१२ मे, २०२१

उठा आता चला शोधू पुन्हा रस्ते नवे काही


           गझलेचा आकृतीबंध वरवर पाहता थोडा कठीण वाटतो. सगळ्यात महत्वाचे म्हणजे गझलेत वापरले जाणारे वृत्त चालवणे अनेकांना जमत नाही. खरं म्हणजे ही अत्यंत सोपी गोष्ट आहे. शब्दांच्या उच्चाराची लय टिपणारा कान आणि थोडे गायनाचे अंग असले की वृत्तावर सहज पकड निर्माण करता येते. मग आपल्या जीवनानुभवांना सृजनस्पर्श देणा-या काळजातून गझल सहजपणे प्रवाहित होते. जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या पण जीवनाचे मर्म समजून घेत आपल्या गोड गळ्यातून गझल प्रवाहित करणा-या एक गझलकारा म्हणजे वंदना पाटील वैराळकर! त्या शेतीमातीत राबून आपल्या जीवनानुभवांशी तादात्म्य साधत निष्ठेने गझललेखन करत आहेत. (जन्म – २० ऑक्टोबर ’६४) 
................................

         आपल्या गोड गळ्याप्रमाणेच मृदू स्वभावाच्या वंदना पाटील यांना गायनाचा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला. परंतु त्या काळात मुलींना जास्त शिकवले जात नसल्याने त्यांचे दहावीनंतर लगेच लग्न झाले. त्यामुळे त्यांना पुढील शिक्षण घेता आले नाही. परंतु जीवनाने दिलेले अनुभव मनात मुरवत वंदना पाटलांनी आत्मविकास साधला. शालेय जीवनात मिळालेल्या मोडक्या तोडक्या व्याकरणाच्या धड्यांच्या भरवशावर केवळ हिंदी चित्रपट गीते आणि मराठीतील वृत्तबद्ध कवितांच्या वाचनातून त्यांनी वृत्तांवर पकड निर्माण केली. गझल हा काव्यप्रकार वाचनात आल्यानंतर त्या गझलेकडे आकर्षित झाल्या. लग्नानंतर निर्माण झालेल्या बंदिस्त चौकटीत त्यांनी गझलेच्या माध्यमातून आपल्या भावनांना मोकळी वाट करून देणे सुरू केले.

घेऊ कशी भरारी मी? पंख छाटलेले
नजरेसमोर आहे आभाळ फाटलेले

        १९८२ साली लिहिलेल्या या शेरातून स्त्री जाणीव ताकदीने मांडणा-या वंदना पाटलांची मनोवस्था लक्षात येते. त्यांचे पती नाना पाटील त्यांच्या लेखनाबद्दल सकारात्मक असले तरी सामाजिक बंधनामध्ये त्यांचे पंख जखडलेले आहेत याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. गझल असो वा कविता.... व्यक्त होताना अपरिहार्यता गरजेची असते. आता लेखणीचा आधार घेतल्याशिवाय काही पर्यायच नाही अशी वेळ जेव्हा येते तेव्हाच उच्च प्रतीचे काव्य जन्म घेते. 

दुःखासवे कसा मी जगतो नको विचारू
कळ काळजात थोडी; बाकी मजेत आहे

  अशी काळजात कळ सोसत बाकी सगळं मजेत आहे म्हणणे सोपे नसते. वंदना पाटील यांचा एकुणच गझल लेखनाचा प्रवास बघता असे वाटते की त्या आपल्या आयुष्याला स्वतःपासून वेगळे होऊन अतिशय शांत, संयमीपणे बघतात आणि आपले जगणे लयबद्ध रीतीने मांडतात. त्यांच्या स्वभावात असलेला संयम त्यांना जीवनानुभवांच्या चटक्यांनी मिळालेला आहे. त्या जेव्हा एखाद्या मुशाय-यात त्यांची गझल तरन्नुममधे पेश करतात तेव्हा रसिकांसमोर एक जिवंत गझल अवतरते आणि त्यांच्या काळजाचा ठाव घेते. हे सर्व वंदना पाटील त्यांच्या अनुभवांशी प्रामाणिक राहिल्यानेच होते असेच म्हणावे लागेल. बुलढाणा जिल्ह्यातील पान्हेरा खेडी नावाच्या गावात असलेलं आपलं कुडामातीचं घर त्या सडा-सारवणाने लख्खं करत घामाच्या सिंचनाने आपलं शिवार फुलवतात – 

कालचा पाऊस माझ्या अंगणी आला कुठे?
शिंपली मी बाग माझी माझिया घामातुनी.

     अशी जीवननिष्ठा असलेल्यांच्या मागे गझल स्वतःहून चालत आल्याशिवाय राहील का? गझल अभ्यासाचे कुठलेही साधन उपलब्ध नाही, वाचनासाठी पुस्तके उपलब्ध नाहीत, स्मार्टफोन नाही, घरात काव्यलेखनाचा कोणालाही वारसा नाही अशा परिस्थितीत गझललेखन केवळ एक प्रतिभावंतच करू शकतो – 

ना कुणाचा हात पाठी, ना घराणे गाजलेले
माझियापासून झाला हा सुरू इतिहास माझा

    अशी प्रतिभा लाभलेली असतानाही वंदना पाटील यांचे पाय मात्र नेहमी जमिनीवर असतात. आपल्या प्रतिभेपेक्षा त्यांनी नेहमी आपल्या कुटुंबालाच प्रथम प्राधान्य दिले. आज त्यांचा इंजिनिअर असलेला मुलगा खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर आहे तो त्यांच्या त्यागामुळेच! सुरेश भटांना भेटायची त्यांची मनोमन इच्छा होती परंतु जगण्याच्या रेट्याने त्यांना कधी संधी मिळू दिली नाही. आजकाल थोडेफार गझलेचे तंत्र अवगत झाले की लगेच ‘उस्तादाचा’ तोरा मिरवरणा-यांच्या गर्दीत प्रसिद्धीपासून दूर असलेल्या वंदना पाटील वेळ मिळेल तेव्हा आपल्या दुःखाला गुणगुणत भावनांना वाट मोकळी करून देत असतात. 

हे असे का रोजचे येणे तुझे?
कोणते माझ्याकडे देणे तुझे?
मी कसा झाकू छताला मोडक्या?
उंब-याशी थांबले मेणे तुझे.

            कवी अनेकदा आपले वैयक्तिक अनुभव कवितेतून मांडत असतो. पण चांगल्या कवितेचे विशेष लक्षण हे असते की मांडलेले अनुभव, घटना, प्रसंग वैयक्तिकतेतून विलग होऊन त्यांना वस्तुनिष्ठ स्वरूप प्राप्त होत जाते. मग ती कविता फक्त कवीची राहत नाही तिला वैश्विक स्वरूप प्राप्त होते. वंदना पाटील यांच्या रचना वाचताना हा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या रचनांमधे शेतीमातीच्या अनुभवांबरोबरच स्त्री जाणीव, जीवनाचे तत्त्वज्ञान साध्यासोप्या शब्दांमधे चित्रित झाले आहे.

             वंदना पाटील यांचा आजपर्यंत कुठलाही संग्रह प्रकाशित झालेला नाही. त्यांच्या समकालीन असलेल्या स्त्री गझलकारांचे अनेक संग्रह प्रकाशित झाले, त्यांना अनेक सन्मानही मिळाले. त्यांच्या नंतरही अनेक गझलकारा आल्या. सोशल मिडीयावर त्यांची भरभरून स्तुती होताना दिसते. नक्कीच त्यांचे लेखनही ताकदीचे आहे. परंतु वंदना पाटील मात्र आजही उपेक्षितच आहेत. ज्या काळात बोटावर मोजण्याइतक्या गझलकारा होत्या अगदी तेव्हा पासून त्या प्रसिद्धीपासून कायम दूर राहिल्या आहेत. गझलकाराच्या प्रतिभेला वेळीच कौतुकाचे खतपाणी मिळणे गरजेचे असते. जाणकारांचे भाष्य आणि चोखंदळ रसिकांची दाद वेळोवेळी मिळत राहिली तर काव्य अधिकाधिक फुलत जाते. वंदना पाटील यांची प्रतिभा नक्कीच प्रसिद्धीची भुकेली नाही पण केवळ एकमेकांची पाठ थोपटणा-या कंपुंनीसुद्धा कधीतरी आपला दृष्टीकोन उदात्त करणे गरजेचे आहे.    
       मराठी गझलेच्या उपेक्षित गानकोकिळा वंदना पाटील वैराळकर यांची एक गझल -  

कुणाची पापणीपाशी थबकली आसवे काही?
विचारी कोण मायेने तुला वेड्या हवे काही?

कशी गंधाळुनी गेली सुगंधी रात्र पाऱ्याची
तुला ना आठवे काही मला ना आठवे काही

कितीदा त्याच त्या वाटा जुन्या चोखाळुनी झाल्या
उठा आता चला शोधू पुन्हा रस्ते नवे काही

पुन्हा लागे पहा माझा गडे एकांत बोलाया
मनाच्या अंगणी आले स्मृतींचे हे थवे काही

खुळ्या आशेवरी जगते अजुनही झाड चाफ्याचे
उद्या येतील वस्तीला नव्याने पारवे काही

(वंदना पाटील वैराळकर, पान्हेरा खेडी, ता. मोताळा जि. बुलढाणा. मो. ८८३०१४७२३३)
..................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४


४ टिप्पण्या: