीफ-काफिये वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ज्या काळात मराठी गझल नुकतेच बाळसे धरू लागली होती त्या काळात वामनदादांच्या गझललेखनाची वाटचाल स्वतंत्रपणे एकलव्यासारखी सुरु होती. त्यामुळे त्यांची गझललेखनाची शैली ही स्वतंत्र आणि स्वयंभू होती. त्यांच्या रदीफ-काफियांच्या वापरावरून त्यांची कल्पकता वेळोवेळी अधोरेखित होते. आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून मराठी गझलेच्या अभ्यासासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. तरीसुद्धा वामनदादांसारखा रदीफ-काफियांचा कल्पकतेने वापर करणे अनेक गझलकारांना सहजपणे साध्य होत नाही. गझलेचा गैरमुरद्द्फ (अंत्ययमकरहीत) प्रकार देखील वामनदादांनी यशस्वीपणे हाताळला आहे.
लोभ सोडून सारा धनाचा, मित्र व्हावे उपाशी जनाचा
साथ द्यावी सदा सज्जनाला, काळ व्हावे इथे दुर्जनाचा
अडाणी लोकांना समजेल अशी साधी सोपी मराठमोळी भाषा वापरत वामनदादांनी आयुष्यभर आंबेडकरी विचारांच्या प्रसार प्रचारासाठी जवळपास दहा हजार रचना लिहिल्या. त्या रचना आजही महाराष्ट्रभर विखुरलेल्या आहेत. त्यांच्यावर प्रेम करणा-यांनी त्या जिवापाड जपल्या आहेत. महाराष्ट्रभरातील अनेक गायक त्यांच्या रचना आजही अनेक कार्यक्रमांमधे सादर करत असतात. या सर्व रचना म्हणजे आंबेडकरी अनुयायांचा प्राण आहेत. वामनदादांच्या गायकीचा वारसा चालवणारे अनेक गायक आहेत. परंतु गायनाच्या तुलनेत ताकदीचे लेखन करणारे आणि त्यांच्याप्रमाणे भाषेवरची पकड निर्माण करणारे लोककलांवत नगण्य आहेत. वामनदादांचा वारसा चालवणारे कवी आणि गायक निर्माण होणे ही काळाची गरज आहे.
वामनदादांच्या हजारो रचना विखुरलेल्या असल्या तरी ‘वाटचाल’ (१९७३) ‘मोहळ’ (१९७६), ‘हे गीत वामनाचे’ (१९७७) हे गीत-गझल संग्रह आजही जनमानसात लोकप्रिय आहेत. त्यांच्या विखुरलेल्या रचना एकत्रित करण्याचे महत्वपूर्ण काम ‘महाकवी वामनदादा कर्डक समग्र वाड्ग्मय खंड १ व २’ च्या माध्यमातून माधवराव गायकवाड, प्रा.सागर जाधव यांनी केले आहे. त्याचप्रमाणे ‘संग्रामपिटक-१’ या पुस्तकाच्या रुपाने प्रमोद वाळके यांनी वामनदादांच्या काही गझला एकत्रितपणे प्रकाशित केल्या आहेत. ‘माझ्या जीवनाचं गाणं’ (१९९६) हे त्यांचे आत्मकथन सुद्धा प्रसिद्ध आहे. वर्धा येथे भरलेल्या पहिल्या अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेल्या वामनदादांना दिल्लीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप, महाराष्ट्र राज्य शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार, साहित्य, संस्कृती मंडळाची ‘उत्कृष्ट कविरत्न’ ही गौरववृत्ती, जामखेडच्या भाई फुटाणे प्रतिष्ठानचा ‘संत नामदेव पुरस्कार’, ‘अस्मितादर्श पुरस्कार’ असे सन्मानही प्राप्त झाले होते. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे सदस्यत्व, महाराष्ट्र साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे सदस्यत्व सुद्धा भुषविले. वामनदादांच्या रचनांचा खजिना येणा-या पिढ्यांसाठी जतन करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
(लेखक मराठी गझलकार व गझल अभ्यासक आहेत )
९०४९०११२३४
....................................................
अमोल बी शिरसाट
अकोला
बहुत बढ़िया प्रस्तुति
उत्तर द्याहटवाबढीया
उत्तर द्याहटवा