७ जुलै, २०२१

काळ कोडगा आणि विधाता दांभिक झाला आहे


                      गझल या काव्यप्रकाराचा दिवसेंदिवस मराठी कवितेमधे रेटा वाढत आहेत. यासाठी सोशल मीडिया महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. गझलेसंबंधी चर्चा करण्यासाठी व्हाट्सअप, फेसबूकवर अनेक समूह अस्तित्वात आहेत. त्यात गझलेच्या आकृतीबंधासंदर्भात चर्चा होत असते. आकृतीबंध समजला की गझलकार झालो अशी अनेकांची समजूत होते. परंतु गझल ही विधा मुरत घातलेल्या लोणच्या सारखी असते असे म्हटले जाते. गझलेतल्या शेरांना ‘इन्संट’ दाद हवी असते परंतु ‘इन्स्टंटली’ गझलकार होता येत नाही. त्यासाठी गझल हा काव्यप्रकार व्यवस्थीत समजून घेणे आवश्यक आहे. नव्याने गझललेखन करणारे काही गझलकार सखोल ज्ञान घेऊन लेखन करीत आहेत. त्यापैकीच एक गझलकार म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातले डॉ. शिवाजी काळे. (जन्म - २० एप्रिल १९७८) 
.................

  गझलेच्या आकृतीबंधाबद्दल बोलताना गझलकार श्रीकृष्ण राऊत म्हणतात की, ‘शब्दरचनेच्या विविध आकारानुसार ओवी, अभंग, गीत, गझल असे वेगवेगळे काव्यप्रकार आपल्याला स्वतंत्रपणे ओळखू येतात. त्यांनाच आपण आकृतिबंध असे म्हणतो. रचनेने सिद्ध केलेल्या प्रत्येक आकृतिबंधाचे काही नियम, काही कायदे असतात. ह्या नियमांनाच आपण त्या त्या काव्यप्रकाराची लक्षणे, किंवा त्या आकृतिबंधाचे तंत्र म्हणतो. तंत्र कोणत्याही कवितेचे असो;जोवर ते आशयाशी एकजीव झालेले असते तोवर ते स्वतंत्रपणे आपले अस्तित्व जाणवू देत नाही. तीच ख-या अर्थाने त्या तंत्राची शुद्धता असते. आणि ज्यावेळी कवितेत तंत्राचे अस्तित्व स्वतंत्रपणे जाणवण्याइतके ठळकपणे उमटते, तेव्हा अर्थातच त्याने आशयावर मात करून ते कवितेवर हावी झालेले असते. तंत्र जिंकले आणि हारलेला आशय फरफटत तंत्राच्या मागेमागे चाललेला कवितेत जेव्हा दिसून येतो तेव्हा आशय तंत्राला शरण गेला असे आपण म्हणतो.’ नव्याने गझललेखन करणा-या कवींच्या बाबतीत हे अनेकदा घडते. तंत्र अवगत करून गझलेचे सांगाडे रचणारे अनेक कवी मराठीतही आहेत. परंतु शिवाजी काळे यांच्यासारखे गझलकार मात्र अभ्यासपूर्वक तंत्राला आपल्या आशयावर हावी न होऊ देण्यासाठी नेहमी सजग असतात.  

पुन्हा सरींनी भिजलेली मी गझल लिहावी म्हणतो
ढगात माझ्या पुन्हा पुरेशी ओल साचली आहे.

             हा शेर म्हणजे डॉ शिवाजी काळेंच्या सहजतेचा आणि लिहिण्याच्या अपरिहार्यतेचा एक उत्तम नमुना म्हणता येईल. मनाच्या आभाळात पुरेशी ओल साचल्याशिवाय लिहिणे म्हणजे कोरडवाहू शेतीत पावसाची सुतराम शक्यता नसताना पेरणी करण्यासारखे आहे. मनाचे धरण पूर्ण भरले की व्यक्त होण्यासाठी शब्दांचा आधार घ्यावा अशा वेळीच लेखणी हातात घ्यावी लागते. 

मनाला पूर आल्यावर खुली कर सर्व दारे
धरण टिकवायचे तर सांडवा नसतो पुरेसा

   शिवाजी काळेंच्या या शेरातही मन, धरण आणि सांडवा आलेला आहे, पण तो वेगळ्या अर्थाने ! मनात भावनांचा कल्लोळ दाटलेला असतो, काय करावे सुचत नाही. कोणाजवळ बोलताही येत नाही, भलत्या कोणाला सांगावेसेही वाटत नाही. पण व्यक्त झाल्याशिवाय पर्याय नसतो. नाहीतर त्याचे भयंकर परिणाम होताना दिसतात. जे आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत ते घरातल्या पंख्याला बांधलेल्या दोराचा, रेल्वेलाईन, विहीर, डोह, विष यांचा अविचाराने आधार घेतात आणि आपली जीवनयात्रा संपवतात. म्हणूनच आपले जीवनरूपी धरण टिकवायचे असेल तर व्यक्त होण्यासाठी सांडवा पुरेसा नसून मनाची पूर्ण दारे नेहमी उघडी करणे आवश्यक असते. कारण नवी सुरूवात करायला वयाचे कुठलेच बंधन नसते. डॉ. शिवाजी काळे यांचे शेर अनेक सखोल विचारमंथनातून जन्म घेत असतात.    
 
उजेडातही अंधाराचे अनेक चेले होते
रस्ता चुकलेल्यांना त्यांनी गुहेत नेले होते

किंवा

निघण्याआधी नजर भिडव तू नजरेला
टिकतो का निर्धार बघू मग ठाम तुझा

किंवा 

तुकडे पडण्यासाठी एकच घाव पुरेसा ठरला
त्या भरभक्कम झाडाचे मन दुभंगलेले होते

अशा शेरांमधून त्यांची विचारप्रवणता दिसून येते. मेंदू हे विचारांचे केंद्र मानले जाते तर संवेदनांचे केंद्र ह्रदय असते असे म्हणतात. खरं म्हणजे हृदयाची रचना फक्त रक्ताभिसरणासाठीच असते. त्यामुळे संवेदनांचे केंद्र हृदय असल्याचा एक समज प्रस्थापित आहे. वास्तविक पाहता असे काहीही नसते. संवेदना आणि विचारांचे केंद्र सर्वार्थांने मेंदूमधेच असते. कवितेमधे विचारप्रवणता आली की संवेदनांची ओल काहीशी कमी होत असते. परंतु संवेदनांची ओल कायम राखत विचारप्रवणता असणारे शेर लिहिता आले तर ते रसिकांच्या पसंतीस उतरतात. संवेदनशील मनाचे डॉ. शिवाजी काळे आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत गझललेखन करीत आहेत. दैंनंदिन जीवनाने दिलेले अनुभव टिपून त्यावर सखोल चिंतन-मनन करून ते मांडत असतात.   
     गझलकार डॉ शिवाजी काळे सध्या राशीन ता. कर्जत जि. अहमदनगर येथे मागील सोळा वर्षांपासून अविरतपणे वैद्यकीय सेवा देत आहेत. शालेय जीवनापासून त्यांना काव्यलेखनाची आवड होती. महाविद्यालयात शिकत असताना ‘अक्षरवेल’ नावाच्या साहित्यिक शोकेसचे संयोजन त्यांच्याकडे होते. २००४ पासून वैद्यकीय सेवेला सुरूवात झाल्यानंतर १०-१२ वर्ष काव्यलेखन कुठेतरी हरवून गेले होते. परंतु जुन्या मित्र-मैत्रींणींच्या व्हाट्सअप समुहामुळे ते पुन्हा एकदा कवितेकडे ओढले गेले. सोबतच गझलेबद्दल विशेष ओढ निर्माण झाली. गझलेबद्दल मिळेल ते जास्तीतजास्त ज्ञान त्यांनी संपादित केले. ‘देणा-याने देत जावे’ या विंदांच्या कवितेप्रमाणे शिवाजी काळेंनी मिळवलेले ज्ञान फक्त स्वतःपुरते मर्यादित न ठेवता इतरांनाही त्याचा लाभ व्हावा हा हेतु समोर ठेवून गझलकार अनिल कांबळे यांच्या ‘गझलमंथन’ या समुहाच्या संकल्पनेला सर्वतोपरी मदत केली. काही नव्या-जुन्या गझलकारांच्या सहभागातून हा समूह उदयाला आला. आज या समूहाच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या उपक्रमांमधून नवोदित गझलकारांना लेखनासाठी प्रेरणा मिळत आहे.       
डॉ. शिवाजी काळे यांची एक गझल – 

छुपी लढाई लढताना तो अगतिक झाला आहे
प्रत्येकाचा मेंदू हतबल सैनिक झाला आहे

प्रारब्धाची हूल देउनी प्राण पळवले त्यांनी
काळ कोडगा आणि विधाता दांभिक झाला आहे

उभ्या जगाचे एकसारखे भाग्य रेखले कोणी ?
(भविष्य बघणाऱ्याचा मुखडा त्रासिक झाला आहे)

सुपातल्यांची बघून तगमग हात जोडले त्याने
जात्यामधला अखेरचा क्षण आस्तिक झाला आहे

तलवारीची धार कशाने बोथट झाली आहे
वार कदाचित पात्यावरती शाब्दिक झाला आहे

कुणी मालकी सांगितली तर हसून उत्तर देतो
आता भोळा ‘शिवा’ मनाने वैश्विक झाला आहे

(डॉ. शिवाजी काळे, ९४२३७५१५३३)
............................
अमोल शिरसाट
अकोला
९०४९०११२३४

३ टिप्पण्या:

  1. अप्रतिम लेख! सरांच्या गझल खूप आवडतात अभिनंदन!💐

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. खूप खूप छान लेख वाचून आनंद झाला. आपल्या लिखाणाला उत्तरोत्तर अशीच धार कायम राहो हीच सदिच्छा!

      हटवा