१४ जुलै, २०२१

कवी ‘सौभद्र’ नावाचा इथे कोणीतरी आहे

      कविवर्य केशवसुतांना आधुनिक मराठी कवितेचे प्रवर्तक मानले जाते. त्याचप्रमाणे कविवर्य बा.सी. मर्ढेकरांना मराठी नवकाव्याचे जनक म्हटले जाते. असे का? तर वरील दोन्ही महानुभावांनी प्रचलित मराठी कवितेपेक्षा वेगळ्या धाटणीची कविता लिहिली. त्यांच्या कवितेचे वेगळेपण त्यांच्या शैलीमधे आहे. त्यांच्या कवितेत त्यांच्या काळाचा स्वर उमटलेला जाणवतो. कवितेमधे वेगळेपण कशामुळे येते तर काळाला अनुरूप कविता लिहिली गेली तरच तिच्यात नवेपण येत असते. आजच्या काळाचे प्रतिबिंब मराठी गझलेत सुद्धा उमटताना दिसते. सुरेश भटांच्या शैलीचा प्रभाव आजही मराठी गझलेत नव्याने लिहिणा-या अनेक गझलकारांवर असला तरी स्वतःच्या शैलीचा शोध घेत आपल्या काळातल्या प्रतिमा, प्रतिकांचा वापर करणारेही अनेक गझलकार तयार होत आहेत. त्यापैकीच एक गझलकार म्हणजे नाशिकचे संजय गोरडे ‘सौभद्र’. (जन्म- १६ ऑगस्ट ‘७८)

           गझलकार संजय गोरडे यांचे मुळ गाव औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या गंगापूर तालुक्यातील मांजरी हे आहे. त्यांचे वडील काहीसे कलंदर व छांदिष्टवृत्तीचे होते. त्यांना कवितेची आवडही होती. आयुष्याच्या अनेक पातळ्यांवर त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. त्यामुळे स्वतः जवळची थोडीफार असलेली शेतीही विकावी लागली. त्यामुळे कुटुंबाने प्रचंड हालअपेष्टा भोगल्या, कित्येक वर्ष वाळूज औद्योगिक वसाहतीच्या झोपडपट्टीत रहावे लागले. कधी पेपर वाटणे, ब्रेड विकणे असे मिळेल ते काम करून संजय गोरडेंनी आपले शिक्षण पूर्ण केले. परंतु ते १९९६ च्या बारावीच्या परिक्षेत नापास झाले. त्यानंतर आय.टी.आयच्या पेंटर ट्रेडला प्रवेश घेऊन त्यांनी स्वतःचा पेटिंगचा व्यवसाय सुरू केला. विविध कंपन्यांमधेसुद्धा पेंटिंगचे काम केले. आर्थिक स्थैर्यासाठी त्यांना खूप भटकंती करावी लागली. त्यांना लहानपणापासून वाचनाची आवड होती. परंतु आपण चांगली कविता लिहू शकतो ही जाणीव २०१४ नंतर झाली. आपणही व्यक्त झाले पाहिजे या विचारातून त्यांचे लेखन सुरू झाले. गझलेबद्दल ओढ निर्माण झाली. काही मित्रांबरोबर केलेल्या सहअभ्यासातून त्यांचे गझल लेखनही सुरू झाले. सध्या संजय गोरडे वाहन निर्मिती करणा-या ‘महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा’ कंपनीमधे कामगार म्हणून काम करतात. वाहनांच्या Total Productive maintainence चे काम करत असतानाच ते गझललेची Productivity कशी वाढेल याकडेही बारकाईने लक्ष देत आहेत -    

कवी ‘सौभद्र’ नावाचा इथे कोणीतरी आहे
गझलच्या पालखीचा मामुली खांदेकरी आहे

जिच्या काठी उभा मी जन्मभर व्याकूळल्यावानी
गझल माझ्या-तुझ्यामधली अशी गोदावरी आहे

            संजय गोरडे स्वतःला गझलेच्या पालखीचा मामुली खांदेकरी म्हणतात. यात त्यांचं गझलेवरील निस्सीम प्रेम दिसून येते. गझललेखन शिकत असताना त्यांना आलेल्या अनुभवांची टिपणे ते काढत असतात. या टिपणांवरून त्यांचे गझलेबाबतचे सखोल चिंतन दिसून येते. वर दिलेल्या दुस-या शेरात संजय गोरडे गझल काय आहे? हे मोजक्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतात. याच शेरात गोदावरीचा उल्लेखसुद्धा बेमालुमपणे आला आहे. 'गोदावरी ' या विशेष नामाचा काफिया (उपांत्य यमक) म्हणून वापर केल्याने शेराचे सौंदर्य अधिक खुलले आहे. शेरामधे अचानकपणे येणारा वेगळा काफिया रसिकांना आश्चर्याचा धक्का देऊन जातो तेव्हा आपोआपच त्या शेराला दाद मिळत असते. शेरामधे 'गोदावरी 'चा उल्लेख अजून एका वेगळ्या कारणामुळे आला असावा असे वाटते. त्यांचे गाव गोदावरी खो-यात वसले आहे. त्यामुळे गाव आणि नदिकिनारा शहरात राहणा-या गोरडेंना नेहमी खुणावत असला पाहिजे.         

प्रश्न एकच सतावतो आहे
मी दिवे काय लावतो आहे?
काय शहरात येउनी केले ?
धावतो फक्त धावतो आहे

     
      आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येकाला ‘मी काय दिवे लावतो आहे?’ हा प्रश्न पडत असतोच. महानगरात राहणा-या प्रत्येकाचे जीवन तर खुपच धकाधकीचे झाले आहे. दिवसरात्र प्रत्येकजण धावतच असतो. महानगरीय जीवनाचे चित्रण प्रामुख्याने मर्ढेकरांच्या कवितेमधे मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ग्रामीण संस्कृतीमधून आलेला कवी जेव्हा महानगरात वास्तव्याला येतो तेव्हा पारंपरिक संस्कार आणि आधुनिक जीवनपद्धती यांच्यात मोठे अंतर त्याला जाणवते. त्यामुळे एकप्रकारचा न्यूनगंड तयार होऊन एक ‘Identity Crisis’ निर्माण होत जातो. त्यामुळे मर्ढेकरोत्तर महानगरीय कविता अशा अस्तित्वाच्या संघर्षातून पुढे आलेली आहे. याचे प्रतिबिंब संजय गोरडे यांच्या उपरोक्त ओळींमधे उमटलेले आहे. महानगरीय जीवनाचे चित्रण संजय गोरडे अधिक चांगले करू शकतील असे वाटते.

       संजय गोरडे आपल्या गझलेत तंत्राचा वापर उत्स्फुर्ततेने करतात. अनेकदा वृत्त, छंदाचा वापर केल्याने आशयाशी तडजोड करावी लागते, त्यामुळे यांत्रिकपणा येतो असा आरोप केला जातो. पण त्यात फारसे तथ्य नाही. तंत्र जर योग्यरीत्या आत्मसात केले तर आशयाशी तडजोड करावी लागत नाही. संजय गोरडे गझलेतील तंत्राची तुलना गाडीतल्या गिअर बॉक्ससोबत करतात. गाडी चालवताना आपण फक्त कुठे पोहोचायचे आहे याचा विचार करतो, गिअर कितीवेळ आणि कुठे बदलायचा? याचा विचार करत नाही. गिअर बदलण्याची क्रिया आपोआप घडत असते.      

नुसते म्हणायला हे मोठे ललाट आहे
माझे नशीब माझ्याइतके सपाट आहे

कळलो अजून कोठे मी नेमका मलाही,
थोडा नव्या युगाचा, थोडा जुनाट आहे

       अशा अनेक शेरांमधे संजय गोरडे तंत्र आत्मसात करून उत्स्फुर्तता आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सोबतच त्यांची जीवनदृष्टीसुद्धा अधिक प्रगल्भ होत जाताना दिसते.

भजत नाही कुणी कुठल्याच देवाला
इथे नुसतीच करतो आरती आपण

किंवा

अर्जुन ऐकत बसला गीतेचे पारायण
दुर्योधन आता दुनियेचा वाली आहे!

किंवा

वाट चुकलेलाच वाटाड्या हवा आहे मला
जिंकणारा तर मला माघार शिकवू पाहतो

       अशा शेरांमधून त्यांची व्यापक जीवनदृष्टी झळकत राहते.    

       आपल्या व्यवसायाबरोबरच काव्यामधल्या ‘Quality’ कडे बारकाईने लक्ष देणारे संजय गोरडे आपल्या संवेदना जिवंत ठेवत मानवी व्यवहारांचे बारकाईने निरीक्षण करतात. जीवनाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर झालेल्या संघर्षातून तयार झालेल्या संजय गोरडे यांची गझल अजून बराच मोठा पल्ला गाठेल असा विश्वास वाटतो. त्यांचा एक कवितासंग्रह व एक गझलसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. गझलेखनासाठी त्यांना ‘स्व. नाना बेरगुडे स्मृती गझलयात्री पुरस्कार २०१९’ प्राप्त झाला आहे.    

 गझलकार संजय गोरडे यांची एक गझल -  

अताशा संपली शाळा मुलींनो...
स्वत:ला फार सांभाळा मुलींनो!

मुलींची फार चिंता या जगाला
मुलींचा फार कंटाळा मुलींनो

 जगाला खूप आवडतोय हल्ली
करा तो चेहरा काळा मुलींनो

 नको इतक्यात स्वप्नांचा चुराडा,
नको इतक्यात वरमाळा मुलींनो!

 पुढे भाळायला आयुष्य आहे!
जराशी पुस्तके चाळा मुलींनो

 घराचे काळजी करतात डोळे
उशीरा यायचे टाळा मुलींनो

(संजय गोरडे ‘सौभद्र’, नाशिक – ७२७६०९१०११)
.....................

अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

३ टिप्पण्या: