२० जानेवारी, २०२१

एक जखम सुगंधी


               आदिम काळापासून संगीत हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. सुरांना माणसाच्या जीवनातून वजा करता येत नाही. शब्दांना सुरांची साथ मिळाली तर ‘या ह्रदयीचे त्या ह्रदयी’ थेटपणे पोहोचते. गझलेच्या बाबतीत बोलायचे झाले तर गझल लय घेऊन जन्माला येत असते. परंतु प्रत्येक गझलेला चाल देता येत नाही. त्यासाठी स्वरांना पोषक असलेल्या शब्दांची निवड गझलकाराला करावी लागते. अशा गेय रचनांना चाल देऊन गुलाम अली, जगजीत सिंग यांच्या सारखे गायक गातात तेंव्हा शब्दांमधे प्राण ओतण्याची किमया साधली जाते. मराठी गझलचे एक किमयागार म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अष्टगाव नावाच्या छोट्याश्या गावात जन्मलेले गझलनवाज भीमराव पांचाळे! (जन्म – ३० मार्च १९५१)
.........................................................................................................
                अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन गझलगायकीच्या अत्युच्च शिखरापर्यंत जाऊन पोहोचणा-या भीमराव पांचाळेंच्या यशात त्यांच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. त्यांचे वडिल गुलाबराव पांचाळे यांना सुद्धा गायनाचे वेड होते. ते भजनांमधे रात्र-रात्रभर रमत. आजुबाजुच्या गावात कुठेही भजनांचा कार्यक्रम असला तरी रात्रीचा अंधार तुडवत ते लहानग्या भीमरावांना आपल्या खांद्यावर बसवून शब्दसुरांच्या भावयात्रेत घेऊन जात. लहानपणी वडिलांनी दिलेला संगीताचा संस्कार त्यांच्यासाठी आयुष्यभराची शिदोरी ठरला. १९६८ साली एस.एस.सी. झाल्यानंतर पुढचे शिक्षण अशक्य झाले तेंव्हा भीमरावांसाठी अकोल्याचे स्व. किशोर मोरे आधार बनले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी स्व. किशोर मोरे त्यांना अकोल्याला घेऊन आले. इथे पं. एकनाथ कुलकर्णी यांच्याकडे त्यांचे गाण्याचे शिक्षणही झाले. यापूर्वी त्यांनी अमरावतीच्या पं. भैय्यासाहेब देशपांडे यांच्याकडेही शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले होते. लहानपणापासूनच हिंदी-उर्दू गझलेकडे आकर्षित झालेल्या भीमरावांना सुरेश भटांमुळे मराठी गझलेची खुमारी चढली. पुढे त्यांनी आयुष्यभर मराठी गझल गायकीला वाहून घ्यायचे ठरवले.
                   मराठी गझल गायकी बद्दल बोलताना भीमराव पांचाळे म्हणतात, ‘मराठी गझल योग्य त-हेने रसिकांपर्यंत पोहोचवावी याच दृष्टीकोनातून मी मराठी गझल गायनाकडे वळलो. ‘शब्दप्रधान गायकी’ हा गझलचा मूळ बाज कायम ठेऊन गायकीचं गझलवर अतिक्रमण होऊ न देता गझल गावी असं मनापासून वाटायचं म्हणूनच मी मराठी गझलकडे वळलो.’ संगीताची साथ असो वा नसो गझलेच्या आवडलेल्या शेरावर रसिकांची दाद मिळणे अपेक्षीत असते. उर्दू-हिंदी गझलचा माहोल आधीपासूनच तयार आहे. परंतु मराठी रसिकांचा कान आजही गझलेसाठी तयार झालेला नाही. त्यांना कविता वाचन किंवा गायन संपल्यानंतर शेवटी टाळ्यांनी कौतुक करायची सवय आहे. परंतु गझलेबाबत असे घडले तर गझलकार किंवा गायकाचा हिरमोड होतो. गझल मराठीत रुजण्याच्या काळात प्रत्येक शेरावर दाद मिळविण्याचे काम तर फारच कठीण होते. अशा परिस्थितीत चोखंदळ मराठी रसिकांकडून प्रत्येक शेरावर दाद मिळविण्याची किमया भीमराव पांचाळे यांनी साधली.

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना जाळलेस का तेव्हा?

                     ही सुरेश भटांची गझल भीमराव गातात तेंव्हा प्रत्येकवेळी रसिकांची भरभरून दाद मिळते. ही दाद म्हणजे त्यांच्या शब्दप्रधान गायकी रुजविण्याच्या प्रयत्नांची पावतीच असते. गझल गायकाला शब्दांची आर्तता ओळखून आशयाचे विविध पदर उलगडून दाखवायचे असतात. आशयाचा उलगडा करताना शब्दांना दिलेली ‘ट्रीटमेंट’ आशयवर हावी होऊ नये यासाठी संतुलन राखावे लागते.  एक चांगला गझलकार आपल्या शेरांमधून जे सांगायचे आहे ते थेटपणे सांगत नाही. त्याने लिहिलेला प्रतिमा-प्रतिकांचा वापर करून आशयाकडे अंगुलीनिर्देश करणारा शेर रसिक आपल्या अनुभवाच्या कसोटीवर तपासून पाहतो आणि तो खरा ठरल्यानंतरच त्याच्या नकळत त्याच्या तोंडून दाद निसटते. असे शेर कोणते आहेत? याचा बारकाईने गझल गायकाला अभ्यास करावा लागतो. भीमरावांना असे शेर आणि त्यातील शब्दांची आर्तता ओळखण्याची ताकद उपजतच लाभली आहे.
                       गझल गाऊन सादर करताना गायकाचा खरा कस लागत असतो. आपल्यातला गायक गझलेवर वरचढ होणार नाही याची दक्षता गायकाला घ्यावी लागते. याबरोबरच रसिकांच्या मनावरची पकड तसूभरही कमी न होऊ देता आवश्यक त्या ठिकाणी ताना घेत आशय व शब्दांची आर्तता विशिष्ट उंचीवर नेऊन सोडावी लागते. मराठी गझलेच्या भीमरावांनी हे लिलया साध्य केले आहे.

अंदाज आरशाचा वाटे खरा असावा
बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा

                  जेष्ठ गझलकार इलाही जमादार यांची ही रचना भीमरावांच्या गझल गायकीमुळेच नावारुपास आली. ‘अंदाज आरशाचा’ आणि ‘भीमराव पांचाळे’ या दोन गोष्टी एकमेकांसाठीच जन्माला आल्या आहेत असे वाटते. भीमरावांसारखेच ग़ुलाम अली, जगजीत सिंग, पंकज उधास यांनी गायलेल्या अनेक गझला त्यांच्याच आहेत असा समज पसरलेला आहे. यानिमित्ताने गझल महत्वाची की गायक? हा मुद्दाही अनेकदा चर्चिल्या गेला आहे. परंतु या मुद्दयात फारसे तथ्य नाही कारण या दोन गोष्टींची तुलना करणे कदापिही योग्य नाही. गझलकार आणि गायकाच्या सामर्थ्यावरच कलाकृतीचे भवितव्य ठरत असते. दोघांच्या कौशल्यातला तीळभर ऐब चोखंदळ रसिकांच्या नजरेतून सुटू शकत नाही. भीमरावांनी स्वरबद्ध केलेल्या आणि रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या अनेक गझलांपैकी एक म्हणजे अकोल्याच्या गझलकार श्रीकृष्ण राऊतांची खालील गझल होय ....

दुःख देखणे तुझे देखणा वसंत तू
घाव सांगतात ना आजही पसंत तू

                   ‘तू नभातले तारे’ किंवा ‘अंदाज आरशाचा’ प्रमाणेच या गझलेची चालही अत्यंत वैशिष्ट्पूर्ण अशी आहे. गझल गायनाच्या वेळी केलेले संगीत संयोजनही मनात रुंजी घालत राहते. तलम आणि मनाचा ठाव घेणा-या आवाजाचे धनी असलेल्या भीमरावांनी ‘हजार जखमा मनास माझ्या’ या पल्लेदार ओळी असलेल्या शायर बदीउज्जमा खावरांच्या गझलेला देखील स्वरसाज चढविलेला आहे. खावरांसारख्या दुर्लक्षित गझलकाराच्या समग्र गझलांचा संग्रह त्यांच्या ग़ज़ल सागर प्रतिष्ठान तर्फे २००३ साली प्रकाशित करण्यात आला, ही उल्लेखनीय बाब आहे. मराठी गझलेच्या प्रचार प्रसारासाठी १९९९ साली स्थापन केलेल्या या संस्थेच्या माध्यमातून आजवर अनेक गझलकारांच्या संग्रहांचे प्रकाशन, गझल गायन मैफिली, गझल कार्यशाळांसह नऊ अखिल भारतीय गझल संमेलने विविध ठिकाणी आयोजित केली आहेत.
                       महाराष्ट्र शासनाकडून गायनाला उपशास्त्रीय दर्जा  व पंडित उपाधी(२०१०)  मिळालेल्या भीमराव पांचाळे यांना राजकपूर यांच्या हस्ते 'सुरसिंगार'(१९७७) सन्मानचिन्ह, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तर्फे दिला जाणारा सेतु माधवराव पगडी राज्य पुरस्कार(२००२),विदर्भरत्न पुरस्कार(२००३) असे अनेक सन्मान गझलगायकीच्या प्रवासात प्राप्त झाले आहेत. त्यांच्या गझलगायकीवर अनेक विद्यापीठांत अभ्यासक पीएच.डी. सुद्धा करत आहेत. त्यांनी काही नाटक व चित्रपटांना संगीतदिग्दर्शनही केले आहे. सोबतच विविध वर्तमानपत्रांमधे मराठी गझलेच्या प्रचार प्रसारासाठी स्तंभलेखन सुद्धा केले आहे. मराठी साहित्य संमेलनासह अनेक देशांमध्ये त्यांच्या  गझल मैफली गाजल्या आहेत. त्यांच्या ‘एक जखम सुगंधी’(१९९३), ‘शब्दसुरांची भावयात्रा’(१९९३), ‘स्वप्न तारकांचे’ (१९९५), ‘पुन्हा तेजाब दुःखाचे’ (२००२) या ध्वनिफितींना मराठी रसिकमनाने आपलेसे केले आहे. उर्दू भाषेवरही अतोनात प्रेम करणा-या भीमराव पांचाळे यांनी अनेक उर्दू गझला सुद्धा स्वरबद्ध केल्या आहेत.
.....................................

अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

1 टिप्पणी: