जगभरातील साहित्यात विविध प्रवाह आहेत. पण प्रामुख्याने कलेसाठी कला की जीवनासाठी कला असे दोन भेद केले जातात. साहित्यातील सर्व प्रवाह या दोन गटांमधे विभागले जाऊ शकतात. मात्र आजघडीला तरी मराठी गझलेत असे गट करणे शक्य नाही. परंतु मराठी गझलेतील सामाजिकता हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरू शकेल. सुरेश भट आणि त्यानंतरच्या काळातील अनेक गझलकारांनी त्यांच्या गझलेत सामाजिक आशयाबरोबरच विद्रोह देखील ताकदीने मांडला. इ.स.२००० नंतर उदयाला आलेल्या नव्या पिढीतल्या गझलकारांच्या गझलेत देखील सामाजिक भान आणि विद्रोहाची धार दिसून येते. त्यापैकीच एक गझलकार म्हणजे यवतमाळचे किरणकुमार मडावी. ते आदिवासी जाणिवांबरोबरच विविध विषय आपल्या गझलेत ताकदीने मांडत आहेत. ( जन्म – ७ जून ’८२)
......................
मराठीत आज अनेक साहित्यप्रवाह अस्तित्वात आहेत. प्रत्येक प्रवाहाने स्वतःभोवती स्वतःचे रिंगण आखलेले आहे. तशाच प्रकारचा प्रयत्न मराठी गझलेत देखील सुरू आहे. पण गझल या काव्यविधेचे वैशिष्ट्य असे आहे की गझलेतला एक शेर म्हणजे स्वतंत्र कविता असते. त्यामुळे त्या गझलेतला कोणताही एक शेर परिस्थितीनुसार वेगळा काढून वाचता येऊ शकतो. प्रेमभावना व्यक्त करणा-या एखाद्या गझलेत सामाजिक आशयाचा शेर सुद्धा येऊ शकतो आणि सामाजिक आशय व्यक्त करणा-या गझलेत नाजूक प्रेमभावना व्यक्त करणारा एखादा शेरही असतो. शेवटी प्रवाह कोणताही असो त्याच्या मुळाशी मानव्य असणे गरजेचे आहे. गझलकार किरणकुमार मडावी व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यामुळे त्यांच्या गझलेत इंडीयातल्या ग्रामीण भारताचे चित्र उमटत असते. उन्हातान्हात मातीमधे राबत असताना मातीत पेरलेल्या बियाण्याबरोबरच त्यांची गझलही फुलते.
नविन आयुष्याची माझ्या दिशा रेखतो आहे
या मातीच्या गर्भामध्ये जीव पेरतो आहे
शेतकरी शेताची पेरणीपूर्वी मशागत करतो. पावसाची चाहूल लागताच मातीमधे बियाणे पेरतो. बियाणे पेरल्यानंतर तर त्याचे काम अधिकच वाढलेले असते. रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून तो त्या बियाण्याची निगा राखतो. मातीमधे पेरलेल्या बियाण्याची जशी काळजी घ्यावी लागते तितकीच काळजी गझलेच्या शेरात शब्द पेरताना घ्यावी लागते. किरणकुमार वेळोवेळी तशी काळजी घेण्याचा प्रयत्न करताना दिसतात. शेतक-यांचे प्रयत्न प्रत्येकवेळी सफल होतातच असे नाही. किरणकुमारांना निर्सगाने दगा दिला तर गझलच पहिल्यांदा त्यांच्या दुःखात वाटेकरी बनते. गझल त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून राहिली आहे. -
पापण्यांचे हे असे मजबूर असणे
कठिण आहे, जवळ असुनी दूर असणे
मोल जर का लाभले नाही धडाचे,
फायद्याचे काय कोहीनूर असणे?
नैसर्गीक संकटांना तोंड देत शेतकरी मोत्यांचे दाणे मातीत पिकवतो. त्याला फार मोठ्या फायद्याची अपेक्षा नसते. पण तरीही त्याला वंचनेलाच तोंड द्यावे लागते. त्याने पिकवलेल्या मोत्यांच्या दाण्यांना रास्त भाव तर सोडाच पण त्याच्याच हातावर तुरी देण्याचा प्रकार सुरू आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशात मात्र शेतक-यांना मात्र कितीतरी सुविधा उपलब्ध आहेत. शेतमालाच्या निर्यातीसाठी शेतापर्यंत रेल्वेचे रूळ अमेरिकेत अस्तित्वात आहेत. जेणेकरून शेतक-यांना आपल्या मालाची वाहतुक कमी कालावधीत बाजारपेठेपर्यंत करता यावी, प्रसंगी निर्यातही करता यावी. भारतात मात्र सर्व योजना अजूनही कागदावरच आहेत. तेव्हा किरणकुमार मडावींमधला व्यवस्थेविरुद्ध बोलणारा बंडखोर गझलेतून बोलतो.
भाकरीच्या योजनेवर हे उभे झाले महल,
अन् इथे रस्त्यात मेल्या, कोवळ्या सा-या भुका!
गरिबांना दोन वेळची भाकर मिळण्याच्या योजनेसाठी संसदेची महिनोमहिने अधिवेशनं चालतात. चर्चा होतात. वादविवाद होतात. गदारोळ होतो. पण शेवटी काय घडते? कोट्यावधी रुपये खर्च करून केलेल्या चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही. तेव्हा हा सारा नुसताच टाईमपास आहे की काय असे किरणकुमारांना वाटू लागते -
प्रश्नास उत्तराचा लागून ध्यास आहे...
नुसताच संसदेचा टाईमपास आहे
सत्तेत संधिसाधू आली जमात सारी,
अमुचे भकास असणे त्यांचा विकास आहे!
खरंच सामान्य माणसाला भकास ठेवणं हाच खरा एसीत बसलेल्यांचा विकास असावा असे वाटते. किरणकुमार यांच्या गझलेतली विद्रोहाची धार अत्यंत तीक्ष्ण आहे. व्यवस्थेला आरसा दाखवण्याची ताकद त्यांच्या शब्दात आहे.
माणसांना त्रास मरणाचा जिथे आहे सुरू..!
काय तो बनणार मित्रा देश विश्वाचा गुरू..!
काढतो एसीत नुसती काय तू टिपणे तिथे,
ये जरा शेतात आणिक लाग तू नांगर धरू..!
एसीत बसून नुसतीच टिपणे काढणा-यांना हातात नांगर कसा धरावा हे कुठे माहित आहे? देशाची शोकांतिका ही आहे की दहावी नापास लोक देशाचे शिक्षणमंत्री बनतात, अंगठाबहाद्दर कृषीमंत्री बनतात, दंगलीचे गुन्हे दाखल असलेले गृहमंत्रीच काय पंतप्रधानदेखील बनू शकतात. या गडबडीत सामान्य माणसांचा त्रास मात्र वाढतच चालला आहे. असा देश विश्वगुरू बनु शकेल काय?
किरणकुमार मडावी आधी गझल जगतात नंतर ती कागदावर उतरते हे त्यांच्या गझलेचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. आपले जीवनानुभव मांडत असताना भाषेचे बारकावे आणि खरेखुरे संदर्भ गझलेत टिपता यायला हवेत. किरणकुमारांच्या -
या दिशेने तुम्ही भेटण्या या मला,
पायवाटेत मी मुरमुरे फेकले.
किंवा
हुरडा फुकेच सारे झाले कसे जमा हे?
हा प्रश्न हरभ-याला; भीती गव्हास आहे!
या सारख्या शेरांचे वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी भाषेचे बारकावे आणि खरेखुरे संदर्भ अलगदपणे टिपले आहेत. पहिल्या शेरात अंत्ययात्रेमधे फेकले जाणारे 'मुरमुरे' त्यांनी चपखलपणे बसवले आहेत. दुसरा शेर ग्रामीण प्रतिमा-प्रतिकांच्या आधारे राजकीय नेत्यांवर ताशेरे ओढणारा आहे. 'हुरडा फुके' हे विशेषण अचूकपणे बसवले आहे. अशा प्रकारे बोलचालीतील भाषेचे बारकावे आणि खरेखुरे संदर्भ किरणकुमारांनी त्यांच्या गझलेत अधिकाधिक योजले तर त्यांची गझल अधिक बहरून येईल.
गझलकार किरणकुमार मडावी यवतमाळ जिल्ह्यातील मोहोदा या छोट्याशा गावात राहतात. त्यांच्याकडे वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. त्यांनी कला शाखेतून स्नातक पदवी प्राप्त केलेली आहे. कुटुंबाला आधार देण्यासाठी लवकर नोकरी मिळावी याकरीता त्यांनी आय.टी.आय.चे काही कोर्सेसही केले. स्पर्धा परिक्षाही दिल्या. सुंदर हस्ताक्षराचे धनी असलेल्या किरणकुमारांच्या वळणदार अक्षरांची स्तुती मुलाखतींमधे सुद्धा अनेकदा झाली. परंतु नोकरी मात्र मिळाली नाही. नाईलाजास्तव त्यांनी शेती व्यवसाय स्वीकारला. त्यांच्या संवेदनशील मनाला गझल वेळोवेळी आधार देत राहिली पण शब्दांनी पोट भरत नाही ना! म्हणूनच ते कधी कधी असाही शेर लिहून जातात -
गझला इथे विकाया जर काढल्या कधी मी,
घरट्यातल्या पिलांना येईल काय चारा..!
किरणकुमार मडावींचे गझल मुशाय-यात सादरीकरण दमदार असते. व्याकरणाच्या काही छोट्या-मोठ्या चुका असल्या तरी त्यांची भावोत्कटता त्या चुकांकडे दुर्लक्ष करायला भाग पाडते. त्यांचा 'जिंदगी भाकरीच्या दबावात आहे' हा गझलसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.
किरणकुमार मडावींची एक गझल
आहेच काय बाकी होळी करायला?
कुठले पुरण मिळावे पोळी करायला?
तू दान हासण्याचे पदरात टाक ना
लावेन जिंदगीला झोळी करायला!
सारा विचार-गुंता, चिंताच मस्तकी
हा लागलाच जाळे कोळी करायला.
येते जशी सुखाची एखाद ही हवा,
ही लागतात दुःखे टोळी करायला.
शब्दात मावले ना सारेच अर्थ जर
येतात आसवे मग ओळी करायला
(किरणकुमार मडावी, ८८०६१२२४०९)
........................
अमोल शिरसाट
९०४९०११२३४
अप्रतीम सर खुपच छान मांडणी केली
उत्तर द्याहटवाWah khup sundar
उत्तर द्याहटवावाह...
उत्तर द्याहटवा