२४ मार्च, २०२१

दे क्रांतीचे कुणब्याला सामान तुकोबा

कवीच्या आडनावाला जात चिकटलेली असली तरी कवी आणि त्याची कविता जातीधर्माच्या पलिकडे जाऊन पोहोचलेली असते. परंतु कुपमंडुक प्रवृत्तीचे लोक मात्र कवितेचा दर्जा कवीच्या आडनावावरून ठरवत असतात. आजच्या विज्ञान युगात देखील अनेक लोकांची मानसिकता रानटी जनावरांपेक्षाही भयानक आहे. पण कवीला अशा मानसिकतेच्या लोकांचे काही घेणे देणे नसते तो आपली कविता अधिक सशक्त बनवत राहतो. मानवी संवेदना आपल्या गझलेत मांडणारे एक सशक्त गझलकार म्हणजे नाशिक जिल्ह्यातील वडेल ता.मालेगाव जि. नाशिकचे संतोष कांबळे. नुकताच त्यांचा ‘तुकोबाच्या कुळाचा वंश’ हा गझल संग्रह प्रकाशित झाला आहे . (जन्म – १ जून १९८१) 
  कवितेला धर्म नसतो तसाच एक खरा शिक्षक देखील जातीधर्माच्या पलिकडे जाऊन पोहोचलेला असतो. त्याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थी समान असतो. अशाचप्रकारे गेल्या अठरा वर्षापासून जि.प. प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले संतोष कांबळे आपली शिक्षकाची भूमिका अत्यंत चोखपणे बजावत आहेत. कोणी सहजासहजी नोकरी करायला तयार नसलेल्या नाशिक जिल्ह्यातल्या रामपुरा नावाच्या गावी ते गेल्या बारा वर्षापासून काम करत आहेत. गझल लेखनाबरोबरच ते मुलांना मन लावून शिकवण्याचे काम तर करतच आहेत सोबतच त्यांनी लोकसहभागातून आपली शाळा डिजीटल केली आहे. विद्यार्थ्यांसाठी अतिशय पोषक वातावरण त्यांनी आपल्या शाळेत तयार केले आहे आणि म्हणूनच संतोष कांबळे म्हणतात – 
विठोबा एकदा शाळेत माझ्या येच सवडीने,
तुही म्हणशील या राज्यात दुसरी पंढरी आहे.
  इतकं प्रामणिकपणे ज्ञानदानचं काम करणारे निर्मळ मनाचे शिक्षक तसे विरळेच ! चांगली कवितासुद्धा अशा निर्मळ मनातूच प्रवाहित होते. सुंदर हस्ताक्षराचे धनी असलेल्या संतोष कांबळे यांची गझलही तितकीच सुंदर आहे. ते जीवनाचं तत्वज्ञान साध्यासोप्या शब्दात आपल्या शेरांमधून मांडतात – 

जसजसे नापास करतो जीवना तू,
तसतसा मी आणखी अभ्यस्त होतो

          जीवनात नापास होण्याचे प्रसंग अनेकदा उद्भवतात. परंतु नापास होण्याने खचून न जाता आपला अभ्यास आणखी वाढवावा लागतो. तेव्हाच जीवनाच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होता येते. हे जीवनाचं तत्वज्ञान समजण्यासाठी कधीकधी फार उशीर होतो. प्रत्येकाला ही गोष्ट समजतेच असे नाही. यासाठी गरज असते ती सखोल चिंतनाची ! पण जास्त चिंतनही अनेकदा घातक ठरू शकते. यश संपादन करण्यासाठी मनाच्या संतुलनाची गरज असते. असे संतुलन राखले गेले नाही तर जास्त पाणी दिल्याने जसे शेतातले पिक करपते तसे जीवन सुद्धा उध्वस्त होऊ शकते. हीच गोष्ट संतोष कांबळे आपल्य शेरात अचूकपणे मांडतात – 
फक्त दुष्काळामुळे थोडाच जळतो?
जास्त पाण्याने मळा उध्वस्त होतो!
         संतोष कांबळे यांच्या शेरांमधे चिंतनशीलता आहे. लोणचे मुरल्यानंतर जसे अधिक रुचकर लागते अगदी तसेच गझलेच्या शेरांचे असते. एखादा विचार सुचल्यानंतर अनेक दिवस तो मनात खोलवर मुरावा लागतो. प्रतिमा-प्रतिके यांचा चपखलपणे वापर करून तो विचार सफाईदारपणे व्यक्त व्हावा लागतो , त्याला सोसण्याचा साज चढवावा लागतो तेव्हा कुठे एक घरंदाज गझल जन्माला येते. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणा-यांना खरी कविता-गझल कधीच गवसत नाही. चांगली कविता लिहिण्यासाठी स्वतःच्या मनाच्या खोलीचा ठाव तर घ्यावा लगतोच सोबतच इतरांचे सोसणे सुद्धा अनुभवावे लागते. 
काय सासुरवास होता बोलली नाहीच ती
मात्र रांगोळीत भित्रा काढला होता ससा !
                        या शेरातल्या सासुरवास भोगत असलेल्या मुलीची वेदना संतोष कांबळे यांनी तीव्रतेने मांडली आहे. काय वेदना आहेत हे ती कधीच बोलत नाही पण तिच्या रांगोळीत मात्र ती नकळतपणे व्यक्त होते. रांगोळी आणि भित्रा ससा ह्या प्रतिमा काळजाला स्पर्श करून जातात. या मागे कांबळेची सखोल चिंतनशीलता दिसून येते. ते केवळ आपल्या कोशात रमत नाहीत त्यांच्या गझलेत प्रखर सामाजिक जाणीव सुद्धा उतरली आहे.

नाडली परवा भुकेली पोर भोळी
नाडणारे भाकरीआडून आले

                          भाकरीची प्रतिमा अनेक कवींनी आपल्या कवितेतून वेगवेगळ्या प्रकारे वापरली आहे. बरेचदा वापरल्या गेल्याने अनेक प्रतिमा बोथट होतात. त्यात काही नावीन्य राहत नाही. पण उपरोक्त शेरात आलेली भोळी पोर आणि तिचे भाकरी आडून केलेले शोषण विषण्ण करून टाकते.  
संतोष कांबळेंच्या अनेक गझलांमधे आलेला विद्रोह देखील उल्लेखनीय आहे. त्यांच्या लेखणीला तुकोबांच्या कुळाच्या विद्रोहाची धार लाभली आहे. 

झेंडे, बुक्का, प्रसाद ठेवू नको दुकानी
दे क्रांतीचे कुणब्याला सामान तुकोबा

        वारकरी संप्रदायाचा झेंडा वारश्याने खांद्यावर लाभलेले संतोष कांबळे अंधभक्त नाहीत. ते डोळसपणे जगाकडे पाहतात. अन्याय, शोषण, विषमता, जातीभेद या गोष्टींनी ते अस्वस्थ होतात. महाराष्ट्रभरातले शेतकरी दरवर्षी पंढरपूरची वारी नित्यनेमाने करतात. आपल्या शेतमालाला रास्त भाव मिळावा यासाठी ते विठ्ठलाला साकडे घालतात. पंढरपुरात झेंडे, बुक्का, प्रसाद आणि बरेच साहित्य विक्रीसाठी असते. संतोष कांबळेंना हे सर्व नको आहे. ते म्हणतात या सर्व शेतक-यांना त्यांच्या मालाला रास्त भाव मिळत नसेल तर क्रांतीचे सामानच मिळाले पाहिजे तेव्हा कुठे शेतक-यांचे भले होईल. कारण विकासाच्या नावाखाली मोठमोठे मार्ग निर्माण करण्यासाठी शेतक-यांची जमीन हडपली जाते. त्यांना याचा तुटपुंजा मोबदला दिला जातो. लाखांचा पोशिंदा आपली जमीन बेभाव गेल्याने बेघर होऊन जातो.  

गावची शेती महामार्गात दडपून टाकली;
गाव प्रगतीच्या नव्या स्वप्नात बरळत राहिले

         तथाकथीत विकासाच्या नावाखाली शेतक-यांची बोळवण केली जाते. त्यामुळे संतोष कांबळेंसारखा कवी व्यथित होतो. त्याचे संवेदनशील मन ‘आपण भले, आपले पोट भले’ असे म्हणू देत नाही. त्यांच्यातला कवी प्रश्न विचारतो –

दुर्बलांचे एवढे करता कसे शोषण तुम्ही?
मुंडक्यांचे बंगल्यांना लावता तोरण तुम्ही?

      असा विद्रोही सूर आपल्या गझलेत व्यक्त करणारे संतोष कांबळे यांची लेखणी प्रेमभावना व्यक्त करताना अत्यंत नाजूक होते. सामाजिक जाणीव प्रखर असल्याने त्यांच्या गझलांमधे प्रेमभावना व्यक्त करणारे शेर तसे कमीच आहेत पण प्रेमभावना व्यक्त करणा-या शेरांना देखील विद्रोहाचीच किनार असते.
  ज्ञानदानाचे कार्य प्रामाणिकपणे करत गझल लेखन करणा-या गझलकार संतोष कांबळे यांना काव्यलेखनाच्या प्रवासात प्रकाशकिरण प्रतिष्ठाण,श्रीरामपूर या संस्थेचा उत्कृष्ट वाङमयनिर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार, साहित्य विहार संस्था,नागपूरचा राज्यस्तरीय काव्यनिर्मिती पुरस्कार असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. त्यांची एक गझल रसिकांसाठी - 

काय संसारास झाली दीट रखुमाई?
का निवडली वेगळी तू वीट रखुमाई?

सावळा असला तरीही देखणा आहे
लाव नवर्‍याला तुझ्या तू तीट रखुमाई

हा तुझा मालक असे मुंज्या दहा घरचा
रोज का करते अशी किटकीट रखुमाई?

हात कमरेवर नको ठेऊ खुळ्यावानी
उंबर्‍याबाहेर ये,हो धीट रखुमाई!

पायही धरते,कधी पायातळी घेते
वागते दुनिया किती वाईट रखुमाई

मंदिराच्या आतही शिरले पशू आता
तू स्वत:ची काळजी घे नीट रखुमाई

(संतोष वि.कांबळे/९४०४९९८८८८)
.........................
अमोल शिरसाट
अकोला
9049011234

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा