२१ जुलै, २०२१

पंक्चर कसे निघावे सांगा तरी सुखाचे?



             एखादी कला एका दिवसात अवगत करता येत नाही. त्यासाठी निरंतर साधना आवश्यक असते. कलावंताला प्रतिभा जन्मजात लाभते. ‘ टाकेचे घाव सोसल्याशिवाय दगडालाही देवपण येत नाही’ असे म्हणतात. तसेच प्रतिभेला सुद्धा काळ आणि परिस्थितीचे चटके सहन केल्याशिवाय सोन्यासारखी झळाळी प्राप्त होत नाही. प्रतिभावतांना सुद्धा साधना करावीच लागते. इ.स. २००० पासून गझलेची निरंतरपणे साधना करून सिद्धी प्राप्त करणारे एक प्रतिभावंत गझलकार म्हणजे विदर्भातील बुलढाण्याचे सुरेश इंगळे. ( जन्म - १५ सप्टेबर ’८०)  
...........

       गझलकार सुरेश इंगळे बुलढाण्याच्या नगरपरिषदेत पाणीपुरवठा विभागात वॉलमनचे काम करतात. त्यांनी मराठी विषयात स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली असली तरी पाणीपुरवठा करणारे वॉलस्, पाईपलाईन दुरुस्तीचे काम निसंकोचपणे करतात. बुलढाण्याच्या एखाद्या रस्त्यावर फुटलेली पाईपलाईन किंवा वॉल दुरूस्त करतानाच अचानकपणे एखादा रसिक त्यांना “ तुमची आजची फेसबूकवरची गझल फारच दमदार आहे” अशी प्रतिक्रीया देऊन जातो तेव्हा लोकांना नवल वाटल्याशिवाय राहत नाही. कलंदरवृतीचा हा प्रतिभावंत नेहमी आपल्याच धुंदीत जगत असतो. साधी राहणी आणि मितभाषी स्वभावावरून सुरेश इंगळे नावाच्या खोल डोहाचा अंदाजच लावता येत नाही. तसे पाहिले तर पाईपलाईन आणि वॉल दुरूस्तीचे काम तांत्रिक स्वरूपाचे आहे. शब्दांचा आणि या तांत्रिक कामाचा दूरदूरचा संबंध नाही. सुरेश इंगळेंच्या कामाचे स्वरूप पाहता असे वाटते की गझलेचे रोपटे खडकावर उगवले आहे -  

तो फळ देइल किंवा नाही याची चिंता नाही
हेच खूप झाले की तो खडकावर रुजला आहे.

  सुरेश इंगळेंनी गझलेचे तंत्र आपल्या मनाच्या सुपीक मातीत खोलवर रुजवले आहे. त्यामुळे त्यांच्या गझलेचा वृक्ष डौलदार होताना दिसत आहे. दैनंदिन जीवनात आलेल्या अनुभवांकडे सुरेश इंगळे कलात्मक दृष्टीकोनातून बघतात. त्यांचे काम चाकोरीबद्ध असले तरी त्यांच्या निरीक्षणाचा आवाका मात्र मोठा आहे. त्यांच्या प्रतिभेची दृष्टी चौफेर फिरत असते. त्यामुळे त्यांच्या गझलेत विषयांची विविधता आहे. बुलढाणा जिल्ह्याचे ठिकाण असले तरी शेतीमातीशी जास्तीत जास्त लोकांचा संबंध येतोच. त्यामुळे सुरेश इंगळेंच्या गझलेत अनेकदा ग्रामीण प्रतिमा-प्रतिके येताना दिसतात.   

नको अल्लडपणे तू जांभळे वेचू
मला पांदीमधे दिसतो दगा पोरी

     पांद किंवा पांदण म्हणजे कच्चा शेतरस्ता. अनेकदा हा रस्ता दाट झाडीतून, काट्याकुट्यातूनही जातो. रस्त्याच्या एखाद्या कोप-यावर किंवा आजुबाजुला जांभळाचे झाड असतेच असते. टपोरी जांभळं वाटसरूंना मोहात पाडतातच. जांभूळ, पांद आणि अल्लडपणे जांभळं वेचणारी तरूण मुलगी ह्या प्रतिमा वापरून सुरेश इंगळेंनी लिहिलेल्या शेरात अनोखी चित्रमयता आहे. शब्दांमधून असे जिवंत चित्र उभे करायला कसब लागते. आपल्या निरिक्षणशक्तीच्या जोरावर सुरेश इंगळे असे जिवंत शेर सहजपणे लिहून जातात. त्यांच्या शेरांमधे कमालीचा साधेपणा असतो.   

बाकावरती डाग उमटला
वर्गातच अवघडल्या पोरी

  अत्यंत प्रगल्भ अशा स्त्री जाणीवेतून लिहिलेल्या या शेरात एक वेदना आहे. सुरेश इंगळेंनी ही वेदना अत्यंत साध्या शब्दात जिंवतपणे मांडली आहे. आपण प्रगत अशा एकविसाव्या शतकात वावरतो आहोत. तरीसुद्धा मुलींचे ‘अवघडलेपण’ दूर करता आलेले नाही, ही शोकांतिका आहे. असे स्त्रिया आणि ग्रामीण जीवनातील व्यथा मांडणारे अनेक शेर सुरेश इंगळेंनी प्रभावीपणे लिहिले आहेत -      

सरपणासाठी चुलीचा जीव तळमळतो
रोज कच्च्या भाकरीचा जीव तळमळतो
मायबापाला दिला आहेर कर्जाचा
मंडपामध्ये मुलीचा जीव तळमळतो

  अशा शेरांमधून त्यांची प्रखर सामाजिक जाणीव सुद्धा दिसून येते. चुलीचा, कच्च्या भाकरीचा आणि मुलीचा जीव तळमळणे हृदय पिळवटून टाकते. सोबतच ‘जीव तळमळतो’ इतका मोठा रदीफ (अंत्ययमक) सफाईदारपणे हाताळण्याची कला सुरेश इंगळेंना सहजपणे साध्य झाली आहे हेही दिसून येते.  

  सुरेश इंगळे शासकीय कर्मचारी आहेत. त्यामुळे शासकीय कर्मचा-यांच्या व्यथा मांडणारे अनेक शेरही त्यांनी ताकदीने मांडले आहेत.

पंक्चर कसे निघावे सांगा तरी सुखाचे?
स्वप्नामधे हवा का भरतात कर्मचारी?

किंवा

सात दिवसांचे मढे वाहून नेतांना
जन्मभर कोठे मला रविवार सापडला ?

 
  अशा शेरांमधे वापरलेल्या ‘सुखाचे पंक्चर’ किंवा ‘सात दिवसांचे मढे आणि रविवार’ ह्या प्रतिमा इतक्या अफलातून आहेत की उर्दू शायरी सुद्धा मराठी समोर फिकी पडावी. गझलेच्या निरंतर साधनेतून सुरेश इंगळेंनी आपली स्वतःची वेगळी शैली विकसीत केली आहे. वीस वर्षांच्या चिंतनातून हे सर्व साध्य होत गेले आहे. अजूनही त्यांच्या गझलेला बरेच मोठे अंतर कापायचे आहे. या प्रवासात त्यांची सुक्ष्मनिरीक्षण शक्ती त्यांना त्यांचा पुढील मार्ग दाखवतच राहील. त्यांच्या दांडग्या निरीक्षणशक्तीचे अनेक नमुने देता येतील. यातून त्यांच्या चौफेर निरीक्षणाचा अंदाज येऊ शकतो. ‘ जे न देखे रवि, ते देखे कवि’ असे कोणीतरी म्हणूनच ठेवले आहे. -   

बंद दाराच्या कुठे ध्यानीमनी असते
एक फट सुद्धा किती घातक ठरू शकते

किंवा

टिव्हीवर बातमी आली भुकंपाची...
चला हळहळ करू एका क्षणासाठी..
.

किंवा

मलाही दर्शनाची हाव सुटली तर
कुणी चोरायचे मग बूट लोकांनो ?

 
  हे सगळे शेर वाचतना असे वाटते की आपल्या जगण्यातले रोजचे प्रसंग चित्रित झाले आहेत. असे रोजच्या जगण्याला बेमालुमपणे स्पर्शून जाणारे काव्य रसिकांना नेहमीच आपलेसे वाटते. पुन्हा पुन्हा वाचत रहावेसे वाटणारे अनेक शेर सुरेश इंगळेंच्या गझलांमधे सापडतात. सुरेश इंगळे हझलही फारच प्रभावीपणे हाताळतात. त्यांचे अनेक शेर त्यांच्या स्वभावातला छुपा मिष्किलपणा दाखवतात. 
  शालेय जीवना पासून कविता लेखनाची आवड असलेल्या सुरेश इंगळे यांचा गझलप्रवास कोणत्याही प्रकारच्या औपचारिक मार्गदर्शनाशिवाय सुरू आहे. बारावीला असताना त्यांची ओळख बुलढाण्याच्याच रमेश आराख यांचेशी झाली. दोघांची निखळ मैत्री आजही कायम आहे. दोघांनीही सोबत कवितालेखन सुरु केले. बुलढाण्यातील साहित्यिक आणि चळवळीच्या वातावणात त्यांची जडणघडण झाली. सुरेश इंगळे उत्तम हार्मोनियम आणि बासरीवादक आहेत. काव्यलेखनाबरोबरच त्यांनी विविध वाद्य वाजविण्याचा छंद जोपासला आहे. त्यांचा एक गझलसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
सुरेश इंगळेंची एक गझल –


मुके केले मला बोलू दिले नाही...
तिने प्रकरण पुढे वाढू दिले नाही...


मिळाला जन्मभर कुंडीत ओलावा
ऋतू कोणी मला पाहू दिले नाही...


कदाचित मी तुझा कोणीच नव्हतो पण
तुला मी पोरके वाटू दिले नाही...


उचलला पेनही रस्त्त्यात पडलेला
जुने पुस्तक कधी जाळू दिले नाही...


रडाया लागले भिंतीवरी डफडे
डिजे आला मला वाजू दिले नाही...

(सुरेश इंगळे, ९९२२०९७५९६ )
....................

अमोल शिरसाट 

अकोला




२ टिप्पण्या: