१६ जून, २०२१

स्वतःचा शोध घेताना बघ्यांचा घोळका झालो


                   काव्यनिर्मितीमागची प्रेरणा आणि प्रयोजन काय असते? याविषयी आजवर अनेक अभ्यासकांनी आपली मते मांडली आहेत. पण याचे नेमके उत्तर आजही सापडलेले नाही. मानसशास्त्रज्ञ कवितेची निर्मिती प्रकट आणि अप्रकट मनाचा खेळ मानतात. तर समाजशास्त्रज्ञांना कविता म्हणजे भोवतालच्या परिस्थितीविषयीची प्रतिक्रीया वाटते. साहित्याच्या अभ्यासकांनी सुद्धा अनेक मते मांडलेली आहेत. पण माणूस कविता का लिहितो आणि वाचतो याचे नेमके कारण सांगता येऊ शकलेले नाही. 
..................................................................  
                           एकवेळ माणूस कविता का वाचतो याची कारणे सांगता येऊ शकतील. काही लोक मनोरंजनासाठी कविता-गझल वाचतात. काही लोकांना काहीतरी बोध घ्यायचा असतो. काहींना जीवनाचा अर्थ समजून घ्यायचा असतो. अशी अनेक प्रयोजने सांगता येतील. लिहीण्यामागचे प्रयोजन काय असते याचे एक कारण हे आहे की काव्यनिर्मितीतून कवीला आनंद मिळतो. त्यामुळेच काही कवी आम्ही स्वतःसाठीच लिहितो असे सांगतात. त्यांची काव्यनिर्मितीमागची भूमिका स्वांतसुखाय असली तरी जगातल्या कोणत्याही कवितेत आणि काव्यप्रकारात नक्कीच निवेदक असतो. निवेदक आला की संवाद आलाच! संवाद कधीही एका पेक्षा अधिक व्यक्तींमधे होतो. एकट्याने एकट्याची कविता लिहीली तरी देखील वाचक जोपर्यंत ती वाचत नाही तोपर्यंत तिला पूर्णत्व येऊच शकत नाही. गझलेला तर वाचणा-यापेक्षा प्रत्यक्ष समोर बसून ऐकणारा दिलदार रसिक हवा असतो. 

मलाही ओळखू शकलो न मी गर्दीत दुनियेच्या
स्वतःचा शोध घेताना बघ्यांचा घोळका झालो.

           हा बोरिवलीच्या गझलकार सुधीर मुळीक यांचा शेर वाचताना प्रथम हा शेरातल्या निवेदकाने स्वतःशी साधलेला संवाद वाटतो. परंतु अधिक खोलात गेले तर असे दिसून येते की शेरातला निवेदक दुनियेच्या गर्दीत हरवून गेलेला आहे. तो स्वतःला दुनियेच्या नजरेने बघताना बघ्यांच्या घोळक्याचाच एक भाग बनून राहिला आहे. इतरांची मतं त्याने स्वतःच्या शरीराभोवती इतकी चिकटवून ठेवली आहेत की आता तो स्वतःला देखील ओळखू शकत नाही. या सर्व गोष्टी तो शेरात कथन करतो. त्याच्यावर जे बेतलं आहे ते त्याला त्याच्या काळजाच्या जवळ असणा-या लोकांना सांगायचं आहे. 

जखमाही दिलदार निघाल्या
खपल्या वारंवार निघाल्या
मी वांझोटा ठरण्याआधी
चार व्यथा गर्भार निघाल्या

   या सुधीर मुळीक यांच्याच ओळींमधे ‘मी’ असा उल्लेख आला आहे. मग हा ‘मी’ म्हणजे कोण? तुम्ही म्हणाल मी म्हणजे नक्कीच सुधीर मुळीक! नाही! मग कोण? तर या शेरातला मी म्हणजे निवेदक. निवेदक त्याच्या भावना शब्दांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवतो. वाचकाला त्या भावना जेव्हा आपल्याच आहेत असे जेव्हा वाटू लागते तेव्हा शेरातला मूळ निवेदक लोप पावतो आणि त्या निवेदकाची जागा वाचकच व्यापून टाकतो. मूळ निवेदकाला तिथे जागाच उरत नाही. मानवी अंतरंग उजळून टाकण्याचे सामर्थ्य उत्कृष्ट गझलेमधे असते. गझलेने वाचकांच्या जाणीवा सखोल होत जातात, अनुभुतीचे क्षितिज रुंदावत जाते. सुधीर मुळीक यांच्याप्रमाणेच अनेक गझलकारांचे शेर वाचताना किंवा ऐकताना काहीतरी नवे लाभल्याचे समाधान वाचकांना होते. हे समाधान त्यांना एका अपूर्व आनंदात घेऊन जाते. त्यामुळेच मराठी जनमानसात गझल खोलवर रुजत चालली आहे. 

हवी तर गाळतो थोडी तुझ्या हिश्श्यातली पाने
तुझ्या माझ्यातला किस्सा नको वगळायला सांगू ..

          या शेरात एका किस्स्याचा उल्लेख आला आहे. हा किस्सा ‘तुझ्या-माझ्यातला’ आहे असे म्हटले गेले आहे. म्हणजे नकी कोणामधला आहे? सुधीर आणि त्यांच्या एक्स-प्रेयसीमधला आहे का? यावेळी सुद्धा उत्तर नाही असेच आहे. हा किस्सा कोणामधलाही असू शकतो. यावेळी निवेदकाचा संवाद त्याच्या प्रेयसीसोबत सुरु आहे. पण केवळ प्रेयसीलाच तो शेर ऐकवायचा नसून तो रसिकांसाठी सुद्धा आहेच. सुधीर मुळीक यांचा आणखी एक शेर असा आहे की, 

चौपाटीवर भेटुन बोलूया का पुढचे ?
फेसबूकवर फोटो पाहुन भागत नाही !

  नव्या प्रतिमा घेऊन येणारा हा शेर तंत्रस्नेही प्रेमी जिवांना नक्कीच जवळचा वाटेल. या शेरामुळे या फेसबुक, चौपाटी आणि ते दोघे डोळ्यांसमोर उभे राहतात. एक जिवंत प्रसंगच डोळ्यांपुढे उभा राहतो असे म्हणा ना! मग हा प्रसंग खरा असेल का? हाही प्रश्न पडू शकतो. पण या प्रसंगाला वास्तवाचा आधार असला तरी गझलकाराने निर्माण केलेले कल्पनारंजनच आहे. सुधीर मुळीकांसारखा गझलकार आपल्या दोन ओळींच्या शेरात आपल्या प्रतिभाबलाने एक सृष्टीच निर्माण करतो. रसिकांना त्या सृष्टीसोबत एकरूप व्हायला भाग पाडतो. खरं म्हणजे कल्पनेने निर्माण केलेली सौंदर्यसृष्टी अनुभवणे ही मानवी मनाची गरजच आहे. सुधीर मुळीक यांच्या गझलेत अनोखे वास्तवाचे भान असलेले कल्पनारंजन आहे. लेखनाबरोबरच त्यांचे सादरीकरणही दमदार असते.

         आपल्या पिढीतल्या अनेक कवींना गझलेच्या मार्गावरून अपूर्व अनुभूतीच्या प्रवासाला आपल्यासोबत घेऊन जाणा-या सुधीर मुळीक यांनी २००७ पासून गझललेखन सुरू केले. ‘ऑर्कूट’वर त्यांनी आपल्या काही मित्रांना सोबत घेऊन ‘काव्यांजली’ नावाचा समूह सुरू केला होता. या समूहावर अनेकदा कवितालेखनाविषयी प्रदीर्घ चर्चा चालत. यातून स्वतः शिकत सुधीर मुळीकांनी इतरांना सुद्धा लिहिते केले. याबरोबरच शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांनी स्थापन केलेल्या ‘सुरेश भट गझल मंच’मधे त्यांचा स्थापनेपासून मोठा सहभाग आहे. या मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रभरात आयोजित ‘गझलरंग’च्या मुशाय-यांनी शंभरी गाठली आहे. सुधीर मुळीक यांचा ‘सदरा कफल्लकाचा’ हा संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे.      

सुधीर मुळीक यांची एक गझल - 

आजन्म घेत आलो अंदाज घोळक्याचा
गर्दीत कोण माझे मी नेमका कुणाचा ?

या सर्कशीत बसलो हरवून चेहरा मी
नंतर दिला जगाने दर्जा विदूषकाचा

तू मनमुराद हसली नसतीस या व्यथेवर
जर ऐकलास असता गोंगाट आसवांचा

मी भरजरी सुखाच्या भिरकावल्यात चिंध्या
तेव्हा कुठे मिळाला सदरा कफ़ल्लकाचा

आता अशाच एका आशेवरी जगूया
असणार फार सुंदर शेवट कथानकाचा

(सुधीर मुळीक, बोरिवली, ७०२१६५१६१७)
.............................
अमोल शिरसाट
अकोला
9049011234

६ टिप्पण्या:

  1. खुप सुंदर लेखन केले आहे...
    हार्दिक अभिनंदन....

    उत्तर द्याहटवा