२६ मे, २०२१

भरकटलो तर भरकटलो; भरकटून पाहू

         

  
 
                   गणित हा विषय ललितेतर साहित्यात मोडतो. ललितेतर साहित्य वस्तुनिष्ठ व तर्काधिष्ठित असते. गझल ललित साहित्यात मोडत असली तरी तिच्यातही एक गणित असते. ती सुद्धा तर्कानुमानावर आधारीत असते. गझल निर्मितीच्यावेळी व्यक्तीनिष्ठ असली तरी ती वस्तुस्थितीशी इमान राखणारी असल्यामुळे शेवटी तिचे स्वरुपही वस्तुनिष्ठच होते. कानपुरच्या आय.आय.टी.मधे गणिताचे प्राध्यापक असलेले गझलकार समीर चव्हाण क्लिष्ट गणितांची आकडेमोड करता-करता आपल्या संवेदनांचेसुद्धा तर्काधिष्ठीत सुसंघटन करत गझलेतून आत्माविष्कार करत असतात. ( जन्म - ८ एप्रिल ’७७) 
.................

       गणित म्हटलं की की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. शालेय जीवनात कधीच समजु न शललेली बिजगणिताची समीकरणं, भुमितीच्या चित्र-विचित्र आकृत्या डोळ्यांपुढे नाचु लागतात. अशा परिस्थितीत कोणी गणितासारख्या विषयात पी.एच.डी. प्राप्त करत असेल तर अशी व्यक्ती जनसामान्यांच्या दृष्टीने थोरच असते. गझलकार समीर चव्हाण यांनी गणितामधे पी.एच.डी. तर प्राप्त केलीच आहे सोबतच ते मराठी गझल क्षेत्रातही आपली वेगळी वाट निर्माण करणारे गझलकार सुद्धा आहेत. प्राचीन काळापासून अनेक गणितज्ज्ञांनी उत्तम काव्यनिर्मिती केली आहे. याचे मूळ गणित आणि कवितेचे तत्वज्ञानाशी जवळचे नाते असते या गोष्टीमधेसुद्धा असू शकते. उमर खय्याम या सुप्रसिद्ध गणितज्ञाने रुबाई हा गझलेचा प्रकार संवेदनशीलरीत्या हाताळला आहे. समीर चव्हाणांच्या गझलेतही तत्वज्ञानाबरोबरच मानवी भावभावनांचे सुंदर चित्रण अनुभवायला मिळते -  

काही तरी तुटल्याप्रमाणे वाटते
हातातुनी सुटल्याप्रमाणे वाटते
उरली न आता जिद्द जगण्याची जणू
आयुष्य भरकटल्याप्रमाणे वाटते

       आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर गालिबच्या शेराप्रमाणे ‘कोई उम्मीद बर नहीं आती/ कोई सुरत नजर नही आती’ असा अनुभव येत जातो. समीर चव्हाणांनी उपरोक्त शेरामधे ही भावना आपल्या पद्धतीने मांडली आहे. ही भावना थोड्याफार फरकाने प्रत्येकाच्याच मनात उमटत असते. अशावेळी हातातून काहीतरी सुटत असताना खोलवर काहीतरी तुटल्यासारखे वाटत राहते. जगण्याच्या जिद्दीचे शीड काहीसे फाटत जाऊन आयुष्याची नाव भरकटल्याप्रमाणे वाटते. ही भावना फार काळ मनात घर करून राहणे खूपच धोकादायक असू शकते कारण अशा विनमस्क अवस्थेत अनेकजण आपल्या आयुष्याची यात्रा संपवतात. पण असा निर्णय घेणे म्हणजे पळपुटेपणाचे लक्षण आहे. कारण सुख- दुःख, आशा-निराशा, दिवस-रात्र हे जीवनाचे अविभाज्य घटक आहे. दुःखाशिवाय सुखाला कधीच पूर्णत्व येऊ शकत नाही. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक अनुभवाची मजा घेण्यातच खरी गंमत आहे त्यामुळे -

      
भरकटलो तर भरकटलो; भरकटून पाहू
जोवर गंमत येते आहे चालत राहू

    सगळं आयुष्य सरळसोटपणे जगणे रटाळ असते. त्यामुळे समीर चव्हाणांप्रमाणे ‘भरकटलो तर भरकटलो’ असे म्हणून चालत राहण्यात वेगळी मजा आहे. अशा भरकटण्याची मजा यांत्रिकपणे आयुष्य जगणा-यांना कधीच प्राप्त होऊ शकत नाही. भरकटण्यातून विविध अनुभवसुद्धा मिळत जातात. असे अनुभव जेव्हा गझलेमधून व्यक्त होतात तेव्हा त्यामधे संवेदना, विचार आणि भावना असे तीन घटक अंतर्भूत असतात. अनुभवांचे आकलन गझलकार आपल्या वृत्तीनुसार करत असतो. त्याने अनुभवलेले जीवनाचे स्वरूप गझलेच्या शेरांमधून व्यक्त होत असते. त्यामुळे वरवर पाहता व्यक्त होणा-या भावना एकसारख्या असल्या तरी त्या एक नसतात.         


एक-एक टाका माझा मी उसवुन पाहिन
मात्र वेदनेच्या टोकाशी जाउन राहिन

   हा शेर वाचताना ‘Pain is inevitable : suffering is optional’ ची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. वेदना अपरिहार्य असली तरी त्या वेदनेपासून उत्पन्न होणारे दुःख मात्र ऐच्छिक असते असे बुद्धाचे तत्वज्ञान सांगते. समीर चव्हाण बुद्धाप्रमाणे जखमांचे टाके उसवून वेदनेच्या मुळाशी जाऊ पाहतात. वेदनेचे खरे कारण शोधू पाहतात. बुद्धाने सांगितल्याप्रमाणे इच्छा म्हणजेच तृष्णा हेच दुःखाचे मूळ कारण आहे याची जाणीवही समीर चव्हाणांना होते त्यामुळेच ते म्हणतात - 

कशाला धरू आणखी एक इच्छा
किती दूर मी वागवावे लटांबर

          इच्छांचे ‘लटांबर’ आपण आयुष्यभर सोबत वागवतो. त्या लटांबरासोबत दुःखाचे ओझेही आयुष्यभर डोक्यावर असते. दुःखाचे ओझे आणि इच्छांचे लटांबर दूर फेकता आले तर आयुष्य सुंदर बनते. समीर चव्हाणांच्या उपरोक्त शेराचे सूचकता हे एक वैशिष्ट्य आहे. कोणती इच्छा आहे हे सांगितलेले नाही त्याचप्रमाणे लटांबर या प्रतिमेमुळे शेराची व्यापकता अधिकच वाढली आहे. ‘विरोधाभास’ हा गझलेचा एक पैलु आहे परंतु फक्त विरोधाभासच गझलेतून मांडत राहणे म्हणजे एखाद्या बॉडीबिल्डरने कोणत्याही एकाच अवयवाचा व्यायाम करण्यासारखे आहे. समीर चव्हाण आपल्या गझलेतून विरोधाभासाबरोबरच विविध प्रयोग करत असतात.

‘काळाची सांमंती निगरण’(२०१८) व ‘रात्रीची प्रतिबिंबे’(२०१९) असे दोन संग्रह नावावर असलेल्या समीर चव्हाणांनी संत तुकारामांच्या अभंगांचा सखोल अभ्यास करून ‘अक्षई तें झांले – तुकाराम : हिन्दूस्तानी परिवेशात’ असा समीक्षणात्मक ग्रंथ सिद्ध केला आहे. लवकरच तो वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. याबरोबरच त्यांचा एक गणितावरील संशोधनात्मक ग्रंथ इंग्लंडची जगप्रसिद्ध केंब्रीज युनिवर्सिटी प्रेस प्रकाशित करत आहे. समीर चव्हाण गणिताच्या अनेक जागतिक चर्चासत्रांमधेसुद्धा सहभागी होत असतात. त्यांना संशोधन कार्यासाठी २०१७ मधे केळकर फेलोशिपसुद्धा प्राप्त झाली आहे. याबरोबरच त्यांनी गझलकार अनंत ढवळे, विजय दिनकर पाटील यांचे समवेत ‘समकालीन गझल’ या अनियतकालिकाचे संपादक म्हणूनही महत्वाची भूमिका निभावली आहे. 
  समीर चव्हाण यांची एक गझल रसिकांसाठी –
 
दिवस जातो कसाही,रात्र जाता जात नाही;
कुणालाही विसरणे आपल्या हातात नाही.

कुणाला हृदय देणे आपल्या हातात नाही;
कसे सांगू तुला की प्रेम केले जात नाही.

न वा-याला,न ता-याला,न पर्वा चांदण्याला;
घना तू सांग माझा चंद्र का गगनात नाही.

जरी सुकली फुले,सरला जरी मधुमास तरिही;
असे होणार नाही गंध या विजनात नाही.

न उरली ओढ ती,नाहीच कोठे तो जिव्हाळा;
तसे ते प्रेम ही आता सये अपुल्यात नाही!
(समीर चव्हाण, कानपूर, उत्तरप्रदेश, मो. ९७९३४७१७५१ )
...................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

२ टिप्पण्या: