तुम्हाला राहुल द्रविड आठवतो का? आपल्या तंत्रशुद्ध आणि संयमी खेळीने शतकामागुन शतके ठोकणा-या राहुल द्रविडचं नाव क्रिकेटच्या इतिहासात सुर्वणाक्षरांनी कोरलं गेलं आहे. कधीही स्वतःसाठी न खेळणारा हा मि.डीपेंडेबल अटीतटीच्या वेळी भक्कम बचाव करत खेळायचा. मराठी गझलेत सुद्धा एक मि. डीपेंडेबल आहेत आणि ते म्हणजे सुरेश भटांनंतरच्या तिस-या फळीतील पुण्याचे दमदार गझलकार प्रमोद खराडे! मार्केटींग क्षेत्रात करीयर करत गझलेबरोबरच त्यांनी क्रिकेट आणि फोटोग्राफीचा छंद नित्यनेमाने जोपासला आहे हे विशेष! (जन्म – १० फेबृवारी ’७३)
..........................
सुप्रसिद्ध फ्रेंच तत्वज्ञ जॅकस् मॅरिताँ म्हणतो ‘माणसात कारागीर आणि कलावंत हे एकत्र नांदत असतात. मात्र मानवजातीच्या ऐतिहासिक विकासक्रमात त्याच्यातील कारागीर हा कलावंताला आपल्या खांद्यावर वागवीत आला आहे.’ याचा अर्थ कलावंत हा कारागीरावर अवलंबून असतो. कलांवत आपल्या कल्पकतेने निर्मितीची दिशा ठरवतो पण कारागीर त्याला परीश्रमपूर्वक मूर्त रूप देतो. पण गझलेत कला आणि कारागिरी दोन्ही समतुल्य आहेत. सुरेश भटानंतरच्या तिस-या पिढीतील गझलकार म्हणून प्रमोद खराडे यांनी गझलेची कारागिरी अर्थात तंत्र अवगत करून आपल्यातील कलेला उल्लेखनीय मूर्त रूप दिले आहे.
मज जरी येथे सुखाचा ध्यास होता
जन्म माझा एक कारावास होता
'मान' देण्याचाच झाला मोह तेव्हा
केवढा तो रेशमी गळफास होता
लहानपणी मितभाषी आणि शांत असलेल्या प्रमोद खराडे यांचे वडील सुद्धा कविमनाचे होते. अनेक साहित्यिकांचा त्यांच्या घरी राबता असायचा. घरातल्या छोट्या लायब्ररीत प्रमोद यांना अनेक पुस्तकं मिळाली. कवितांची पुस्तकं विशेष आवडत. त्यात सुरेश भटांचा ‘एल्गार’ हाती लागला. कोवळ्या वयात गझलेबद्दल आकर्षण निर्माण झाले. आणि जमेल तसे कविता आणि गझलसदृश्य रचना लिहिणे सुरु झाले. पण ह्या सर्व डायरीत लिहून ठेवलेल्या रचना कधी कोणाला दाखवल्या नाहीत. त्यांच्या लपून बहिणीने त्यांची डायरी ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख यांना दाखवली. त्यांनी इत्थ्यंभूत मार्गदर्शन केले. गझल लेखनाला प्रारंभ झाला आणि मराठी गझल प्रमोद खराडेंच्या सुख-दुःखाची वाटेकरी झाली.
माझा नि वेदनेचा झाला असा घरोबा
तीही मजेत आहे, मीही मजेत आहे
खरं म्हणजे एकदा गझलेशी नाळ जुळली की वेदनेशी घरोबा होतोच! कारण डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी कधीतरी डोळ्यात अश्रु येणं जसं आवश्यक असतं अगदी तसंच कधीही ओठांमधून व्यक्त न करता आलेली भावना कागदावर तरी उतरायला हवी! तेव्हाच मनाचं स्वास्थ्य चांगलं राहतं. ती भावना कवितारुपानं बाहेर पडली की कोणी साथ द्यायला असो वा नसो सभोवताली शब्दच फेर धरून नाचायला लागतात. गझलेच्या प्रेमात पडलेला माणूस तर कधीच एकटा राहत नाही. प्रमोद खराडेंच्या शब्दात -
सोबतीला एकही माणूस नसताना
वाटतो लोकांस मी गर्दीत रमलेला
प्रेमात पडलेला प्रत्येक माणूस कधी एकटा नसतोच. सतत कुठला तरी भास, कोणती तरी आठवण सोबत असते. अशा गुलाबी दिवसांची खुमारी काही औरच असते! मग आपल्याला आवडलेल्या व्यक्तीच्या मनातही आपण आहोत की नाही? हा प्रश्न सतावत राहतो. तिच्या जाण्यायेण्याच्या वाटेवर पाय खोळंबतात. त्या वाटेवर नजर टक लाऊन वाट पहात राहते. एकदा का ती आली की मन आणि शरीर पिसासारखं तरंगु लागतं. काय बोलावं? बोलावं की बोलू नये? या विवंचनेत असतानाच ती निघूनही जाते. ती गेली तरी तिचा सुगंध दरवळत राहतो. मग अशावेळी सांगा बरं चित्त था-यावर राहील का?
कसे राहील सांगा चित्त थाऱ्यावर
तिचा येतोय अजुनी गंध वाऱ्यावर
असं चित्त था-यावर नसलेल्या व्यक्तीला आजुबाजुची प्रत्येक गोष्ट प्रेमात पडल्या सारखी भासू लागते. कोणीतरी म्हटलंच आहे ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’! हीच गोष्ट प्रमोद खराडेंनी आपल्या वेगळ्या शैलीत अत्यंत सुंदरीत्या मांडली आहे.
रात्रभर जागाच तो असतो म्हणे!
चंद्र पडला वाटतो प्रेमामधे..
पण असे गुलाबी क्षण फक्त चित्रपटांमधेच चांगले वाटतात. आवडलेल्या व्यक्तीचा हात आयुष्यभर हातात राहणं हा नशीबाचाच भाग आहे. प्रत्येकाला असे भाग्य लाभत नाही. काहींना नकार मिळतो तर ब-याच लोकांना परिस्थिती साथ देत नाही. तो हवाहवासा वाटणारा चेहरा गर्दीत कायमचा हरवून जातो आणि शिल्लक राहते ती एक खोल जीवघेणी जखम! काळ सगळ्या जखमा ब-या करतो असं म्हणतात. पण काही जखमा कधीच ब-या होत नसतात. अनेकवेळा वरून वरून बरी झाल्यासारखी वाटणारी जखम पायातल्या कुरूपासारखी आतल्या आत ठणकत राहते. पडलेला व्रण देखील कालांतराने पुसला जातो. पण आतली जखम मात्र मरेपर्यंत हिरवीच राहते.
व्रण काळाने पुसला गेला
जखम आतली आत राहिली
पण काळजाला जखमा होण्याचे प्रेम हेच एकमेव कारण नाही. जीवन नावाच्या गाठोड्यातून कोणत्या क्षणी काय निघेल काहीच सांगता येत नाही. २००२ साली सुरेश भटांची पाठीवर कौतुकाची थाप मिळालेल्या प्रमोद खराडेंच्या गझलेत प्रेमभावनेचे विविध पैलु तर दिसतातच सोबत जीवनाविषयीचे सखोल चिंतन देखील दिसून येते.
कोणते निवड़ू कळेना विष मला
वाटतो प्रत्येक प्याला चांगला
सहज सुंदर भाषाशैली, प्रतिमा-प्रतिकांची योग्य निवड अशी अनेक गझलेखनाची वैशिष्टे असलेल्या गझलकार प्रमोद खराडे यांच्या नावावर ‘मनस्पंदन’(२००७), ‘समतोल’(२०१४) असे दोन गझलसंग्रह आहेत. ‘एकांताचे स्वगत’(२०२०) हा मनोगतांचा संग्रह देखील प्रकाशित झाला आहे. आपल्या व्यवसायाच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या विविध शहरांमधे फिरत असताना त्यांनी गझलकारांचा गोतावळा निर्माण केला आहे. स्वतःची गझल विकसीत करत इतरांना देखील गझललेखनासाठी नेहमीच प्रोत्साहित केले. गेल्या पंधरा वर्षांपासून अनेक गझल कार्यशाळांमधे मार्गदर्शकाची भूमिका देखील चोखपणे बजावली आहे. त्यांना गझलेखनाच्या प्रवासात ‘हुतात्मा राजगुरू गझल गौरव पुरस्कार’(२०१६), रंगत-संगत प्रतिष्ठानचा ‘भाऊसाहेब पाटणकर पुरस्कार’(२०१६), यु.आर.एल. फांऊंडेशनचा ‘गझलउन्मेष पुरस्कार’(२०१७), ‘करम’चा गजलांजली पुरस्कार’(२०१७) असे अनेक सन्मानही प्राप्त झाले आहेत.
मराठी गझलेचे मि. डीपेंडेबल अर्थात गझलकार प्रमोद खराडेंची एक सुंदर गझल -
अद्याप सारे आठवे ते बोलणे माझे तुझे
होकार दिसतो का कुठे हे शोधणे माझे तुझे
ती रात्र होती भोवती अन् गात्र तरिही संयमी
ते चांदण्याच्या सोबतीने जागणे माझे तुझे
ते भेटणे अन् दूर होणे संपले नाही कधी
ते नाईलाजाने दिशाहिन चालणे माझे तुझे
नाही कधीही टाकली आपण चुकीची पावले
टाळून साधा स्पर्शही ते बहरणे माझे तुझे
सा-या उभ्या जन्मातल्या त्या मोजक्या काही खुणा
आता स्मृतींच्या कोंदणातुन वेचणे माझे तुझे
( प्रमोद खराडे, २-सी, मधुगण सहकारी सोसायटी,
२४४, शुक्रवार पेठ, अकरा मारोती चौक, पुणे ४११००२)
.............................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा