९ जून, २०२१

मला आनंद याचा की मला गणवेश मिळतो

      
        स्थळ, काळ आणि परिस्थिती कवीचे अनुभवविश्व निश्चित करत असते. या अनुभवविश्वात त्याची कविता आकाराला येते. कवी माणूस म्हणून जन्माला येतो. इतर माणसांप्रमाणेच त्याचे आयुर्मानही निश्चित असते पण त्याच्याकडे असलेली स्थळ, काळ आणि परिस्थितीच्या पलिकडे पाहण्याची प्रतिभा त्याला अनेक शतकांपर्यंत जिवंत ठेवते. मानवी मूल्यांच्या मुळाशी जाण्याची ओढ ही त्याच्या प्रतिभेचा गाभा असते. तसं पाहिलं तर आजवर मानवी मुल्यांसाठी धडपडणा-या प्रत्येकाचीच जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली आहे. तुम्ही किती जगलात हे कधीच महत्वाचे नसते. मग काय महत्वाचे आहे? 

मी किती जगलो नव्हे तितके महत्त्वाचे
राहिलो आहे किती लक्षात लोकांच्या
   
           गझलकार राजीव मासरूळकर यांच्या उपरोक्त शेराप्रमाणे तुम्ही लोकांच्या किती लक्षात राहिलात हेच महत्वाचे आहे. बुलढाणा जिल्ह्यात असलेल्या मासरूळ या छोट्याशा गावातून आलेल्या राजीव मासरूळकर यांनी सुद्धा लोकांच्या लक्षात राहील असेच काम केले आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. हातमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढताना त्यांच्या आई-वडीलांची प्रचंड ओढाताण होत असे. घरात सर्वात लहान असलेला राजु सर्व परिस्थिती डोळे उघडे ठेऊन पहात होता. त्यामुळे नकळतपणे लहान वयातच जबाबदारीची जाणीव रुजत गेली. कोवळ्या वयात आलेल्या मोठेपणाने कोणत्या मार्गाने जायचे आहे हे आधीच निश्चित केले होते. बारावीनंतर लगेच डी.एड. करून राजीव मासरूळकर यांनी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी मिळवली आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पुढे शिक्षकी पेशावर समाधान न मानता सरळ सेवा भरतीची परीक्षा देऊन शिक्षण विस्तार अधिकारी पद प्राप्त केले. कुठलीही शिफारस किंवा पैसा खर्च न करता आपल्या क्षमतेच्या जोरावर शेतमजूर असलेल्या आई-वडिलांचा लाडका राजू ‘साहेब’ बनला. राजीव मासरुळकर यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. जबाबदारीच्या जाणीवेला मनाची संवेदनशीलता बळ देत असते. शालेय जीवनापासूनच राजीव यांच्या संवेदनशील मनाने आपल्या भावनांना कवितेतून वाट मोकळी करून दिली. गझलेतून तर त्यांनी आपल्या ‘आपबिती’ला ‘जगबिती’ बनवले आहे.      
 
ईश्वरा हातून थोडी चूक झाली
पोट छोटे, फार मोठी भूक झाली

       गझलेचे खरे यश विशिष्टाकडून सामान्याकडे जाण्यामधे असते. एखाद्या शेरामधे व्यक्त झालेला व्यक्तीचा विशिष्ट अनुभव इतरांनाही आपलाच आहे असे जेव्हा वाटते तेव्हा तो शेर एखाद्या वैज्ञानिक संशोधना सारखाच असतो. मानवी भावना आणि जीवनाचे तत्त्वज्ञान वैज्ञानिक नियमांसारखे शेरांमधे प्रस्थापित झाले तर त्या शेरांना सुभाषितत्व प्राप्त होते. आपली प्रतिभा पणाला लावून जेव्हा एखादा गझलकार असे वैज्ञानिक नियम आपल्या शेरांमधून मांडू पाहतो तेव्हा आपोआपच शेराप्रमाणे तोही मोठा होतो. गझलकार राजीव मासरूळकर यांची प्रतिभा आणि क्षमता यामुळे त्यांचा प्रवास सामान्याकडून विशेष व्यक्तीकडे झाला असला तरी त्यांना मात्र आपलं सामान्यत्वंच प्रिय आहे.        
बरा होतो दगड निश्चिंत रस्त्याच्या कडेला मी
कुणी देवा मला शेंदूर नाहक फासला आहे?

        शेंदूर फासून एखाद्या दगडाचा देव करणे हे भारतात सरार्सपणे चालते. धोंड्याचा शेंदूर फासून देव करणे हा वाक्प्रचारही मराठी भाषेत वापरला जातो. याच आशयाची एक वेगळी अर्थछटा पकडून राजीव यांनी उपरोक्त शेर लिहिला आहे. हा शेर संदर्भ बदलून अनेक ठिकाणी वापरता येऊ शकतो. संदर्भ बदलूनही शेर जर चपखलपणे दुस-या परिस्थीत सुद्धा सहजपणे बसू शकत असेल तर त्याला एकप्रकारे अनेकार्थता लाभते. हेच उत्तम शेराचे एक लक्षण आहे.  

सुंदर नसते कोणी, नसते सुंदर काही
आयुष्याचा तो तितका क्षण सुंदर असतो.

       या शेरात राजीव यांनी ‘सुंदर’ या शब्दाचा तीन वेळा वापर करून एक सुंदर आशय वाचकांपर्यंत पोहोचवला आहे. उपरोक्त शेर कशामुळे सुंदर झाला आहे? त्यात वापरलेल्या शब्दांमुळे की आशयामुळे? शब्द अणि आशय यांचं स्थान समतुल्य आहे. दोनपैकी एक घटक कधीच निवडता येणार नाही. यापेक्षा आणखी महत्वाचा एक घटक हा आहे की तो शेर वाचकांशी Connect होतो का? चांगला शेर वाचकांशी जोडला जाणे अत्यंत महत्वाचे असते. चांगला शेर म्हणजे काय? याची कुठलीच व्याख्या करता येत नाही. चांगल्या शेराची लक्षणे मात्र सांगता येऊ शकतील. त्यापैकी वाचकांशी जोडले जाणे हे प्रमुख लक्षण नक्कीच सांगता येईल. उपरोक्त शेरात राजीव यांनी सुंदर काय असते हे सांगितले आहे. उत्तम शेराची जशी व्याख्या करता येत नाही तशीच सौंदर्याची देखील व्याख्या करता येत नाही. जम्मूकाश्मीरला पृथ्वीवरचा
मानले जाते. अर्थात हे ठिकाण स्वर्गासारखे आहे हे बाहेरच्या लोकांना वाटते पण तिथे राहणा-या लोकांना कदाचित थरचे वाळवंट किंवा मुंबईसारखे शहर सुद्धा स्वर्गासारखे सुंदर वाटू शकते. असे असले तरी एखादी वस्तू सुंदर आहे किंवा नाही हे जास्तीत जास्त लोकांच्या मतावरच निश्चित होत असते.       
   
         मुळात एक हाडाचा शिक्षक असलेले राजीव मासरूळकर शिक्षण खात्यात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे ‘ Right man on the Right job’ असे आपल्याला सहजपणे म्हणता येईल. स्वतः एक शिक्षक असल्यामुळे शिक्षकांच्या अ‍डचणी आणि मर्यादांची त्यांना चांगली जाणीव आहे. अडचणी आणि मर्यादांच्या पलिकडे जाऊन शिक्षणाचे स्वरूप विद्यार्थीकेंद्रित कसे होईल यासाठी ते प्रयत्न करत असतात. सोबतच त्यांची संवेदनशीलता त्यांना वेळ मिळेल तेव्हा शब्दांमधून व्यक्त होण्यासाठी प्रेरित करत असते. त्यांची कविता अत्यंत साधी आणि सहज असते. त्यांची सामाजिक जाणीव अनेक कवितांमधून प्रकर्षाने व्यक्त होत असते. त्यांच्या कवितेत असलेली सामाजिक जाणीव, साधेपणा आणि सहजता त्यांच्या गझलेत उतरली तर त्यांची गझल अधिक परीणामकारक होऊ शकते. मासरूळकरांचे ‘मनातल्या पाखरांनो’ (२००६) व लॉकडाऊनच्याकाळातील विदारक अनुभव व्यक्त करणारा ‘अस्वस्थ वर्तमानाचा आक्रोश’ (२०२१) असे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांचा गझलसंग्रह देखील प्रकाशनाच्या मार्गावर आहे. 

   राजीव मासरूळकरांची एक गझल 

कुठे स्वातंत्र्य आल्यावर कुणाला देश मिळतो
मला आनंद याचा की मला गणवेश मिळतो

दिलेले काम तो करतो निमुट बैलाप्रमाणे
मिळत काहीच नाही, बस नवा आदेश मिळतो

इथे सर्वस्व लावावे पणाला लागते बघ
तरी केवळ सुखाचा खिन्नसा लवलेश मिळतो

किती आटापिटा केलाय बोलायास आपण
अता एकाच क्लिकवर आतला संदेश मिळतो
 
स्वत:सोबत अनेकांचे मरण तात्काळ दिसते
अशावेळीच जगण्याचा खरा उद्देश मिळतो

मला मी शोधतो आहे कधीचा पण मिळेना
कधी राजू; कधी राजीव वा राजेश मिळतो
( राजीव मासरूळकर, औरंगाबाद, ९४२३८६२९३८)
....................
अमोल शिरसाट
९०४९०११२३४

५ टिप्पण्या: