१९ मे, २०२१

उगाचच जन्म घेतो का नवा इतिहास एखादा?

                काव्यामधे आशय महत्वाचा की आविष्कार? हा प्राचीन काळापासून चर्चेचा विषय राहिला आहे. आशयाचे मूळ अनुभवामधे सापडते आणि अविष्कार म्हणजे काय तर आशय मांडण्याची पद्धत. मग आशय महत्वाचा की पद्धत यावर अनेक मतेमंतातरे आहेत. ‘What’ महत्वाचे की ‘How’ ? या विषयावर अनेकदा वादविवाद होताना दिसतात. गझलेमधल्या ‘अंदाजे बयां’ विषयी सुद्धा अनेकदा गझलकार आणि समीक्षक बोलत असतात. पण रसिकांना नेमकी कोणती गोष्ट अधिक भावते? 

  समूहरुपात विचार केला तर सर्व मानवीय अनुभव सारखेच आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात उमटणा-या भावनाही सारख्याच असतात. काव्याचे वेगळेपण हे केवळ मांडण्याच्या पद्धतीमधे असते, ही एक बाजू झाली. पण समूहरुपात सारखे असलेले अनुभवांचे वैयक्तिक पातळीवरील संयोजन(Combination) एकमेव असते. म्हणून पृथ्वीवरील प्रत्येक माणसाचे जगणे वेगवेगळे असते. त्याला आलेले अनुभव वेगवेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाच्या भावनांचे पदरही वेगवेगळे असतात. म्हणूनच दुसरी बाजू ही आहे की वरवर सारख्या वाटणा-या भावना वेगळ्या असतात. त्यांची उत्कटताही वेगळी असते. त्यामुळे काव्याचे वेगळेपण फक्त मांडणीच्या पद्धतीमधेच आहे असे म्हणणे एकांगी आहे. आशय की आविष्कार यापैकी एक पर्याय निवडण्यापेक्षा ‘आशयाचा आविष्कार’ हा पर्याय निवडणे अधिक योग्य ठरेल. ‘What’ किंवा ‘How’ असे वर्गीकरण करणे कठीण आहे. कारण दोहोंचे अस्तित्व स्वयंभू नाही. या दृष्टीने विचार करताना मनिषा नाईक यांचा एक ‘सिग्नेचर’ शेर आहे –
 
उल्केपरी चल सोडते आकाश मी;
तू काळजाचे एकदा 'लोणार' कर!

                  प्रथमदर्शनी असे वाटते की या शेरात प्रेमभावनाच व्यक्त झाली आहे. दुसरी गोष्ट प्रतिमा वेगळ्या वापरल्या आहेत. म्हणजे नेहमीची गोष्ट नाविन्यपूर्ण पद्धतीने सांगितली आहे. पण नेहमीच्या भावनेची उत्कटताही वेगळीच आहे ना! म्हणून केवळ अविष्काराला महत्व नसून ‘आशयाचा अविष्कार’ महत्वाचा आहे. मनिषा नाईक यांच्या उपरोक्त शेराप्रमाणे कवीच्या प्रतिभास्पर्शाने आशय आणि अविष्काराचे एक वेगळे रसायन तयार होणे गरजेचे असते. मग ‘What’ की ‘How’ प्रश्नच शिल्लक राहत नाही ! 
               साधारणपणे कवितेमधे एकाच आशयाचे वेगवेवेगळे पदर उलगडून दाखवलेले असतात. गझलेत प्रत्येकवेळी असे होत नाही. गझलेच्या प्रत्येक शेरात वेगवेगळा आशय मांडलेला असतो. हे गझलेचे वैशिष्ट्य आहे. काफिया आणि रदीफच्या धाग्याने वेगळेवेगळ्यांची अनुभवांची विविधरंगी फुले गुंफलेली सुंदर माळ म्हणजे गझल! प्रत्येकाचे अनुभवविश्व वेगळे असते. गझलेत खरेखुरे अनुभव मांडणे अपेक्षित असते. त्यामुळेच गझलेत जिवंतपणा येत जातो. मनिषा नाईक आपल्या गझलेतून आपले खरेखुरे अनुभव मांडताना दिसतात. 

रीत मोडुनी बाई जेव्हा जगणे शिकते
प्रत्येकाची नजर अचानक समाज बनते

                  स्त्री म्हणून त्यांनी मांडलेला अनुभव वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचला आहे. त्यांच्याप्रमाणे रीत मोडून जगणे शिकत असताना प्रत्येकाच्या नजरेला समाजाचे रूप प्राप्त होते. ही गोष्ट प्रत्येक स्त्री अनुभवत असते. त्यामुळे या शेराला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. सामाजिक क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी मनिषा नाईक काम करतात तेव्हा 

हजार बाया वेगवेगळ्या
व्यथा वेदना एकसारख्या

             असा अनुभव त्यांना वेळोवेळी येत असतो. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येक स्त्रीला घरातल्या प्रत्येकाची समाज बनलेली नजर नेहमी टोकत असते. त्यामुळे प्रत्येक स्त्रीच्या वेदना मनिषा नाईक यांना एकसारख्या वाटतात. ‘बायको म्हणजे पायातली वहाण’ ही धारणा आज कितपत बदलली आहे? याचा विचार होणे गरजेचे आहे. ती घरात जेव्हा एक साधी तक्रार करते तेव्हा काय घडते?       

केवळ एका तक्रारीवर मला म्हणाला
पायामधला जोडा का कुरकुरतो आहे?

            तिच्या एका साध्या तक्रारीवरून त्याला पायातला कुरकुरणारा जोडा आठवावा हे खुपच वेदनादायक आहे. मोठमोठ्या मंचावरून स्त्री-पुरुष समानतेची मोठमोठी पोकळ भाषणे आणि व्याख्याने ठोकून जमत नाही. त्याची सुरुवात आपल्या घरापासून झाली पाहिजे. स्त्रियांना जखडून ठेवणा-या जुनाट चालीरीती आणि परंपरा मोडीत काढणे गरजेचे आहे. 

घराच्या आतली ती रीत आधी मोडली
मुलीला आणलेली ओढणी मी फाडली

हा मनिषा नाईक यांचा शेर वाचताना असे वाटू शकते की ओढणी हे स्त्रीचे अंग झाकणारे वस्त्र आहे. अशी मुलीची ओढणी फाडून तिला काय ‘बिकीनी’ घालायला लावायचे का? पण असा विचार करणा-याच्या डोक्यात ‘बिकीनी’ च का यावी ? सूट-बूट-टाय का येऊ नये ? याचा अर्थ असा आहे की स्त्रीने कसे रहावे याच्या काही संकल्पना तयार करून ठेवल्या गेल्या आहेत. उपरोक्त शेरातली आई या संकल्पना मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आजही लहान मुलीमुलांच्या खेळण्यांपासून स्त्री-पुरूष असमानतेची सुरुवात होते. मुलीला खेळभांडे, डॉल्स हाऊस आणून दिले जाते, मुलांना कोणती खेळणी आणून दिली जातात ते वेगळे सांगण्याची गरज नाही. ओढणी फाडणे हा केवळ वरवरचा अर्थ न घेता तो जुन्या चालीरीती आणि परंपरांच्या संदर्भात घेणे आवश्यक आहे. आणि मनिषा नाईक यांच्या शेराप्रमाणे असे खरेखुरे जगणे गझलेच्या शेरांमधून साध्यासोप्या शब्दांमधे मांडता यायला हवे. स्त्री असो वा पुरूष प्रत्येकाला आपल्या मनाप्रमाणे जगणे जमले पाहिजे तेव्हाच जगणे सुंदर होईल -  

माझे सुद्धा जगणे नंतर सुंदर झाले
मनात आले जे जे माझ्या ते मी केले

              असे जगणे सुंदर झाल्यामुळेच जीवनाला प्रवाहीपणा येतो आणि तेव्हाच ‘मनी’ म्हणजेच मनिषा नाईक यांच्यासारखी स्वतःची वाटही शोधता येते.  
   
प्रवाही होत गेली मग 'मनी' आयुष्यभर
तिने आधी स्वतःची वाट होती शोधली

                     मराठी गझलेत आपली स्वतःची वेगळी वाट धरू पाहणा-या मनिषा नाईक यांच्या गझलेत जीवनाचे विविध पैलु चित्रित झाले आहेत. त्यांनी २०१० पासून गझललेखन सुरू केले असून अद्याप एकही संग्रह प्रकाशित झालेला नाही. वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी बरोबरच त्यांनी समाजकार्य शाखेत पदवी प्राप्त केली आहे. त्या एका खाजगी कंपनीत महिला सक्षमीकरण योजनांच्या प्रकल्प समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सिंधूताई सपकाळ यांच्या ‘सन्मती बालनिकेतन, मांजरी’ या अनाथ आणि निराधार मुलांच्या संस्थेत अधिक्षिका म्हणूनही काम केले आहे.      

गझलकारा मनिषा नाईक यांची एक सुंदर गझल वाचकांसाठी – 

नवा संकल्प येतो चांगला जन्मास एखादा
जिवाला जेवढा आतून होतो त्रास एखादा

जुन्या एका पिढीचे लागते बलिदान काळाला
उगाचच जन्म घेतो का नवा इतिहास एखादा

पुढे आयुष्य घडते आपले जीवन सफल होते
मनाला एवढा बेचैन करतो ध्यास एखादा

जिवाची वाढते धडधड कुणी येणार आहे का?
खरा ठरणार आहे का मनाचा भास एखादा

नव्याची जन्मवेणा यातना सुद्धा असू शकते
विनाकारण कसा होईल सांगा त्रास एखादा

सुखे दारात आली का पुन्हा स्वप्नात गेले मी
कुणी काढा मला चिमटा जरा हातास एखादा

( मनिषा नाईक, पुणे, ८८०५३२५०५४)
......................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२४४

८ टिप्पण्या:

  1. अप्रतिम मार्गदर्शन व सुंदर नवं गाजलकारांसाठी आवश्यक

    उत्तर द्याहटवा
  2. नवीन गजलकार मध्ये नक्की ताई आपलं नाव रोशन करतील अशी शुभकामना वेक्त करतो व भावी जिवनास शुभेच्छा देतो.

    उत्तर द्याहटवा