७ एप्रिल, २०२१

ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली

                        आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीअर करणे प्रत्येकाला शक्य होत नाही. अनेक लोक करीअर निवडताना तडजोड स्वीकारतात. आपली आवड मनातल्या अडगळीत डांबून यांत्रिकपणे जगत राहतात. सरते शेवटी साक्षात्कार होतो की आपण जगलोच नाही. आपल्या ऐवजी कोणीतरी यंत्रमानव आपल्यात राहत होता. पण आपली कलेलाच आपली शक्ती बनवणारे एक तरूण गझलकार म्हणजे वैभव देशमुख! विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या चांडोळ या छोट्याशा गावचे रहिवासी असलेले वैभव देशमुख सध्या पुणे येथे गझलेखनाबरोबरच जाहीरातलेखन, गीतलेखन क्षेत्रात आपले करीअर करत आहेत. त्यांना या दोन्ही क्षेत्रात कमी वयात अनेक बहुमानसुद्धा प्राप्त झाले आहेत.      
............................

    शब्द उपजीविकेचे साधन बनु शकतात का? या प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही ‘नाही’ असे देत असाल तर तुम्हाला तुमचा दृष्टीकोन बदलवावा लागेल. लहानपणापासून चित्रकलेची आवड असलेल्या वैभव देशमुख यांना सुलेखनात विशेष आवड निर्माण झाली आणि मग गावातील दुकानांच्या पाट्या, साईन बोर्ड्स, बॅनर्सवर सुंदर अक्षरं उमाटायला लागली. बघता बघता पंचक्रोशीतले लोक लहानग्या वैभवला आपल्या दुकानाची पाटी किंवा बॅनर रंगवून देण्यासाठी हुडकायला लागले. शाळेत शिकत असताना गावातच खूप कामं मिळु लागली पण वैभव देशमुख यांना मात्र काहीतरी वेगळं साध्य करायचं होतं. बारावीनंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी औरंगाबाद गाठलं. कला शाखेत पदवीचे शिक्षण घेत असतानाच आपलं एक छोटसं पेंटीगचं दुकान टाकलं. २००१-२०१० दरम्यान शेकडो दुकानांचे बोर्ड्स, हजारो बॅनर्स, साईन बोर्डसमधे आपल्या सुंदर अक्षरांनी जीव ओतणारा हा कलाकार कवितेतल्या शब्दांनाही जिवंत करू लागला. पेंटींगच्या कामांबरोबरच अनेक कविसंमेलनं गाजवू लागला. २०१० नंतर मात्र डिजिटल प्रिंटिंग आल्यामुळे जाहीरातलेखन आणि गीतलेखनाचे नवे क्षेत्र गावखेड्यातून आलेल्या या कलाकाराला खुणावू लागले. मागील दहा वर्षांपासून वैभव देशमुखांचे शब्द हेच उपजीविकेचे साधन बनले आहे. ग्रामीण भागातून आलेला, दुकांनांच्या पाट्या रंगवून देणारा पेंटर ते फिल्म, टेलिव्हिजन आणि अडव्हरटायझिंग इंडस्ट्रीत स्ट्रगल कराणारा एक उमदा कलावंत असा वैभव देशमुखांचा प्रवास थक्क करणारा आहे. 

        बहुतेक लोकांना कॉपीरायटींग अर्थात जाहीरातलेखन हे क्षेत्र अगदीच नवखं वाटेल. मोठमोठ्या कंपन्यांच्या जाहिराती अनेक ठिकाणी पाहत असतो. या जाहिरातींमधला संवाद असो की टॅगलाईन्स यामधे नेमकेपणा आवश्यक असतो. त्यासाठी या कंपन्या तज्ञ कॉपीरायटर्सकडून आपल्या टॅगलाईन्स लिहून घेतात, त्यासाठी त्यांना चांगला मोबदला देतात. गावखेड्यातून आलेल्या व बी.ए. ची पदवी घेतलेल्या वैभव देशमुखांकडे कुठलाही अनुभव किंवा जाहिरातलेखन क्षेत्रातली कुठलीही पदवी नाही. केवळ आपल्यातल्या कवित्वाच्या भरवशावर त्यांनी या क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवले आहेत. खरं म्हणजे गझलेतही नेमकेपणा आवश्यक असतो. शब्दांचा फापटपसारा गझल खपवून घेत नाही. आपल्या भावना नेमकेपणानं मांडण्याची कला अवगत असलेले वैभव देशमुख ‘विजा घेऊन येणा-या पिढीतले’ ताकदीचे गझलकार आहेत.   

तिफन थांबवुन विचार करतो आहे मी
पेरू की खाऊ हे दाणे? काय करू?

        शेतक-यांची वेदना नेमकेपणाने टिपणारा हा शेर शेतक-यांची विदारक स्थिती डोळ्यासंमोर उभी करतो. शेतक-यांची वेदना जवळून अनुभवलेली असल्याने वरील शेरात ज्वलंत भावना ओतली गेली आहे. कुठल्याही प्रकारच्या वेदनेची दाहकता कल्पनेने कधीच अनुभवता येत नाही त्यासाठी स्वतःला प्रत्यय येणे आवश्यक असते. अशी प्रत्ययकारी वेदना मांडणारे काव्यच चिरंतन ठरते. वैभव देशमुखांच्याच शब्दात सांगायचं झालं तर    

कल्पनेने येत नसते वेदनेची कल्पना
प्रत्ययाची पाहिजे गवसायला शाळा तुला

            तोंडात सोन्याचांदीचा चमचा घेऊन जन्मणा-यांना अशी प्रत्ययाची शाळा कधीच गवसत नाही. चांगली कविता सुद्धा केवळ कल्पनेच्या जगात राहून कधीच लिहिता येऊ शकत नाही. अनेक लोक आपण कवी आहोत या अविर्भावात जगत असतात. कल्पनेच्या भरा-या केवळ कागदावर मारून बिनबुडाचा आशय मांडू पाहणा-यांना वास्तववादी वैभव देशमुखांचे एकच सांगणे आहे -

नकोस मारू दगड असे शब्दांचे
अरे अजून तो आशय पिकला नाही

चांगली कविता लिहिण्यासाठी मनात असलेला आशय एखाद्या झाडावरच्या फळाप्रमाणे पिकणे गरजेचे असते. कविता लिहिणे म्हणजे दररोज सकाळी येणा-या दूधवाल्या भैयाकडे लावलेला दुधाचा रतीब नाही. खरा कवी आपल्या भावनेला शब्दरुप तेव्हाच देतो जेव्हा त्याचा आशय परिपक्व झालेला असेल. आणि अशी कविता जेव्हा जन्म घेते तेव्हा ती केवळ कवीची राहत नाही, वाचकांची, रसिकांची होऊन जाते. 

कसा पटावा नकार या चिठ्ठीमधला
अक्षर अक्षर आले आहे छान किती

किंवा

हवा येथली ताजी आहे
विकास बहुदा बाकी आहे


            असे एकाहून एक सुंदर शेर आणि गझला लिहिणा-या वैभव देशमुख यांच्या नावावर ‘तृष्णाकाठ ’ हा एकमेव कवितासंग्रह आहे. त्यांचा एक गझलसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. 'तृष्णाकाठ'साठी त्यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान नाशिकचा 'विशाखा काव्य पुरस्कार', साहित्यज्योती प्रतिष्ठान, कडाआष्टीचा 'साहित्यज्योती काव्य पुरस्कार' हे सन्मान प्राप्त झाले आहेत. उत्कृष्ट गझललेखनासाठी 'युआरएल फाऊंडेशन, मुंबई'चा गझलउन्मेश पुरस्कार प्राप्त झाला आहे. याबरोबरच उत्कृष्ट जाहिरात लेखनासाठी ‘कॉपीरायटर ऑफ द ईयर २०१४’ हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला आहे. रिंगण (राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त), नाळ, कागर, मेकअप, लालबागची राणी, लूझ कंट्रोल, घाट, अधम या मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन करणा-या वैभव देशमुख यांना ‘बेस्ट अपकमिंग लिरिसिस्ट ऑफ द यिअर पुरस्कार २०१७’ व अनेक गीतांना नामांकने प्राप्त झाली आहेत. याबरोबरच 92 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलन, उस्मानाबाद व अनेक राज्यस्तरीय संमेलनांचे उत्कृष्ट असे थीम सॉन्गज् लिहिलेले आहेत. त्यांनी बाजी (झी मराठी),बापमाणूस (झी युवा), छोटी मालकीण (सतत प्रवाह), जुळता जुळता जुळतंय की (सोनी मराठी) ,गर्जा महाराष्ट्र (सोनी मराठी) या मालिकांसाठी लिहिलेले टायटल सॉन्गज् सुद्धा उल्लेखनीय आहेत. असा या खेड्यातल्या एका तरुणाचा प्रेरणादायी प्रवास आहे. गझलकार वैभव देशमुख यांची एक सुंदर गझल रसिकांसाठी -

ज्याची ओंजळ भरली त्याला कणगी सुचली    
ज्याची मूठ रिकामी त्याला चोरी सुचली 

 एक वीट अन त्यावर विठ्ठलमूर्ती सुचली
अभंगरचना कुणास सुंदर इतकी सुचली 

 ज्याची हिम्मत पक्की तो हा डोंगर चढला
ज्याची हिम्मत खचली त्याला खाई सुचली

 फक्त मिठीने एका भांडण मिटले असते
गोष्ट मला ही वेळेवर का नाही सुचली

एक उदासी पहाड बनुनी उभी राहिली
पहाडात त्या मज बुद्धाची लेणी सुचली

( वैभव देशमुख, पुणे
भ्रमणध्वनी : 7768989721)   

...............................................
अमोल शिरसाट
९०४९०११२३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा