आपला सन्मान, सत्कार कोणाला नको असतो? काही महाभाग तर आपला सत्कार पैसे देऊन करवून घेतात. अनेक पुरस्कार देणा-या संस्थांचे आयोजकही थोर आहेत. अशा कार्यक्रमांचे आयोजन म्हणजे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार असतो. पुरस्काराच्या नावावर भरपूर निधी गोळा करून चोरलेली शाल आणि फुटके नारळ सत्कारमुर्तीच्या मस्तकात हाणायचे असा एककलमी कार्यक्रम असतो. असो! पण यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीचे ज्येष्ठ गझलकार कलीम खान मात्र सगळे पुरस्कार नाकारणारे जगावेगळे वल्ली आहेत. कुरआनाबरोबरच वेद, उपनिषद गीता आणि धम्मपदांचे गाढे अभ्यासक असलेले कलीम खान महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी वरील विषयांवर व्याख्यानेही देत असतात. (जन्म- ७ ऑगस्ट १९५४)
गझलकार कलीम खान यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी बरबरोबरच संस्कृत आणि उर्दूवर स्वप्रयत्नातून प्रभुत्व मिळवले आहे. त्यांची उर्दू शिकण्याची गोष्ट तर फारच गमतीशीर आहे. त्यांचे एका मुलीवर प्रेम जडले आणि लागलीच त्यांनी तिला हिंदीत प्रेमपत्र लिहिले. विशेष म्हणजे त्यांना प्रेमपत्राचे उत्तर देखील मिळाले. पण अडचण ही झाली की आलेले उत्तर उर्दूत होते. कलीम खान यांना काही वाचता येईना कारण शालेय शिक्षण मराठीतून झालेले. मग त्यांनी उर्दू शिकण्याचा चंग बांधला आणि आठ-दहा दिवसातच ते उर्दू वाचायला शिकले. अशा रितीने त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराचा हात हातातून सुटू दिला नाही. तसे त्यांचे कवितेवर देखील कोवळ्या वयातच प्रेम जडले.आर्णीत होणा-या ऊरूसांच्या निमित्ताने रात्ररात्रभर देशभरातील अव्वल दर्जाच्या कव्वालांच्या मैफिली रंगत. तेव्हा नकळतपणे कलीम खान यांच्यावर गझलेतील वृत्तांचे देखील संस्कार झाले. त्यांना गझलेची खरी ओळख झाली ती सुधाकर कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर! कदमांच्या अनेक गझलमैफिलींचे निवेदन कलीम खान करायचे. त्यांच्या निवेदनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची समयसुचकता आणि हिंदी-उर्दू-मराठीतील तमाम शायरांचे शेर, गझला आणि कविता यांचे जबरदस्त पाठांतर! त्यांची गझलही अत्यंत वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्या गझलेत प्रेमाबरोबरच देशभक्ती, सांप्रदायिक एकात्मता आणि हिंदू-इस्लाम मिथकांचा अनोखा संगम आढळतो.
मीच दिल्ली, मीच केरळ, मीच हिंदूस्थान आहे
मरणही माझे भुईला, कुंकवाचे दान आहे
बाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची
माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे!
इतका उदात्त दृष्टिकोन केवळ माणुसकी हा धर्म असणा-यांचाच असतो. कलीम खान धर्माने मुस्लिम असले तरी त्यांच्या मते धर्म कोणताही असो संस्कृती बदलत नसते त्यांच्या रक्तात येथील संस्कृती मिसळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेतून जी प्रतिमाने येतात ती याच मातीतून उगवलेल्या सस्कृतीमधील आहेत. रुढार्थाने नास्तिक असलेल्या कलीम खान यांची गौतम बुद्ध, श्रीराम, कृष्ण, येशू ख्रिस्त आणि प्रेषीत मुहम्मद ही सर्व श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळेच कलीम खान जितक्या हक्काने कुरआन वर बोलतात तितक्याच हक्काने ते गीता आणि धम्मपदांवरही बोलतात. या सर्वांचे मिश्रण त्यांच्या काव्यामधे दिसून येते. आणि म्हणूनच ते ज्ञानेश्वरांसारखे पसायदानही मागतात –
अभिमान जिंकण्याचा मजला कधी न होओ
अन् हारलो तरीही त्रागा कधी न होओ
आपल्यातला अभिमान दूर करता आला की मग कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. एकदा का मीपणा दूर झाला की हरण्याला किंवा जिंकण्याला फारसे महत्व राहत नाही. कलीम खान यांच्याप्रमाणे स्थितप्रज्ञवृत्तीने जीवनाकडे बघता येते. जगात अनेक लोकांना त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा, सौंदर्याचा, शक्तीचा निरर्थक अभिमान असतो. त्यांच्यासाठी एक सुंदर शेर आहे
सौंदर्य हे तनांचे वाटे जया चिरंतन;
त्यांनी उजाड, पडक्या वाड्याकडे बघावे
कधीतरी संपन्नतेने नटलेले वाडे आज उजाड आणि भकास दिसतात. कधीतरी त्या वाड्यांना, वाड्यातल्या लोकांना संपन्नतेचा अभिमान असेल. पण आज काय परिस्थिती आहे? भिंती खचल्या आहेत, छत कोसळले आहेत. संपन्नता होती मह्णून आस-याला असलेले लोकही परागंदा झाले आहेत. मरणपंथाला लागलेल्या वाड्यासोबत आहे ते त्याचे उदास आणि भयाण एकाकीपण. म्हणूनच खोटा अभिमान बाळगून कोणाचे भले झाले? कलीम खान यांची गझल चिंतनशील आहे.
गझलेप्रमाणेच कलीम खान यांची दोहा या काव्यप्रकारवर चांगली पकड आहे. ते दोह्यामंधे सुद्धा आजच्या काळातील प्रतिमा घेऊन जीवनाचे तत्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करतात –
जिसे कहे तू जिंदगी तालमेल का खेल
सिग्नल जबतक है सही, पटरी पर है रेल
जीवनाचा ताळमेळ साधला जाणे अत्यंत आवश्यक असते. पाप-पुण्य, बरे-वाईट, खरे-खोटे यातल्या सीमारेषा फारच धुसर असतात. चांगल्या गोष्टींचा अतिरेकही कधीकधी जीवनाचे वाटोळे करू शकतो. कधीकधी इतरांच्या भल्यासाठी खोटेही बोलावे लागते. सत्यवादी हरिश्चंद्रासारखं जीवन कोणालाही जगता येत नाही. त्यामुळे जीवनामधे ताळमेळ आवश्यक आहे. असे जीवनाचे तत्वज्ञान कलीम खान आपल्या काव्यातुन मांडतात. त्यांच्या गझलेतील भाषा थोडी जुनी वाटते, तुरळक गझलांमधे शेरांची संख्याही जास्त आहे पण ते जे काही ते लिहीतात ते त्यांचे स्वतःचे आहे. त्यात कोणाचेही अनुसरण नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झालेल्या कलीम खान यांनी आपल्या संपूर्ण नोकरीच्या काळामधे केवळ विद्यार्थ्यांचाच विचार केला. स्वतःची माहिती स्वतःच द्यावी लागत असल्याने शिक्षण विभागाने देऊ केलेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काररही नाकारला. त्यांच्या नावावर आजवर ‘गझल कौमुदी’(२०१९) हा एकमेव संग्रह आहे. या संग्रहामधे त्यांनी गझल अभ्यासकांसाठी गझलेचे वृत्तशास्त्र व ‘रुबाई’या गझलेच्या उपप्रकाराबद्दल सविस्तर माहिती अंतर्भूत केली आहे. ‘कलीम के दोहे’(२०१९) हा त्यांचा हिंदी दोह्यांचा संग्रह देखील प्रकाशित झाला आहे. त्यांनी ‘मँजर’ हा हिंदी-उर्दू गझलांचा संग्रह देखील संपादीत केला आहे. त्यांचे ‘चाँदकी टहनिया’(उर्दू गझलसंग्रह), ‘सूर्याच्या पारंब्या’ (मुक्तछंद) व ‘कलीमच्या रुबाया’ हे तीन संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
मनात साठलेले जेव्हा ताकदीने बाहेर येईल तेव्हाच लेखणीचे माध्यम निवडणा-या शायर कलीम खान यांची एक गझल -
निवडुंग ओळखीचे, नात्यातल्याच बोरी
पण सावलीस त्यांच्या थांबू नकोस पोरी
रचणे कठीण गोट्या, जर एकदा विखुरल्या
जीवन नव्हेच पोरी खेळातली लगोरी
कुठल्याच माणसाचा देऊ नको भरवसा
बाभूळ गावची ज्या त्या गावच्याच बोरी
नाहीच भूक तुजला मी जाणतो तरीही
थोडी तरी असू दे सोबत तुझ्या शिदोरी
सारे चतूर त्यांचे लिहिणे कधीच झाले
मी वेंधळाच माझी पाटी अजून कोरी
(कलीम खान, ‘ग़ज़ल’, मुबारक नगर, आर्णी ता. आर्णी जि. यवतमाळ,४४४५१०३ मो.९९६०३६०१३०)
......................................
अमोल शिरसाट
अकोला
९४९०११२३४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा