१३ जानेवारी, २०२१

हा चेहरा न माझा ओळख कशी पटेना

 


            कविता हे एक अभिव्यक्तीचे माध्यम आहे. ही अभिव्यक्ती जेव्हा रसिकांना आपलीशी वाटू लागते तेव्हा ती वैश्विक होते. ती फक्त कवीची राहत नाही. पण कवितेला जितके रसिक आवश्यक असतात तेवढेच समीक्षकही आवश्यक असतात. एक चांगला समीक्षक कवितेमधले सौंदर्य आणि दोष उलगडून दाखवत असतो. मराठी कवितेला समीक्षकांची एक मोठी परंपरा लाभली आहे. परंतु मराठी गझल समीक्षकांच्या बाबतीतही उपेक्षितच राहिली आहे. मराठी गझलेच्या समीक्षेची धुरा ज्या महानुभावांनी सांभाळली त्यामधे अग्रक्रमावर नाव येते ते उर्दू-मराठी गझलेचे व्यासंगी अभ्यासक, अनुवादक, समीक्षक, गझलकार डॉ राम पंडित ! आपल्या आयुष्याचा ५० वर्षांपासून अधिक काळ मराठी-उर्दू गीत, गझल, कवितेला देणा-या डॉ राम पंडितांनी वाई येथे झालेल्या पाचव्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले आहे. (जन्म – २ जुलै १९४९)
                 डॉ.राम पंडित यांना छंदोबद्ध कवितेचा वारसा त्यांचे आजोबा विसाव्या शतकातील अलौकिक संत गुलाबराव महाराज यांचे उत्तराधिकारी स्कंददास महाराज यांच्याकडून मिळाला. त्यांनी सुद्धा अनेक गझलसदृश्य रचना लिहिल्या आहेत. डॉ. राम पंडितांचे वडील देखिल विविध भाषांचे गाढे अभ्यासक होते. मुंबई विश्वविद्यालयातून हिंदी-उर्दू साहित्यात पीएच.डी. प्राप्त करणा-या डॉ. राम पंडितांनी मराठी, हिंदी, उर्दू साहित्याच्या अनुवादातही महत्वाचे योगदान दिले आहे. १९७३ पासून मराठीसह हिंदी उर्दू गझलेसाठी स्वतःला अक्षरशः वाहून घेतले. त्यांनी विविध भाषांमधील दिवाळी अंकांच्या संपादनाबरोबरच विविध गझलकारांच्या गौरवग्रंथांच्या संपादनाचे काम केले आहे. असंख्य गझलकारांच्या पुस्तकांना प्रस्तावना देऊन मराठी गझलेचा खंबीर पाठीराखा म्हणून आजही वयाच्या ७१व्या वर्षी ते महत्वाची भूमिका निभावत आहेत. मराठी गझलेतील ‘अन् उदेला एक तारा वेगळा’, विदर्भाची मराठी गझल’(२००४), ‘मराठी गझल : अर्धशतकाचा प्रवास’, ‘गझल संदर्भ’, ‘मात्रिक छंदोरचना’ या व अशा असंख्य पुस्तकांचे लेखन आणि संपादन करून डॉ.राम यांनी येणा-या पिढ्यांसाठी एक मोठा खजिनाच उपलब्ध करून दिला आहे.  असे असले तरी त्यांच्यात ‘मी’पणाचा कुठेही दर्प नाही. त्यांच्यातला संवेदनशील गझलकार त्यांना नेहमी जिवंत ठेवतो. हार- तुरे- सन्मानांपासून दूर राहून ते नेहमीच एकांताची वर्दळ शोधत म्हणतात -

रोज शोधतो गर्दीतच या एकांताची वर्दळ
जमावात या जगतो अन् मी असून येथे नसतो

          शरीराला ओढूनताणून कुठेही नेता येते पण मनावर मात्र कुणाचाच ताबा नाही. भोवतालची गर्दी कधी कधी नकोशी होते आणि एकांतामधे स्वतःशी संवाद साधावासा वाटतो. स्वतःचा शोध घ्यावासा वाटतो. तसं पाहिलं तर माणसाचा आत्मशोधाचा प्रवास फार प्राचीन आहे. हजारो वर्षांपासून मानवाने असंख्य शोध लावले पण स्वतःचा शोध मात्र लागला नाही. पृथ्वी गोल आहे तसाच माणसाच्या आत्मशोधाचा प्रवास देखील गोलच आहे. माणूस स्वतःला शोधता शोधता होता तिथेच येतो. हे जीवन म्हणजे एक ‘भुलभुलैया’च आहे असे म्हणा ना.....

जातो पुढे पुढे पण, होतो तिथेच येतो
हा वर्तमान मजला शून्यात रोज नेतो

               पुढे पुढे चालत असल्याचा भास होतो पण वास्तव मात्र वेगळेच असते. पदव्या, पैसा, संपत्ती मिळवली पण समाधान मात्र मिळत नाही. काहीतरी प्राप्त करण्याच्या नादात आयुष्य निघून जाते. अशावेळी आरशासमोर उभं राहिल्यावर आपल्यालाच आपली ओळख पटत नाही. कोण्यातरी परक्या माणसाचाच हा चेहरा आहे असे वाटू लागते.

झालो स्वतःस परका माझे मला कळेना
हा चेहरा न माझा ओळख कशी पटेना

                ही अवस्था प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी येतेच! लहानपणी छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद पैसा, प्रसिद्धी, संपत्त्तीच्या मागे धावता धावता कुठेतरी हरवून जातो. लहानपणी चेह-यावर असलेले निरागस भाव देखिल काळाच्या ओघात हरवून जातात. काम, क्रोध, मोह, लोभ, मद, मत्सर आणि मद हे लुटारू जीवनाच्या वाटेवर सुखाने चालू पाहणा-या वाटसरूचा निरागस चेहरा ओरबाडून नेतात. आणि शेवटी जेव्हा पश्चाताप होतो तेव्हा वेळ निघून गेलेली असते. सुखासाठी केलेली धडपड व्यर्थ जाते. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ असा प्रश्न पडत राहतो.

जगून पाहिले तरी जगायचेच राहिले
सुखास त्या कधीतरी बघायचेच राहिले

खूप जगलो तरी शेवटच्या क्षणीसुद्धा जगण्याची ओढ थांबत नाही. एखादा जीवघेणा आजार झालेल्या रोग्याला शेवटपर्यंत आशा असते की एखादे औषध तरी कामी येईल आणि मी पुन्हा नव्याने माझं आयुष्य सुरू करू शकेल. खरं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंदच आयुष्य सुंदर करतो ही गोष्ट कळायला खूप उशीर झालेला असतो. गझलेची- कवितेची भाषा ही लोकांच्या बोलचालीची भाषा असली पाहिजे. योजलेले शब्द वाचणा-या ऐकणा-याला जवळचे वाटले पाहिजेत. प्रतिमा-प्रतिके फार बोजड असायला नकोत. ‘आप लिखे खुदा बाचे’ अशी स्थिती व्हायला नको. डॉ राम पंडितांची गझल थेटपणे रसिकांपर्यत पोहोचते. त्यांची गझल कोष्टके सोडवल्याप्रमाणे वाटत नाही. त्यांच्या गझललेखनापेक्षा त्यांनी गझलेसाठी केलेले कार्य मोठे असले तरी त्यांच्यातला संवेदनशील, प्रवाही, चिंतनशील गझलकार जीवनाचे तत्त्वज्ञान आपल्या शब्दांमधून सहजपणे मांडतो. गझल हाच त्यांचा प्राण आहे.
                     विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातील सावरखेड या गावी जन्मलेल्या डॉ. राम पंडित यांचा एकुण जीवन प्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. मराठीतील ‘ऋतुरंग’ (१९७६), ‘रंग उडून गेले’ (१९८०), ‘गजलिका’ (२००४), ‘ऋणशेष’(२०१६) असे चार आणि हिंदी उर्दूतील गझल,गीत, कवितांचे अनेक संग्रह त्यांच्या नावावर आहेत. ‘अनिर्वचनीय’ हा त्यांचा कविता व गझल संग्रह देखील प्रकाशनाच्या मार्गावर आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचा ‘सेतू माधवराव पगडी पुरस्कार’, महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘संत नामदेव पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार हिन्दी, उर्दू, मराठी काव्यलेखनासाठी प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे १९९९ साली ‘तकमील’ या उर्दू त्रैमासिक पत्रिकेने त्यांचा गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे.
              अनेक गझलकारांच्या पाठीवर कौतुकाची सदैव थाप देणा-या डॉ राम वासुदेव पंडित ‘पद्मानंदन’ यांची एक गझल -

स्वप्ने कधी उद्याची पाहू नये कुणीही
वाटेस वेदनेच्या जाऊ नये कुणीही

वाजे मनात कुठली चाहूल धुंद यंदा
आशेवरी सुखाच्या राहू नये कुणीही

जीवावरी व्यथेच्या जगतात शब्द माझे
इतका लळा व्यथेचा लावू नये कुणीही

दुःखेच जिंदगीभर बनतात सावली, पण
आजन्म आसवातच न्हाऊ नये कुणीही

जवळून पाहिले मी ग़ज़ले तुझ्या व्रणांना
हसऱ्या स्वरात दुःखे गाऊ नये कुणीही

(डॉ. राम पंडित, एटलांटा सोसायटी, आर.एच.४, प्लॉट क्रं.२९, सेक्टर ४०, नेरुळ (प), नवी मुंबई ४००७०६ भ्रमणध्वनी - ९८१९७२३७५६ )
.....................................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा