हझल हा गझलेचाच एक प्रकार. उपहास, उपरोध, व्यंग आणि विनोद यांचा सुरेख संगम म्हणजे हझल. समाजातल्या वैगुण्यावर विनोदी पद्धतीने भाष्य करत अंतर्मुख व्हायला लावणे हझलेत अपेक्षीत असते. त्यामुळे हझल लिहिणे सोपे काम नाही. म्हणूनच उर्दू गझलेप्रमाणे मराठीतही मोजकेच हझलकार आहेत. सुरेश भटांचे समकालीन आणि मराठीतले एक ताकदीचे हझलकार व गझलकार म्हणजे पुण्याचे घनश्याम धेंडे( १९३९-२०१७). त्यांनी सहाव्या अखिल भारतीय गझल संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले आहे.
.............................
व्यंगचित्रकार जेव्हा व्यंगचित्र काढतो तेव्हा तो विनोदी पद्धतीने वर्मावर बोट ठेवतो. खरं म्हणजे विनोद हे डोळ्यात अंजन घालणारे माध्यम आहे. अगदी त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती-घटना-प्रसंगात दडलेल्या विसंगत सूचितार्थाचा हास्यजनक शाब्दिक अविष्कार म्हणजे हझल होय. असा शाब्दिक अविष्कार करणे सोपे नसते. कवीकडे विसंगती हेरणारी विशेष दृष्टी असावी लागते. घनश्याम धेंडेंकडे ही विशेष दृष्टी होती.
चौकात लावला हा ‘फ्लेक्स’ काल त्यांनी
चौकीमधेही त्यांचे यादीत नाव आहे
आज प्रत्येक चौकात अशी फ्लेक्सबाजी दिसून येते. फ्लेक्सवर वेगवेगळ्या पोजमधे कधी केसाळ, कधी पांढरे शुभ्र कपडे, गळ्यात सोन्याचे अलंकार घालणारे ‘प्राणी’ त्या फ्लेक्सची शोभा अधिकच वाढवत असतात. अश्या प्राण्यांची एक वेगळी जमात समाजात दिसून येते. आणि विशेष म्हणजे अश्या प्राण्यांची जवळच्या पोलिस स्टेशनमधे नक्कीच नोंद असते. धेंडेनी ही विसंगती आपल्या शेरात अचूकपणे हेरली आहे. सामान्य माणसाला आपल्या एखाद्या छोट्या चुकीचा आयुष्यभर खेद वाटतो. पण अनेक गुन्ह्यांची नावावर नोंद असलेले हिंस्त्र प्राणी मात्र मजेत असतात. धेंडेंना याचे गुपित कळले होते. ते म्हणतात -
ते सुखी कशाने झाले? हे आता मला कळाले
‘डोक्यास बांधले आहे, कमरेचे सोडुन त्यांनी’
असे कमरेचे सोडून डोक्याला बांधणे फक्त तथाकथित नेत्यांनाच जमू शकते. या नेत्यांची कातडी पाहून गेंड्यांनाही नवल वाटत असावे. जनतेशी काहीही घेणे देणे नसलेले असे नेते निवडणुका आल्या की खडबडून जागे होतात. मतदारराजा समोर हात जोडून उभे होतात. आश्वासने, दारू आणि पैशांचा पाऊस पाडतात. या निवडकांमधे ते इतके हरखून गेलेले असतात की साक्षात यम जरी दारात आला तरी ते त्यालाही थांबायला सांगतील -
मृत्यू समोर आला जर न्यावयास त्यांना
म्हणतील थांब थोडा सध्या चुनाव आहे
व्यंगचित्रकला ही चित्रकलेची शेवटची पायरी आहे असे म्हटले जाते. अगदी त्याचप्रमाणे हझल ही सुद्धा गझलेची पुढची पायरी आहे असे म्हणता येईल. कारण मार्मिकता आणि परिणाकारकतेची गरज हझलेमधे जास्त असते. घनश्याम धेंडेंच्या हझलेतील मार्मिकता आणि परिणामकारकता मराठी मातीतील प्रतिमा घेऊन येते.
कीर्तीलाही गंज लागतो अहंपणाचा
जसा पडावा मावा, डुलत्या बाजरीवरी
गझलकरांचा हझलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन फारसा चांगला नाही. कारण अनेक कवी हलक्या दर्जाचे हास्यविनोद आपल्या काव्यात मांडतात. पण नुसते हास्य निर्माण करणे हझलेत अपेक्षित नाही. उपहास आणि उपरोधिकता विनोदी अंगाने सादर करण्यासाठी एक वेगळे कसब कवीकडे असावे लागते. तेव्हाच हझल परिणामकारक होते.
लादतील, शंका नाही, श्वसनावर कर एखादा
निर्लज्ज असे की, तो ही, भरणार वाटते आम्ही
घनश्याम धेंडेंनी अनेक कविता व गझलांचे खुमासदार विंडंबनसुद्धा केले आहे. सुरेश भटांच्या ‘रंग माझा वेगळा’ या गझलेचे विडंबन तर खुपच विनोदी आहे-
हिंडूनी गुत्त्यात सा-या बॅंड माझा वेगळा
गुंतूनी धंद्यात काळ्या हात माझा मोकळा
हझलेतून आलेल्या चटकदार, चमकदार कल्पना केवळ हास्यनिर्मितीसाठी आलेल्या नसतात, त्यामागे गहन अभ्यास, सखोल चिंता असावे लागते. जीवनपध्दतीवर एका वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य केलेले असते, वेगळ्या कोनातून प्रकाश टाकलेला असतो. हझल लिहिणारा कवी स्वत:शीही संवाद साधणारा असतो. तो आत्मपरीक्षण करणारा असतो.तो समाजात वावरत असतांना, आजू-बाजूला घडणा-या घटनांचा अन्वययार्थ लावत असतो. अंतर्मुख होऊन विचार करतो आणि कल्पनाशक्ती, विनोदबुध्दी यांची जोड देऊन हझलेत मांडतो. त्यातील उपहास काहींना झोंबणारा असू शकतो. अनेक हझला काळाच्या पलिकडे जाणा-या असतात.
आपल्या दैनंदिन जीवनात अनेक समस्या आहेत. जीवनात हास्य आणि विनोद नसता तर आपले जगणे बेचव झाले असते. आजरोजी अनेक आजार माणसाला मरण स्वस्तात द्यायला दारात उभे आहेत.अशा परिस्थितीत घनश्याम धेंडेंसारख्या हझलकारांच्या हझलेत येणारा निखळ आनंद माणसाला त्याचे दु:ख क्षणभर का होईना विसरायला भाग पाडतो. ते मिश्किलपणे थेट यमालाच प्रश्न विचारतात -
जीवघेणी ही अशी थट्टा, यमा!, नाही बरी
काय तू होतास माझा मेहुणा केव्हातरी?
आंबेडकरी जलस्यातून घडलेल्या गझलकार घनश्याम धेंडे यांच्या गझलेत एक वेगळी ताकद आहे. प्रतिमा आणि प्रतिकांची योग्य निवड, सफाईदारपणे निभावलेले काफिये आणि रदीफ, ओघवती आणि मराठमोळी भाषा ही त्यांच्या गझलेची वैशिष्टे सांगता येतील. त्यांचे ‘बासरी', ‘निघालो आज तिकडच्या घरी’ आणि ‘तहानलेलं तळं', ‘हजलनामा’ हे गझलसंग्रह प्रकाशित आहेत. ‘महाकारमणी तथागत', ‘वर्धमान महावीर' आणि पंजाबी लोकगीतांवर आधारीत तीन-तीन ओळींच्या कवितांचा ‘माहिया' हे संग्रह देखील त्यांच्या नावावर आहेत. गझलेबरोबरच गीत, लावणी विडंबन काव्य, नाटक इ. विपूल लेखन त्यांनी केले आहे. ‘या थोडं हसू या' हा स्वतंत्र विनोदी कार्यक्रमाचे सादरीकरण सुद्धा धेंडे करायचे. बालभारती इयत्ता आठवीच्या पुस्तकात त्यांच्या कवितेचा समावेश केला गेला होता. त्यांची ‘नमो-तस्स' ही बुद्धगीतांची ध्वनिफितसुद्धा सुप्रसिद्ध आहे. धेंडे यांना गझललेखनासाठी ध्येयवेडा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य गीत लेखन पुरस्कार, गुणवंत कामगार : आर्टिस्ट ऑफ द ईयर सन्मान, साहित्य संस्कृती मंडळाचा (तळेगाव) गो. नि. दांडेकर पुरस्कार, रंगत-संगत प्रतिष्ठानचा हास्य रंगत पुरस्कार, रात्र आरंभ चित्रपटाच्या अभिप्राय लेखनास सुवर्ण मुद्रा, विनोदी व हास्य कवितांकरिता शताब्दीरत्न पुरस्कार, काव्य लेखनासाठी राष्ट्रगौरव पुरस्कारांने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. अशा हरनुन्नरी कलावंताची एक गझल वाचकांसाठी -
असेहि होईल, कुणास ठावे, यदा कदाचित
घेऊन बंदुक उडतील रावे, यदा कदाचित
फिरतिल बिबटे दिवसा-ढवळ्या, शहरांमधुनी
उजाड होतिल, वस्त्या, गावे, यदा कदाचित
हिंस्त्र श्वापदाहून होवुनी हिंस्त्र माणसे
स्वत: स्वत:ला घेतिल चावे, यदा कदाचित
कुणी बनावट मुद्रांकांवर लिहून काही
करील गरिबी तुमच्या नावे, यदा कदाचित
मंदिर, मस्जिद, चर्च,अग्यारी, नको धर्मही
मिटतिल जाती, हेवेदावे, यदा कदाचित
वाचू शकतो ‘घन:श्याम’ चेहरे अताशा
ओळखील साऱ्यांचे कावे, यदा कदाचित
(घनश्याम धेंडे)
.........................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा