२४ फेब्रुवारी, २०२१

मी रोज नव्या आशेच्या किरणांनी उगवत असतो

                कवीला संवेदनशीलतेची देणगी लाभलेली असते. कोणाचीही वेदना त्याला बघवत नाही. भोवताली घडणा-या चुकीच्या गोष्टींवर तो आपल्या कवितेतून भाष्य करतो. त्याला बदल घडवायचा असतो. संत कबीर, तुकोबांनी हेच केलं. पण जग मात्र काही केल्या बदलत नाही. पण संवेदनशील मनाचा कवी मात्र बोलत राहतो. कारण त्याचा सकारात्मक दृष्टीकोन त्याला आशावादी बनवतो. मराठी गझलेतले प्रचंड आशावादी आणि सकारात्मक असलेले एक गझलकार म्हणजे गौरवकुमार आठवले. त्यांचे मूळ गाव वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) हे असून ते सध्या भारत प्रतिभूती मुद्रणालय, नाशिक येथे निरिक्षक पदावर कार्यरत आहेत. ( जन्म – ९ ऑगस्ट १९६८) 
............................................................................
            आदिम काळापासून मानवाने माणूसपण प्राप्त करून घेताना खूप मोठा संघर्ष केला आहे. माणसाने आपल्या बुद्धीच्या जोरावर निसर्गातील अनेक अनाकलनीय गोष्टींचा शोध लावला. वाळवंटासारख्या रुक्ष भागात देखील माणसाने जिवंत राहण्यासाठी अनेक क्लृप्त्या शोधून काढल्या. यासाठी त्याला त्याचा सकारात्मक दृष्टीकोन नेहमीच मार्गदर्शक ठरला आहे. कविमनाला संवेदनशीलतेप्रमाणेच सकारात्मक दृष्टीकोनही निसर्गदत्त असतो. जीवनात अनेक अ‍डचणी येतात. अनेकदा अपयश येतं. पण सकारात्मक विचार करणारा गौरवकुमार आठवलेंसारखा कवी खचून जात नाही. 

उरी लागता तीर घायाळ झालो
पुन्हा लागलो मी नव्याने उडाया

                 काळजाला भेदून जाणारे अनेक तीर घायाळ करून जातात. पण सर्व शक्ती एकवटून पुन्हा उडण्याची ताकद ज्याच्यात असते तो कधीही अपयशी होत नाही. संपूर्ण आकाश आपल्या पंखांनी झाकून टाकण्याची उर्मी कितीही तीक्ष्ण तीरांचा मारा सहन करू शकते. अस्तित्वाला झाकून टाकण्यासाठी अनेकदा काळाकुट्ट अंधार देखील मार्गात येतो. पण अंधारातून, काट्याकुट्यांमधून ठेचाळत चालताना उद्याच्या पहाटेची प्रकाश किरणेच आपले ध्येय गाठण्यासठी प्रेरणा देत राहतात.  
  
रात्रीच्या काळोखाचे पचवून विषारी प्याले
मी रोज नव्या आशेच्या किरणांनी उगवत असतो

             पण अशा अंधारातून चलण्याचा मार्ग सोपा नसतो. पायांमधे काटे रुततात. ते वेळीच काढले गेले नाहीत तर ते ध्येयाच्या दिशेने चालताना अडसर ठरू शकतात. आपल्या अवतीभवती वावरणारे अनेक लोकही या अणकुचीदार काट्यांसारखेच असतात. कारण असे लोक नकारात्मक वागणुकीने आपल्या पराभावाचा काळोख अधिकच गडद करतात. आपल्या यशाकडे ते ढुंकूनही बघणार नाहीत पण आपण अपयशी झालो रे झालो की ते आपली कावळ्याची चोच घेऊन हजर असतात. म्हणून अशा लोकांना आपल्या आयुष्यातून वेळीच वजा करणे गरजेचे असते. तसं पाहिलं तर आपल्या यशाचे अनेक वाटेकरी असतात. पण आपल्या अपयशाचे कोणीच भागीदार व्हायला तयार नसते. आपण पराभूत व्हायला लागलो की एकेक जण काढता पाय घ्यायला सुरुवात करतो. अशावेळी गौरवकुमारांप्रमाणे अशा लोकांना ठणकावून सांगावसं वाटतं - 
  
करू नका फैसला कुणीही अताच माझ्या पराभवाचा
जरी असे एकटा तरी मी लढावयाला रणात आहे

             लढाई कोणतीही असो, ती जिंकता येते. पण त्यासाठी मनात आत्मविश्वासाचा दारुगोळा ठासून भरलेला असावा लागतो. इतिहासात त्याची अनेक उदाहरणं सापडतील. आपल्या मुठभर सैन्याच्या भरवशावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मिती केली. त्यांच्या प्रमाणे प्रत्येकाला हातात तलवार घेऊन उभे राहण्याची गरज नाही. आपल्याला जीवनातल्या अनेक पातळ्यांवरच्या लढाया शिवाजी महाराजांसारखा आत्मविश्वास बाळगून नक्कीच जिंकता येतात. 
              गझलकार गौरवकुमार आठवलेंची गझल त्यांची स्वतःची गझल आहे. त्यांनी अनुभवलेले, त्यांच्या मनाला टोचलेले त्यांनी शब्दांमधे सफाईदारपणे बांधले आहे. हा सफाईदारपणा ते आपल्या अनुभवांशी व लेखणीशी प्रामाणिक असल्यामुळेच त्यांच्या रचनांमधे उतरला आहे. त्यांची लेखणी प्रसंगी विद्रोहीसुद्धा होते. त्यांच्या गझलेबद्दल बोलताना डॉ. राम पंडित म्हणतात, ‘गौरवकुमार आठवले आपल्या ब-या – वाईट अनुभवांचे विश्लेषण अत्यंत निस्पृहपणे करतात. त्यांची विचारशैली अनेकदा सकारात्मक तर क्वचितप्रसंगी विषादात्मक आहे. बोचणा-या गोष्टी, कृती, शब्दबद्ध करताना ते लाऊड होत नाहीत. त्यांच्या गझलेतील विद्रोही स्वर हा संयमी आणि परिपक्व आहे. तसेच आपले अनुभवविश्व रेखाटताना सहसा ते गझलशैलीची कास सोडीत नाहीत.’ 

मी जसा माणूसकीचा लागतो झेंडा उभारू
लागतो जो तो पुसाया काय माझी जात आहे?

        असा माणुसकीचा झेंडा उभारणा-या प्रत्येकालाच त्रास होतो. जातीभेदाने तर समाजात खूप खोलवर पाय रुजवलेले आहेत. एकवेळ एखाद्या जीवघेण्या आजाराचे औषध सापडेल पण जातीभेदाचे विषाणू मात्र मानव जातीला संपवल्यावरच मरतील असे वाटते. माणुसकीचा झेंडा उभारून निवडणुकही लढवता येत नाही. 

मला जात नाही, मला धर्म नाही
लढावी कशी मी निवडणूक माझी?

             गौरवकुमार आठवले आंबेडकरी विचारांचे पाईक आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या गझलेमधून समता-स्वातंत्र्य-बंधुत्वाचा विचार आपल्या गझलेमधून ओघवत्या शैलीत मांडला आहे. आंबेडकरी विचारांचे अनुयायीच जेव्हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे मारेकरी होतात तेव्हा ते व्यथीत होतात.- 

पुन्हा बाबा तुझा सौदा कराया लागलो आम्ही
स्वतःची अस्मिता आता विकाया लागलो आम्ही
तुझ्या नावावरी येथे दुकाने मांडुनी सारी
खिसे आपापले बाबा भराया लागलो आम्ही

              गौरवकुमारांनी वास्तव अगदी चपखलपणे मांडले आहे. महापुरुषांच्या विचारांना मुठमाती देण्याचे काम स्वतःला त्यांचे अनुयायी म्हणवणारेच करत असतात. उपरोक्त गझलेतील इतर सर्वच शेरही धारदारपणे येतात. सुरेश भटांच्या नंतरच्या पिढीतील गझललेखनाचे तंत्र आत्मसात करणा-या प्रमुख गझलकारांमधे गौरवकुमारांचा समावेश होतो. नाशिकच्या चलनी नोटा निर्मिती करणा-या मुद्रणालयात अत्यंत तणावपूर्ण नोकरी करत ते अविरतपणे गझललेखन करीत आहेत. त्यांचा ‘सवाल’ (२०००) हा काव्यसंग्रह साहित्य संस्कृती महामंडळातर्फे प्रकाशित करण्यात आला असून ‘मांडतो फिर्याद मी’(२०११) हा गझलसंग्रह सुद्धा प्रकाशित झाला आहे. कविता व गझललेखनासाठी त्यांना कामागार कल्याण मंडळ, मुंबईचा ह.ना.आपटे पुरस्कार, नाशिकचा ‘छंदोमयी’ असे अनेक सन्मान मिळाले आहेत. 
            गझलकार गौरवकुमार आठवले गेल्या चार-पाच महिन्यांपासून अर्धांगवायुशी निकराची झुंज देत पुन्हा एकदा नव्या दमाने नोकरी व गझलसेवेत रुजु होत आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना - 

बोललेले शब्द कोठे पाळतो आपण ?
कारणे सांगायचेही टाळतो आपण.

ही खरी आहे तुझी माझी परीक्षा बघ...
एकमेकांना कसे सांभाळतो आपण.

ये भविष्यावर कधी तर मोकळे बोलू;
भूतकाळाला कितीदा चाळतो आपण.

माणसांना चल जरा समजून घेऊया;
व्यर्थ दगडांनाच का ओवाळतो आपण.

राहवेना भेटल्यावाचून दोघांना;
रोज भेटूनी जरी कंटाळतो आपण.

ये फुलांनाही जरा शोधून काढूया;
सारखे काटेच का न्याहाळतो आपण.

ह्या जगाला थांगपत्ताही नसे याचा;
रोज एकांतात अश्रू ढाळतो आपण!

( गौरवकुमार आठवले, 'प्रेरणा,' रो-हाऊस क्रं २,पारिजात नगर, लोखंडेमळा, जेलरोड, नाशिकरोड-४२२ १०१. संपर्क ९४२३४७५३३६)
...................................................

अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा