पाहणे, दिसणे, बघणे या डोळ्यांशी संबंधीत क्रीया आहेत पण तिन्हीचा अर्थ फार वेगळा आहे. दिवसभर आपण अनेक गोष्टी पाहतो परंतु सर्व गोष्टी जशा आहेत तशाच त्या आपल्याला दिसतात का? त्या अनेक गोष्टींकडे बघण्याची विशेष दृष्टीसुद्धा आपल्याकडे असतेच असे नाही. अनेकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बघितला तर त्यांना डोळे आहेत की नाही याचीच शंका वाटते. पण आपल्या प्रज्ञाचक्षुंनी जगाकडे, जीवनाकडे डोळसांपेक्षा बारकाईने पाहणारे अनेक अंध आपल्या आजुबाजुला असतात. मराठी गझलक्षेत्रातल्या डोळसांना लाजवणा-या गझला लिहिणारे माळेगाव जि. जालन्याचे गझलकार विजय आव्हाड यांचेच उदाहरण घ्या ना ! जन्मानंतर काही वर्ष प्रकाश आणि काही मोजक्या रंग छटांचा अनुभव घेऊ शकणा-या व नंतर पूर्ण अंधत्व आलेल्या आव्हाडांच्या गझलांमधे उतरलेले रंग पाहताना आपल्यालाच डोळे आहेत की नाही हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.
गझलकार विजय आव्हाडांच्या गझला वाचताना असं वाटते की पाहणे-दिसणे-बघणे ह्या क्रीया डोळ्यांशी संबंधीत नाहीतच. आव्हाडांना जीवनाकडे बघण्याची दिव्यदृष्टी लाभली आहे. ही दिव्यदृष्टी डोळे असणा-यांना देखील आयुष्यभर लाभत नाही. आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यावर लक्ष केंद्रीत केल्यास यशाची उंच शिखरं सहज गाठता येतात. त्यासाठी प्रत्येकाने ‘अत्तदीप’ होण्याची गरज असते. स्वतःच स्वतःचा उजेड झालं की मग तुम्हाला डोळे आहेत की नाहीत याचा काहीच फरक पडत नाही. विजय आव्हाडांनी आत्मतेजाचा वसा घेतला आहे -
दिव्य सूर्याने दिला जो आत्मतेजाचा वसा
दीप रक्ताचेच अंधारात जाळू लागलो
असा एकदा आत्मतेजाचा वसा घेतला की रक्ताच्या प्रत्येक थेंबात एक दिव्य उजेड संचारू लागतो. मग हा उजेड भोवताली पसरलेल्या किर्र अंधाराला दूर सारत एका आनंदी पहाटेची खात्री देत राहतो.
सुचावी काळरात्रीला नवी आनंद भूपाळी
पहाटेचीच अंधारास देतो रोज खात्री मी
पण स्वतःला सुखाची खात्री देताना वास्तव देखील विसरता येत नाही. दुःख माणसाच्या जीवनाचं अंतिम सत्य आहे. ते स्वीकारावंच लागतं. पण ते सहजासहजी स्वीकारता येत नाही. आपल्या मेलेल्या मुलाला जिवंत करण्यासाठी बुद्धाकडे जाणा-या आईप्रमाणे प्रत्येकाची अवस्था असते. बुद्धाने मुठभर मोहरीसाठी घालून दिलेली अट कधीच पुर्ण होऊ शकत नाही. तेव्हा दुःखाचा गळफास कापू न शकणारी सुखाच्या संभ्रमाची कात्री फेकून दिल्याशिवाय पर्याय नसतो.
कशाने कातरावे हे जुने गळफास दुःखाचे?
सुखाच्या संभ्रमाची ही दिली फेकून कात्री मी!
केवळ दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विजय आव्हाडांची बदलापूरच्या ‘प्रगती अंध विद्यालय’ या शाळेत उजेडाशी प्रथम ओळख झाली. ब्रेल लिपीमधे कागदावर ह्रदय उतरू लागलं आणि त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. आयुष्यभर पुरणा-या अंधारासोबत गरीबीचे अणकुचीदार काटे सहन करणा-या या गुलाबाचं हसणं पहिलं की मन गहिवरून आल्याशिवाय राहत नाही.
हसरा गुलाब माझ्या दुःखास नाव आहे
काट्यात हासण्याचा ज्याला सराव आहे.
लहानपणी जात्यावर सुरेल ओव्यांसोबत दुःख भरडणा-या आईने विजय आव्हाडांना जीवनाचं तत्वज्ञान तर दिलंच पण आतला आवाज ओळखण्याची ताकदही दिली. एखादी कविता मनाला तेव्हाच भिडते जेव्हा आतला आवाज शब्दाशब्दात आपलं संपूर्ण अस्तित्वंच ओतून टाकतो. कविता लिहिणे म्हणजे ‘ट’ ला ‘ट’ जोडण्याचा खेळ कधीच नसतो. कविता असो किंवा गझल ती कविच्या आतला आवाज असली पाहिजे. केवळ कवी, गझलकार किंवा साहित्यिक म्हणून मिरवण्यात कुठलेच सार्थक नाही.
हा शब्द शब्द माझा आवाज आतला
मी अक्षरात माझ्या हा जन्म ओतला
अक्षरांमधे जीव ओतण्याची ताकद या कविला प्राप्त झाली आहे. अंधाराच्या कुशीत जन्मलेल्या या खळखळणा-या झ-यातून सुंदर गाणे वाहते. वाहताना जीवनाने दिलेले अनुभव हा झरा नेमकेपणाणे टिपतो आणि जीवनाचे तत्वज्ञान, कधीही भौतिक नजरेस न पडलेले दृश्य आपल्या शब्दात जिवंत करतो.
शेवटी होणार मातीचेच सारे
झाड म्हणुनी फळ पुन्हा उचलीत नाही
न्युटनने झाडावरचे फळ पडताना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला. पण विजय आव्हाडांना मात्र वेगळीच अनुभुती होते. आपल्या फांदीवरून पडलेले फळ झाड कधीच उचलत नाही कारण आपल्या अस्तित्वाची कधीतरी मातीच होणार आहे हे कदचित झाडाला माहिती असावे. न्युटनने शोधलेला नियम जितका खरा आहे तितकाच या कविने मांडलेला अनुभव शाश्वत आणि चिरंतन आहे. असे जीवनाचे शाश्वत सत्य मांडणारा हा कवी फक्त स्वतःच्या दुःखात रमत नाही. तो सामाजिक जाणीवही उत्स्फुर्तपणे आपल्या लेखणीतून मांडतो.
एकीकडे भुकेच्या गोळ्या नव्या नव्या
एकीकडे उपाशी दुष्काळ बेतला
किंवा
नेमकी शाळेत माझी जात कळली
शिक्षणा तेव्हा तुझी औकात कळली
विजय आव्हाडांचे असे शेर वाचताना त्यांची निरीक्षणशक्ती आणि प्रतिभा लक्षात येते. प्रतिभेवर जात, धर्म, लिंग, वंश याबरोबरच शारिरीक क्षमतेची सुद्धा मक्तेदारी नाही याची जाणीव होते.
‘खोल जगण्याच्या तळाशी’(२००६), ‘आरसा’(२००८), ‘दारात सार्थकाच्या’(२०१०) असे तीन गझलसंग्रह नावावर असलेल्या गझलकार विजय अव्हाडांना अंकूर साहित्य संघाचा ‘सुरेश भट स्मृति पुरस्कार’, यु.आर.एल. फाउंडेशनचा ‘गझलउन्मेश’ पुरस्कार, पुण्याच्या हाडकर फाऊंडेशनचा ‘हेलन केलर’ पुरस्कार असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. ‘विजा घेऊन येणा-या पिढीतील’ एक महत्वाचा गझलकार म्हणून निर्माण केलेले आपले वेगळे स्थान ते टिकवून ठेवतील असे वाटते. त्यांच्या लेखनात असलेली उत्स्फुर्तता आणि जीवनानुभव टिपून ते नेमकेपणाने मांडण्याची कला अधिकाधिक विकसीत होवो ही एक रास्त अपेक्षा आहे.
वेदनेची दिक्षा घेऊन सोसण्याची तपस्या करणा-या गझलकार विजय आव्हाड यांची एक गझल
हिंडतो दाही दिशांना प्रश्न माझ्या नोकरीचा
मागतो दुष्काळ वाटा रोज अर्ध्या भाकरीचा!
आग विझलेल्या चुलीची लागली पोटात माझ्या
मी कसा मग
सूर काढू फुंकणीतुन बासरीचा?
झाडले घरदार तेव्हा अंगणाने प्रश्न केला
काढला का
केर कोणी काळजाच्या ओसरीचा?
सोसल्यावाचून कोणी थोर-मोठा होत नाही
डोंगरावर
घाव आहे खोल दुःखाच्या दरीचा!
खाटकाचा हात चिरला एक मेंढी कापताना
जखम बांधू
लागला घायाळ तुकडा लोकरीचा!
घेतली या अक्षरांनी वेदनेची थोर दीक्षा
ही तपस्या
सोसण्याची; छंद नाही शायरीचा!
(विजय आव्हाड, मु माळेगाव पो गोलडगाव ता बदनापूर जि. जालना मो. ८६५२०१२७७०)
...........................................
अमोल बी शिरसाट
अकोला
९०४९०११२३४
खूप सुंदर लिखाण काम समर्पक समीक्षण
उत्तर द्याहटवा