३० जून, २०२१

शिकलो म्हणूनच हातामध्ये झोळी आली नाही!


            गझल हा काव्यप्रकार मराठीत परकीय भाषेतून आलेला आहे. असे असले तरी मराठी गझलेची भाषा, रूप आणि आशय या अंगांनी मराठी मातीच्या संस्कृतीचाच आविष्कार मराठी गझलेत होताना दिसतो. त्यामुळे गझल हा काव्यप्रकार परकीय आहे असे मुळीच म्हणता येणार नाही. मराठी गझल मराठमोळ्या पद्धतीने हाताळणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंबचे एक गझलकार म्हणजे शेखर गिरी. त्यांची इ.स. २००५ पासून अविरतपणे ‘गझलगिरी’  सुरू आहे.( जन्म – १८ एप्रिल ’७६) 
....................

  कवितेप्रमाणेच गझलेतही ज्या काळाने गझलकाराला घडविले त्या काळाचा स्वर उमटणे आवश्यक असते. तेव्हाच त्याची गझल कालातीत होऊ शकते. अलिकडे गझलेकडे वळणा-या कविंची संख्या खूप वाढली आहे. समाजमाध्यमांमधून भरमसाठ गझला लिहिल्या जाऊ लागल्या आहेत. दर्जानिश्चिती करता येऊ शकत नसली तरी गझलेच्या सुरूवातीच्या दोन ओळींवरूनच शेरांमधे कोणते यमक येतील याचा अंदाज रसिकांना बांधता येऊ लागला आहे. त्यामुळे गझल हा काव्यप्रकार यमकानुसारी काव्यप्रकार आहे असे अनेक लोकांना वाटते. अनेक चांगले कवी गझलेच्या नादाला लागून बरबाद होत आहेत असा आरोपही अनेकदा होताना दिसतो. परंतु ‘ट’ ला ‘ट’ लावून तयार होणा-या  मराठी कविता वाचूनही मराठी कविता खड्ड्यात चालली आहे असेच वाटते ना! खरं म्हणजे ‘यमकानुसारी गझल’ आणि ‘ट’-‘ट’ वाल्या कवितांचा प्रकार एकच आहे. पण खरी कविता किंवा गझल यमकांचा खेळ नसून शब्दांच्या पलिकडला अर्थ सांगणारी असते. जेव्हा बोलून मनातले सांगता येत नाही तेव्हा कविताच आधार द्यायला येते – 

कविते तुझ्यामुळे हे जगणे सुसह्य झाले
जगलो असा तसा मी तू भेटण्याअगोदर

     शेखर गिरींचा शेर कवितेचं जगण्यातलं काय स्थान आहे हे सांगणाराच आहे. त्यांचं जगणं कवितेनं सुसह्य केलं आहे. अत्यंत कठिण परिस्थितून शिक्षण घेत शेखर गिरींनी स्वतःला सिद्ध केलं आहे. सुरूवातीला त्यांनी डी.फार्म करून औषधींचे दुकान सुरु केले होते. जवळपास दहा वर्ष त्यांनी हे दुकान चालवले. ब-यापैकी पैसेही मिळत होते पण कविमनाच्या गिरींचा जीव शरीरावरच्या औषध-गोळ्यांमधे जीव रमत नव्हता. जवळपास सगळ्या रोगांचा इलाज मनाच्या तळाशी असतो आणि मनाला शब्दांशिवाय कोणतेच औषध लागू पडत नाही त्यामुळे आपला व्यवसाय सुरळीत सुरू असतानाही त्यांनी कलाशाखेत ग्रॅज्युएशन तर केलंच पुढे इंग्रजी, राज्यशास्त्र आणि मराठी अशा तीन विषयात पी.जी. केलं. त्यानंतर ते कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. शेखर गिरी गोसावी समाजाचे आहेत. गोसावी समाजाचा पारंपारीक व्यवसाय भिक्षा मागणे हा आहे. परंतु शेखर गिरी व त्यांच्या वडीलांनी सर्व परंपरा मोडीत काढल्या आहेत. 

पीठ मागुनी जगण्याची ती परंपरा संपवली
शिकलो म्हणूनच हातामध्ये झोळी आली नाही!
                 खरा कवी मुळातच सगळ्या संकंल्पना आणि परंपरा मोडीत काढणारा असतो. कवितेची परिपूर्ण अशी व्याख्या अजूनही उपलब्ध नाही. याचे कारण हेच आहे की प्रत्येक कवी नव्या शक्यतांचा शोध घेत असतो. त्याच्या नव्या कवितेबरोबरच कवितेची एक नवी व्याख्याही तयार करावी लागते.  
   गझल या काव्याप्रकाराचा उगम मुळात ‘प्रेयसीसोबत किंवा प्रेयसीविषयी’ बोलण्यातून झाला आहे. त्यामुळे शेखर गिरींनी सुद्धा अनेक नाजुक प्रेमभावना व्यक्त करणा-या गझला आणि शेर लिहिले आहेत.  
 
जरा थांबली तर तिचे काय जाते?
हसुन बोलली तर तिचे काय जाते?
तिची बंद खिडकी मला खूप छळते...
खुली ठेवली तर तिचे काय जाते?

  गिरींची ही साधी-सोपी रचना मुशाय-यात चांगलीच भाव खाऊन जाते. अशा रचना मंचीय प्रकारात मोडत असल्या तरी रसिकांना त्या निखळ आनंद देऊन जातात. शेवटी लिहिणा-याचा आणि ऐकणा-याचा आनंद महत्वाचा! प्रत्येकवेळा समीक्षेच्या विशिष्ट चौकटींमधे कवितेला बसवणे योग्य नाही. समीक्षेची चौकट लाऊन कवितेचाच काय जगण्याचा सुद्धा खरा आनंद घेता येऊ शकत नाही. सर्वच भाषांमधे जसा गझलेबद्दलचा ‘प्रेयसीसोबत किंवा प्रेयसीबाबत बोलणे’ हा दृष्टीकोन बदलत गेला आहे. विविध विषय हाताळले जात आहेत.  शेखर गिरी सुद्धा विविध विषय ताकदीने मांडताना दिसतात. 

कष्ट करूनी मरणा-याला काही नाही
रोज सुळावर चढणा-याला काही नाही
शाबाशी अन् किताब मिळतो अधिका-याला
चोर नेमका धरणा-याला काही नाही!

   अश्या सामाजिक स्वरुपाच्या शेरांमधे सुद्धा शेखर गिरी साध्या-सोप्या पद्धतीने आशय मांडताना दिसतात. त्यांना जे सांगायचे आहे ते थेटपणे रसिकांच्या मनाला जाऊन भिडते हे महत्वाचे आहे. 
  
विसावा घ्यायचा नाही कशाला थांबला ‘शेखर’
भरोसा काय झाडाचा कधीही उन्मळू शकते

अशा शेरांमधून शेखर गिरी जीवनाचे तत्वज्ञान ताकदीने मांडताना दिसतात. हिंदी-उर्दू गझलाप्रमाणे आपले नावही ते शेवटच्या शेरात सुंदररित्या वापरतात. शेखर गिरींवर फुले- शाहू- आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव असल्याने त्यांची गझल ‘तरक्कीपसंद’ आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची भावना व्यक्त करताना ते म्हणतात – 

केलास तू जगाचा उद्धार भीमराया
मानू तुझे किती मी उपकार भीमराया
नावात काय आहे जादू तुझ्या अशी की,
‘जयभीम’ क्रांतिकारी उच्चार भीमराया

  गझलकार शेखर गिरी आपल्या ‘गझलगिरी’ बरोबरच आपले ज्ञानदानाचे कार्य चोखपणे पार पाडत असतात. विद्यार्थ्यांमधे वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ते विशेष प्रयत्न करत असतात. ‘खरं तर’( चारोळी संग्रह, २००५) व ‘गझलगिरी’( गझलसंग्रह, २०१८) असे दोन संग्रह शेखर गिरींच्या नावावर आहेत. सोबतच त्यांनी ‘कविता सुमारे १२०’ हा बारा कवींच्या कवितांचा संग्रह देखील त्यांनी संपादित केला आहे. शेखर गिरींना मुर्तिजापूरच्या गझलदीप प्रतिष्ठानचा प्रथम ‘सुरेश भट स्मृति पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. शेखर गिरी अनेक नवोदित गझलकारांना गझललेखनासाठी प्रोत्साहित करत असतात.        
 शेखर गिरींची एक गझल - 
 
मी बदलुन गेलो पुरता इतकेच ठरवल्यानंतर
माघार घ्यायची नाही स्पर्धेत उतरल्यानंतर

मज प्रत्येकाने येथे धक्काच दिला जगताना
मी तरी तोल सावरला हा पाय घसरल्यानंतर

प्रेमात तुझ्या असताना ते नशेत जगणे होते
मी मजेत जगतो आहे बघ तुला विसरल्यानंतर

हिन्दूही दुःखी येथे अन् मुस्लिम शीख इसाई
माणूस सुखी होइल का मग धर्म बदलल्यानंतर

‘मी सुपुत्र या मातीचा, हे शेतच माझी आई’
गळफास घ्यायचा नाही इतकेच ठरवल्यानंतर

आव्हान दिले लढण्याचे मज प्रत्येकाने येथे
शत्रूच कुणी ना उरला मी मला हरवल्यानंतर

मी किती कमवला पैसा मी किती बांधले इमले
मातीच शेवटी उरते मातीत मिसळल्यानंतर
(शेखर गिरी, कळंब, ८३२९३३०२९५)
...........................
अमोल शिरसाट
९०४९०११२३४

1 टिप्पणी:

  1. गिरी सरांच्या गझला आणि त्यांचा तुम्ही केलेला उहापोह दोन्ही खास...

    उत्तर द्याहटवा