१० मार्च, २०२१

जिते मी ठेवले हृदयात अजुनी 'स्त्रीत्व' माझे

  भाषा संस्कृतीच्या देवाणघेवाणीतून नवे शब्द, नव्या प्रतिमा आत्मसात करते. कवी आपल्या कवितांमधे नवे शब्द आणि प्रतिमा सामावून घेतो. त्यामुळे भाषेच्या विकासाला अधिक चालना मिळत राहते. मराठी कवितेसह मराठी गझलेनेसुद्धा सुरुवातीपासून नव्या प्रतिमा, शब्द, संकल्पना सामावून घेतल्या आहेत. आपल्या गझलेत बदलत जाणा-या जीवनशैलीच्या चित्रणाबरोबरच इंग्रजी शब्दांचा चपखलपणे वापर करणारे सुरेश भटानंतरच्या तिस-या पिढीतील एक गझलकार म्हणजे पुण्यातील सासवडचे शुभानन चिंचकर ‘अरुण’. त्यांच्या गझलेत शहरीकरणामुळे निर्माण झालेली निराशा आणि वैफल्याबरोबरच प्रखर सामाजिक जाणीव चित्रीत झाली आहे.(जन्म- ३ ऑक्टोबर ७५) 
.............................................................................................   
असं म्हणतात की कवी हा शब्दसृष्टीचा ईश्वर असतो. दिक्कालातून आरपार पाहण्याचे सामार्थ्य त्याच्यात असते. रोजच्या सामान्य वाटणा-या शब्दांमधून तो नव्या शक्यता निर्माण करतो. अशा शक्यता त्याच्या कवितेतून निर्माण झाल्यावर शब्दांना नवे आयाम प्राप्त होतात, नवे अर्थ प्राप्त होतात. तसा समांतरपणे भाषेचाही विकास होत असतो. मराठी नवकवितेचे जनक बा.सी. मर्ढेकर यांनी त्यांच्या कवितेत पारंपारिक प्रतिमांपेक्षा नव्या युगाच्या प्रतिमांचा वापर केला आहे. यंत्रयुगामुळे मानवी जीवनात आलेली कृत्रिमता आणि निरसता यामुळे मानवी संवेदना खुज्या झाल्या आहेत. मर्ढेकरांनी हा खुजेपणा आपल्या कवितेतून मांडला. गझलकार शुभानन चिंचकर यांच्या गझलेतसुद्धा ‘बोन्साय’ झालेल्या मानवी जीवनाचे चित्र उभे राहते. 

रोज पोटाच्याच मागे धावणारे पाय मोजू?
स्वप्न मोजू, भूक मोजू, हाव मोजू... काय मोजू?

खुंटलेले स्वप्न शहराच्या खुज्या कुंडीत लावू
कौतुकाने आपले झाले किती बोन्साय मोजू.

        आजचे शहरी जीवन म्हणजे खरोखरच एखाद्या कुंडीत लावलेल्या ‘बोन्साय’ झाडाप्रमाणेच झाले आहे. मुंबईसारख्या शहरात उभ्या असलेल्या उंच इमारती आणि त्यात असलेले ‘फ्लॅटस्’ कबुतराच्या खुराड्याप्रमाणेच वाटतात. एखाद्या दिवशी श्वास गुदमरून मरून जाऊ अशी मुंग्यांसारखी गर्दी पाहिली की अंगावर काटा उभा राहतो. अश्या जीवघेण्या गर्दीत लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास आयुष्यभर उभ्यानेच करतात. हा प्रवास चिंचकरांसारखा संवेदनशील मनाचा गझलकार आपल्या गझलेत शांतपणे टिपतो. 

प्रवासाची उभ्या इतकी सवय झाली
मला वाटे उभा मरणार आहे मी

           मुंबईच्या स्टेशनवर नुसतं उभं राहिलं तरी जीवाच्या आकांताने धावणारी गर्दी आपल्याला आपोआप ट्रेनमधे चढवते आणि चुकून तुम्ही दाराजवळ उभे राहिलात तर तुम्हाला उतारायचे नसूनही ही गर्दी चुकीच्या स्टेशनवर उतरवते देखील! तसं पाहिलं तर जीवनाचा प्रवास देखील असाच असतो. चढायचे नसूनही नकोशा गाडीत चढावे लागते आणि रडत, पडत केलेल्या प्रवासात आता कुठे सहप्रवाशांवर प्रेम जडायला लागते तेव्हा नकोशा स्टेशनवर उतरावे लागते. कधी कधी लोकलमधे जीव मुठीत धरून प्रवास करताना गावाची आठवण येते पण आता परत जायची हिम्मत होत नाही. तेव्हा स्वतःची खोटी समजूत घालावी लागते -     
खिडकी, खुर्ची, पुस्तक हाच सहारा उरला आहे
बघण्यापुरता आभाळाचा तुकडा उरला आहे

मला लागले आहे आता या शहराचे पाणी
कुठे तसाही गावाकडचा ओढा उरला आहे
          चिंचकरांच्या ह्या ओळी वाचल्यानंतर बा.सी. मर्ढेकरांच्या ‘किती तरी दिवसात नाही चांदण्यात गेलो’ या कवितेची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. मर्ढेकरांनाही आपल्या गावाकडील नदीप्रवाहाची राहून राहून आठवण येते पण त्यांना शहर सोडून जाण्याचा नुसता विचारही अंगावर काटा काढतो. शेवटी त्यांना आपल्या शहरातील तोत-या नळाची धारच बरी वाटते. अगदी तसेच चिंचकरही आपल्या मनाची खोटी समजूत काढतात. चिंचकरांच्या गझलेत शहरीकरणामुळे मानवी जीवनात निर्माण झालेले वैफल्य प्रामुख्याने दिसून येते. अनेक शेरांमधे शहरी जीवनातले दाहक वास्तव ते अचूकपणे मांडतात.   
   
सोड ना आज तू... उद्या नक्की!
जीव थकलाय खूप कामाने

        तो सकाळी चारला उठून कामावर जातो आणि उशिरा रात्री घरी येतो. पिल्लांसाठी दाणे गोळा करता करता दिवसभर हाडाची काडे करून त्याचा केवळ सापळा उरतो. पण या गडबडीत तिच्या स्वप्नांचा मात्र चुराडा झालेला असतो. उद्याचा दिवस नक्कीच चांगला असेल या आशेवर दोघेही दिवस पुढे ढकलत राहतात. शुभानन चिंचकर तिची वेदना अलगदपणे टिपतात. कारण त्यांनी तिची वेदना समजून घेणारं ‘स्त्रीत्वं’ आपल्या पुरुषी हृदयात कायम जपून ठेवलं आहे. 

‘पुरुष' आहे तरी मनमोकळे जमते रडाया
जिते मी ठेवले हृदयात अजुनी 'स्त्रीत्व' माझे
         गझलकार शुभानन चिंचकरांच्या जाणीवा प्रगल्भ आहेत. आपल्या अवतीभवती घडणा-या मनाला टोचणा-या गोष्टी ते कान आणि डोळे उघडे ठेऊन टिपतात. त्यांच्या गझलेत सामजिक जाणीवही प्रखरतेने आली आहे. 

खूपदा झोपेमधे दचकून उठते ती
बोलते काकांसवे खेळायचे नाही

           या शेरात मांडलेले दाहक वास्तव संवेदना सोलून काढते. क्षणभर या शेराला दाद द्यावी की मनातली चीड ओरडून व्यक्त करावी हेच कळत नाही. कविता ही समाजाचा आरसा असते. शुभानन चिंचकरांसारखा कवी समाजात घडणा-या चुकीच्या गोष्टींवर प्रकाश टाकून समाजमनाला अंतर्मुख व्हायला भाग पाडतो. केवळ आपल्या कोशात गुंतून न राहता चुकीच्या गोष्टींवर आपल्या कवितेतून बोलणे ही सुद्धा कवीची नैतिक जबाबदारी आहे. चिंचकरांच्या गझलेत व्यक्त झालेल्या प्रेमासह सर्व अनुभूती आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टीने संपन्न आहेत.       
    वडीलांच्या सांगण्यावरून जबरदस्तीने इंजीनिअरींगला अ‍ॅडमिशन घेणा-या शुभानन चिंचकरांचे मन यंत्रांमधे रमले नाही. त्यांनी दोन वर्षातच इंजीनिअरिंग सोडून दिले. लहानपणापासून त्यांना जीवनाचे रंग स्वच्छंदपणे टिपणारा चित्रकार व्हायचे होते. त्यांनी त्यासाठी स्वतः कमवून शिकण्याचा प्रयत्न देखील केला. पण घरच्यांनी आणि परिस्थितीने साथ दिली नाही. त्यानंतर त्यांनी स्क्रीन प्रिंटिंगचा व्यवसाय सुरू केला आहे. आज ते ‘स्वयं प्रकाशन’ ही आपल्या कष्टाने आणि कल्पकतेने उभारलेली पुस्तक प्रकाशन संस्था चालवत आहेत. अनेक दर्जेदार पुस्तके त्यांनी प्रकाशित केली आहेत. त्यांचा ‘स्वप्नांचे बोन्साय’ (२०१८) हा एक दर्जेदार संग्रह प्रकाशित झाला असून त्यांचा एकच वृत्त आणि ‘रस्ता’ हा एकच रदीफ असलेला जवळजवळ पाचशे शेरांचा ‘गात जातो धून रस्ता’ हा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. १९९६ पासून गझल लेखन करत असूनही तथाकथित दुनियादारी जमत नसल्याने भिडस्त स्वभावाच्या चिंचकरांना आजवर एकही पुरस्कार प्राप्त झालेला नाही, ही शोकांतिका आहे. असे असले तरी त्यांना मात्र याची खंत नाही.  
    गझलकार शुभानन चिंचकर 'अरुण' यांची एक गझल - 

फोन वाजला अवेळीच तर दचकुन उठते
भयशंकेने शहारून घर दचकुन उठते

स्पर्श सरपटत शोधत येतो काळोखातुन
आणि अपूरी गाफिल चादर दचकुन उठते

हळद कोवळी, नाजुक कंबर, डोह खोलगट
पुन्हा श्वास घुसमटून घागर दचकुन उठते

लाल सूर्य माथ्याचा येते रात्र पुसाया
सांज रंडकी होउन कातर दचकुन उठते

धडपडून म्हातारा उठतो... पेला पडतो
मोत्या भुंकत येतो, मांजर दचकुन उठते

स्वप्न भयानक पडते का माणुस झाल्याचे
आजकाल झोपेतुन वानर दचकुन उठते...
(शुभानन चिंचकर, सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे, ८८८८७६९६५९)
.....................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा