२ जून, २०२१

रोगराई-संकटे घेऊन जा गे मारबत

          आजच्या विज्ञानयुगातही निसर्गात अनेक अनाकलनीय गोष्टी आहेत. माणसाचे जीवनही अनेक अकल्पित आणि गूढ गोष्टींनी भरलेले आहे. माणूस त्याच्या जीवनात घडणा-या अप्रिय घटनांनी हतबल होताना दिसतो. याच गोष्टीचा फायदा घेऊन अध्यात्माच्या नावावर अंधश्रद्धांचे थोतांड सामान्य माणसांच्या मस्तकी मारणारे भोंदू समाजात आहेत. पण अध्यात्म म्हणजे मन आणि शरीराचे सृष्टीसोबत तादात्म्य साधणारे एक विज्ञानच आहे. अकोला जिल्ह्यातील हातरूण येथील श्यामनाथ पारसकर  लोकांना विज्ञानावर आधारीत अध्यात्माचे धडे देत गझललेखन सुद्धा करीत आहेत.( जन्म – ६ ऑगस्ट ’५९) 
......................................................................................
  अकोला जिल्ह्यातील संत यादवनाथ-महादेवनाथ या नाथ संप्रदायातील संसारी योगीपुरुषांच्या रक्ताचा आणि विचारांचा वारसा चालवणाऱ्या श्यामनाथ पारसकर यांनी १९८० च्या दरम्यान विज्ञान शाखेतील स्नातक पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते आरोग्य विभागात क्ष-किरण तंत्रज्ञ म्हणून रुजू झाले. घरी अध्यात्माचे संस्कार आणि शिक्षणातून विज्ञानाचे धडे घेत आत्मशोधाच्या प्रवासाला निघालेले श्यामनाथ पारसकर कधीही आत्ममग्न झालेले नाहीत. खरं म्हणजे केवळ वेद किंवा आणखी कोणताही धर्मग्रंथ वाचून कधीच आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होत नाही. माणसांची वेदना वाचणे हेच खरे आध्यात्माचे सार आहे.        

नवीन गाडी नवा बंगला सुख देईना,
अध्यात्माची गोड कल्पना सुख देईना.
संसाराचे प्रेम घेरते वैराग्याला,
संतत्वाचा सुंदर डगला सुख देईना
  
       संतत्वाचा खोटा डगला घालणारे अनेक भोंदू आज समाजात आहेत. अध्यात्म तोंडी  लावण्यापुरते ठेवून ते आपल्या अंतर्वासनांचे पोट भरण्याचे काम नित्यनेमाने करत असतात. परंतु श्यामनाथ पारसकर मात्र माणसांची वेदना वाचतात. 

भुकेजल्यांची भणंग दिंडी उभी दिसे ती तुझ्याच दारी,
अशा घडीला जरी न तारी, म्हणू कसा आपला विठोबा?

      विठ्ठलाच्या दारात उभी असलेली भुकेजल्यांची भणंग दिंडी पाहून त्यांच्या मनाला वेदना होतात. तेव्हा थेट तुकोबारायांसारखा विठ्ठलाला आपला कसा म्हणू? असा सवाल करतात. संपूर्ण महाराष्ट्रातले शेतीमातीत राबणारे शेतकरी दरवर्षी नित्यनेमाने विठ्ठलाची वारी करतात. ते केवळ विठ्ठलभक्तीत रमतात असे नाही तर वर्षभर अपार कष्ट करतात. पण  सतत येणारा दुष्काळ आणि नापिकी त्यांच्या जीवनाचं मातेरं करते. अशावेळी श्यामनाथ पारसकर विठ्ठ्लाला काकुळतीने विनंती करतात-  

जरा दिसू दे ढगाप्रमाणे तुझी छबी सावळी खुलोनी,
निघून ये पावसासवे तू, मधे कुठे थांबला विठोबा?

      कठीण परिस्थीतीत शेतात उगवलेल्या शेतमालाला रास्तभावही मिळत नाही. ए.सी.मधे बसून शेतमालाचा भाव ठरवणा-यांना शेतक-यांची केवळ मते मिळवायची असतात. त्यांना केवळ व्यापा-यांचेच पोट भरायचे असते. शेतीमातीत राबणा-यांचा ते कधीच विचार करत नाहीत. मोठ्या कष्टाने उगवलेल्या पिकांचा परस्पर भाव करून ते मोकळे होतात, तेव्हा -  

तुझ्या पोटास घालू पण कदर कर शेतमालाची
परस्पर भाव करण्याचा तुला अधिकार आहे का ?

  असा प्रश्न विचारून आपल्या अनेक गझलांमधून पारसकर राजकीय-सामाजिक परिस्थितीवर देखील सटीक भाष्य करतात. 

बड्या थापा, बडी स्वप्ने, खरे थोडे तरी बोला;
कधीकाळी असे मित्रा तुझा हा देश रामाचा.

         उपरोक्त ओळी सद्यस्थितीवर चपखलपणे बसणा-या आहेत.  राजकीय-सामाजिक परिस्थीतीवर भाष्य करताना कवीला ती कविता सार्वकालिक होण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. एखाद्या तात्कालिक समस्येच्या मुळाशी असलेल्या शाश्वत भावनेचा मानवी जीवनाशी असलेल्या संबंधाचा शोध घेणे आवश्यक असते. त्या भावनेचा प्रतिकात्मक आविष्कार करावा लागतो. तेव्हाच ती कविता देश-काल-परिस्थितीच्या सीमा ओलांडते. अन्यथा त्या कवितेची आवाहनक्षमता क्षणिक ठरू शकते. पारसकरांचा सद्यस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना दिसतो. 

आजाराचा धाक दाखवा, पैसे उकळा
हेच नवे अभियान चालवा, पैसे उकळा
'अमुच्या येथे खात्रीलायक इलाज होतो'
जाहिरातिचे ढोल वाजवा, पैसे उकळा

       आजकाल आजाराचा धाक दाखवून पैसे उकळण्याचे अभियान जोरात सुरू आहे. उपरोक्त ओळीमंधे सद्यस्थितीचे चित्रण श्यामनाथ पारसकरांनी थेटपणे केले आहे. गझल किंवा कवितेच्या भाषेला अनेकदा थेटपणा मानवत नाही. जे सांगायचे असते ते रोजच्या वापरातील भाषेतून सांगायचे असले तरी प्रतिमा-प्रतिकांचा बेमालूम वापर होणे आवश्यक असते. प्रतिमा-प्रतिके वाचकांना आपलीशी वाटणे आवश्यक असते.

बैलपोळ्यापाठ ये ,येवून जा गे मारबत
रोगराई संकटे घेऊन जा गे मारबत
द्रव्यलोभी, संधिसाधू, भामटे ने सोबती
जनहिता जे चांगले ठेवून जा गे मारबत
        
        मारबत ही १४० वर्ष जुनी असलेली एक खास नागपुरी आदिवासी लोकपरंपरा आहे. पोळ्याच्या दुस-या दिवशी  मारबत आणि बडग्याचा उत्सव असतो. या निमित्ताने समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर करण्याचे साकडे मारबतीला घालण्यात येते. या उत्‍सवात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मुद्यांसह स्थानिक समस्यांवरही भाष्य करणारे फलक आणि सूचक ओळींनी जनतेच्या मनातला प्रशासनाच्‍या विरोधात राग आणि संताप व्यक्त होतो. दरवर्षी वर्षभरातील चर्चेचा विषय घेऊन बडग्या येत असतो. या परंपरेला पारसकारांनी आपल्या गझलेतून योग्यरीत्या हाताळले आहे. अशा लोकपरंपरेतील प्रतिकांबरोबरच ते इंग्रजी शब्दांचाही वापर आपल्या गझलेतून सुंदररीत्या करत असतात. गझलेचा उपप्रकार हझलही ते उत्तमरीत्या हाताळतात.    
  
          १९९० च्या दशकापासून गझल व काव्यलेखन करणा-या श्यामनाथ पारसकरांच्या नावावर ‘शांतीच्या माहेरी’, ‘उगम शोधाया प्रवाह निघाला’( १९८९) असे दोन काव्यसंग्रह आहेत. त्यांचा एक गझलसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. सोबतच त्यांनी 'शांतीसुधा' या अध्यात्म - मासिकाचे व ‘ब्र’ या अनियतकालिकाचे संपादनसुद्धा केले आहे. ते श्रीनाथबाबा शांतीमंदिर संस्थान हातरूण जि. अकोलाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. ‘हातरूणचे नंदादीप’ , ‘श्री यादवनाथ योगलीलामृत’ , ‘श्री. महादेवनाथ चरित्र ग्रंथ’ व अन्य ८ लघुग्रंथांचे त्यांनी संपादन केले आहे. आकाशवाणीद्वारे त्यांचे विचार - चिंतन, प्रसंग विशेष सातत्याने प्रसारित होत असतात. 

श्यामनाथ पारसकरांची एक गझल - 

नालायकीपुढे तू करणार काय बाबा?
सत्ता मुजोर तेथे लाचार न्याय बाबा.

त्या थोर पुस्तकांनी तत्त्वे कुठे हरवली?
सत्त्वास राखण्याचा नाही उपाय बाबा.

जगण्यास मोल कवडी, अब्रूस कोण गणतो
ठरते समानताही व्यक्तीनिहाय बाबा.

जातींमधेच सारे बांधव विभागले तर
ठरणार त्या प्रतिज्ञा अर्थाशिवाय बाबा.

स्वातंत्र्य लाभल्याला झालीत सात दशके,
शोधून काढ कोठे त्याची सराय बाबा.

मौनास जुंपल्याने चाले बरे सुशासन,
बघ हाय-फाय बनले ते वाय-फाय बाबा.

( श्यामनाथ पारसकर, अकोला, ९४२२९१९५११)
.......................
अमोल शिरसाट
अकोला

४ टिप्पण्या:

  1. वाह! अप्रतिम लेख. श्री श्यामनाथ पारसकर यांच्या अध्यात्मिक आणि वाड्·मयीन कार्याचा उत्तम आढावा. मारबत या आदिवासी लोकपरंपरेचा उल्लेख उन्नयन साधणारा.👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. वाह! अप्रतिम लेख. श्री श्यामनाथ पारसकर यांच्या अध्यात्मिक आणि वाड्·मयीन कार्याचा उत्तम आढावा. मारबत या आदिवासी लोकपरंपरेचा उल्लेख उन्नयन साधणारा.👌👌

    उत्तर द्याहटवा