वैद्यकीय क्षेत्राचा आणि साहित्याचा तसा दूरदूरचा संबंध नाही. साहित्य मानवी भावना आणि कल्पनांशी निगडीत आहे तर वैद्यकीय क्षेत्रात पेशंट आणि त्याच्या रोगाची लक्षणे यांचा विचार केला जातो. एखाद्या डॉक्टरने कधीही भावनिक होऊन चालत नाही. तो जर कल्पनेच्या जगात वावरत राहिला तर रोग्याचा चांगलाच इलाज झाला म्हणून समजा! पण शासकीय सेवेत नवी मुंबई येथे वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत असलेले डॉ. कैलास गायकवाड मात्र याला अपवाद आहेत. डॉक्टर आणि गझलकार हे कॉम्बीनेशन तसे विरळच!
-------------------------------------------------------------------------------------------------
गझल म्हणजे काय? या प्रश्नाचं उत्तर अनेक जाणकारांनी आपल्या पद्धतीने दिलं आहे. सुरुवातीच्या काळापासून ते आतापर्यंत गझलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन उर्दू सारखाच मराठीत देखील बदलत गेलेला आहे. गझलेत नाजुक प्रेमभावना जशा व्यक्त करता येतात तसाच ताकदीचा विद्रोह देखील व्यक्त करता येतो. भावना वेगवेगळ्या असल्या तरी व्यक्त होताना आवश्यक असते ती उत्स्फुर्तता! डॉ कैलास गायकवाडांनी सुद्धा आपल्या एका गझलेत काय आवश्यक आहे ते अगदी उत्स्फुर्तपणे सांगितलं आहे.
जी विजेचा लोळ नाही
ती गझलची ओळ नाही
सुप्रसिद्ध इंग्रजी कवी वर्डस्वर्थ म्हणतो, ‘Poetry is the spontaneous overflow of powerful feelings.’ खरोखरच कविता म्हणजे एखाद्या भावनारुपी नदीचे बांध ओलांडत दुथडी भरून वाहणेच असते. गझल हा तंत्रानुगामी प्रकार असला तरी गझलेच्या शेरात व्यक्त होणा-या भावना नेमकेपणाने तावून-सुलाखून बाहेर पडत असतात. गझल कधी सखीचे नाजुक गुलाबी गाल होते तर कधी विजेचा लोळही ! गायकवाडांच्या उपरोक्त गझलेतील आणखी एका शेराने एक वेगळी उंची गाठली आहे –
लागली शाळेस सुट्टी
पण मला आजोळ नाही
हा त्यांचा सिग्नेचर शेर वाचताना खोलवर एक बारीक कळ उठल्याशिवाय राहत नाही. अगदी सहज आणि सोप्या शब्दांमधे एका चिमुकल्याची वेदना शब्दात बांधली गेली आहे. असं म्हटलं जाते की ‘ कठिण लिहिणं सोपं आहे पण सोप लिहिणं खूपच कठिण!’ शब्दांच्या प्रेमात न पडता अत्यंत सोप्या शब्दात वाचणा-या ऐकणा-याच्या काळजाचा ठाव घेता आला पाहिजे. वैद्यकीय सेवा देताना पेशंटच्या ह्रदयाचे स्टेथोस्कोपने ठोके मोजणा-या डॉ कैलास गायकवाडांनी वरील शेरातून रसिकांच्या काळजाला हात घातला आहे. औषध-गोळ्या आणि प्रशासकीय सेवा देणारे हे डॉक्टर गझलेकडे कसे वळले ही गोष्ट सुद्धा गमतीशीरच आहे. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. घरची परिस्थिती जेमतेम असली तरी वडीलांनी वाचनाची आवड निर्माण केली. महविद्यालयीन जीवनातसुद्धा डॉ गायकावाडांनी आपली वाचनाची आवड जोपासली. ते कविता सुद्धा लिहायचे. तसं पहिलं तर महाविद्यालयात शिकत असताना प्रत्येकजण कवीच असतो. एम.बी.बी.एस पूर्ण केल्यानंतर ते नवी मुंबई महापालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजु झाले. उत्कृष्ट कामगिरीमुळे प्रमोशन सुद्धा मिळत गेलं. या दरम्यान गझलकार अण्णा त्रिभुवन त्यांना अनेकदा भेटायला यायचे आणि मराठी गझलेबाबत अनेकदा सांगायचे. डॉ गायकावाडांनी एकदा चिडून गझल माणसाच्या जीवनात काहीच बदल करू शकत नाही असे म्हटले. तेव्हा त्रिभुवनांनी त्यांना गझलेचा एक शेर लिहून दाखवण्याचे आव्हान दिले. सोबत तंत्राबाबतची काही पुस्तकंही दिली. गायकावाडांनी ते आव्हान स्वीकारलं. आठ दहा दिवस निघून गेल्यानंतर त्रिभुवन पुन्हा हजर झाले. त्यांनी शेराबाबत विचारणा केली तेव्हा गायकवाडांनी ‘अर्ध्या तासात या’ असे म्हटले आणि या दरम्यान त्यांनी एक तंत्रशुद्ध शेर लिहून काढला. २०१० च्या या घटनेपासून त्यांनी गझलेचा हात कधीच सोडला नाही.
*प्रार्थनेस काय ढोल पाहिजे*
*पोचला नभात बोल पाहिजे*
*धाय मोकलीत आसवे नको*
*फक्त पापणीत ओल पाहिजे*
गझलेत व्यक्त होतानाही कुठलाच गाजावाजा अपेक्षित नसतो. धाय मोकलून रडत राहणेही गझलेला मानवत नाही. अत्यंत साध्या सोप्या शब्दात पापण्यांच्या कडा ओलावणारी गोष्ट गझल मागते. भोवतालची परिस्थितीती बदलणे माणसाला प्रत्येकवेळी शक्य नसते. उघड्या डोळ्यांनी सर्व काही बघत रहावे लागते. हळुहळु परिस्थितीची एवढी सवय होऊन जाते की पर्वताएवढे दुःख मिळाल्यानंतर जवाएवढ्या सुखाने जीव हुरळत नाही. उलट त्या नखभर सुखाचा देखील त्रास होतो असे वाटते. तेव्हा आधार द्यायला गझल येते.
दाब दुःखाचा पडावा अंगवळणी एवढा,
(श्वास झाला मोकळा की, कोंडल्यागत वाटते)
पालघर जिल्ह्यातील साखरे हे मुळ गाव असलेल्या गायकवाडांचे बालपण मुंबईतच गेले. त्यामुळे आजच्या शहरी जीवनाचे अनेक संदर्भ त्यांच्या गझलेतून येतात. कठिण परिस्थितीत बालपण गेल्यामुळे गरीबीची दाहकता त्यांनी अनुभवली आहे. आजकाल शहरांतल्या झोपडपट्ट्यांमधले आयुष्य पाहिले तरी श्वास गुदमरल्या सारखा होतो. नरक नावाची संकल्पना ‘याची डोळा याची देही’ अनुभवायला मिळते. या नरकातली वेदना डॉ. गायकवाड परकाया प्रवेश करून शब्दांमधे व्यक्त करतात.
आयुष्य कंठल्यावर झोपडपट्टीमध्ये
मी वावरेन म्हणतो, नरकात सरावाने
दुःखाचा सराव झालेला असला तरी अनेकदा थकल्यासारखे होते. अशावेळी कुणीतरी आपलं यावं आणि मनसोक्त गप्पा मारव्यात असं वाटतं. पण प्रत्येकवेळी आपलं दुःख कोणाजवळ व्यक्त करावेसे वाटत नाही. तेव्हा थकलेल्या मनाला देखील केव्हातरी चहा पाजवासा वाटतो -
पार थकलेल्या मनाला बोलतो
एकदा पाजू चहा केव्हातरी
आपली स्वतःची वेगळी शैली निर्माण करत आपली स्वतःची गझल लिहिणा-या गझलकार डॉ कैलास गायकवाड यांना गझलमंथन समुहचा ‘गझलगुरु’(२०१९), मराठी ग्रंथ संग्रहालय, दादर या संस्थेचा ‘उत्कृष्ट कवी’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचा ‘अस्वस्थ प्रतिबिंब’ हा गझलसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांनी आगरी भाषेत गझल लेखनाबरोबरच कथालेखन सुद्धा केले आहे. त्यांचा आगरी भाषेतील ‘तात्या’ हा कथासंग्रह देखील प्रकाशनाच्या मार्गावर आहे. मुंबईचे धकधकीचे जीवन आणि प्रशासकीय कामांचा ताण यातून वेळ काढत गझल लेखनाबरोबरच अभिनयाचा छंद देखील ते नेमाने जोपासतात.
नाजुक प्रेमभावनेबरोबरच टोकदार विद्रोह आपल्या गझलेतून मांडणा-या गझलकार डॉ. कैलास गायकवाड यांची एक गझल -
पूर्वजांनी सोसलेला जाच आठवतो
वेद म्हटले की मला रेडाच आठवतो
क्रूर सामूहीक अत्याचार होताना
द्रौपदीला भेटलेले पाच आठवतो
अल्पभूधारक बनुन शेतात कसताना
वामनाच्या पावलाची टाच आठवतो.
उच्च ना, ना नीच कोणी वाचल्यानंतर
खैरलांजीतील नंगानाच आठवतो
कोण हा ‘कैलास’ वावरतो शहाण्यागत
पाहता त्याला मला वेडाच आठवतो
(डॉ .कैलास गायकवाड, पत्ता H2/3/2 पॅराडाईज को ऑप हाऊसिंग सोसायटी, चांदपाडा, नवी मुंबई – मो. 95 94 28 98 98 )
.........................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४
छान
उत्तर द्याहटवाकैलास गायकवाड सर म्हणजे अंतर्बाह्य पारदर्शक माणूसपण! फार सुंदर लिहिलंत सर! विशषत:शेरांची निवड खूपच सुंदर! खूप आवडला लेख!
उत्तर द्याहटवामाझे अत्यंत आवडीचे गझलकार डॉ.कैलासजी गायकवाड. अमोल जी आपण या लेखातून त्यांचा जीवनपट सुद्धा माहीत करून दिला आणि त्यांचे प्रचंड उंचीचे शेर सुद्धा आस्वाद घेण्या करीत दिले..वाह वाह मजा आ गया!!
उत्तर द्याहटवा