२१ फेब्रुवारी, २०२२

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी


                हजारो मैलांचा प्रवास आणि अनेक स्थित्यंतरे पार करत गझल अनेक भारतीय भाषांमध्ये रुजली ,फुलली, बहरली. ज्या भाषेत गेली त्या भाषेची पट्टराणीच झाली. जगाचा फार मोठा भूभाग गझलेने काबीज केला आहे. जगभरात वर्षानुवर्षे अनेकदा सत्तांतर झाले पण गझलेने मात्र शतकानुशतके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मराठी गझलेने सुद्धा महाराष्ट्राला गेल्या अनेक दशकांपासून वेड लावले आहे. मराठी गझलेचे खलिफा म्हणून ज्यांची ओळख आहे असे सुरेश भट यांना मराठी मातीत गझल रुजविण्याचे श्रेय जाते.


मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या तू जिवाला गुंतवावे

लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी की
राजसा, माझ्यात तू अन्‌ मी तुझ्यामाजी भिनावे!

        अशा श्रृंगार रसाने ओतप्रोत भरलेला गझलेचा प्याला त्यांनी मराठी रसिकांच्या हाती दिला. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी आपल्या रेशमी आवाजाने भटांच्या अनेक गझला रसिकांच्या मनात कायमच्या कोरून ठेवल्या. ‘केव्हा तरी पहाटे’,‘तरुण आहे रात्र अजुनी’, ‘सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या’ या गझला ऐकताना किंवा वाचताना असे वाटते की सुरेश भट म्हणजे मराठी काव्यसृष्टीला पडलेले एक सुंदर स्वप्नं होते. मृदूमुलायम भावनांबरोबरच त्यांच्या गझलेत व्यक्त होणारी सामाजिक जाणिव सुद्धा टोकदार होती.

साध्याच माणसांचा एल्गार येत आहे
हा थोर गांडूळांचा भोंदू जमाव नाही

                हा शेर आजही अनेक ठिकाणी वापरला जातो. संदर्भ बदलत असतील पण पहिल्या ओळीत व्यक्त झालेला साध्या माणसांचा एल्गार जिथे जिथे येतो तिथे या ओळी आपपोआपच आठवतात. दुस-या ओळीत आलेली ‘गांडूळांचा भोंदू जमाव’ ही संकल्पना समाजातील पांढरपेश्या प्रवृत्तींवर चाबकाच्या फटका-याप्रमाणे आहे. गझलेत ‘गांडूळ’ हा शब्द वापरल्यामुळे याच पांढरपेश्या प्रवृत्तींनी टिकाही केली. पण सुरेश भटांनी कोणाच्याही टिकेला भिक घातली नाही. ते आपल्या कैफात जगत राहिले.

माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

......हा ‘पेटण्याचा सोहळाच’ त्यांच्या गझलेला वेगळेपण प्राप्त करून देतो. ‘साधीसुधी ही माणसे, माझ्या कवित्वाची धनी’ असे जेव्हा ते म्हणतात तेव्हा पांढरपेश्या कविंसारखे आपल्या ए.सी.च्या खोलीत बसून लिहित नाहीत. त्यांच्या लेखणीला असलेली विद्रोहाची धार भिंतीवर शोपीस म्हणून लावलेल्या तलवारीसारखी नव्हती. शोषित पिडीतांचे दुःख त्यांनी जवळून अनुभवले होते. त्यामुळे त्यांच्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव पडला. पुढे त्यांनी बौद्ध धर्म देखील स्वीकारला होता. त्यांनी लिहिलेली ‘भीमवंदना’, ‘तुझाच गौतमा पडे’ ही गीते खूप गाजली.
                
                माधव जुलियन यांनी गझल हा काव्यप्रकार मराठीत आणला. त्यानंतर अनेक कविंनी गझल हाताळली. परंतू मराठी गझलेला खरे वैभव सुरेश भटांनीच प्राप्त करुन दिले. उर्दूत सुरुवातीला गझल म्हणजे प्रेयसी किंवा प्रेयसीविषयी असलेली बातचित असाच समज होता. प्रामुख्याने गालिबनंतर उर्दू गझलेला कोणतेही विषय वर्ज्य राहिले नाही. भटांनी देखील शृंगाराबरोबरच सामाजिक, राजकीय विषय तितक्याच ताकदीने मांडले. गझल हा एक प्रभावी काव्यप्रकार आहे. ‘गझल लिहिणारा आधी उत्तम कवि असला पहिजे.’ भट हे एक उत्तम कवि तर होतेच पण महाराष्ट्रातल्या शेकडो कविंना गझल लेखनासाठी प्रेरीत कराणारे गझल प्रवर्तक सुद्धा होते. त्यांनी आयुष्यभर गझल चळवळ राबिविली. आज मराठी गझलेचा वटवृक्ष डौलदार झाला आहे याचे श्रेय गझल सम्राट सुरेश भटांनाच जाते.
भट साहेबांची एक ह्रदयस्पर्शी रचना ...

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन् अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कसा होतो मलाही आठवावे लागले !

पांगळे आयुष्य थकुनी बैसले वाटेवरी
जागच्या जागीच मजला परत यावे लागले !

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !
(सुरेश भट)


-अमोल शिरसाट

#अजिंक्यभारत #गझलयात्रा #मराठीगझल #सुरेशभट #Gazal #अमोलशिरसाट