एकीकडे तेराव्या शतकात 'माझा मराठीची बोलू कौतुके’ असे म्हणणारे संत ज्ञानेश्वर आणि दुसरीकडे विसाव्या शतकात ‘लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी’ असे म्हणणारे सुरेश भट.... दोघांमधे जवळपास सातशे वर्षांचा काळ....पण दोघांनाही जोडणारी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी ! ‘अमृतातेहि पैजा’ जिंकणा-या मराठीचे वेड अनेक अमराठी लोकांनाही लागलेले आहे. मराठी गझल परंपरेतही मराठी मातृभाषा नसूनही अनेक गझलकारांनी गझललेखन केले आहे. त्यापैकीच एक महत्वाचे नाव म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात बाणकोट येथे जन्मलेले उर्दूचे प्रख्यात शायर बदीउज्जमां खावर !
बदीउज्जमां खावर(१९३८-१९९०) यांचे मूळ नाव महंमद बदीउज्जमां इब्राहिम परकार असे होते. खरं म्हणजे ‘खावर’ हा त्यांचा तखल्लुस (साहित्यीक उपनाम) होता. खावर या शब्दाचा अर्थ सूर्य असा होतो. हिंदी-उर्दू शायर असा तखल्लुस धारण करून त्याचा वापर आपल्या शायरीत करत असतात. खावरांनी आपले मूळ नाव सोडून ‘बदीउज्जमां खावर’ हेच नाव गॅझेटेड करून घेतले होते. असा शायरी मिजाज असलेल्या खावरांनी आपले गझलवेड आयुष्यभर जपले. शायरीवरच्या आत्यंतिक प्रेमामुळे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दिल्ली गाठली. तेथे नामवंत कवी आणि साहित्यिकांच्या संपर्कात राहून आपले काव्यज्ञान अधिक वृद्धिंगत केले. खावर दिल्लीतून कोकणात परत आल्यानंतर १९६२ ते १९९० पर्यंत नॅशनल हायस्कूल, दापोली येथे शिक्षक होते. अनेक भाषांवर प्रभुत्व असणा-या बदीउज्जमां खावर यांनी अनेक मराठी कथा, कवितांचा उर्दूत अनुवादही केला आहे.
बदीउज्जमां खावर यांच्यावर मानवतावादी सूफी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. सूफी आणि वारकरी संप्रदायांमधे ब-याच अंशी साम्य आढळून येते. अल्लाहवर निरपेक्षभावनेने प्रेम करणारे सूफी संत अनेकदा स्वतःला माशुक किंवा माशुका संबोधताना दिसतात तर वारकरी संप्रदायातील संतांना विठ्ठल भेटीची ओढ लागलेली असते. आणि म्हणूनच खावरांना वारकरी संप्रदाय सुद्धा जवळाचा वाटत होता. –
–
नसती माझ्या खांदी झेंडे कुठल्याही पंथाचे
भक्त जरी मी असलो, नाही वेड मला धर्माचे
सूर माझिया गळ्यात घुमिती देहूच्या संतांचे
गुणगुणतो वेड्या कंठाने अभंग मी तुकयाचे
असे तुकोबांचे अभंग गाणा-या खावरांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन मानवतावादी होता. याचा प्रत्यय त्यांच्या अनेक गझलांमधून येतो. माणसांनी वेगवेगळे धर्म निर्माण केले. माणूस जातीधर्मात वाटला गेला. माणुसकीचा धर्म विसरून माणसा-माणसात वैर निर्माण झाले. खावर मात्र अशा लोकांना अगदी सहजपणे प्रश्न विचारतात -
प्रत्येक तीर्थक्षेत्री जाणीव ही कुणाची?
काशीत कोण आहे? काब्यात कोण आहे?
असा उदात्त दृष्टीकोन असलेले बदीउज्जमां खावर अनेकदा समाजात वाढत चाललेल्या अनैतिक, मानवतेस काळिमा फासणारी, समाजविघातक कृत्ये पाहून दुःखी होतात. हे दुःख त्यांनी आपल्या गझलांमधून व्यक्त केले आहे..
ही अचानक माणसांची माकडे झाली कशी?
माणसांच्या चेह-याची माणसे गेली कुठे?
माणूस माकडंच काय कधी कधी असे वाटते की एखाद्या हिंस्त्र श्वापदापेक्षाही भयावह होत आहे. माणुसकीचा मणका मोडणा-या आणि जीभ छाटणा-या घटना पाहिल्या की मन सुन्नं होते. खावरांच्या अनेक शेरांमधून ही खंत वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त झाली आहे. त्यांच्या अनेक गझला आणि शेर ‘माणूस’ या संकल्पने भोवतीच फिरताना दिसतात. परंतु त्यांची अभिव्यक्ती मात्र वेगवेगळी आहे. त्यामुळे तोचतोचपणा जाणवत नाही.
खावरांचा जसा मानवी मुल्यांसाठी शोध सुरू होता तसाच त्यांचा स्वतःचा शोध देखील आयुष्यभर सुरु होता. हा आत्मशोध त्यांच्या अनेक गझलांमधून व्यक्त झाला आहे –
मिळेना कोण जाणे का मला पत्ता कुठे माझा
कधीपासून मी शोधात माझ्या हिंडतो आहे
माणसाने अनेक शोध लावले. स्वतःसाठी अगणित सुखसुविधा निर्माण केल्या. स्वतःच्या शरीरातील साध्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या पेशीपासून ते अंतराळातील अनेक अनाकलनीय गोष्टींचे गूढ उलगडले. पण अनादी काळापासून त्याला स्वतःचा शोध मात्र लागला नाही. स्वत:चा शोध घेता घेता अनेकदा स्वतःशी प्रत्येकाचा संवाद सुरू असतो. कधी कधी वादही होतो. अनेकदा मनाला प्रश्न पडतो की खरंच आपण नेमके कशासाठी जन्मलो आहोत? खावरांनाही हा प्रश्न नेहमीच पडतो. ते म्हणतात –
उलगडे ना गूढ ह्या प्रवासाचे मला
जायचे आहे कुठे? आलो असे कोठून मी?
उर्दू शायरीचे एकुण नऊ संग्रह नावावर असलेल्या बदिउज्जमा खावरांना १९८५ साली ऑल इंडिया मीर अकादमी, लखनौ तर्फे ‘इमतियाझे मीर सनद’ हा उर्दूतील उच्च साहित्यिक बहुमान मिळाला होता. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब आहे. १९८३ नंतर मराठी गझलेकडे वळलेल्या खावरांचे त्यांच्या हयातीत ‘गझलात रंग माझा’ (१९८५) व ‘माझिया गझला मराठी’ (१९८६) अशी दोन मराठी गझलांची पुस्तके प्रकाशित झाली होती. ‘चार माझी अक्षरे’ (१९९८) हा त्यांचा गझल संग्रह त्यांच्या मरणोपरांत अरुणोदय भाटकर यांनी प्रकाशित केला होता. यबरोबरच २००३ मधे त्यांच्या समग्र ११३ गझलांचा संग्रह डॉ. राम पंडित व गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या संपादनात प्रकाशित झाला आहे. मराठीतील विविध वृत्तांचा अगदी सहजपणे वापर करत सहज सोप्या सुंदर भाषेत लिहिलेल्या या ११३ गझला मराठी गझलेच्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा म्हणून अत्यंत महत्वाच्या आहेत.
खावरांच्या गझलांवर थोडाफार उर्दूचा प्रभाव असला तरीही त्यांची गझल मराठी मातीशी इमान राखणारी आहे. त्यांची शांत समाधानी वृत्ती प्रत्येक ठिकाणी झळकते. औचित्यपूर्ण रुपके आणि खयालांची सुटसुटीत मांडणी ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. मराठी गझलेला गझलियत देणा-या महत्वाच्या गझलकारांच्या यादीत बदीउज्जमां खावरांना महत्वाचे स्थान आहे.
स्वतःला ‘गझललेखनाचा ध्यास असलेला एक वेडा मराठी कवी’ असे म्हणणा-या बदीउज्जमां खावरांची मराठीत अभावानेच आढळणा-या वृत्तातील एक सुंदर गझल -
बसलो न कधी गाणी जुळवीत जगासाठी
ही चार पदे माझी आहेत तुझ्यासाठी
माझे न असे येथे काहीच तरीसुद्धा...
रमलोय कळेना ह्या दुनियेत कशासाठी
येऊ न दिला कुठला आरोप तुझ्यावरती
मी खूप जरी झालो बदनाम तुझ्यासाठी
ओसाड घरी तिथल्या उरला न कुणी माझा
मी हाय अता जाऊ गावात कुणासाठी !
जमणार जगाशी ह्या सौदा न कधी माझा
मी दुःख न कुठलेही विकणार सुखासाठी
रुततात कसे काटे, होतात कशा जखमा
जाऊन पहा 'खावर' बागेत फुलासाठी!
(बदीउज्जमां खावर)
- अमोल शिरसाट
९०४९०११२३४
रेखाचित्र सौजन्य - जयदीप शरद जोशी
(गझलयात्रा- दैनिक अजिंक्य भारत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा